Saturday, December 19, 2009

अन्नयोग फळे

उन्हाळ्यात येणारी फळे रसरशीत असल्यामुळे तहान शमविण्यास मदत करणारी असतात, तर हिवाळ्यातील फळे ताकद वाढविणारी असतात.

ऋतुनुरूप फळे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते. अमुक ऋतूत अमुक फळे येण्यामागे निसर्गाची काही योजना असते. उदा.- उन्हाळ्यात येणारी फळे रसरशीत असतात, त्यामुळे तहान शमविण्यास मदत करणारी असतात. हिवाळ्यातील फळे ताकद वाढविणारी असतात. सध्या फळे किंवा फळांचे रस साठवून वर्षभर सेवन करण्याची पद्धत प्रचलित होत असली, तरी उन्हाळ्यातील फळे उन्हाळ्यात जितकी चांगल्या प्रकारे पचतात तशीच ती पावसाळ्यात पचतील, असे नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

कलिंगड
उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर कलिंगडे येतात.
कालिंगं शीतलं बल्यं मधुरं तृप्तिकारकम्‌।
गुरु पुष्टिकरं ज्ञेयं मलस्तंभकरं तथा।।
कफकृत्‌ दृष्टिपित्ते च शुक्रधातोश्‍च नाशकम्‌।।
...निघण्टु रत्नाकर
रस - मधुर,
गुण - गुरू म्हणजे पचायला जड
वीर्य - शीतल
दोष - कफकारक, पित्तनाशक
कलिंगडाने तृप्ती होते, ताकद वाढते, शरीर पुष्ट होते; मात्र अधिक प्रमाणात कलिंगड खाल्ल्याने मलप्रवृत्ती घट्ट होऊन अवरोध होऊ शकतो, दृष्टी कमी होऊ शकते व शुक्रधातूचाही नाश होऊ शकतो. उन्हाळ्यात घाम अधिक येण्याने शरीरातील द्रव प्रमाणापेक्षा कमी होण्याची शक्‍यता असते. कलिंगडात भरपूर द्रव असल्याने उन्हाळ्यात अधूनमधून कलिंगड खाणे उत्तम असते. उन्हाळ्यात अंगाचा दाह होत असल्यास कलिंगड खाल्ल्यानंतर सालीला लागून असलेला पांढरा गर चोळल्याने बरे वाटते. उष्णतेमुळे त्वचेवर येणारे रॅशेसही कमी व्हायला मदत मिळते.

खरबूज
कलिंगडापेक्षाही खरबूज अधिक गोड असते.
पक्वं तु खर्बुजं तृप्तिकारकं पौष्टिकं मतम्‌।
कफकृन्मूत्रलं बल्यं कोष्ठशुद्धिकरं गुरुः।।
स्निग्धं सुस्वादु शीतं च वृष्यं दाहश्रमापहम्‌ ।।
वातं पित्तं तथोन्मादं नाशयेदिति च स्मृतम्‌ ।।
...निघण्टु रत्नाकर
रस - अतिशय मधुर
गुण - गुरू म्हणजे पचायला जड, स्निग्ध
वीर्य - शीतल
दोष - वात-पित्तशामक, कफकर
खरबूज पौष्टिक असते. तृप्तिदायक असते, ताकद वाढवते, मूत्रप्रवृत्ती साफ होण्यास मदत करते, शुक्रधातूस पोषक असते, दाह व श्रमांचा नाश करते, उन्माद म्हणजे मनोरोगातही हितकर असते. लघवीला कमी होत असल्यास किंवा जळजळ होत असल्यास धने पूड व जिऱ्याची पूड टाकून खरबुजाचा पाव कप रस घोट घोट घेण्याचा उपयोग होतो. उन्हाच्या झळा लागल्या, तर खरबुजाचा रस अंगाला चोळण्याची व खरबुजाच्या बिया वाटून डोक्‍यावर लेप करण्याची पद्धत आहे. खरबूज; तसेच कलिंगड ही दोन्ही फळे व्यवस्थित पिकली असतानाच सेवन करायची असतात. कच्चे खरबूज चवीला कडू व आंबट लागते, तर अति प्रमाणात पिकले तर खारट बनते व उष्ण होते.

पिकलेली गोड करवंदे
करवंदांची काटेरी जाळी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
तत्पक्वं मधुरं रुच्यं लघु शीतं च पित्तहृत्‌।
रक्‍तपित्तं त्रिदोषं च विषं वातं च नाशयेत्‌।।
... निघण्टु रत्नाकर
रस - मधुर
गुण - लघू
वीर्य - शीतल
दोष - त्रिदोषनाशक, विशेषतः पित्त-वातशामक
करवंद रुचकर असतात. रक्‍तपित्त म्हणजे नाक-मुख-योनी वगैरे ठिकाणाहून रक्‍तस्राव होत असल्यास उपयोगी असतात, विष द्रव्यांचाही नाश करतात.

कच्ची करवंदे
करवंदे कच्ची असतानाही खाल्ली जातात. कच्च्या करवंदांचे लोणचे केले जाते.
करमर्दफलं चामं तिक्‍तं चाग्निप्रदीपकम्‌।
गुरु पित्तकरं ग्राहि चाम्लमुष्णं रुचिप्रदम्‌ ।।
रक्‍तपित्तं कफं चैव वर्धयेत्‌ तृड्व्व्विववनाशकम्‌।।
...निघण्टु रत्नाकर
रस - आंबट, कडवट
गुण - गुरू म्हणजे पचण्यास जड, ग्राहि म्हणजे मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारे
वीर्य - उष्ण
दोष - पित्तवर्धक, कफवर्धक
कच्ची करवंदे चविष्ट असतात, अग्नी प्रदीप्त करतात, तहान शमवते; मात्र अति प्रमाणात खाल्ल्यास नाक-मुख वगैरेतून रक्‍तस्राव होऊ शकतो.
पिकलेली करवंदे वाळवून ठेवण्याचीही पद्धत असते. वाळवलेल्या करवंदांचे गुण पिकलेल्या करवंदांप्रमाणेच असतात.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
--Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad