Tuesday, December 15, 2009

अन्नयोग : फळे

फळे नाजूक असतात किंवा टणकही. त्यांचा आकार, चव यातही खूप विविधता आहे. पण ती आरोग्यदायी असतात. ती धातुवृद्धी करतात, रोगपरिहार करतात आणि ताकद वाढवतात.

फळांची विविधता पाहून आश्‍चर्यचकित व्हायला होते. अंजीर, सीताफळासारखी काही फळे इतकी नाजूक असतात की झाडावरून काढून बाजारात नेईपर्यंत आणि बाजारातून घरी आणेपर्यंत तशीच्या तशी राहतीलच असे नाही. नारळ, फणसासारखी फळे मात्र बाहेरून इतकी टणक, कडक असतात की आतल्या गराला धक्काही लागणार नाही. आकार, चव, गुणधर्म सगळ्याच बाबतीत फळांमध्ये खूप विविधता असते. अन्नयोग मालिकेत आपण फळांची माहिती घेत आहोत

फणस
तत्पक्वं शीतले दाहि स्निग्धं वै तृप्तिकारकम्‌ ।धातुवृद्धिकरं स्वादु मांसलं च कफप्रदम्‌ ।।
बल्यं पुष्टिकरं जन्तुकारकं दुर्जरं वृषम्‌ ।वातं क्षतक्षयं रक्‍तपित्तं चाशु व्यपोहति ।।...निघण्टु रत्नाकर
* रस - मधुर,
* गुण - स्निग्ध व दुर्जर म्हणजे पचण्यास अवघड
* वीर्य - शीतल
* दोष - वातशामक व कफवर्धक
* फणस रुचकर असतो. फणस खाण्याने तृप्ती होते, फणस मांसधातू, शुक्रधातू वाढविण्यास मदत करतो, ताकद वाढवितो, वजन वाढवतो, क्षतक्षय, रक्‍तपित्त वगैरे रोगात हितकर असतो. अति प्रमाणात फणस खाण्याने जंत होऊ शकतात तसेच छाती-पोटात दाह होऊ शकतो.
* कापा व बरका अशा फणसाच्या दोन जाती असतात. कापा फणस गरे खाण्यासाठी वापरतात तर बरका फणस फणसपोळी, मुरंबा वगैरे करण्यासाठी वापरतात. फणसाची भाजी सुद्धा केली जाते.
* भूक लागत असली पण अशक्‍तपणा जाणवत असल्यास, वजन वाढत नसल्यास पिकलेल्या फणसाचे दोन - तीन गरे काळ्या मिरीचे चूर्ण लावून खाण्याचा उपयोग होतो.
* फणस पचण्यास जड असल्याने एका वेळेस जास्ती प्रमाणात खाणे चांगले नसते. भूक लागत नसल्यास, आतड्यांसंबंधित कुठलाही विकार झाला असल्यास तसेच खोकला, दमा, मधुमेह वगैरे कफदोषाशी संबंधित विकार झाला असल्यास, अंगावर सूज येत असल्यास फणस न खाणे चांगले. फणस खाल्ल्यावर पाणी वा दूध पिण्याने किंवा दही, श्रीखंडाबरोबर फणस खाण्याने किंवा रात्रीच्या वेळी फणस खाण्याने त्रास होऊ शकतो.
* कच्चा फणस खाण्याने मलप्रवृत्ती कडक होऊ शकते व वातदोषही वाढू शकतो. तेव्हा फणस पिकला की मगच खाणे उत्तम असते, तसेच अति पिकून लिबलिबीत झालेला फणस खाणे टाळणेच उत्तम.
फणसाच्या गऱ्यांप्रमाणेच गऱ्यांमधील आठळ्या खाता येतात.
तस्य बीजं तु मधुरं वृष्यं विष्टम्भकं गुरु ।...निघण्टु रत्नाकर
* रस - मधुर
* गुण - पचायला जड
* दोष - शुक्रधातूवर्धक
* फणसाच्या बियांमुळे मलप्रवृत्ती कडक होऊ शकते. तेव्हा मलावरोधाची प्रवृत्ती असणाऱ्यांनी फार प्रमाणात आठळ्या खाऊ नयेत.
* आठळ्या ओल्या असताना त्यांची चिरून भाजी करतात तर सुकल्या की भाजून ना उकडून खातात. भाजलेल्या आठळ्यांची भाजी करून खाण्याची पद्धत आहे.

सीताफळ
सीताफलं तु मधुरं शीतं हृद्यं बलप्रदम्‌ ।
वातलं कफकृत्‌ स्वादु पुष्टिकत्‌ पित्तशमनम्‌ ।।...निघण्टु रत्नाकर
* रस - मधुर
* वीर्य - शीतल, कफकर, वातवर्धक व पित्तशामक
* सीताफळ हृदयासाठी हितकर असते, ताकद वाढवते, वजन वाढण्यास मदत करते.
* अंगाचा दाह होत असल्यास पिकलेले सीताफळ योग्य प्रमाणात खाण्याचा उपयोग होतो.
* अग्नी, प्रखर प्रकाश ऊन वगैरेंच्या सहवासामुळे पित्त वाढून घसा व तोंड कोरडे पडते, तहान शमत नाही अशा वेळी दुपारच्या वेळी सीताफळ खाण्याचा उपयोग होतो.
* फणसाप्रमाणेच सीताफळही कफाचा त्रास असणाऱ्यांसाठी अनुकूल नसते. विशेषतः वारंवार सर्दी , खोकला, दमा, मधुमेह असणाऱ्यांनी, अंगावर सूज येत असल्यास सीताफळ न खाणे चांगले.

रामफळ
पक्वं रामफलं स्वादु मधुरं कफवातलम्‌ ।
अम्लं रुचिकरं दाहक्षुत्पित्तश्रमनुत्परम्‌ ।।...निघण्टु रत्नाकर
* रस - मधुर, किंचित आंबट,
* विपाक - मधुर
* दोष - कफवर्धक, वातवर्धक, पित्तशामक
* रामफळ रुचकर, दाह, भूक, श्रम यांचा नाश करणारे असते. सीताफळाचा गर पांढरा शुभ्र असतो तर रामफळाचा गर किंचित तांबूस व कणयुक्‍त असतो. सीताफळाप्रमाणेच रामफळही कफविकार असणाऱ्यांनी न खाणे चांगले होय.

डॉ. श्री बालाजी तांबे
--

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

ad