दूध पचणे महत्त्वाचे असते. दूध पचत नसेल तर आहार परिपूर्ण होण्यात मोठीच अडचण येईल. काही वेळा आपल्या आतड्यातील पाचक रसातील दोषांमुळे दूध पचत नाही.
लोह वगळता दुधातून आपल्या जीवनाला आवश्यक सर्व घटक मिळू शकतात. प्रथिने, मेद, कर्बोदके, जीवनसत्त्वे, क्षार या सर्वांचा दूध हा एक चांगला स्रोत असतो. ६०० मिलिलिटर दुधातून मानवाच्या गरजेतील ७/८ कॅल्शिअम, १/३ रायबोफ्लेविन, १/४ प्रथिने आणि १/५ जीवनसत्त्व "अ' उपलब्ध होते. उष्मांकदेखील चांगल्या प्रमाणात मिळतात. दुधातून केसीन नावाचे प्रथिन मिळते. जठरातील हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे ते गोठते. त्यामुळे दूध घेतल्यावर पोट भरल्याची भावना दीर्घकाळ राहते. केसीनमधून आपल्याला आवश्यक ती सर्व अमायनो ऍसिड्स (Essential Amino Acids) मिळू शकतात. शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी, पाचक रसांच्या उत्पादनासाठी, विविध अंतर्ग्रंथींच्या स्रावांच्या (Harmone) निर्मितीसाठी, रक्तातील प्रथिनांच्या बांधणीसाठी आणि अनेक विकर (Enzymes) तयार करण्यासाठी ही अमायनो ऍसिड्स आवश्यक असतात. यासाठी दूध पचणे महत्त्वाचे असते. दूध पचत नसले तर आहार परिपूर्ण होण्यात मोठीच अडचण येईल.
दूध न पचण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आपल्या आतड्यातील पाचक रसातील दोष असणे, हे होय. दुधामध्ये लॅक्टोज (Lactose) नावाची शर्करा असते. ही शर्करा ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज (Glucose & Galactose) या दोन शर्करांच्या रेणूंच्या संयोगातून बनलेली असते. मानवी आतड्यातून ग्लुकोज व गॅलॅक्टोज वेगवेगळे शोषले जाऊ शकतात; परंतु त्यांच्या संयोगाने निर्माण झालेला लॅक्टोज रेणू शोषला जाऊ शकत नाही. लॅक्टोजचे विघटन होणे आवश्यक असते. हे विघटन लहान आतड्यातील लॅक्टेझ (Lactase) नावाच्या विकराने होते. आतड्यात लॅक्टेझची निर्मिती पुरेशी झाली नाही, तर लॅक्टोजचे विघटन होत नाही. लॅक्टोज हा रेणू जसाचा तसा पुढे मोठ्या आतड्यात जातो. मोठ्या आतड्यातील जीवाणू (Bacteria) या लॅक्टोजच्या रेणूचे हायड्रोजेन, कार्बन-डाय- ऑक्साइड आणि शॉर्टचेन फॅटी ऍसिड्स या रेणूत विघटन करतात. लॅक्टोजचा रेणू लहान आतड्यातून पुढे जाताना
आपल्याबरोबर पाण्याचे रेणू नेतो. त्यामुळे जुलाब होणे, शौचाला भसर होणे, पोट फुगणे असे त्रास होऊ लागतात.
तीस टक्के भारतीयांमध्ये लॅक्टेझ पुरेशा प्रमाणात कार्य करीत नसावे, असा अंदाज आहे. काहींच्या आतड्याची जन्मतःच लॅक्टेझ तयार करण्याची क्षमता आनुवंशिकतेमुळे कमी असते. अनेकांच्या बाबतीत आतड्यात झालेल्या जीवाणू- विषाणू- एकपेशीय परोपजीवी जंतूंमुळे ही क्षमता कमी होते. आहारातील त्रुटीमुळे लॅक्टेझ तयार करण्याकरता लागणारी अमायनो ऍसिड्स मिळाली नाहीत तरीही हाच परिणाम होतो. आतड्यांच्या अस्तरातील पेशी लॅक्टेझ हे विकर तयार करतात. आतड्याचे अस्तर सतत नवे तयार होत राहते. अमायनो ऍसिड्स व इतर जीवनावश्यक अन्नघटक उपलब्ध झाले नाहीत तर हे अस्तर तयार होण्यात अडचण निर्माण होते. शिवाय इतर कोणत्याही कारणाने जुलाब होत राहिले तर लॅक्टोज पचविले जात नाही. लहान मुलांना अनेक कारणांमुळे जुलाब होणे संभवते. कारण कोणतेही असले तरी जुलाब होत असणाऱ्या अर्भकाला लॅक्टोज पचत नाही. असे लॅक्टोजचे अपचन तीन ते चार महिने टिकू शकते.
ज्या व्यक्तीला दूध पचत नाही त्याने दुधाचे सेवन मर्यादित ठेवावे. सहसा २४० मिलिलिटरपर्यंत दुधाचे २४ तासांतील सेवन बहुतेकांना सहन होते. दुधाबरोबर इतर धान्ये मिसळली तर पचन संस्थेवर ताण कमी येतो. दूध-भात, दूध-पोहे, दुधात कुस्करून ठेवलेली चपाती किंवा भाकरी, खीर, कॉर्नफ्लेक्स व दूध असे सेवन चांगले. दुधाचे दही होताना लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक ऍसिडमध्ये होते. त्यामुळे ज्यांना दूध पचत नाही, त्यांनी दही किंवा ताक घेणे श्रेयस्कर. दूध चांगले उकळून घेण्यानेसुद्धा फायदा होतो. कारण लॅक्टोजचे रूपांतर परत कर्बोदकांत व कार्बनच्या अणूंत (Caramalization) होण्यास मदत होते. लॅक्टेझचा अभाव असणाऱ्या ज्या व्यक्तींना मलावरोध होतो त्यांनी आहारात दूध वाढविल्यास चांगल्या प्रतीचा आहार मिळेल व मलावरोध दूर होईल. बाजारात लॅक्टेझ मिळू शकते. एक लिटर दुधात ५ ते १० थेंब मिसळून ते दूध शीतपेटीत (Refrigerator) २४ तास ठेवावे, म्हणजे लॅक्टेझच्या अभावाचा दुष्परिणाम होणार नाही.
दूध न पचण्याची इतरही कारणे असू शकतात. दुधात अनेक जीवाणू सहज वाढू शकतात. न उकळलेले दूध कधीच निर्जंतुक नसते. दूध गोळा करताना स्वच्छतेकडे किती लक्ष दिले जाते, हे फार महत्त्वाचे असते. या जीवाणूंमुळे विषमज्वर (Typhoid), पॅराटॉयफॉईड, ऍमिबिक डिसेंट्री, बॅसिलरी डिसेंट्री असे आजार होतात. शिवाय टी.बी., घटसर्प, पटकी, पोलियो मायलायटिस इत्यादी आजार पसरू शकतात. दूध पाश्चराइज केले म्हणजे ते सेवण्यास योग्य होते. पाश्चरायझेशनमध्ये दूध वेगवेगळ्या तापमानापर्यंत तापवून लगेच गार केले जाते. दूध उकळण्याने ते निर्जंतुक होते व पचनासही सोपे होते. दुधातील चरबी कमी करण्याने, म्हणजे साय काढण्यानेदेखील दूध पचनास सुलभ बनते. तापवून साय काढण्याने दुधातील चरबीचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे ज्यांच्या रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त आहे त्यांनाही ते उपयुक्त ठरते.
- डॉ. ह. वि. सरदेसाई --
| |
|
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment