Wednesday, December 5, 2012

आवळा


आवळा
डॉ. श्री बालाजी तांबे
आयुर्वेदात असंख्य औषधांमध्ये, रसायनांमध्ये आवळा वापरला जातो. ताजा आवळा कधी वापरायचा, वाळवलेली आवळकाठी कशी वापरायची, काढा कसा करायचा हे सर्व आयुर्वेदात सांगितलेले आहे. आधुनिक शास्त्रही व्हिटॅमिन "सी'चा सर्वोत्तम स्रोत म्हणून आवळ्याकडे पाहते. 

आपल्या भारत देशाला सर्वच बाजूंनी निसर्गाने भरभरून देणी दिलेली आहेत. औषधी गुणांनी परिपूर्ण वनस्पती हे त्यातलेच एक मुख्य देणे. अनंत काळापासून या वनस्पती आपले जीवन व आरोग्य संपन्न करत आहेत. अशीच एक अतिशय उपयुक्‍त भारतीय वनस्पती म्हणजे "आवळा'. आवळा हे मोठे औषध तर आहेच, पण त्याच्या रुचकर गुणामुळे आवळा स्वयंपाकघरातही वापरला जातो.

आवळ्याचे झाड लावल्यावर त्याला कमीत कमी सात - आठ वर्षांनंतर फळ येते. कच्चे फळ हिरवे असते, ते पिकले की पिवळ्या रंगाकडे झुकते. आवळ्याची फळे व्यवस्थित पिकल्यानंतरच औषधात वापरायची असतात. यामुळे कार्तिक महिन्यातील शुद्ध पक्षाच्या नवमीला आवळीपूजन करून मगच पूर्णपणे तयार झालेले वीर्यवान आवळे औषधात वापरण्याची प्रथा आहे. आधुनिक संशोधनानुसार सुद्धा या महिन्यात काढलेल्या आवळ्यात सर्वाधिक प्रमाणात ऍस्कॉर्बिक ऍसिड (सी व्हिटॅमिन) असते असे सिद्ध झालेले आहे. 

पूर्ण वाढ झालेले आवळ्याचे झाड दरवर्षी साधारण 50 ते 70 किलो आवळे देते. झाडाची व्यवस्थित देखभाल केली तर 70 वर्षांपर्यंत आवळ्याच्या झाडाला फळे येऊ शकतात.

आवळा गुणाचा 
आयुर्वेदात असंख्य औषधांमध्ये, रसायनांमध्ये आवळा वापरला जातो. ताजा आवळा कधी वापरायचा, वाळवलेली आवळकाठी कशी वापरायची, काढा कसा करायचा हे सर्व आयुर्वेदात सांगितलेले आहे. आधुनिक शास्त्रही व्हिटॅमिन "सी'चा सर्वोत्तम स्रोत म्हणून आवळ्याकडे पाहते. आवळ्याची विशेषतः ही की आवळा शिजवला तरीसुद्धा त्यातील "सी' व्हिटॅमिन नष्ट होत नाही. आयुर्वेदाने आवळ्याचे गुणधर्म याप्रमाणे सांगितले आहेत,

आमलकं कषायाम्लं मधुरं शिशिरं लघु ।
दाहपित्तवमीमेह शोफघ्नं च रसायनम्‌ ।।...राजनिघण्टु
श्रम-वमन-विबन्धाध्मान-विष्टम्भ-दोषप्रशमनम्‌ अमृताभं चामलक्‍याः फलं स्यात्‌ ।। ...राजनिघण्टु 


आवळा तुरट, आंबट व गोड असतो; शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा दिलेली आढळते.

याशिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो. आवळ्याचे फळ तर मुख्यत्वे औषधात वापरले जातेच, पण आवळ्याच्या बिया, सालसुद्धा औषधी गुणांच्या असतात.

आवळा रसायन गुणाचा आणि तारुण्य टिकवून ठेवणाऱ्या द्रव्यांमध्ये श्रेष्ठ समजला जात असल्याने बहुतेक सर्व रसायनांमध्ये असतोच. च्यवनप्राश, ब्राह्मरसायन, आमलकावलेह, धात्री रसायन वगैरे रसायनांमध्ये आवळा हाच मुख्य घटक असतो.

कसा वापराल? 
आवळा असंख्य प्रकारांनी वापरला जातो. त्यातले सर्वांत महत्त्वाचे व अनुभवाचे काही उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील.
पित्तशामक - उष्णता कमी करण्यासाठी आवळा उत्तम असतो.
पित्तामुळे उलट्या होत असल्यास आवळ्याचे पाव चमचा चूर्ण चंदन उगाळून बनविलेल्या गंधात मिसळून थोडे थोडे चाटल्याने बरे वाटते.
डोळ्यांची आग होत असल्यास पाच - सहा तास पाण्यात भिजवलेली आवळकाठी आणि तीळ बारीक वाटून त्याचा लेप बंद डोळ्यांवर करण्याचा फायदा होतो.
पोटात, छातीत, घशात पित्तामुळे जळजळत असेल तर पाव चमचा आवळ्याचे चूर्ण, त्यात अर्धा चमचा साखर व एक चमचा घरी बनविलेले साजूक तूप यांचे मिश्रण थोडे थोडे घेता येते.
नाकातून रक्‍त येत असल्यास आवळ्याच्या चूर्णाचा पाण्यात केलेला लेप टाळूवर करण्याने रक्‍त येणे थांबते.
आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ताजे आवळे मिळणाऱ्या दिवसात रोज एका आवळ्याचा रस, त्यात खडीसाखर व जिऱ्याची पूड टाकून तयार केलेले मिश्रण घ्यावे. याने फार चांगला गुण येतो.

रसायन, वयःस्थापन 
आवळा, गोखरू आणि गुळवेल यांचे समभाग चूर्ण तूप-साखरेसह घेण्याने धातुवृद्धी होते, शक्‍ती वाढते. थकवा दूर होण्यास मदत मिळते.
आवळ्याचा ताजा रस व तूप यांचे मिश्रण घेण्याने वीर्यवृद्धी होते.

आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्याच रसाच्या अनेक भावना देऊन तयार झालेले चूर्ण, साखर, मध व तूप यांचे मिश्रण सेवन केल्यास वय वाढले तरी म्हातारपणामुळे होणारे त्रास होत नाहीत असे सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेले आहे.

तारुण्य टिकून राहण्याच्या दृष्टीने जी अभ्यंगतेले सांगितलेली आहेत, त्यात आवळा असतोच.

रक्‍तशुद्धी, कांतिवर्धन 

आवळ्याचे चूर्ण उटण्याप्रमाणे वापरण्याने त्वचा स्वच्छ तर होतेच, पण सुरकुत्या पडत नाहीत, कांती उत्तम राहते, काळसरपणा दूर होतो.
त्वचेवर खरूज होते, त्यावर आवळकाठी जाळून तयार झालेली राख तिळाच्या तेलात मिसळून लावण्याचा उपयोग होतो.

स्त्रीरोग 

आवळ्याच्या बिया पाण्यात वाटून त्यात साखर व मध घालून तीन दिवस घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून जाणे थांबते.

आवळ्याच्या बिया (बियांचे कडक कवच फोडल्यावर निघणाऱ्या आतील छोट्या बिया) मात्र या बिया मदकारक असल्याने त्यांची मात्रा वैद्यांच्या सल्ल्याने ठरविणे चांगले.
अंगावरून पांढरे जात असताना आवळा व हळद यांच्या काढ्याने योनीभाग धुण्याचा उपयोग होतो.
पित्त वाढल्यामुळे पाळीच्या दिवसात अतिरक्‍तस्राव होत असल्यास आवळ्याच्या रसात खडीसाखर टाकून घेण्याचा उपयोग होतो.
योनीच्या ठिकाणी जळत असल्यासही आवळ्याचा रस साखर टाकून घेण्याचा उपयोग होतो.

प्रमेह, ताप वगैरे विकारांवर 

एक किंवा दोन ताज्या आवळ्याचा रस, पाव चमचा हळद पूड, अर्धा चमचा मध यांचे मिश्रण घेणे प्रमेहामध्ये हितकर असते. यामुळे लघवी साफ होण्यासही मदत मिळते.
शीतल वीर्यामुळे आवळा तापातही हितकर असतो. विशेषतः पित्तामुळे आलेल्या तापात आवळ्याच्या काढ्यात साखर व मध टाकून घेण्याने बरे वाटते.
जीर्ण ज्वरामध्ये म्हणजे अंगात मुरलेल्या तापावर आवळ्याने सिद्ध केलेले तूप घेण्याचा उपयोग होतो.

-----------------------------------------------
असा करा मोरावळा 
कार्तिक, मार्गशीर्ष वगैरे महिन्यांमध्ये ताजा आवळा सहज उपलब्ध असतो. वर्षभर वापरता यावा यासाठी आवळ्याचा मोरावळा करून ठेवण्याची पद्धत आहे. मोरावळा अनेक प्रकारांनी करता येतो, मात्र त्यातल्या त्यात सोपी व सर्वांना जमेल अशी पद्धत याप्रमाणे होय.

ताजे आवळे स्वच्छ धुवून कोरडे करावेत. त्यांना टोचणीच्या साहाय्याने बीपर्यंत टोचावे. उकळत्या पाण्यात टाकून थोडे शिजवावेत. बाहेर काढून सुती कापडाने पुसून कोरडे करावेत. साखर किंवा खडीसाखरेच्या चार तारी पाकात आवळे बुडवून ठेवावेत. असा हा मोरावळा वर्षभर खाता येतो आणि दोन - तीन वर्षेदेखील चांगला टिकतो.

आवळ्याच्या पाचक, रुचिवर्धक वड्यासुद्धा करून ठेवता येतात. आवळे उकडून त्यांचा गर वाटून घ्यावा. त्यात जिरे, मिरे, धणे, सुंठ, दालचिनी, सैंधव यांचे चूर्ण मिसळावे. याच्या वड्या करून उन्हात वाळवाव्या. जेवणाच्या आधी अशी वडी खाण्याने भूक लागते, रुची वाढते तसेच अन्न पचण्यासही मदत मिळते. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad