Saturday, December 31, 2011

ऊब आहाराची - 2

डॉ. श्री बालाजी तांबे
भारतीय परंपरेतील सर्व सण-उत्सव, त्या उत्सवांच्या देवता, त्या सणाच्या देवतांना प्रसादरूपात अर्पण करायच्या वस्तू व पक्वान्ने या सर्वांचा हिशेब ऋतुमानाप्रमाणे व प्रकृतिमानाप्रमाणे केलेला असतो. थंडीच्या दिवसांत सूर्यध्यान व्हावे, या हेतूने सूर्याकडे पाहणे, पतंग उडवणे किंवा सूर्यप्रकाशात बसणे हे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच तिळगूळ खाणे व गुळाची पोळी खाणे हे सणाशी संबंधित ठेवलेले आपण पाहतो. शरद पौर्णिमेला रात्री प्यावयाचे दूध असो, श्रावण महिन्यातील गोपालकाला असो, रामनवमीचा सुंठवडा असो- या सर्वांचा संबंध शरीराच्या तापमानाशी, आरोग्याशी जोडलेला दिसतो.

आ युर्वेद शास्त्राचा एक नियम आहे, की सम गुणांनी वृद्धी होते आणि विरुद्ध गुणांनी क्षय होतो. जसे मनुष्यप्रकृतीचे वात, पित्त, कफ असे स्वभाव असतात, तसेच प्रत्येक वस्तूचेसुद्धा वात, पित्त, कफ असे स्वभाव असतात. मनुष्याच्या प्रकृतीचे उष्ण प्रकृती, शीत प्रकृती असे प्रकार असतात, तसेच वस्तूंमध्ये उष्ण वीर्य, शीत वीर्याच्या वस्तू असतात. त्यामुळेच शरीरात उष्णता वाढावी असे वाटत असेल तर कोणत्या गोष्टींचे सेवन करावे, याचे नियोजन करता येते.

भारतीय परंपरेतील सर्व सण-उत्सव, त्या उत्सवांच्या देवता, त्या सणाच्या देवतांना प्रसादरूपात अर्पण करायच्या वस्तू व पक्वान्ने या सर्वांचा हिशेब ऋतुमानाप्रमाणे व प्रकृतिमानाप्रमाणे केलेला असतो. थंडीच्या दिवसांत सूर्यध्यान व्हावे या हेतूने सूर्याकडे पाहणे, पतंग उडवणे किंवा सूर्यप्रकाशात बसणे हे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच तिळगूळ खाणे व गुळाची पोळी खाणे हे सणाशी संबंधित ठेवलेले आपण पाहतो. शरद पौर्णिमेला रात्री प्यावयाचे दूध असो, श्रावण महिन्यातील गोपालकाला असो, रामनवमीचा सुंठवडा असो- या सर्वांचा संबंध शरीराच्या तापमानाशी, आरोग्याशी जोडलेला दिसतो.

शीत गुणधर्माच्या वस्तूंमध्ये दुधाचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. त्याचा रंग पांढरा असतो. वस्तू जसजशा उष्ण वीर्याच्या होत जातील तसतशा त्या लाल रंगाकडे झुकू लागतात. वात प्रकृतीच्या वस्तू निळ्या, काळ्या, गडद रंगाच्या असतात. जांभळ्या वा बैंगनी रंगाचे वांगे वातकारक आहे, असे वेगळे सांगावे लागत नाही. गडद हिरव्या रंगाचे वाटाणेही वातवृद्धी करतात. शीत गुणाच्या वस्तू मऊसर असतात व त्यात जलतत्त्वाचे प्रमाण अधिक असते.

वात गुणाच्या वस्तू कठीण, पोकळ व रसभाव कमी असलेल्या असतात. सिमला मिरची पोकळ असते व त्यातील बिया खुळखुळ वाजू शकतात, तिच्यावर आकाशतत्त्वाचा व वायुतत्त्वाचा प्रभाव अधिक असतो. लाल रंगाचे टोमॅटो, बीट, चिंच वगैरे द्रव्ये उष्ण स्वभावाची व पित्तकर असतात. गडद रंगाचा गहू पित्तकर असला तरी त्याचे पीठ केल्यावर त्याचा पित्तगुण कमी होतो व कफभाव वाढतो. गव्हापासून बनविलेला मैदा अतिसूक्ष्म असल्याने तो अधिक जागा व्यापतो, म्हणजे तो आकाशतत्त्वाशी जवळीक करतो, त्यामुळे वात वाढवतो. घडीच्या पोळीला पापुद्रे असणे इष्ट असले तरी ते पापुद्रे एकमेकांच्या जवळ असतात, जेणेकरून पोळी शरीराला पुष्ट करेल, पण वात वाढवणार नाही. रुमाली रोटी मैद्याची बनवलेली असते व ती बनवताना आकाशाकडे फेकून, तिला गती देऊन पातळ केलेली असल्याने ती पचायला जड असून वातकारक असते, हे सहज लक्षात येते. एखादे आंबट फळ उष्णता वाढविणारे व पित्तकर असू शकते, पण तेच फळ वाफवून शिजवल्यावर त्यात रसतत्त्व वाढल्यामुळे व मऊ झाल्यामुळे त्याचा पित्त गुण कमी होऊ शकतो. वस्तूचा स्वभाव व त्यांची पाककृती यांची विशेष योजना करून "आयुर्वेदिक अन्नयोगा'ची योजना केलेली असते. यामुळे पदार्थ पचनाला सोपे- हलके होतात.

"ऊब आहाराची" या विषयाचा विचार करत असताना आयुर्वेदिक अन्नयोगाचा विचार करून पदार्थ तयार केले तर थंडीला तोंड देणे सोपे होऊ शकते. त्याउलट चव व नावीन्य या नावाखाली कुठल्यातरी चार-पाच वस्तू एकत्र करून तयार केलेली पाककृती वाढताना आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विशेष मेहनत घेण्यावर भर दिल्यास त्या वस्तू अन्नयोग संकल्पनेपासून दूर जाऊ शकतात.

आलेपाक, हळिवाचे लाडू, डिंकाचे लाडू, केळ्यावर मध घालून तयार केलेले पक्वान्न, केळ्यावर मध, लिंबू व साखर घालून तयार केलेले पक्वान्न, सुक्‍या मेव्यात तूप व इतर द्रव्ये घालून तयार केलेले पक्वान्न वगैरे अन्नयोगात सुचविलेल्या पाककृती पाहिल्या तर आरोग्याचा किती सुंदर विचार केलेला आहे, हे समजते.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

1 comment:

  1. नमस्कार, आपला ब्लॉग मराठी ब्लॉग जगतशी जोडला गेलेला आहे. म. ब्लॉ.ज.ला भेट देणार्‍या वाचकांना आपल्या ब्लॉगची माहिती देण्यासाठी म.ब्लॉ.ज.चे ओळखचिन्ह आपल्या ब्लॉगवर अवश्य लावा. म.ब्लॉ.ज.च्या फेसबुक पेजला व ट्विटर पेजला देखील अवश्य भेट द्या.

    ReplyDelete

ad