Saturday, December 31, 2011

हिवाळ्यातील ऊब - आहार 2

डॉ. श्री बालाजी तांबे
आयुर्वेदिक अन्नयोगाचा विचार करून पदार्थ तयार केले तर थंडीला तोंड देणे सोपे होऊ शकते. त्याउलट चव व नावीन्य या नावाखाली कुठल्यातरी चार-पाच वस्तू एकत्र करून तयार केलेली पाककृती वाढताना आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विशेष मेहनत घेण्यावर भर दिल्यास त्या वस्तू अन्नयोग संकल्पनेपासून दूर जाऊ शकतात.

ऋतुनुसार आहारात बदल केले तर तो आरोग्यरक्षणास हातभार लावणारा असतो. हिवाळ्यातल्या थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शरीर उबदार राहणे आवश्‍यक असते. याला मदत करण्यासाठी, तसेच वर्षभरासाठी शरीरशक्‍ती कमवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात आहारात विशेष पदार्थ समाविष्ट करता येतात.


आहार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ऋतूनुसार आहारात बदल केले तर तो आरोग्यरक्षणास हातभार लावणारा असतो. हिवाळ्यातल्या थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शरीर उबदार राहणे आवश्‍यक असते. याला मदत करण्यासाठी, तसेच वर्षभरासाठी शरीरशक्‍ती कमवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात आहारात विशेष पदार्थ समाविष्ट करता येतात. मागच्या अंकात या पदार्थांचा उल्लेख केला होताच. आज आपण त्यांच्यापासून बनवलेल्या काही पाककृतींची माहिती घेणार आहोत.

ओली हळद व आंबेहळद यांचे लोणचे
हळद उष्ण वीर्याची असते, कफदोष, वातदोष कमी करणारी, रक्‍त शुद्ध करणारी असते. आंबेहळद गुणाने हळदीसारखीच असते. ओली हळद, ओली आंबेहळद आणि आले यांचे मीठ व लिंबाच्या रसाबरोबर लोणचे करून ठेवता येते. हिवाळ्यात हे लोणचे खाल्ले असता पचन नीट राहते, शरीराला आवश्‍यक ती ऊबही मिळते.

आलेपाक
रक्‍ताभिसरण वाढवून शरीर उबदार राहण्यास मदत करणारे घरगुती औषध म्हणजे आले. आले पचनास मदत करते, अग्नीस प्रदीप्त करते, खोकला, सर्दी, दमा वगैरे त्रासात उपयोगी असते. आल्यापासून आलेपाक बनवून ठेवता येतो. हिवाळ्यात रोज सकाळी किंवा जेवणाअगोदर आलेपाक खाल्ला तर त्याने पचन सुधारण्यास आणि ऊब मिळण्यास चांगली मदत मिळते.
आल्याचा रस काढावा, त्यात दोन किंवा तीन पट साखर घालावी, थोडे पाणी मिसळून पाक करावा. पाक तयार झाला की त्यात वरून केशर, वेलची, जायफळ, जायपत्री, लवंग यांचे चूर्ण घालावा. ताटात तापून त्याच्या वड्या पाडाव्यात व भरून ठेवाव्यात.

अहळीव लाडू
अहळीव वीर्याने उष्ण व शरीरपोषक असतात. वातदोषाचे संतुलन व्हावे आणि कंबरेत ताकद यावी म्हणून हिवाळ्यात अहळिवाचे लाडू किंवा खीर खाणे चांगले असते. यातील इतर घटकद्रव्येही शक्‍तिवर्धक असतात.
घटकद्रव्ये
  • अहळीव 25 ग्रॅम
  • गूळ 300 ग्रॅम
  • बदाम 50 ग्रॅम
  • काजू 50 ग्रॅम
  • पिस्ते 50 ग्रॅम
  • जायफळ पूड छोटा सपाट चमचा
  • नारळाचा चव 100 ग्रॅम
  • नारळाचे पाणी/दूध आवश्‍यकतेप्रमाणे
1. अहळीव पुरेशा नारळाच्या पाण्यात किंवा दुधात तीन-चार तास भिजवावे.
2. बदाम, पिस्ते, काजू यांची मिक्‍सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.
3. फुगलेले अहळीव, नारळाचा चव व किसलेला गूळ जाड बुडाच्या पातेल्यात एकत्र करून मंद आचेवर ठेवून शिजवावे.
4. शिजत आल्यावर सुक्‍या मेव्याची भरड व जायफळ चूर्ण टाकून एकत्र करून, थोडे गार झाल्यावर लाडू वळावेत.

डिंकाचे लाडू
उत्तम प्रतीच्या डिंकाची तुपात तळून तयार केलेली लाही हाडे, पर्यायाने सांधे व पाठीची मजबुती वाढवणारी आहे. खारीकसुद्धा वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांना संतुलित करणारी तसेच स्नायू व हाडांचे पोषण करणारी आहे. यातील बाकीच्या बदाम, काजू, पिस्ते वगैरे गोष्टीही वीर्य-शक्‍तिवर्धक व जीवनशक्‍तिपोषक आहेत. या सगळ्या गोष्टी शरीरात सहज पचण्यासाठी व शरीराकडून स्वीकारल्या जाण्यासाठी सुंठ, पिंपळी, केशरासारखी द्रव्येही यात घातलेली आहेत.

कॅल्शियम व लोह पुरेशा प्रमाणात मिळावे, एकंदर स्टॅमिना टिकून राहावा व शरीरबांधा उत्तम राहावा यासाठी हे लाडू हिवाळ्यात ऊब देण्यास उत्कृष्ट असतो.
घटकद्रव्ये
  • डिंक 200 ग्रॅम
  • खारीक पूड 200 ग्रॅम
  • खोबरे 100 ग्रॅम
  • खसखस 100 ग्रॅम
  • काजू 50 ग्रॅम
  • बदाम 50 ग्रॅम
  • पिस्ता 50 ग्रॅम
  • चारोळी 50 ग्रॅम
  • गूळ 300 ग्रॅम
  • साखर 200 ग्रॅम
  • सुंठ चूर्ण 25 ग्रॅम
  • पिंपळी चूर्ण 25 ग्रॅम
  • जायफळ चूर्ण 6 ग्रॅम (दोन चमचे)
  • केशर चूर्णअर्धा ग्रॅम (पाव चमचा)
  • दूध25-30 मि.लि. (अंदाजे पाव कप)
तळण्यासाठी तूप आवश्‍यकतेप्रमाणे
  1. डिंकाचे फार मोठे खडे असल्यास, हलक्‍या हाताने कुटून डिंक थोडा बारीक करून घ्यावा. डिंकाचे खडे फार मोठे असल्यास तळताना आतमध्ये कच्चट राहतात व फार बारीक असल्यास जळून जातात.
  2. काजू, बदाम, पिस्ते, चारोळी यांची मिक्‍सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.
  3. लोखंडाच्या कढईत खसखस भाजून घ्यावी, गार झाल्यावर मिक्‍सरमध्ये वा खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यावी.
  4. खोबरे किसून मंद आचेवर भाजूून घ्यावे. गार झाल्यावर हातानेच थोडेसे कुस्करून घ्यावे.
  5. लोखंडाच्या कढईत तूप गरम करून थोडा थोडा डिंक तळून घ्यावा व गार झाल्यावर हातानेच जरासा कुस्करून घ्यावा.
  6. त्याच कढईत उरलेल्या तुपावर खारीक पूड भाजून घ्यावी.
  7. मोठ्या परातीत किंवा पातेल्यात तळलेला डिंक, खारीक, खोबरे, काजू-बदाम-चारोळी-पिस्त्याची भरड, खसखस, सुंठ चूर्ण, पिंपळी चूर्ण, जायफळ चूर्ण एकत्र मिसळावे.
  8. जाड बुडाच्या पातेल्यात गूळ, साखर व दूध टाकावे व मंद आचेवर ठेवावे. गूळ विरघळल्यानंतर पाकाला बुडबुडे यायला लागले की आचेवरून खाली उतरवून त्यात केशराची पूड टाकावी व केशर नीट मिसळल्याची खात्री करून घ्यावी.
  9. याप्रमाणे तयार झालेल्या पाकात वरील सर्व मिश्रण हळूहळू टाकून कलथ्याने एकत्र करून, गरम असतानाच लाडू बांधावेत.

जवसाची चटणी
जवस प्रकृतीला उत्तम असतात. जवसाची चटणी करून आहारात समाविष्ट करता येते.

घटकद्रव्ये
जवस, तीळ, शेंगदाणे, किसलेले कोरडे खोबरे (साधारण 5-2-2-2 प्रमाणात).
जवस, तीळ, शेंगदाणे, किसलेले कोरडे खोबरे व लाल सुक्‍या मिरच्या कढईत वेगवेगळे भाजून घ्यावे. शेंगदाण्याची साले काढून टाकावी. गार झाल्यावर त्यात चवीनुसार मिरची, मीठ, साखर घालून मिक्‍सरमध्ये चटणी बनवून भरून ठेवावी व आवश्‍यकतेनुसार वापरावी.

विडा
नागवेलीच्या पानांचा विडा बनवला जातो. विड्याची पाने उष्ण, पाचक, मुखशुद्धीकर, स्वर सुधारणारी असतात. त्यांचा त्रयोदशगुणी विडा बनवला तर तो पचनास मदत करतो, हिवाळ्यात ऊब देण्यास उत्कृष्ट असतो. चुना, सुपारी, काथ, लवंग, जायपत्री, जायफळ, बदाम, वेलची, कापूर, केशर, कस्तुरी, कंकोळ, ओल्या नारळाचा कीस ही द्रव्ये टाकून बनवलेला त्रयोदशगुणी विडा जेवणानंतर खाण्यास उत्तम असतो.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad