Wednesday, June 29, 2011

मणके झाले ढिले


डॉ. जयदेव पंचवाघ, चेताविकारतज्ज्ञ, पुणे
श्री. लालजी खंडेलवाल हे परभणी जिल्ह्यात राहणारे कापड व्यावसायिक. ते जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा आले तेव्हा चालताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली वेदना स्पष्ट दिसत होती. ""डॉक्‍टर, गेल्या दोन वर्षांपासून ही असह्य कंबरदुखी सुरू झाली आहे. उठून चालायला लागलो, की कंबरेच्या मध्यभागी वेदना सुरू होते. चालणं तसंच चालू ठेवलं तर हे दुखणं असह्य होतं. कंबरेच्या आतल्या भागात कुणीतरी "खिळा टोचल्याप्रमाणे' वेदना होते. हळूहळू कंबरेतून मांड्यांच्या मागच्या भागात हे दुखणं उतरतं आणि मी पुढे चालूच शकत नाही. दोनही पाय जड पडून मुंग्या येतात व मला कुठेतरी झोपावं लागतं.''

लालजींनी त्यांच्या कंबरेचा एक्‍स-रे व एम.आर.आय. करून घेतलेले होते. त्यांच्या कंबरेचा चार नंबरचा मणका पाच नंबरच्या मणक्‍यावर घसरलेला दिसत होता. मी लालजींना व त्यांच्या मुलाला ते दाखवले.

""लालजी, अशा प्रकारच्या मणक्‍याच्या "घसरण्याला' "स्पॉंडिलोलिस्थेसिस' म्हणतात. तुम्ही उभे राहिलात, की शरीराच्या वजनाच्या भाराने तो मणका आणखीनच घसरतो व नसांवर दाब येतो. मणका घसरल्याने कंबरदुखी सुरू होते व नसांवरील जागामुळे पाय जड पडतात. ... खरं तर हा त्रास गेली दोन वर्षं तुम्ही कारण नसताना सहन करता आहात. शस्त्रक्रियेने घसरलेला मणका आपण पूर्वस्थितीला सहजगत्या आणू शकतो. त्यामुळे मणका घसरणं तर थांबतंच, पण नसांवरचा दाबसुद्धा निघून जातो. ही शस्त्रक्रिया तुम्हाला नवसंजीवनी देईल, हे निश्‍चित.''

लालजींचे दुखणेच इतके तीव्र होते, की त्यांनी ही शस्त्रक्रिया लगेचच करण्याचा निर्णय घेतला. आधुनिक यंत्रणेने आम्ही त्यांचे मणके जागेवर आणून जोडले व आज लालजी एखाद्या तरुणाप्रमाणे परत कामाला लागले आहेत. आपल्या कंबरेच्या कण्यामध्ये पाच मणके असतात. निसर्गाने त्याची अत्यंत सुव्यवस्थित रचना केलेली आहे. हे पाच मणके व त्यांच्यामधील कुर्चा (गाद्या) एकावर एक नेटक्‍या रचलेल्या असतात. स्पॉंडिलोलिस्थिसिस (स्पॉंडिलो- मणक्‍यांचे; लिस्थेसिस- घसरणे) या आजारात एक मणका दुसऱ्या मणक्‍यावर "घसरतो'. सुरवातीला हे घसरणे अगदी किरकोळ असते. हळूहळू हा मणका अधिकाधिक घसरत जातो. या घसरण्यामुळे कंबरेतून पायाकडे जाणाऱ्या नसा दाबल्या जाऊन त्यांच्यावर ताण येतो. उभे राहिल्यावर कंबरेच्या मणक्‍यात असह्य वेदना होणे, चालताना या वेदना वाढून पायांत कळा येणे, मुंग्या व जडपणा येणे, अशी लक्षणे दिसतात. आजार दुर्लक्षित केल्यास पायांत कमजोरी येत जाते. व्यक्तीला रोजच्या जीवनातील साध्या गोष्टीसुद्धा करता येईनासा होतात. आजार फारच वाढल्यास लघवीवरचे नियंत्रण नाहीसे होऊ शकते.

न्यूरोसर्जरी क्‍लिनिकमध्ये रुग्णाची लक्षणे ऐकून व शारीरिक तपासणी करून याचे प्राथमिक निदान केले जाते. मणक्‍याच्या इतर आजारांप्रमाणेच "एक्‍स रे' व एमआरआय तपासण्यांवरून याचे निश्‍चित निदान होते.

अगदी प्राथमिक अवस्थेत "फ्लेक्‍शन' प्रकाराच्या व्यायामांनी व इतर उपचारांनी काही काळ आजारावर नियंत्रण ठेवता येते, परंतु आजार वाढल्यास योग्य वेळी शस्त्रक्रिया न केल्यास गंभीर परिस्थिती उद्‌भवू शकते.

या शस्त्रक्रियेत घसरलेला मणका पूर्वस्थितीला आणला जातो व तो परत घसरू नये म्हणून स्क्रू व रॉडच्या साह्याने कायमचाच "फिक्‍स' करून ठेवला जातो. सुदैवाने "टायटॅनियम' धातूचे अतिशय आधुनिक स्क्रू व रॉड आज उपलब्ध आहेत. अगदी कमी वजनाचे पण अत्यंत भक्कम असे हे स्क्रू मणक्‍याला कायमचीच बळकटी देतात व रुग्णाला वेदनामुक्त करून टाकतात. अर्थात मणक्‍याच्या इतर आजारांप्रमाणे नेमक्‍या कोणत्या रुग्णाला शस्त्रक्रिया लागेल, हे ठरवणे हेच कौशल्याचे काम आहे.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

1 comment:

  1. mala tumcha contact number hava aahe, please jara lavkar mail kara.vicky_pawar1986@yahoo.com

    ReplyDelete

ad