Sunday, May 29, 2011

बुद्धी

डॉ. श्री बालाजी तांबे
रोजच्या जीवनक्रमात अनेकदा "द्विधा' परिस्थिती उत्पन्न होते, मन एका क्षणी एक म्हणते, तर दुसऱ्या क्षणी भलतीकडेच धावते. अशा वेळेला मोहाच्या आहारी न जाता योग्य निर्णय देण्याचे काम बुद्धीचे असते. निश्‍चित व योग्य ज्ञान करण्याचे कौशल्य म्हणजे बुद्धीची शुद्धता. या उलट बुद्धी भ्रष्ट झाली की काय हितकर आहे काय अहितकर आहे, काय क्षणभंगुर आहे, काय चिरंतन आहे हे समजू शकत नाही.

ज न्माला येणाऱ्या प्रत्येक जिवामध्ये चेतनेपाठोपाठ काही तत्त्वे येत असतात, त्यातलेच एक बुद्धी. कुशाग्र बुद्धी, मंद बुद्धी, साधारण बुद्धी असे शब्द आपण व्यवहारात वापरतो. बुद्धीचे असे सर्व प्रकार तिच्या शुद्धतेमुळे, बुद्धीवर झालेल्या संस्कारांमुळे पडत जातात. म्हणूनच बुद्धितत्त्व हे जरी चेतनतत्त्वाच्या जोडीने आपोआप येत असले तरी त्यावर संस्कार करणे शक्‍य असते व त्यातूनच ते संपन्न व उत्तम बनू शकते.
आयुर्वेदशास्त्रात बुद्धीची व्याख्या केली आहे,

निश्‍चयात्मिका धीः बुद्धिः ।...सुश्रुत शारीरस्थान
एखाद्या विषयाचे, एखाद्या वस्तूचे निश्‍चित, नेमके व खरे ज्ञान करून देते ती "बुद्धी' होय. एखादा विषय समजावला पण तो तर्कसंगत नसला तर त्यातली विसंगती बुद्धीला समजते. आकलन झालेल्या दोन परस्परभिन्न गोष्टींमधली नेमकी खरी कोणती याचा निर्णय फक्‍त बुद्धीच घेऊ शकते. उदा. अंधारात पडलेली दोरी कितीही सापासारखी भासली, मेधाशक्‍तीने दोरीचे साप म्हणून आकलन जरी केले तरी अखेरीस तो साप नसून दोरी आहे हे बुद्धी सांगू शकते. म्हणूनच मेधा-स्मृतिजन्य ज्ञानाला बुद्धीच्या नेमक्‍या निश्‍चिततेची जोड असणे आवश्‍यक असते. अन्यथा दोरीला साप समजून कारण नसता घाबरण्याची पाळी येऊ शकेल.

बुद्धी करते निर्णय
व्यवहारात, रोजच्या जीवनक्रमात अनेकदा "द्विधा' परिस्थिती उत्पन्न होते, मन एका क्षणी एक म्हणते, तर दुसऱ्या क्षणी भलतीकडेच धावते. अशा वेळेला मोहाच्या आहारी न जाता योग्य निर्णय देण्याचे काम बुद्धीचे असते. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर तापातून नुकत्याच उठलेल्या व्यक्‍तीला समोर आइस्क्रीम दिसले तर खायची इच्छा होईल, मन आइस्क्रीमच्या मोहात पडेल, पण त्याच वेळेला बुद्धी त्याला "आत्ता आइस्क्रीम खाणे बरोबर नाही' हा निर्णय देईल. आइस्क्रीमचे हे उदाहरण अगदीच सर्वसाधारण आहे, पण आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच लहान-मोठ्या गोष्टी, दिनक्रम, व्यवसाय वगैरे गोष्टीं ठरवताना, नातेसंबंधातून जाताना, आयुष्याची दिशा ठरवताना बुद्धी आपल्याला योग्य निर्णय देत असते.

समं बुद्धिर्हि पश्‍यति ।...चरक शारीरस्थान
जे जसे आहे तसेच पाहणारी ती बुद्धी. बुद्धिमत्ता हे सात्त्विकतेचेही प्रतीक असते. सात्त्विक व्यक्‍तीमध्ये बुद्धी सम म्हणजे आपले काम चोखपणे पार पाडणारी असते तर तामसिक व्यक्‍तीमध्ये बुद्धी मूढ झालेली असते, दुष्ट झालेली असते.
शुद्ध बुद्धीची व्याख्या अशी केलेली आहे,

बुद्धेः निश्‍चयात्मकज्ञानकरत्वे पाटवम्‌ ।...चरक सूत्रस्थान
निश्‍चित व योग्य ज्ञान करण्याचे कौशल्य म्हणजे बुद्धीची शुद्धता. या उलट बुद्धी भ्रष्ट झाली की काय हितकर आहे काय अहितकर आहे, काय क्षणभंगुर आहे, काय चिरंतन आहे हे समजू शकत नाही, उलट विषमज्ञान होते म्हणजे जे हितकर आहे ते अहितकर वाटते, जे चिरंतन आहे त्याकडे लक्ष न देता क्षणभंगुराची ओढ लागते, चांगले काय, वाईट काय हे कळेनासे होते, करायला पाहिजे त्या गोष्टी होत नाहीत, जे करायला नको ते करावेसे वाटते. मुख्य निर्णय देणारी बुद्धीच चुका करायला लागली की नंतर सगळेच शारीरिक, मानसिक व्यवहार चुकीचे होत जातात.
बुद्धी, धृती, स्मृती हे बुद्धीचे प्रकार सांगितले असले तरी त्यात बुद्धी सर्वात महत्त्वाची असते.

बुद्‌ध्या विषमविज्ञानं विषमं च प्रवर्तनम्‌ ।प्रज्ञापराधं जानीयान्मनसो गोचरं हि तत्‌ ।।...चरक शारीरस्थान
जे जसे आहे तसेच समजण्याची बुद्धीची क्षमता नाहीशी झाली (विषमज्ञान) आणि त्यामुळे ती अनुचित कर्माचा निर्णय करू लागली (विषमप्रवर्तन) तर त्यामुळे प्रज्ञापराध घडतो आणि त्यातून दुःख, सर्व शारीरिक मानसिक रोगांची उत्पत्ती होते.
बुद्धीची असमर्थता हे तमोगुणाचे दर्शक आहे असेही आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले आहे. "मनःशुद्धौ बुद्धिप्रसादः' म्हणजे बुद्धिप्रसादनासाटी मन शुद्ध असणे आवश्‍यक आहे, असे सुश्रुतसंहितेत म्हटले आहे म्हणून बुद्धिवर्धनाची इच्छा असणाऱ्यांनी मनात रज, तम वाढू नयेत याकडे लक्ष ठेवायला हवे. त्यासाठी सात्त्विक व साधा आहार, सद्वर्तन, प्रकृतीनुरूप आचार वगैरे गोष्टींकडे लक्ष ठेवता येते.

सुवर्णप्राशन संस्कार
बुद्धी संस्कारांनी संपन्न करता येते. आयुर्वेदाने नवजात बालकांसाठी "सुवर्णप्राशन' संस्कार सांगितला आहे तो यासाठीच.

षड्‌भ्यभिर्मासैः श्रुतधरः सुवर्णप्राशनाद्‌ भवेद्‌ ।...कश्‍यप सूत्रस्थान
बाळाला जन्मल्यापासून ते सहा महिन्यांचे होईपर्यंत रोज सुवर्णप्राशन म्हणजे मधासह शुद्ध सोने उगाळून चाटवले तर बालक "श्रुतधर' म्हणजे एकदा ऐकलेले लक्षात ठेवू शकेल असे बुद्धिसंपन्न होते.
तूप, बदाम, शतावरी, ब्राह्मी, सुवर्ण, केशर, बदाम, खडीसाखर ही द्रव्ये बुुद्धिवर्धक असतात. त्यामुळे मोठ्या वयातही या द्रव्यांचे नियमित सेवन करता आले तर ते बुद्धिवर्धनासाठी, बुद्धिसंपन्नतेसाठी उत्तम असते. त्यादृष्टीने सुवर्णसिद्धजल, केशर-सुवर्णवर्खयुक्‍त "संतुलन बालामृत', शतावरी-केशर-सुवर्णवर्खयुक्‍त "संतुलन अमृतशतकरा', पंचामृत, ब्रह्मलीन घृत, ब्रह्मलीन सिरप, आत्मप्राश वगैरे योगांचा रोजच्या आहारात समावेश करता येतो.

बुद्धिवर्धनासाठी रसायनयोग
आयुर्वेदाने बुद्धिवर्धनासाठी उत्तमोत्तम रसायनयोगही सांगितले आहेत, उदा.
पिपल्ल्या सिन्धुजन्मना । पृथग्लोहैः सुवर्णेन वचया मधुसर्पिषा ।।
सितया वासमायुक्‍ता समायुक्‍ता रसायनम्‌ । त्रिफला सर्वरोगघ्नी मेधायुः स्मृतिबुद्धिदा ।।...अष्टांगसंग्रह उत्तरस्थान
ज्येष्ठमध, वंशलोचन, पिंपळी, सैंधव, सुवर्ण, लोह, रौप्य, वेखंड, मध, तूप, खडीसाखर व त्रिफळा यांचे मिश्रण सेवन केल्यास सर्व रोगांचा नाश होतो व मेधा, आयुष्य, स्मृती, बुद्धी यांचा लाभ होतो.
बुद्धीवर संस्कार होण्यासाठी आयुर्वेदाने इतरही उपाय सुचविले आहेत,

सतताध्ययनं वादः परतन्त्रावलोकनं तद्विद्याचार्यसेवा इति बुद्धि मेधाकरो गणः ।...सुश्रुत चिकित्सास्थान
सातत्याने अध्ययन करणे, मनापासून शास्त्र अभ्यासणे.
सहाध्यायी व्यक्‍तीबरोबर शास्त्राबद्दल संवाद साधणे.
आपल्या शास्त्राशी संबंधित इतर शास्त्रांची माहिती करून घेणे.
ज्या शास्त्राचे अध्ययन करायचे असले त्यातील तज्ज्ञांच्या, आचार्यांच्या सहवासात राहून त्यांची सेवा करणे.

ॐकार गूंजन आवश्‍यक
यातून अजूनही एक गोष्ट लक्षात येते, की बुद्धी संपन्न ठेवायची असली तर तिचा वापर करत राहणे आवश्‍यक आहे. धूळ खात पडलेली तलवार जशी गंजून निकामी होऊ शकते, तसेच बुद्धीच्या बाबतीत घडता कामा नये. बुद्धीने शेवटपर्यत सम राहायला हवे असेल, प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेऊन जीवन सुखी व्हायला हवे असेल तर बुद्धीवर या प्रकारचे संस्कार करत राहायला हवेत.
बुद्धी व मनाच्या शुद्धीसाठी आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे प्राणायाम. प्राणायामाच्या नित्य अभ्यासाने मनाची शक्‍ती वाढते, मन स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले तर त्यामुळे बुद्धी सुद्धा आपले काम व्यवस्थित करू लागते आणि मग अर्थातच शरीर-मनाची सर्व कार्ये व्यवस्थित होऊ लागतात. प्राणायामापेक्षाही अधिक प्रभावी उपचार म्हणजे ॐकार गूंजन (सोम ध्यानपद्धत). यामुळे प्राणायामाचे फायदे मिळतातच, पण मन व बुद्धी अधिक चांगल्या प्रकारे शुद्ध होऊ शकतात.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad