Sunday, April 17, 2011

शाकाहार

डॉ. श्री बालाजी तांबे
अन्नाचे मुख्य कार्य शरीर, बल, प्राणशक्‍ती व मनोधारणा तयार करणे हेच आहे. तेव्हा आपल्या शरीराला जे मानवेल, म्हणजेच नैसर्गिकरीत्या पचून बल देईल, असे अन्न प्रत्येकाने खावे. केवळ शाकाहारच षड्ररसपूर्ण व चार प्रकारचे अन्न पुरवू शकतो.

शा काहार व मांसाहार असे आहाराचे दोन प्रकारात वर्गीकरण होते. आयुर्वेदात भाज्या, फळे वगैरे शाकाहारी द्रव्यांचे गुणधर्म सांगितले आहेत, त्याचप्रमाणे विविध पक्षी-प्राण्यांच्या मांसाचे गुणधर्मही वर्णन केले आहेत. मात्र आयुर्वेदातील "अन्नयोग' संकल्पना अंमलात आणायची ठरविले, औषधे बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकद्रव्यांचा आढावा घेतला तर मांसाहारापेक्षा शाकाहारालाच अधिक महत्त्व दिलेले आढळते.

"चतुर्विध आहार' ही संकल्पना आयुर्वेदात तसेच इतरही भारतीय शास्त्रांमध्येही आहे. पेय म्हणजे पिण्यास योग्य पदार्थ, लेह्य म्हणजे चाटून खाण्याजोगे पदार्थ, भोज्य म्हणजे सहज खाता येतील असे पदार्थ आणि भक्ष्य म्हणजे चावून खाण्याजोगे पदार्थ असा चार प्रकारचा आहार असावा. कारण असा आहार शरीरपोषण व्यवस्थित करण्यास सक्षम असतो. या प्रकारचे चतुर्विधत्व आहारातून सहज शक्‍य असते. मांसाहार हा फक्‍त भक्ष्य प्रकारात आणि मांसापासून "मांसरस (सूप)' तयार केला तर, फार तर पेय प्रकारात बसू शकतो.

आयुर्वेदाने अन्नयोग संकल्पनेमध्ये षड्रस म्हणजे मधुर, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट अशा सहा चवींचा समावेश केला आहे.

सर्व रसाभ्यासो बलकराणां श्रेष्ठः ।एक रसाभ्यासो दौर्बल्यकराणाम्‌ ।।...चरक सूत्रस्थान

सहाही रसांचे (चवींचे) सेवन बल वाढवण्यासाठी व स्वास्थ्य टिकवण्यासाठी अत्यावश्‍यक आहे. केवळ एक-दोन रसांचे सेवन केल्यास मनुष्याला दुर्बलता येते व त्यातून विविध रोगही उद्भवू शकतात.

शाकाहारातून षड्रस
धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे यांचे गुणधर्म पाहिले असता लक्षात येते, की त्यांच्या योग्य संयोगातून आपणास सहाही रस मिळू शकतात. ऋतूंनुसार मिळणाऱ्या भाज्या व फळांतूनही त्या त्या ऋतूतील दोषस्थितीचे संतुलन करता येऊ शकते. याउलट मांसाहाराचा विचार केल्यास समजते, की बहुतांशी सर्व प्रकारचे मांस मधुर रसाचे आहे. क्वचित एखादेच मांस मधुर रसासह तुरट रसाचे किंवा तिखट विपाकाचे आहेत. अर्थात त्यामुळे मांसाहार हा पूर्ण आहार होऊ शकत नाही. आयुर्वेदात मांसाचे जे गुणधर्म सांगितले आहेत, त्यानुसार बहुतेक सर्व मांस पचण्यास अतिशय अवघड, उष्णता वाढविणारे व कफ, पित्तदोष वाढविणारे असतात असे समजते म्हणूनच जे नित्य व्यायाम करतात व ज्यांचा अग्नी प्रदीप्त आहे अशा व्यक्‍ती जर असा मांसाहार पचवू शकल्या तरच त्यापासून त्यांचे बल वाढू शकते, शुक्रधातूला शक्‍ती मिळू शकते.

मांसाहार पचन क्षमतेत घट
सध्याची जीवनशैली पाहता, हवामानातील बदल पाहता मांसाहार अनुकूल ठरण्याची शक्‍यता फारच कमी झालेली दिसते. मांसाहार पचण्यासाठी शारीरिक मेहनत आवश्‍यक असते, सध्या शरीराच्या तुलनेत मानसिक, बौद्धिक श्रमांचेच प्रमाण इतके वाढले आहे की मांसाहार पचवण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होते आहे.

निसर्गातही काही पक्षी व प्राणी शाकाहारी तर काही मांसाहारी असतात असे आढळते. मात्र या प्राण्यांच्या शरीरशास्त्राचा, शरीरक्रियांचा अभ्यास केला तर शाकाहारी प्राण्यांपेक्षा मांसाहारी प्राण्यांची मूलभूत जडणघडण विशेष पद्धतीने झाली आहे असे समजते. मांसाहारी प्राण्यांमधली आक्रमकता वेगळी असते, त्यांची मानसिकता, जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते. त्यांचे दात व पचनसंस्था वेगळ्या तऱ्हेने विकसित झालेली असते. मानवी शरीराची जडणघडण या पद्धतीची नाही. प्राण्यांपेक्षा वेगळी जीवनपद्धती, वेगळी मानसिकता असणे अपेक्षित असणाऱ्या मनुष्यप्राण्यासाठी मांसाहार हा आदर्श नाही. औषधातही फार क्वचित ठिकाणी मांसाचा अंतर्भाव केलेला आढळतो. खूपच धातुक्षय झाला असेल, तातडीने शक्‍ती देण्याची आवश्‍यकता असेल, तेव्हासुद्धा मांसाहारापेक्षा मांसरस (सूप) घ्यायला सांगितलेला दिसतो. मांससूप तृप्ती करणारे आहे. ज्याचे शरीर सुकत चालले आहे, जो रोगापासून मुक्‍त झाला आहे, जो स्वभावतःच कृश आहे व ज्यांचे शुक्र क्षीण झाले आहे त्यांनी मांससूप सेवन करावे असे चरकाचार्य म्हणतात. पण त्याच्याच पुढे ते असेही म्हणतात, व्यायामनित्याः । अर्थात जे नित्य व्यायाम करतात, म्हणजेच ज्यांचा जाठराग्नी प्रदीप्त असल्याने पचायला जड असणाऱ्या मांसाला पचवण्यास समर्थ आहे त्यांनीच मांससूप सेवन करावे. मद्य व मांस दोन्हीही राजस, तामस व मनोदोष वाढवणारे आहेत.

शाकाहार सुरक्षित
आहार सेवनाचा मुख्य उद्देश असतो, शरीराचे धारण करणे, शरीरावश्‍यक सर्व तत्त्वांची पूर्ती होणे. हा उद्देश पूर्ण होण्याबरोबरच दुसऱ्या बाजूने त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना याकडे लक्ष देणेही आवश्‍यक असते. जसे गाडीमध्ये इंधन टाकताना आपण ते जितक्‍या चांगल्या प्रतीचे, जितके शुद्ध स्वरूपातील निवडू तितकी गाडी अधिक चांगली पळते, अधिक टिकते. शाकाहार व मांसाहार दोन्हीही पोट भरण्यास सक्षम असले तरी मांसाहाराच्या तुलनेत शाकाहार शरीराबरोबरच मानसिक पातळीवरसुद्धा अधिक सुरक्षित असतो, नुकसान न करणारा असतो.

सध्या तर प्राण्यांचे वजन वाढावे, अंडी मिळण्याचे प्रमाणे वाढावे, कमीत कमी वेळात अधिक अंडी मिळावीत म्हणून अनेक अनैसर्गिक औषधांचा, हॉर्मोन्सचा सर्रास वापर केला जातो. ही सर्व शरीरघातक, अनैसर्गिक तत्त्वे मांसाहारात तशीच राहतात, मांसाहार सेवन करण्याच्या पोटात जातात, त्यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

बऱ्याचदा शाकाहारातून जीवनावश्‍यक सर्व तत्त्वांची पूर्ती होत नाही म्हणून मांसाहार आवश्‍यक आहे असा प्रचार केला जातो, पण संतुलित शाकाहार म्हणजे दूध, तूप, भाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये वगैरे सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहार असला तर त्यातून सर्व आवश्‍यक तत्त्वे मिळू शकतात व ती सहज पचतात.

एक गोष्ट लक्षात घ्यावी की खाणे जरी आपल्या हातात असले तरी पचवणे आपल्या हातात नाही. शेवटी जिभेला चांगले लागणारे असो, खाण्यापूर्वी ते अन्न कसेही असो, पचनानंतर त्याचे काय होते त्यालाच महत्त्व असते. म्हणजे त्यापासून कशा प्रकारचे शरीर, बल, प्राणशक्‍ती व मनोधारणा तयार होते हेच महत्त्वाचे ठरते.

तेव्हा आपल्या शरीराला जे मानवेल, म्हणजेच नैसर्गिक रीत्या पचून बल देईल, असे अन्न प्रत्येकाने खावे. पूर्वी आपण पाहिले आहेच की केवळ शाकाहारच षड्ररसपूर्ण व चार प्रकारचे अन्न पुरवू शकतो. तेव्हा शाकाहाराचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने शाकाहार करावा.


- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad