Wednesday, October 26, 2011

अभ्यंगाचे शास्त्र...

मनिषा कुलकर्णी
दिवाळीच्या पहिल्या पहाटेला 'अभ्यंगस्नान' करतात. पण हा अभ्यंगाचा विधी, घरोघरी अक्षरशः "उरकला' जातो. अंगभर तेल लावून घेण्यात कुणालाच स्वारस्य नसतं. त्यामुळे शास्त्रापुरती डोक्‍यावर तेलाची दोन बोटं टेकवली, की "मुलांनी शास्त्र पाळलं' म्हणून गृहिणी खूष; तर "तेलाचा राडा झाला नाही' म्हणून मुलंही खूष! वास्तविक हे अभ्यंग स्नान केवळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी करून थांबायचं नसतं, तर त्या दिवशी सुरू करून पुढे वर्षभर करायचं असतं.

सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून ते जिरेपर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे याला अभ्यंग असे म्हणतात.अभ्यंग कुणी करावे? नवीन जन्मलेले बालक, बाळंतीण स्त्री, वृद्ध व्यक्ती यांसह सर्वांनी रोज अभ्यंग करावे. बाळ आणि बाळंतीण या दोघांनाही, बाळाच्या जन्माच्या वेळी वेदनांना सामोरे जावे लागते. त्या वेळी बाळंतिणीच्या सर्व मांसपेशींवर अतिशय ताण पडतो; तर बाळाच्या सर्व अवयवांवर "दाब' पडतो. या वेदनांपासून सुटका मिळवून, सर्व मांसपेशींचे कार्य सुरळीत होण्यासाठी दोघांनाही अभ्यंगाची आवश्‍यकता असते.

अभ्यंग कुणी करू नये? पंचकर्मापैकी कोणतेही कर्म केल्यानंतर आठ दिवसांपर्यंत, ताप आला असल्यास, अजीर्ण झाले असल्यास, सर्दीमध्ये, जेवण झाल्यावर ते पचायच्या आत अभ्यंग करू नये.

अभ्यंग कशाने करावे?-
अभ्यंगासाठी साधारणतः कोमट केलेले तिळाचे तेल वापरावे. बाळंतीण व वृद्ध यांच्यासाठी नारायण तेल; तर लहान बाळासाठी चंदनबलालाक्षादी तेल अथवा ज्येष्ठमधाचे तेल वापरावे. डोक्‍यावर अभ्यंग करण्यासाठी कोमट केलेले तिळाचे किंवा खोबऱ्याचे तेल उत्तम! कानात अभ्यंग करण्यासाठी तीळ तेल, लसणीचे तेल किंवा बिल्व तेल यांचा कोमट करून वापर करावा. कुठल्याही आजारात (संधिवात, पक्षाघात इ.) अभ्यंग करायचे असल्यास मात्र वैद्यांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.


अभ्यंग कसे करावे?-
डोके, कान व पाय या तीन ठिकाणी विशेषत्वाने अभ्यंग करावे असे शास्त्र सांगते. हात, पाय अशा लांब अवयवांवर वरून खाली (केसांच्या दिशेने) अभ्यंग करावे. कोपर, गुडघे, मनगट हे सांधे गोल चोळावेत. पाठ, पोट व छाती यावर अभ्यंग करताना मध्य रेषेत दोन्ही हात ठेवून, दोन बाजूला पंखाप्रमाणे चोळावे.


अभ्यंग किती वेळ करावे?- एका अवयवाला पाच मिनिटेपर्यंत अभ्यंग केल्यास, तेल हाडांपर्यंत पोचते, असा शास्त्रात संकेत आहे. या हिशेबाने संपूर्ण शरीराला अभ्यंग करण्यासाठी 35 ते 40 मिनिटे पुरतात.

अभ्यंग कधी करावे?-
सकाळी पोट साफ झाले की आंघोळीपूर्वी अभ्यंग करावे. नियमितपणे व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनी व्यायामापूर्वी अभ्यंग करावे.
अभ्यंगाचे फायदे ः
1. तारुण्य टिकविण्यासाठी ः नियमित अभ्यंग केल्यामुळे "चिरतारुण्य' राखण्यास मदत होते. "वार्धक्‍य' म्हणजे काळाचा शरीरावर होणारा परिणाम. हा परिणाम त्वचेला सुरकुत्या पडणे, मांसपेशी सैलावणे, सांध्यांमध्ये आवाज येणे, दृष्टी मंद होणे, कानांनी कमी ऐकू येणे, सर्व प्रकारची सहनशक्ती कमी होणे, आवाज क्षीण होणे अशा निरनिराळ्या स्वरूपात दिसतो. आजच्या युगात सरासरी चाळिसाव्या वर्षी ही लक्षणे दिसण्यास सुरवात होते. बालपणापासून नियमित अभ्यंग केले, तर "वृद्ध' होण्याची ही मर्यादा साठाव्या वर्षांपर्यंत किंवा त्याहीपुढे ढकलता येऊ शकते.

2. श्रमहर ः खूप शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्ती, खूप व्यायाम करणाऱ्या व्यक्ती, खेळाडू, रोज प्रवास करणाऱ्या व्यक्ती, वाहनचालक अशा व्यक्तींना त्यांच्या रोजच्या कामामुळे होणारे श्रम दूर करण्यासाठी अभ्यंग करायला हवे. अभ्यंगाने थकावट दूर होते व शरीरातील पेशींना रक्तपुरवठा वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साह येतो.

3. वातहर ः आपल्या शरीरातील वात, पित्त व कफ या तीन दोषांपैकी; वातदोष हा रोग निर्माण करण्यासाठी खूप वेळा कारणीभूत ठरतो. तसेच शरीरावर वार्धक्‍याचे जे परिणाम होतात तेही हा वातदोष वाढल्यामुळेच. शरीराला वेदना देणाऱ्या सर्व रोगांमध्ये वातदोष हा महत्त्वाचे कारण असतो. अशा सर्वच अवस्थांमध्ये वाढलेल्या "वाता'ला नियंत्रित करण्यासाठी "अभ्यंग' हा एक प्रभावी व सोपा उपाय आहे.

4. दृष्टी सुधारण्यासाठी ः "डोळे' हे आपले सर्वांत जास्त काम करणारे ज्ञानेन्द्रिय आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. आज संगणक, टीव्ही, रात्रीची जागरणे, चुकीचे व रासायनिक खतांवर पोसलेले अन्नपदार्थ, अति खारट (लोणचे, पापड, क्षार इ.) अन्न या सर्वांमुळे दृष्टी लवकर क्षीण होते. लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. मोतीबिंदूही आता सत्तरीच्या नाही तर पन्नाशीच्या वयातच होतो. म्हणूनच दृष्टी दीर्घकाळ चांगली राखायची असेल, तर अभ्यंगाला पर्याय नाही. अभ्यंगामुळे डोळे तजेलदार, पापण्या काळ्याभोर व दाट दिसतात; तसेच डोळे चिकटणे, जळजळणे या समस्यांपासून सुटका होते.

5. पुष्टीकर ः बारीक असणे किंवा वजन कमी असणे ही आजकाल खूप मोठी समस्या आहे. नोकरी करणाऱ्या व खूप चिंता वाहणाऱ्या स्त्रिया, अशा स्त्रियांची जन्मलेली मुले, अभ्यासाच्या ओझ्याने खंगलेली शाळकरी मुले, आजारानंतर आलेला अशक्तपणा या सर्व प्रकारांमध्ये "बाळसे' धरण्यासाठी अभ्यंगाइतके चांगले दुसरे काहीच नाही.

6. निद्राकर ः वार्धक्‍यात, आजारपणात वेदना असतील, चिंता असेल तर निद्रानाशाचा विकार जडतोच. एकदा झोप उडाली, की आरोग्य हातातून निसटत जाते. निद्रानाशावर "गोळी' हा उपायही जितका रामबाण ठरत नाही, तितका अभ्यंग हा उपाय ठरतो. डोके, कान व पाय या तिन्ही अवयवांना झोपताना हळुवार अभ्यंग केले तर अगदी गाढ निद्रेची प्राप्ती होऊ शकते.

7. क्‍लेशसहत्व ः काही जणांना जागरणाचे "क्‍लेश' (त्रास) होतात. काहींना थंडी त्रासदायक वाटते, तर काहींना उन्हाळा सहन होत नाही. काही जणांमध्ये कष्ट सहन करण्याची क्षमता अजिबातच नसते. असे सर्व प्रकारचे त्रास सहन करण्याची ताकद अभ्यंगाने प्राप्त होते. रोज अभ्यंग केल्याने थंडीत पायाला भेगा पडणे, ओठ फुटणे, त्वचा रुक्ष होणे, डोक्‍यात कोंडा होणे, थंडी सहन न होणे, थंडीने कान दुखणे हे प्रकार संभवत नाहीत. तसेच उन्हाळ्यात त्वचा काळी पडणे, घामोळे येणे, उष्माघात होणे, थोड्याही उन्हाने डोके दुखू लागणे हे प्रकारही टळू शकतात. रोज अभ्यंग केले तर मॉइश्‍चरायझर, टोनर, कोल्डक्रीम, क्‍लिनझिंग क्रीम, सनस्क्रीन लोशन अशा महागड्या, बेभरवशाच्या व कृत्रिम उपायांच्या मागे लागण्याची गरजच नाही.

8. त्वचेचा नितळपणा ः आजकाल प्रत्येक व्यक्ती त्वचेच्या सौंदर्याबाबत जाग

रूक असते. ते मिळवण्याचा सोपा उपाय आहे- अभ्यंग! अभ्यंगाने त्वचा मुलायम, सुरकुत्याविरहित व तजेलदार होते. त्वचेला सश्रुे प्राप्त करून देण्याचे काम अभ्यंगाचेच! त्वचेवरील लोम कृष्णवर्णीय व राठ असल्यास विद्रूप दिसतात. अभ्यंगामुळे हे लोम मऊ, त्वचेच्या वर्णाप्रमाणे दिसणारे व कोमल होतात. ज्या स्त्रियांना त्वचेवरील लोम काढणे आवडत नसेल वा शक्‍य नसेल त्यांनी रोज तेल व हळद एकत्र कालवून अभ्यंग करावे. विशेषतः ओठांच्या वरील भागातील लव घालविण्यासाठी हा उपाय "गुणी' आहे.9. आघातसहत्व ः आघात, मार, जखमा हे सहन करण्याची उत्तम सहनशक्ती अभ्यंगाने मिळते. रोज अभ्यंग करणाऱ्या व्यक्तींच्या जखमा, शस्त्रकर्माचे व्रण, अस्थिभग्न हे लवकर भरून येतात. आजकाल वयाच्या साठीनंतर घरातल्या घरात पडल्याचे निमित्त होऊन वृद्ध व्यक्तींना फ्रॅक्‍चर होते आणि ते लवकर भरून न आल्याने एकाच जागी झोपून राहावे लागते. त्यामुळे बेडसोअर्स, सांधे आखडणे अशा समस्या उद्‌भवू शकतात. लहानपणापासून नियमित अभ्यंग केले तर वार्धक्‍यातील असे अपघात सुसह्य होऊ शकतात.

उटणे
उटणे म्हणजे सुगंधी वनस्पतींचे कोरडे चूर्ण. हे चूर्ण अभ्यंगानंतर अंगाला चोळायचे असते. उटण्यामुळे अभ्यंगासाठी लावलेल्या तेलाचा ओशटपणा निघून जातो. त्यामुळे साबणाची गरज भासत नाही. आज जगभरातील असंख्य माणसे फार मोठ्या प्रमाणावर साबण वापरून, पाणी व जमीन यांच्या रासायनिक प्रदूषणात भरच टाकतात. उटणे वापरण्याने हे प्रदूषण कमी करता येईल. ऋतूंप्रमाणे वेगवेगळी चूर्णे एकत्र करून, वेगवेगळी उटणी वापरता येऊ शकतात.1. पावसाळ्यात ः तांदळाचे पीठ, सुंठ, नागरमोथा, हळद यांचे उटणे. 2. हिवाळ्यात ः नागरमोथा, हळद, वेखंड, ज्येष्ठमध, गहुला यांचे उटणे.3. उन्हाळ्यात ः चंदन, वाळा, नागरमोथा, कचोरा, मसुराच्या डाळीचे पीठ यांचे उटणे. असे विविध प्रकार वापरता येतात.

उटण्याचे फायदे :
1. कफनाशक ः सर्दी, कफयुक्त खोकला अशा कफाच्या आजारांमध्ये वेखंड, सुंठ अशा चूर्णांचे उटणे लावल्याने कफ कमी होतो.
2. मेदनाशक ः स्थूल व्यक्तींनी अभ्यंग व उटणे या दोन्हींचा रोज अभ्यास केल्यास वजन व मेदाचे साठे कमी होण्यास पुष्कळ मदत होते.
3. त्वचेचे सौंदर्य ः सारीवा, कचोरा, नागरमोथा अशा चूर्णांच्या वापराने त्वचेचा वर्ण, स्पर्श, गंध, स्पर्शज्ञान या सर्वांमध्ये सुधारणा होते.4. स्थैर्य ः "अवयवांचे स्थैर्य' ही गोष्ट वाढत्या वयानुसार कमी होत जाते. हात- पाय कापणे, पायात गोळे येणे, मांसपेशी फडफडणे, मानेला कंप, कंपवात, वस्तू घट्ट धरता न येणे, लिहिताना किंवा बाटलीत पाणी भरताना किंवा रांगोळी काढताना हात थरथरणे हे सर्व वयोमानाप्रमाणे उद्‌भवणारे धोके टाळायचे असतील तर नियमित उटणे लावायला हवे.
---------------------------------------------------------------
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad