Sunday, August 29, 2010

वैद्यकाच्या दाही दिशा : ताई ची आणि ची गाँग

वैद्यकाच्या दाही दिशा : ताई ची आणि ची गाँगBookmark and SharePrintE-mail
डॉ. उल्हास कोल्हटकर 
चीनच्या सुंग घराणे राज्यातील (इ. स. ९६० ते १२७९) चँग सॅन फेंग नावाच्या टाओपंथीय, मार्शल आर्ट प्रवीण मुनीची ही गोष्ट! (कदाचित कल्पितही असू शकेल!) त्याने एकदा प्रचंड सारस पक्ष्याची व एका सर्पाची लढाई पाहिली. ज्या लवचिकतेने, सफाईने व गतीने त्या छोटय़ाशा सर्पाने त्याच्याहून खूप मोठय़ा व ताकदवान सारस पक्षाशी लढत दिली, स्वसंरक्षण केले व योग्यवेळी चपळतेने, आक्रमण करून शेवटी त्याचा पराभव केला, त्याने चँग सॅन फेंग आश्चर्यचकित व प्रभावित झाला व त्याच वेळी त्याने या लवचिकतेचा, गतीचा व नैसर्गिक डौलदार हालचालींचा आपल्या स्वत:च्या खास मार्शल आर्ट पद्धतीत अंतर्भाव करण्याचे ठरविले व त्यातूनच आज सर्वपरिचत अशा चीनी ‘ताई ची’ या पद्धतीचा जन्म झाला असे मानले जाते. या सर्व हालचालींना पारंपरिक ‘टाओ’ पद्धतीच्या श्वसनाची जोड दिली गेली, ज्यामुळे जीवनउर्जा (ची) शरीरात प्रवाहित होण्यास मदत होते, असे चीनी वैद्यक मानते.
* इतिहास : परंपरा असे मानते की, भारतातून चीनमध्ये आलेल्या गौतमबुद्धाच्या परात्पर शिष्याने, बोधीधर्माने, इ.स.च्या पाचव्या शतकात, शाओलिन मंदिरातील साधूंना झेन मुष्टीयुद्धाचे शिक्षण दिले ज्यातून पुढे ‘कूँग फू’ विकसित झाले व त्यातूनच मार्शल आर्टस निर्माण झाले. उपरोल्लेखित चँग सॅन फेंगने सुरुवातीस विविध ‘तेरा’ हालचाली निश्चित केल्या. ज्यातून पुढे विविध ‘ताई ची’ पद्धतींचा विकास झाला. आज ताई ची (Tai chi) किंवा ताई ची चुआन (Taichi Quan) ची विविध तंत्रे उपलब्ध असली तरी आधुनिक जगाला माहीत असलेली व लोकप्रिय तंत्रे म्हणजे- याँग (यातही दीर्घ व छोटय़ा अशा दोन पद्धती आहेत), वू (wu), सन (SUN), शेन (chen), वूडँग (wudang), ली (Lee) इ.
* शास्त्रीय बैठक : विविध शास्त्रीय संशोधनातून, नियमित ताई ची व्यायामांमुळे स्नायूंचे, सांध्यांचे व विशेषकरून चेतासंस्थेचे शिथिलीकरण साधले जाते असे दाखवून देण्यात आले आहे. चेतासंस्थेवरील या परिणामांमुळे, आंतरस्र्रावी ग्रंथी व शरीराच्या प्रतिरक्षाप्रणालीवरही सकारात्मक परिणाम साधला जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढते व त्यामुळे चयापचयात (metabolism) तसेच प्रतिकारक्षमतेत लक्षणीय सुधारणा होते. विविध प्रकारच्या हालचालींमुळे स्नायू व सांधे अधिक लवचिक होतात, रक्ताभिसरण सुधारते तर टाओ श्वसनामुळे श्वसनाची गुणवत्ताही सुधारण्यास मदत होते. ताई ची मध्ये मूलत: हालचालींना वा व्यायामाला, श्वसनाची व ध्यानाची जोड दिल्याने शारीरिक फायद्यांबरोबर, मानसिक व आध्यात्मिक फायदे साधण्याला मिळू शकतात व या सर्वाचा एकत्रित परिणाम त्याच्या र्सवकष आरोग्यावर (wholistic health) सकारात्मक रितीने होताना दिसतो.
* ताई ची सराव नेमका कसा करतात? 
वर उल्लेखिल्याप्रमाणे ‘ताई ची’ वेगवेगळ्या पद्धतीने साधता येते. उदा. यांग पद्धतीनमध्ये हालचाली संथ, लयबद्ध, वाहत्या पण ताकदवान असतात तर शेन पद्धतीत त्यांची गती संथ ते जलद असी बदलती असते. एकच पद्धत योग्य अशी धारणा ‘ताई ची’मध्ये नाही. अर्थात कोणत्याही ताई ची पद्धतीत हालचालींनी तयार होत असलेल्या आकृतीबंधाला, रचनेला किंवा आकाराला (Form) खूप महत्त्व असते. विशिष्ट, डौलदार, संथ हालचालींचा एखादा गट म्हणजे फॉर्म! हा फॉर्म दीर्घ किंवा छोटा असू शकतो. परंपरेनुसार दीर्घ आकृतीबंध हा १०८ हालचालींचा असतो व त्याला २० मिनिटांपासन ते १ तासापर्यंत वेळ लागू शकतो तर छोटा आकृतीबंध हा ३७ ते ४८ हालचालांची असून त्याला सहसा ५ ते १० मिनिटांचा कालावधी पुरतो. या सर्व हालचाली मूलत: स्वसंरक्षणात्मक असून त्यांची नावेही हालचाल निर्देशक अशी असतात. उदा. Kick with Right heel किंवा Punch with concealed fist B. या सर्व हालचाली एका संथ, वाहत्या श्रेणीत, क्रमाने केल्या जातात व त्यामुळे शिथिलीकरणाबरोबरच शरीर, मन व आत्म्याचे संतुलन साधले जाते अशी चीनी वैद्यकाची धारणा आहे. मेरिडियन्समधून वाहणारी जीवनउर्जा या हालचालींमुळे नियमित होते, योग्य दिशेने प्रवाहित होते. तसेच रक्ताभिसरण व कसिकाभिसरण योग्य तऱ्हेने होते असा चीनी वैद्यक दावा करते. निसर्गाशी जवळीक साधण्याच्या दृष्टीने सर्वसाधारणपणे ‘ताईची’ हालचाली उघडय़ावर म्हणजे बागांमध्ये, वृक्षांच्या सान्निध्यात केल्या जातात.
* ची गाँग (Qi Gong) : ताई ची वर्णन चलन ध्यान किंवा walking meditation  असेही केले जाते. आधुनिक जगामध्ये व विशेषत: पाश्चात्य देशांमध्ये आज ताई ची खूपच लोकप्रिय आहे. त्यामानाने त्याचे ‘संथ’ भावंड, ची गाँग (Qi Gong) लोकांना तसे कमी माहितीचे आहे, पण दोघांचीही शास्त्रीय व तात्त्विक बैठक सारखीच आहे. ची गाँग म्हणजे जीवन उर्जेचे संवर्धन (Energy Cultivatio) तर ताई ची म्हणजे त्याचेच गतिमान रुप हे ध्यानात घेतले तर ची गाँग समजणे सोपे जाईल. भारतीय योगाप्रमाणेच ची गाँग ही आरोग्यरक्षणाची, रोगनिवारणाची, बरे होण्याची आणि आध्यात्मिक प्रगतीची चीनी पद्धत आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. ची (Qi) म्हणजे जीवन उर्जा व Gong म्हणजे सराव, क्षमता किंवा फायदा. ची गाँग म्हणजे थोडक्यात ‘जीवनउर्जा संस्करण व संवर्धन’ पद्धत.या ची गाँगच्याही अनेक पद्धती अस्तित्वात असून त्यांचे स्थिर (यात स्थिर बसणे, उभे राहाणे किंवा पहुडणे व केवळ ‘मनाचा’ उपयोग करणे हे अपेक्षित असते), श्वसनावर आधारित किंवा गतिमान (हात, पाय वा हातापायांच्या हालचाली, विविध प्राण्यांप्रमाणे हालचाली यांचा यात समावेश होतो) असे तीन प्रकारे वर्गीकरण करता येते.
* इतिहास : ताई ची प्रमाणेच ची गाँगचा इतिहासही जवळजवळ ३००० वर्षांचा असून विविध उत्खननांत याचे पुरावे मिळाले आहेत. यापैकी दोन महत्त्वाचे म्हणजे इ. स. पूर्व ६०० या काळातील झौ (ZHOU) घराण्याच्या राजेशाही दरम्यानचा ची गाँगचे सिद्धांत व सराव यावर भाष्य करणारा मजकूर कोरलेला गळ्यातील एक किमती हार व इ. स. १० च्या आसपासचे हॅन राजवटी (Han Dunasty) च्या कालखंडातले एक रेशीम पेंटिंग ज्यावर ची गाँगच्या विविध हालचाली चित्रीत करण्यात आल्या आहेत. विविध टाओ आणि बुद्ध धर्मीय साधूंच्या पंथांच्या माध्यमातून ही ‘ची गाँग’ परंपरा विकसित होत गेली व अन्यथा घटकेला चीनमध्ये जवळजवळ एक लक्ष विविध पद्धती अस्तित्वात आहेत अशी मान्यता आहे. असे असले तरी या विविध पद्धतींमागची चीनी वैद्यकीय बैठक एकच आहे व ती म्हणजे- शरीरात खेळणाऱ्या जीवन उर्जेचे संवर्धन; तिच्या प्रवाहात अडथळा असल्यास तो दूर करणे; शरीरांतर्गत व बाह्य उर्जेचे रक्षण, संस्करण व संवर्धन! शरीरांतर्गत उर्जेचे संतुलन साधून सर्व अवयवांचे व शरीरांतर्गत प्रणालींचे आरोग्य सुधारण्याच्या तंत्राला ठी्र Nei Dan(Inner elixir of life) असे म्हणतात तर बाह्य धोक्यांपासून शरीराचे रक्षण करण्याच्या ची गाँग wei Dan (external elixir of life) असे म्हणतात.
पाश्चात्य देशात या ची गाँगचा अधिक प्रसार व्हावा म्हणून आता या पद्धतींमागची ‘सांस्कृतिक पाश्र्वभूमी’ थोडी बाजूला ठेवून त्याला पाश्चात्यांच्या सांस्कृतिक पाश्र्वभूमीची डूब देण्याचेही प्रयत्न आज जगभर चालू आहेत.
* ताई ची वन ची गाँग नेमके कोठे उपयुक्त?  
या दोन्ही पद्धतीत शारीरिक हालचाली (व व्यायाम), श्वसन आणि ध्यान यांचा सुंदर मिलाफ साधला आहे हे एव्हाना चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आले असेलच. साहजिकच या पद्धतींचा उपयोग ताणतणाव दूर करण्याकरिता व तणावजन्य बहुतेक रोगांवर होऊ शकतो हे समजून येईल. ताणतणाव, नाहकचिंता, उच्चरक्तदाब, सांधेदुखी, अपघातातून पुनर्वसन होताना अशा सर्व स्थितीत या पद्धती रुग्णाला खूपच दिलासा देताना आढळून आल्या आहेत. याव्यतिरिक्त अस्थिविरलता टाळण्याकरिता, सांधे व स्नायू लवचिक ठेवण्याकरिता प्रतिबंधात्मक म्हणूनही या पद्धतीचा वापर करता येतो असे दिसून आले आहे. भारतीय आयुर्वेदाप्रमाणेच दीर्घपरंपरा असलेले चीनी वैद्यक आता सर्व जगभर लोकप्रिय होऊ लागले आहे ही पर्यायी वैद्यक क्षेत्रात एक आशादायक बाब आहे
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad