Saturday, September 18, 2010

अन्नयोग : तोंडी लावण्याच्या गोष्टी

डॉ. श्री बालाजी तांबे

"तोंडी लावण्याच्या गोष्टीं'मुळे जेवण रुचकर तर होतेच, पण पाचक स्राव स्रवण्यास मदत मिळते. अशा रुचिवर्धक पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केला तर जेवणानंतर आळस येण्यास प्रतिबंध होऊ शकतो. 
वरण-भात, भाजी, पोळी-भाकरी असे जेवण आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते, पण त्याला परिपूर्णता येण्यासाठी रुची वाढविणारे "तोंडी लावणे' आवश्‍यक असते. साधारणपणे पानाच्या डाव्या बाजूला "तोंडीलावण्याच्या गोष्टी' वाढल्या जातात. यामुळे जेवण रुचकर तर होतेच, पण पाचक स्राव स्रवण्यास मदत मिळते, पचन सुधारते. अशा रुचिवर्धक पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केला तर जेवणानंतर आळस येण्यास प्रतिबंध होऊ शकतो.
आयुर्वेदोक्‍त रुचिवर्धक पाककृतींची आज आपण माहिती घेणार आहोत-

रागखांडव - मुरांबा
आममाम्रं त्वचाहीनं द्विस्त्रिर्वा खण्डितं ततः । भृष्टमाज्ये मनागस्तं खण्डपाकेऽथ युक्‍तितः ।।
सुपक्वं च समुत्तीर्यं कुङ्‌कुमैलेन्दुवासितम्‌ । स्थापितं स्निग्धमृद्‌भाण्डे रागखाण्डवसंज्ञितः ।।
कैरीचे साल काढून त्याचे तुकडे करावेत. तुपावर किंचित परतून घेऊन साखरेच्या पाकात टाकून मंद आचेवर थोडा वेळ शिजू द्यावे. अग्नीवरून उतरवल्यावर त्यात केशर, वेलची, कापूर यांचे चूर्ण घालून मातीच्या भांड्यात ठेवावे. याला रागखाण्डव म्हणतात. रागखाण्डव म्हणजेच मुरांबा.
पुष्टिदो बलदः पित्तवातास्रारुचिनाशनः ।स्निग्धो गुरुस्तर्पणश्‍च सुस्वादु रागखाण्डवः ।।...निघण्टु रत्नाकर
हा मुरांबा पुष्टिकर असतो. ताकद वाढवतो. पित्त, तसेच वातदोष शमवतो. रक्‍तविकार, अरुची यात हितकर असतो. चवीला गोड, गुणाने स्निग्ध असतो. तृप्तिकर असतो आणि रुचकर असतो. याचप्रमाणे आवळे, महाळुंग यांचाही रागखाण्डव तयार करता येतो.

सर्वरसखाण्डवसितारुचकसिन्धुत्थैः सवृक्षाम्लपरुषकैः । जम्बुफलरसैर्ययुक्‍तो रागो राजिकसाधितः ।।
साखर, सौवर्चल मीठ, सैंधव, महाळुंगाच्या फोडी, चिंचेचा कोळ, फालसा फळाच्या फोडी, जांभळाचा रस व मोहरीची डाळ हे सर्व एकत्र करावे. याचे नाव खांडव. या खांडवाचे वैशिष्ट्य असे, की यात मधुर, आंबट, खारट, कडू, तिखट आणि तुरट हे सहाही रस असतात. अर्थातच हा खांडव अतिशय रुचकर असतो.
दीपनो बृंहणो रुच्यस्तीक्ष्णो हृद्यः श्रमापहः । रुचिकृत्‌ शुक्रजनकस्तिक्‍तः क्षारश्‍च संस्मृतः ।।...निघण्टु रत्नाकर
हा खांडव अग्नी प्रदीप्त करतो, शुक्रधातू वाढवतो, हृदयासाठी हितकर असतो, थकवा दूर करतो, धातूंना वाढवतो; मुख, जीभ यांची शुद्धी करतो.

ताज्या फळांची चटणी
चिंचां कपित्थं वृक्षाम्लं मातुलिं च दाडिमम्‌ । एषामन्यतमस्यापि चिकिर्षाखाण्डवं प्रति ।।
तद्‌ गृहीत्वा विनिक्षिप्य कदुसैन्धवशर्करे । गुडं वा हिंगुसहितं दृषदा च सुपेषयेत्‌ ।।...निघण्टु रत्नाकर
चिंचा, कवठ, आमसूल, महाळुंग, डाळिंब यापैकी ज्या फळाचे खांडव करायचे असेल त्या फळामध्ये तिखट, सैंधव, गूळ वा साखर घालून वाटून चटणी करावी. ही चटणी रुची वाढवते, भूक लागायला मदत करते.

- डॉ. श्री बालाजी तांबे 
आत्मसंतुलनव्हिलेजकार्ला 410 405 
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad