Tuesday, June 15, 2010

वैद्यकाच्या दाही दिशा : ‘देही’ असो द्यावे समाधान.

डॉ. उल्हास कोल्हटकर ,
‘चित्ती असो द्यावे समाधान’ या संतवचनाला अनुसरून आणि अगदी आधुनिक चेतावैद्यकाच्या सिद्धांतानुसारही, शरीरस्वास्थ्याकरिता मानसिक समाधान असणे अत्यावश्यक असते. तसे असेल तर शरीरात अनेक प्रकारची पोषक चेतारसायने उदा. आनन्दामाईड्स निर्माण होऊन एकप्रकारची ‘फील गुड’ भावना तर निर्माण होतेच, पण रक्तदाब, रक्तशर्करा पातळी नियमनापासून ते विविध संप्रेरकांचा समतोल साधण्यापर्यंत अनेक गोष्टी साध्य होतात. भारतासारख्या आध्यात्मिक (?) देशात म्हणूनच फार पूर्वीपासून, ‘शेकडो विचारवंतांनी व संतांनी मानसिक समाधानावर भर दिलेला दिसतो. पण म्हणून ‘देहीक समाधानाकडे’, शरीराच्या यांत्रिक सुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आधुनिक शरीर-मनवैद्यक (Body Mind Medicine) या गोष्टीकडे कटाक्षाने अंगुलीनिर्देश करताना दिसते. मनाइतकेच ‘शरीर’ जपणे स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
‘शरीर’ जपणे याचा अर्थ त्यातील अवयव, उती जपणे; त्याची यंत्रणा कार्यक्षम ठेवणे आणि विचार उद्भवल्यास त्यावर त्वरित उपचार करणे व रोग होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. या दृष्टीकोनातूनच आज पर्यायी वैद्यक विश्वात अॅक्युप्रेशर, अलेक्झांडर टेक्निक, किरोप्रॅक्टीक, मसाज, ऑस्टिओपथी, पिलेट्स, टय़ूइना इ. अशा अनेकविध उपचारपद्धती प्रचलित दिसतात. यापैकी काहींचा आपण आता परिचय करून घेणार आहोत.
आपल्या शरीरातील सगळ्यात मोठा अवयव कोणता असा तुम्हाला प्रश्न विचारला तर आपल्या डोळ्यासमोर हृदय, यकृत, मूत्रपिंड इ. अवयव तरळू लागतील. पण सगळ्यात मोठा अवयव म्हणजे आपली ‘अस्थि-स्नायू’ संस्था होय. याच संस्थेमुळे इतर अवयवांना संरक्षण मिळते. याच संस्थेमुळे आपण चालू, धावू, बोलू, खाऊ शकतो, चित्र काढू शकतो किंवा नाचू शकतो आणि युद्ध करू शकतो किंवा शल्यक्रियाही करू शकतो! हाच अवयव शरीराला उपलब्ध, असलेल्या ऊर्जेचा सगळ्यात मोठा हिस्सा वापरतो व याच अवयवातील बिघाड बहुसंख्य वेळेला आपल्याला ताबडतोब डॉक्टरांकडे धाव घेण्यास भाग पाडतो व म्हणूनच या अवयवासंबंधित  उपचार पद्धतींना जगात भलताच भाव आहे. या उपचार पद्धतींमधील एक वैशिष्टय़पूर्ण (आणि काहीशी वादग्रस्तही!) पद्धती म्हणजे किरोप्रॅक्टीक! आज मुंबई-पुणे यासारख्या महानगरांमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके किरोप्रॅक्टर असले तरी अमेरिका-ऑस्ट्रेलिया, कॅनडा व काही युरोपियन देशांमध्ये त्यांची संख्या हजारोंनी आहे. तेथे ही उपचारपद्धती कायदेशीर मान्यताप्राप्त असून, हेल्थप्लॅन संमतही असते. जागतिक आरोग्य संघटनेनेही किरोप्रॅक्टिक (chiropractic) उपचारासंबंधी, प्रशिक्षणासंबंधी व व्यवसायाविषयी काही नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली आहेत.
ल्ल काय आहे हे किरोप्रॅक्टिक?
डॅनियल डेव्हिड पामर या ‘किरोप्रॅक्टिक’च्या जनकाच्या सिद्धांतानुसार मानवी आरोग्याचा पाया म्हणजे मानवी चेतासंस्था व तिचा मुख्य आधार म्हणजे पाठीचा कणा. (आश्चर्य म्हणजे योगामध्येही पाठीच्या कण्यास म्हणजे मेरुदंडास व त्याच्या सरळ असण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे!) या कण्यातील मणके सरकल्यास (Vertebral Sublvxation) त्यामुळे त्यातून बाहेर पडणाऱ्या नसांवर दाब पडून त्यांच्या कार्यात व पर्यायाने ज्या अवयवाला या नसा संदेश पोहोचवितात वा ज्यापासून संदेश आणून तो मेंदूपर्यंत पोहोचवतात त्या अवयवाचे कार्य बिघडते व रोगनिर्मिती होते. डी.डी. पामरने पुढे या ‘नसा’ दाबल्या जाण्याच्याऐवजी मणके सरकण्यामुळे त्यांच्या कार्यस्पंदनात बिघाड होऊन, अवयवांचे कार्य बिघडते असा सैद्धान्तिक बदल केला. हे सरकलेले मणके ‘हाताने’ परत जागच्या जागी सरकविणे (Spinal Manipulation) म्हणजे डी.डी. पामर यांच्या मते ‘किरोप्रॅक्टिक’! कंबरदुखीपासून, अर्धशिशीपर्यंत आणि लहान मुलांच्या अंथरुण ओले करण्याच्या विकृतीपासून ते आंत्रव्रणापर्यंत विविध विकारांवर किरोप्रॅक्टिकचा उपयोग होतो असे या उपचारपद्धतीचे समर्थक सांगतात.
अर्थात ‘अशास्त्रीय पंथ’ म्हणून या पद्धतीची हेटाळणी करणारेही (आधुनिक वैद्यकाचे उपासक असणारे) अनेक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या उपचारपद्धतीची मार्गदर्शक तत्त्वे सांगताना सन २००५ मध्ये, मणके सरकणे हा किरोप्रॅक्टिकचा सिद्धान्त, प्रत्यक्ष मणका सरकण्यासंबंधीचा (Physical or Structural displacement) नसून, ते सरकणे कार्यदृष्टीने (म्हणजे functional) आहे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बरेचसे वाद मिटावेत असे वाटते.
किरोप्रॅक्टिकची वेगवेगळी तंत्रे- आज युरोप अमेरिकेत या उपचारपद्धतीची कॉलेजेस असून त्यातील शिक्षणक्रम व कालावधी निश्चित केलेला असतो. अमेरिकेतील बहुतेक राज्यांत किरोप्रॅक्टिक पद्धतीने उपचार करणाऱ्यांना औषधांचे प्रिस्क्रीप्शन लिहिण्याची वा शल्यक्रिया करण्याची परवानगी नसते. तसेच त्यांना प्रमाणीकरण करणे (Accredition) आवश्यक असते. किरोप्रॅक्टिकचे दोन मुख्य प्रवाह आहेत. अ) पारंपरिक (Straight)- हे पामर यांनी विकसित केलेल्या मूळ पद्धतीशी इमान राखून आहेत. वैश्विक बुद्धिमत्ता, वैयक्तिक बुद्धिमत्ता (शरीरांतर्गत संतुलन) आणि प्रकृती स्वास्थ्य यांचे एकमेकांशी दृढ नाते असून मेरुदंडातील बिघाड हे प्रकृती अस्वास्थ्याचे प्रमुख कारण होय असेही परंपरा मानते. ब) आधुनिक Mixers)- मेरूदंडातील बिघाडाव्यतिरिक्त प्रकृती अस्वास्थ्याची अनेक कारणे असू शकतात व त्याकरिता Spinal Manipulation च्या व्यतिरिक्त व्यायाम, मसाज, आहार, अॅक्युपंक्चर इ.चाही योग्य पूरक वापर करण्यास हरकत नाही असे हा प्रवाह मानतो. आज जगात पारंपरिकपेक्षा या Mixers चेच प्रमाण अधिक आहे व यामुळेच किरोप्रॅक्टिकमध्ये पूर्वी मान्य नसलेले पुरावाधिष्ठित वैद्यकाचे (Evidence Based Medicine) महत्त्व वाढीस लागलेले दिसते व ते स्वागतार्हच आहे. आज किरोप्रॅक्टिकची जी विविध तंत्रे विकसित झाली आहेत ती पुढीलप्रमाणे-
१)Diversified Technique  २) स्प्रिंगचा वापर असलेला Activator Technique . ३) थॉम्पसन तंत्र  ४) गॉनस्टीड तंत्र ५) कॉक्सचे Flexion/ Distraction तंत्र ६) क्रॅनियल तंत्र. ७( सॅक्रो ऑक्सिपिटल तंत्र ८) Applied Kinesiology ९) Nimmo Receptor Tonus तंत्र १०) भूलशास्त्राचा वापर करून मणके बसविणे.
भविष्यकालीन वेध- मानवी शरीराचा डोलारा उभा करण्यात, तो सावरण्यात व सांभाळण्यात अस्थि, स्नायू (Musculoskeletal System) व जोडपेशींचे (Connective Tissues) अनन्यसाधारण योगदान आहे. या उतींकडे केवळ जड (Mechanical) दृष्टीने न पाहता, एक अवयव म्हणून पाहणे आवश्यक आहे असा मतप्रवाह अनेक वर्षांपासून वैद्यकक्षेत्रात आढळतो. या अवयवाच्या आरोग्यावर इतर अवयवांचे आरोग्य अवलंबून आहे, असेही ठाम प्रतिपादन काहीजण करताना आढळतात. (किरोप्रॅक्टिक हे त्यापैकी एक!)
शरीरांतर्गत सर्व जोडपेशी (डोक्यापासून पायापर्यंत) एकमेकाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जोडलेल्या असतात व हे महापटल सर्व शरीराला आधारभूत असते हे ध्यानात घेतले तर Spinal Manipulation चे महत्त्व थोडेथोडे ध्यानात येऊ लागते. अर्थात या विषयावर सखोल संशोधन होणे तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच अशा प्रकारचे उपचार करून घेणे योग्य. भविष्यात या शास्त्राकडून अधिक अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. मनाच्या समाधानाबरोबरच ‘देह’ ही समाधानी असणे र्सवकष आरोग्याच्या दृष्टीने कसे आवश्यक आहे ते एव्हाना ध्यानात आले असेलच!
ल्ल  किरोप्रॅक्टिक कोठे उपयुक्त?
आजतागायतच्या उपलब्ध माहितीनुसार पुढील विकारांवर ही उपचारपद्धती कमी-अधिक प्रमाणात उपयुक्त होऊ शकते (अर्थात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच!)- कंबरदुखी- बेल्स पाल्सी (Bell's Palsy) मान दुखणे Infantile Erb's Palsy तणावजन्य डोकेदुखी, प्रौढांमधील पाठीच्या कण्याची वक्रता (Adult Scoliosis) मुलांमधील अंथरूण ओले करण्याची विकृती
यासाठी वापरू नये- ऱ्हुमॅटॉईड सांधेदुखी, अस्थिविरलता

या शास्त्राचा जनक डॅनियल डेव्हिड पामर हा मूळचा कॅनेडियन, पण नंतर आयोव्हा प्रांतात डॅव्हनपोर्ट येथे स्थायिक झाला. सुरुवातीस त्याने मधमाशीपालन, रास्पबेरी विकणे, किराणामालाचे दुकान चालविणे असे विविध उद्योग केले. नंतर तो चुंबकोपचार शिकला व सन १८८० मध्ये त्याने आयोव्हात आपला दवाखाना थाटला. सन १८९५ मध्ये त्याच्या बिल्डिंगमधील दरवानावरच्या उपचारादरम्यान त्याने आपल्याला साधारण सतरा वर्षांपूर्वी पाठदुखीने कसे संत्रस्त केले व त्या पाठीच्या लचकण्यामुळेच आपण बहिरेही कसे झालो ते पामरला ऐकविले. दरवानाच्या पाठीवर उपचार करताना त्याचा एक मणका जागेवरून सरकल्याचे पामरच्या लक्षात आले, त्याने तो परत जागेवर बसविला आणि अहो आश्चर्यम्! पामरच्या म्हणण्यानुसार त्याची पाठदुखी तर पळालीच पण त्याचे बहिरेपणही नाहीसे झाले! आणि किरोप्रॅक्टिकचा जन्म झाला. पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्याच्या मुलाने म्हणजे बार्टलेट जोशुआ पामरने हे शास्त्र अधिक विकसित व लोकप्रिय केले. अमेरिकन मेडिकल असोसिएशनने १९८७ पर्यंत ही उपचारपद्धती बहिष्कृतच केली होती. पण Antitrust कायद्यांतर्गत ही असोसिएशन १९८७ साली किरोप्रॅक्टिक विरोधातील एक केस हरली व नंतर राजकीय समर्थनामुळे ही उपचारपद्धती युरोप अमेरिकेत झपाटय़ाने लोकप्रिय झाली.    ’

---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad