गोरस म्हणजे दूध. दूध व दही, ताक, लोणी, तूप, पनीर, खवा वगैरे दुधाचे पदार्थ. त्यांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग यांच्याबाबत समज-गैरसमज अधिक दिसतात.
'अन्नयोग' या सदरात आपण धान्यवर्ग, शमी (कडधान्ये) वर्ग, शाक (भाज्या, फळभाज्या) वर्ग, फळवर्ग वगैरे वर्गात येणाऱ्या विविध द्रव्यांची माहिती घेतली, मसाल्याच्या पदार्थांचेही आयुर्वेदीय गुणधर्म पाहिले. आता आपण माहिती घेणार आहोत गोरस वर्गाची. गोरस म्हणजे दूध. दूध व दही, ताक, लोणी, तूप, पनीर, खवा वगैरे दुधाचे पदार्थ सर्वांच्या परिचयाचे असतात, मात्र त्यांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग यांच्याबाबत समज-गैरसमज अधिक दिसतात. अन्नयोगामधून आपण दूध व दुधाच्या पदार्थांचे नेमके गुणधर्म पाहणार आहोत.
चरकसंहितेत आठ प्राण्यांच्या दुधाचे वेगवेगळे गुणधर्म दिलेले आहेत. गाय, म्हैस, बकरी, उंट, घोडी, मेंढी, हत्तीण व स्त्रीदुग्ध याप्रमाणे आठ प्रकारच्या दुधांचे गुणधर्म ग्रंथात दिलेले आहेत,
गाईचे दूध स्वादु शीतं मृदु स्निग्धं बहलं श्लक्ष्णपिच्छिलम् ।
गुरु मन्दं प्रसन्नं च गव्यं दशगुणं पयः ।।
तदेव गुणमेवौजं सामान्यात् अभिवर्धयेत् ।
प्रवरं जीवनीयानां क्षीरमुक्तं रसायनम् ।।...चरक सूत्रस्थान
* रस - मधुर
* गुण - मृदू, स्निग्ध, श्लक्ष्ण (गुळगुळीत),
पिच्छिल (चिकट), गुरु म्हणजे पचण्यास जड, मंद, प्रसन्नता देणारे
* वीर्य - शीतल
* गाईचे दूध व ओज यांचे गुणधर्म एकसारखे असल्यामुळे गाईच्या दुधामुळे ओज वाढते, जीवन देणाऱ्या सर्व द्रव्यांमध्ये व रसायन द्रव्यांमध्ये गाईचे दूध श्रेष्ठ होय.
* आहारद्रव्य म्हणून गाईचे दूध उत्तम असतेच, पण औषधातही गाईचे दूध मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. औषधी तेल वा तूप बनविताना गाईच्या दुधाच्या भावना दिल्या जातात. अनेक द्रव्यांची शुद्धी करण्यासाठी गाईचे दूध वापरले जाते. गाईचे दूध मेंदू व हृदयासाठी उत्तम असते.
* लघवीस आग होत असल्यास, अडखळत होत असल्यास, तसेच लघवी होताना वेदना होत असल्यास एक कप गाईचे दूध दोन चमचे गूळ टाकून घेण्याने बरे वाटते.
* पित्त वाढल्यामुळे पोटात दुखत असल्यास, आग होत असल्यास सामान्य तापमानाचे गाईचे दूध खडीसाखरेसह घोट घोट घेण्याने बरे वाटते.
म्हशीचे दूधहिषीणां गुरुतरं गव्यात् शीततरं पयः ।स्नेहान्यूनमनिद्राय हितम् अत्यग्नये च तत् ।।....चरक सूत्रस्थान
* म्हशीचे दूध पचण्यास जड व गाईच्या दुधापेक्षा थंड असते. मात्र म्हशीच्या दुधात स्नेहांश अधिक असतो.
* सध्या सहज उपलब्ध असणारे दूध म्हणजे गाईचे वा म्हशीचे दूध. म्हशीच्या दुधातला जडपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे पाणी टाकून उकळता येते वा सुंठीने संस्कारित करता येते. गाईचे दूध सर्वोत्तम असते व त्यानंतर म्हशीचे दूध पिण्यासाठी वापरता येते.
* दूध हाडांसाठी पोषक असल्याने वाढत्या वयाच्या मुलांनी तसेच स्त्रियांनी नियमित दूध घेणे उत्तम असते. खारकेची पूड टाकून उकळलेले दूध हाडांसाठी विशेष पोषक असते.
* घसा कोरडा पडणे, अकारण धडधडणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तता जाणवणे वगैरे तक्रारींवर दूध, खडीसाखर व तूप यांचे मिश्रण घेण्याचा उपयोग होतो.
* डोळ्यांची आग होत असल्यास गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या बंद डोळ्यांवर ठेवण्याने बरे वाटते.
* पोटात जखमा होणे (अल्सर), कावीळ, नाक-गुद-मूत्र वगैरेंमार्गे रक्तस्राव होत असल्यास फक्त दूध व साळीच्या लाह्या, दूध व भात एवढेच खाण्याने पटकन बरे वाटते व शरीराची ताकदही टिकून राहते.
बकरीचे दूध छागं कषायमधुरं शीतं ग्राहि पयो लघु ।रक्तपित्तातिसारघ्नं क्षयकासज्वरापहम् ।।...चरक सूत्रस्थान
* रस - मधुर व तुरट
* गुण - लघु म्हणजे पचण्यास हलके
* वीर्य -शीत
* बकरीचे दूध मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, रक्तपित्त, जुलाब, क्षय, खोकला, ज्वर वगैरेंमध्ये हितकर असते.
* क्षयरोग, कोरडा खोकला, ढास लागणे वगैरे तक्रारींमध्ये बकरीचे दूध विशेष उपयुक्त असते. नाकातून रक्त येण्याची सवय असणाऱ्यांनी बकरीच्या दुधाचे नस्य करण्याचा उपयोग होतो. जुलाब होत असताना गाई-म्हशीचे दूध पिता येत नाही, मात्र बकरीचे दूध घेण्याचा उपयोग होतो.
उंटिणीचे दूध
रुक्षोष्णं क्षीरमुष्ट्रीणां इषत्सलवणं लघु ।शस्तं वातकफानाहक्रिमिशोफोदरार्शसाम् ।।...चरक सूत्रस्थान
* रस - मधुर, किंचित खारट
* गुण - रुक्ष, लघु म्हणजे पचण्यास हलके
* वीर्य - उष्ण
* दोष - वात-कफशामक
* उंटिणीचे दूध आनाह म्हणजे पोट फुगणे, जंत होणे, अंगावर सूज येणे, पोटात पाणी होणे, मूळव्याध वगैरे त्रासांवर तसेच त्वचेच्या विकारात हितावह असते.
- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405 Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment