Wednesday, March 19, 2014

पाठदुखी

पाठदुखी हे एक लक्षण आहे, शरीरातल्या बिघाडाचे सूचक चिन्ह आहे. हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. अर्थातच पाठदुखीवर फक्‍त वेदना कमी करणे इतका मर्यादित स्वरूपाचा उपचार करणे अयोग्य ठरते, तर नेमके कारण काय आहे हे शोधून त्यानुसार नेमके उपचार करणे आवश्‍यक असते.

पाठदुखी व कंबरदुखीचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो, दुखण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी पाठदुखी सर्वांना माहिती असते. तसे पाहिले तर पाठदुखी हे एक लक्षण आहे, शरीरातल्या बिघाडाचे सूचक चिन्ह आहे. हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. अर्थातच पाठदुखीवर फक्‍त वेदना कमी करणे इतका मर्यादित स्वरूपाचा उपचार करणे अयोग्य ठरते, तर नेमके कारण काय आहे हे शोधून त्यानुसार नेमके उपचार करणे आवश्‍यक असते.

पाठीचा कणा हा संपूर्ण शरीराचा भरभक्कम आधार असतो. वाकणे, उठणे, बसणे, वळणे, चालणे अशा बहुतेक सर्वच क्रिया करताना आपण पाठीच्या कण्याचा वापर करत असतो. मानेमध्ये सात, छातीच्या मागच्या भागामध्ये बारा, कंबरेमध्ये पाच मणके असतात, माकडहाडाचे पाच मणके एकमेकांशी सांधलेल्या स्थितीत असतात व त्याच्याही खाली तीन ते पाच मणके जुळलेल्या स्थितीत असणारा कॉसिक्‍स म्हणून कण्याचा शेवटचा भाग असतो. अशा प्रकारे कवटीपासून ते बैठकीच्या भागापर्यंत हे सर्व मणके एकावर एक रचलेल्या स्थितीत असतात. दोन मणक्‍यांमध्ये जणू रबरापासून बनविल्यासारखी चकती असते, जिला "डिस्क (गादी)' असे म्हटले जाते. या मधल्या चकतीमुळेच कणा वाकू शकतो, वळू शकतो. या शिवाय या सर्व मणक्‍यांना व चकत्यांना धरून ठेवणारे अनेक संधिबंधने, स्नायू असतात. या कण्यामध्ये मज्जारज्जूचे स्थान असते. अतिशय महत्त्वाच्या व नाजूक मज्जारज्जूला पाठीचा कणा चहूबाजूंनी सुरक्षित ठेवण्याचे काम करत असतो.

पाठदुखीचे कारण
पाठदुखी असे म्हटले जाते तेव्हा हे दुखणे पाठीच्या कोणत्याही भागात उद्भवलेले असू शकते, तसेच पाठीच्या कण्यातील कुठल्याही संरचनेतील बिघाडाशी संबंधित असू शकते. उदा. पाठीच्या हाडांमधली ताकद कमी झाली तरी पाठ दुखू शकते. इतर हाडे ठिसूळ होतात त्याप्रमाणे मणके ठिसूळ होऊ लागले तरी पाठ दुखू शकते, कण्याला बांधून ठेवणाऱ्या संधिबंधनांना दुखापत झाली तरी पाठ दुखू शकते, कण्याला आधार देणारे स्नायू जखडू लागले तरी पाठदुखी सुरू होऊ शकते. दोन मणक्‍यांमधल्या चकतीची झीज झाली किंवा काही कारणाने ती स्वस्थानातून थोडी जरी निसटली आणि याचा दाब नसेवर आला तरी तीव्र स्वरूपाची पाठदुखी निर्माण होऊ शकते. याशिवाय स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयातील अशक्‍तता पाठदुखीला कारण ठरू शकते. अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अतिरक्‍तस्राव होणे हेसुद्धा पाठदुखीला आमंत्रण देऊ शकते. स्त्रीप्रजननसंस्थेत कुठेही सूज असली, जंतुसंसर्ग असला तरी त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी उद्भवू शकते. अर्थात अशा वेळी फक्‍त पाठीवर नाही तर आतील दोषावर नेमके उपचार करणे आवश्‍यक असते.

वाढत्या वयानुसारही पाठ-कंबरदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, संगणकावर रोज 10-12 तास काम हीसुद्धा पाठदुखीची कारणे होत. फार मऊ गादीवर झोपणे, उंच उशी वापरणे, स्थौल्य, उंच टाचेच्या चपला वापरणे, जड वस्तू उचलणे, ओढणे हीसुद्धा पाठदुखीला आमंत्रण देणारी असतात.

बिघडलेला वातदोष

आयुर्वेदानुसार विचार केला तर पाठदुखी, कंबरदुखी ही वातदोषातील बिघाडाशी संबंधित तक्रार होय. पाठीतील लवचिकता कमी होणे, उठता-बसताना आधाराची गरज भासणे, पाठ जखडणे, पाठीत चमक भरणे वगैरे सर्व तक्रारी वातदोषाशी संबंधित असतात आणि म्हणूनच सहसा पाठदुखी बरोबरीने वाताची इतर लक्षणेही उदा. गुडघेदुखी, मलावष्टंभ, गॅसेस, त्वचा कोरडी पडणे, अशक्‍तपणा जाणवणे, पाय दुखणे, नेहमीच्या हालचाली करताना सहजपणा न राहणे, सांध्यांमधून कटकट आवाज येणे वगैरे त्रास जाणवू लागतात.

म्हणूनच पाठदुखी, कंबरदुखीवर उपचार करताना वाढलेल्या, बिघडलेल्या वातदोषाला संतुलित करणे, झीज झालेली असल्यास ती भरून काढणे आणि ज्या कारणामुळे पाठदुखी सुरू झाली असेल ते कारण दूर करणे अशा प्रकारे योजना करणे आवश्‍यक असते.

पाठ दुखायला लागली, की विश्रांती घ्यावीशी वाटते हा सर्वांचा अनुभव असतो आणि सहसा यामुळे बरेही वाटते. मात्र, फार तीव्र स्वरूपाची पाठदुखी असेल, अगदी साध्या हालचाली करणेही अवघड होत असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक असते. विशेषतः वेदना पाठीतून सुरू होऊन पायांच्या टोकापर्यंत पोचत असतील, श्‍वासोच्छ्वास करताना त्रास होत असेल, छातीत दुखत असले तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे इष्ट होय; परंतु अशी परिस्थिती येऊ नये यासाठी दक्ष राहणेच इष्ट.

प्रतिबंधात्मक उपाय
संपूर्ण शरीराचा आधार असणाऱ्या पाठीच्या कण्याची सुरवातीपासून काळजी घेतली तर पाठदुखी-कंबरदुखीला प्रतिबंध तर होतोच, पण एकंदर चेतासंस्थेचे आरोग्य व्यवस्थित राहायला मदत मिळते. वातदोष संतुलित राहावा, पाठीच्या कण्यातील हाडे व सांधे तसेच आतील मज्जारज्जू यांचे पोषण व्हावे यादृष्टीने पुढील उपचार करता येतात.

मान व पाठीला तेल लावणे. वाताला संतुलित ठेवण्यासाठी, सांध्यांची लवचिकता कायम ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय होय. स्वतःहून किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी खालून वर या दिशेने पाठीच्या कण्याला तेल उदा. संतुलन कुंडलिनी तेल लावता येते.

नस्य - रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात घरचे साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकणे. विशेषतः हे मानेच्या आरोग्यासाठी उपयुक्‍त असते. तसेच मेरुदंडाला ताकद देण्यासाठी साहायक असते.

रोजच्या रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे. वाताच्या असंतुलनामुळे पोट साफ होत नाही आणि पोट साफ झाले नाही तर त्यामुळे वात अजूनच बिघडतो. अर्थातच या दुष्ट चक्राचा पाठीच्या कण्यावरही दुष्परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे चांगले. आवश्‍यकतेनुसार अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा, सॅनकूलसारखे चूर्ण घेता येते.

आहारात वातशामक, कफपोषक पदार्थांचा समावेश असणे -
किमान चार-पाच चमचे घरचे साजूक तूप रोजच्या आहारात ठेवणे, रोज कपभर ताजे सकस दूध पिणे, दुधात खारकेची एक चमचा पूड टाकणे, बरोबरीने शतावरी कल्प, चैतन्य कल्प घेणे हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे हितकारक ठरते.

मज्जापोषक, अस्थिपोषक पदार्थांचे सेवन करणे -
खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, बदाम, च्यवनप्राश, मॅरोसॅनसारखे रसायन रोज घेणे हे मणके, मेरुदंड अशा दोघांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे - पाठीचा कणा आणि मानसिक ताण यांचा खूप जवळचा संबंध असतो. ताणामुळे कण्याजवळील पेशी कडक झाल्या तर त्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते, पर्यायाने मानेचे व पाठीचे त्रास होण्याची शक्‍यता वाढते. मानसिक ताण आला तरी तो कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, संगीत ऐकणे, ॐकार गुंजन यांसारखे उपाय करता येतात.

पाठीच्या कण्याचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्यासाठी अजून एक उत्तम उपाय म्हणजे नियमित व्यायाम. यामध्ये सर्वप्रथम येते ते चालणे. रोज 30 मिनिटे नियमित चालल्यास पाठीच्या मणक्‍यांची, मणक्‍यांमधील गादीसारख्या डिस्कची लवचिकता नीट राहते, त्यामुळे मान-पाठीचे त्रास कमी होण्यास प्रतिबंध होतो.

याखेरीज ताडासन, अर्धशलभासन, स्कंध चक्र, मार्जारासन, संतुलन क्रियायोगातील स्थैर्य, समर्पण, विस्तारण ही आसनेही मानेच्या-पाठीच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.

मानेचे सोपे व्यायाम, उदा. ताठ बसून मान हलकेच मागे नेणे, पुढे आणणे, डावी-उजवीकडे फिरविणे, खांद्यांच्या बाजूला शक्‍य तेवढी वाकवणे, पुन्हा सरळ करणे या प्रकारचे व्यायाम करता येतात. बैठे काम असणाऱ्यांनी, विशेषतः संगणकावर काम करावे लागणाऱ्यांना तर हे व्यायाम खुर्चीत बसल्या बसल्यासुद्धा करता येतात.

प्राणायाम, दीर्घश्‍वसन किंवा या दोघांचा एकत्रित परिणाम देणारे ॐकार गुंजनसुद्धा पाठीच्या कण्यासाठी उत्कृष्ट उपाय होय. या उपायांनी हवेतील प्राणशक्‍ती अधिक प्रमाणात मिळू शकते व ती मेंदू, मेरुदंड यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्‍यक असते. प्राणशक्‍तीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झाला की वेदना, जखडणे, अवघडणे यांसारख्या तक्रारींना वाव मिळत नाही, उलट रक्‍ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते. रोज किमान 10-15 मिनिटे यासाठी काढली तर पाठीच्या कण्यासंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होऊ शकेल.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad