Friday, February 5, 2010

अन्नयोग : दूध 2

जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये बाळाचा विकास सर्वस्वी दुधावरच होत असतो. अर्थातच आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम असते.
दुधाला पूर्णान्न समजले जाते, कारण जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये बाळाचा विकास सर्वस्वी दुधावरच होत असतो. अर्थातच आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम असते. काही कारणास्तव आईचे दूध न मिळाल्यास गाईचे वा बकरीचे दूध बाळाला देता येते.
आयुर्वेदात आठ प्राण्यांच्या दुधाचे स्वतंत्र गुण सांगितले आहेत. मागच्या वेळेला आपण गाय, म्हैस, बकरी व उंटिणीच्या दुधाचे गुणधर्म पाहिले, आता घोडी वगैरे इतर प्राण्यांच्या दुधाचे गुणधर्म आपण पाहू.

घोडी वगैरे एक खूर असणाऱ्या प्राण्यांचे दूध
बल्यं स्थैर्यकरं सर्वमुष्णं चैकशफं पयः । साम्लं सलवणं रुक्षं शाखावातहरं लघु ।।...चरक सूत्रस्थान
* चव - आंबट व किंचित खारट
* गुण - रुक्ष, लघु म्हणजे पचायला सोपे
* वीर्य - उष्ण
एक खूर असणाऱ्या प्राण्यांचे दूध बलवर्धक, शरीराला स्थिरता देणारे व हाता-पायातील वातदोष दूर करणारे असते.

मेंढीचे दूध
हिक्काश्‍वासकरं तूष्णं पित्तश्‍लेष्मलमाविकम्‌ ।...चरक सूत्रस्थान
* वीर्य - उष्ण
* दोष - पित्त व कफवर्धक
मेंढीचे दूध उचकी व दमा उत्पन्न करणारे व अतिशय गरम असते. मेंढीच्या दुधाला एक प्रकारचा दुर्गंध येतो, त्यामुळे मेंढीचे दूध सहसा प्यायले जात नाही. शिवाय ते उष्ण असल्यानेही नियमित घेणे अयोग्य होय.

हत्तिणीचे दूध हस्तिनीनां पयो बल्यं गुरु स्थैर्यकरं परम्‌ ।...चरक सूत्रस्थान
हत्तिणीचे दूध बलदायक व शरीराला स्थिर करणारे असते मात्र पचण्यास अवघड असते.

स्त्रीचे दूध
जीवनं बृंहणं सात्म्यं स्नेहनं मानुषः पयः । नावनं रक्‍तपित्ते च तर्पणं चाक्षिशूलिनाम्‌ ।।...चरक सूत्रस्थान
स्त्रीचे दूध अर्थात स्तन्य नवजात बालकासाठी जीवनदायक असते, सर्व धातूपोषक असते, अनुकूल असते व शरीराला उचित स्निग्धता देते. नाकातून रक्‍त येत असल्यास नाकात घालण्यासाठी आणि डोळे दुखत असल्यास डोळ्यात घालण्यासाठी स्तन्य वापरता येते.

दहीदही तयार करण्यासाठी गाईचे वा म्हशीचे दूध वापरले जाते. दूध तापवून त्याला विरजण लावले की त्याचे दही तयार होते. दुधाला लावायचे विरजण पारंपरिक, हजारो वर्षांपासून चालत आलेले व प्राणिज असायला हवे. लिंबाची वाळवलेली साल दुधात टाकूनही दही तयार होते पण अशा वनस्पतिज विरजणाने तयार झालेले दही खरे दही नव्हे. पारंपरिक, प्राणिज विरजण लावल्यानंतर त्याचे नीट दही लागायला पुरेसा वेळ द्यावा लागतो. रात्री उशिरा विरजण लावले व सकाळी लवकर दही तयार झाले असे समजणे योग्य नाही. विरजण लावल्यावर त्याचे नीट दही होण्यासाठी 10-11 तास द्यावे लागतात. दूध व्यवस्थित व पूर्णपणे विरजण्यासाठी किंवा दुधाचे संपूर्णपणे दह्यात परिवर्तन होण्यासाठी त्यावर सूर्याच्या प्रकाशाचा थोडा संस्कार होणे आवश्‍यक असते. थंडीच्या दिवसात दही जमायला थोडा अधिक वेळ लागतो. उन्हाळ्यात त्या मानाने दही लवकर लागते.
या प्रकारे योग्य विरजण, पुरेसा वेळ या गोष्टी सांभाळून जे दही लागते ते पुरेसे पाणी टाकून रवीने नीट घुसळले व त्यातून लोणी बाजूला काढले की जे ताक तयार होते ते खरे ताक. मुळात जर दहीच योग्यप्रकारे तयार केलेले नसेल तर त्यातून तयार होणारे ताक, लोणी, तूप वगैरे योग्य नसतील.
संपूर्ण जगभर दही खाण्याची पद्धत दिसते पण दह्याचे गुणधर्म पाहून ते आपल्या प्रकृतीला अनुकूल आहे वा नाही हे पाहणे आवश्‍यक होय.
रोचनं दीपनं वृष्यं स्नेहनं बलवर्धनम्‌ ।पाकेऽम्लमुष्णं वातघ्नं मल्यं बृंहणं दधि ।।...चरक सूत्रस्थान

* रस -मधुर, आंबट किंचित तुरट
* गुण - गुरु म्हणजे पचण्यास जड, स्निग्ध
* वीर्य - उष्ण
* विपाक - आंबट
* दोष - वातनाशक पण पित्त-कफवर्धक

दही चवीला रुचकर असते, योग्य प्रमाणात सेवन केले असता ताकद वाढवते, शरीराला स्निग्धता देते तसेच अग्नी प्रदीप्त करते, पण दह्यामुळे शरीरातील स्रावांचे प्रमाण वाढते.

दह्यामुळे अंगावर सूज येऊ शकते, सर्दी-खोकला होऊ शकतो, चरबी वाढू शकते. म्हणून दही नियमितपणे खाणे योग्य नसते. वजन जास्ती असणाऱ्यांनी, त्वचारोग असणाऱ्यांनी, सर्दी-खोकला होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी, यकृत-वृक्क या अवयवांची कार्यक्षमता कमी झालेली असणाऱ्यांनी, उष्ण प्रकृती असणाऱ्यांनी दही नियमित वा वारंवार खाणे टाळणे उत्तम होय.
सूर्यास्तानंतर दही नुसते खाऊ नये तर मुगाचे कढण, मध, तूप, खडीसाखर, आवळकाठी, सैंधव यापैकी एका पदार्थासह खावे असेही संदर्भ आहेत. एकंदर पाहता दही खूपच काळजीपूर्वक खायला हवे. आंबट व शिळे दही खाणे निश्‍चितपणे टाळावे कारण अशा दह्याने रक्‍तदोष तयार होतो. परिणामतः त्वचारोग, तोंड येणे, पाळीच्या वेळेला अतिरक्‍तस्राव होणे, शरीराला दुर्गंधी येणे यासारखे अनेक त्रास होऊ शकतात. अदमुरे म्हणजे विरजण लावल्यानंतर चार - पाच तासात बनलेले, नीट न लागलेले दही. अदमुऱ्या दह्याने त्रिदोषांचा प्रकोप होतो, म्हणून असे दही खाणे अयोग्य होय. नीट लागलेल्या दह्याचे पाणी मात्र औषधी असते. शरीरातील सर्व स्रोतसांची शुद्धी करण्याचा गुण दह्याच्या पाण्यात असतो. म्हणूनच अनेक औषधी तेला-तुपावर दह्याच्या पाण्याचा संस्कार केलेला असतो.

- डॉ. श्री बालाजी तांबे Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

1 comment:

  1. खरच दुधाला संपुर्ण अन्न म्हणतात ते काहि चुकिचे नाहि. पण या महाराष्ट्र नव्हे ते संपुर्ण हिन्दुस्तानात दुधाचे दर ज्या पध्दतीने वाढलेत ते पाहता, गरिबाच्या नशिबी हा अन्नयोग अवघडच म्हणायचा.

    आशिष कुलकर्णी

    ReplyDelete

ad