Monday, February 15, 2010

प्रेमाचे स्थान : हृदय

डॉ. श्री बालाजी तांबे
हृदय हे ओज, प्रेम व प्रेरणा यांचे मुख्य स्थान असते. मेंदू व मनाचा संबंध आहे असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात मनाचा व हृदयाचा संबंध असतो. मनावर झालेले सर्व आघात हृदयावर परिणाम करतात. आपण हृदय विकसित केले तर जन्माचे कल्याण होते.
हृदय-फुफ्फुसे या जोडीतील फुफ्फुसे पुरुषासारखी व हृदय स्त्रीसारखे असते. हृदय तसेही मातृज असते. शरीरातून आलेले अशुद्ध रक्‍त फुफ्फुसांमध्ये येते व त्या ठिकाणी श्‍वासातून आलेला प्राणवायू व प्राण ही शक्‍ती मिळवून शुद्ध झालेले रक्‍त हृदयाकडे पाठवले जाते. पुरुष सर्व जगभर फिरून अनेक उद्योग करून चरितार्थासाठी लागणारी शक्‍ती मिळवितो, परंतु स्त्री शक्‍तीवर व अन्नावर संस्कार करून घरातील सर्व मंडळींना, पै-पाहुण्याला व येणाऱ्या-जाणाऱ्याला ताजेतवाने करून स्वतःच्या कार्यास प्रवृत्त करते. हृदय रक्‍ताचा स्वीकार करून पुन्हा ते सर्व शरीराला पोचविण्याचे काम करते आणि हृदय हे ओज, प्रेम व प्रेरणा यांचे मुख्य स्थान असते.

शरीररूपी गाडी चालायला आवश्‍यक असणारे पेट्रोल म्हणजे वीर्य. पेट्रोल गाडीच्या इंजिनात गेल्यावर तेथे हवेच्या विशिष्ट दाबाखाली येऊन ठिणगी पडली की ते भपकन पेटून शक्‍ती तयार होते. या तयार झालेल्या शक्‍तीने पिस्टन पुढे-मागे होतो व गाडी चालायला लागते. तसे हृदयातल्या कप्प्यात रक्‍त आल्यावर ठिणगी पडली की हृदयातून रक्‍त सर्व शरीराकडे पोचविण्याची क्रिया (डिलिव्हरी सिस्टीम) सुरू होते. हृदयाच्या ठिकाणी चेतना असते व हृदयाच्या ठिकाणी असलेले ओज वीर्यातून तयार झालेले असते. ओज हा एक स्वतंत्र विषय आहे. ओज हृदयात राहते, या कारणाने हृदयाला ओजाचे स्थान म्हटले जाते. पण मेंदूलाही ओजाची आवश्‍यकता असतेच. मेंदू, हृदय यांना ओजाची अधिक आवश्‍यकता असते. मेंदू व हृदयाने ओज घेतल्यावर उरलेल्या ओजाच्या द्वारा शरीर इतर कार्य करू शकते. अतिमैथुनात व्यस्त झालेल्या मंडळींच्या हृदयाला व मेंदूला ओजाची व वीर्याची पूर्ती नीट न झाल्याने ही मंडळी लवकर थकतात, ही माणसे निरुत्साही असू शकतात, त्यांच्यात जोश कमी असू शकतो.

शरीरात अभिसरण होणारे रक्‍त शरीराद्वारा वापरले गेले की अशुद्ध होते, त्यातील शक्‍ती निघून जाते. सर्व शरीरातील अशुद्ध रक्‍त हृदयाच्या एका कप्प्यात येते. हृदयाचे आकुंचन झाले की हे अशुद्ध रक्‍त फुफ्फुसात येते. फुफ्फुसात आलेले अशुद्ध रक्‍त प्राणवायूच्या संपर्कात येते व शुद्ध होते. हे शुद्ध आलेले रक्‍त पुन्हा हृदयाच्या एका कप्प्यात येते व हृदयाच्या आकुंचनामुळे ते सर्व शरीरभर पोचवले जाते. अशा तऱ्हेने हृदय पंपासारखे काम करत असते.

हृदय हे प्रेमाचे व मनाचे स्थान आहे, हे ज्या भारतीयांनी शोधले त्यांचे कौतुक करण्यासारखे आहे. हृदयात प्रेमाचे स्थान असते. मनुष्यमात्राला काही अडचण आहे का, त्यांना आपण काही देऊ शकतो का, वगैरे भावना हृदयात निर्माण होते. प्रेमाचे प्रतीक दाखवायचे असेल तर आपण हृदयाचे चित्र काढत राहतो. हृदयातच प्रेमाचा वास असतो. हृदयातच भक्‍तीचा वास असतो. हृदयातच एखाद्या मनुष्यासाठी असलेले समर्पण असते.

याच संदर्भात रामायणात एक कथा आहे. हनुमान म्हणाले, ज्या गोष्टीत राम नाही ती गोष्ट मला नको. स्वतःच्या छातीत राम आहे हे दाखविण्यासाठी हनुमंतांनी स्वतःची छाती फाडून दाखविली. असे जर आपण हृदय विकसित केले तर जन्माचे कल्याण होते, अन्यथा जन्माला आला व मरून गेला, एवढेच घडते. रक्‍ताचे शुद्धीकरण होत राहते, शरीर रक्‍त वापरत राहते. या कार्यात महिनोन्‌ महिनेच काय, वर्षानुवर्षे काहीही फरक पडत नाही.
आपल्या शरीरात जेवढी म्हणून शक्‍तीची केंद्रे आहेत, त्यांना कमळाची उपमा दिलेली आहे. हृत्पद्म, सहस्रदलपद्म वगैरे.

हृदय हे उलट्या ठेवलेल्या कमळासारखे असते व ते छातीच्या मध्यभागी असून, एका बाजूला किंचित कललेले असते. हृदयरूपी कमळातून निघालेल्या दांड्या वरच्या बाजूने निघालेल्या असतात. दांड्या वर असल्याने उलट्या ठेवलेल्या कमळाची उपमा दिलेली आहे. कमळ जसे उमलते व बंद होते तसे हृदयही उघडते व बंद होते, म्हणजे त्याचे आकुंचन व प्रसरण होत असते. निसर्गातील कमळाच्या फुलाबद्दल एक आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कमळाच्या फुलावर प्रकाश पडेपर्यंत ते उघडे राहते, प्रकाश पडायचा बंद झाला की ते बंद होते. म्हणून कमळ सकाळी उमलते व सूर्यास्ताच्या सुमाराला बंद होते. शिवाय कमळाच्या पाकळ्या उघड-बंद होताना त्यांची रचना बिघडलेली दिसत नाही.

आपल्या हृदयाला सांभाळणे आपले काम आहे. ते सहसा तक्रार करत नाही हे लक्षात ठेवून त्याची काळजी लक्षपूर्वक घेणे आवश्‍यक असते.
हदयाची उघडझाप अविरतपणे चालू असते, पण त्यात अडथळा का निर्माण होतो, हे पाहणे आवश्‍यक आहे. हृदयाचा हृत्कमल असा उल्लेख सर्व भारतीय वाङ्‌मयात, आयुर्वेदात, योगशास्त्रात सापडतो. आपले हृदय सतत कार्यरत असते. हृदय हेच मनाचे व प्रेमाचे स्थान आहे. मेंदू व मनाचा संबंध आहे असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात मनाचा व हृदयाचा संबंध असतो. मनावर झालेले सर्व आघात हृदयावर परिणाम करतात. रात्रंदिवस कार्यरत असलेल्या हृदयाला अचानक असे काय होते, की ज्यामुळे आपले जीवन संपुष्टात येऊ शकते. सहसा हृदय तक्रार करत नाही, त्याने तक्रार केली तरी आपण तिकडे लक्ष देत नाही, त्यामुळे हृदयाचे दुखणे विकोपाला जाते, आपल्याला त्रास होतो व आपण जागे होतो.

आपल्या शरीरातील इतर चक्रांनाही कमळाचीच उपमा दिलेली असते. मणिपूर चक्राच्या ठिकाणचे सूर्यकमळ, ब्रह्मरंध्राच्‌?ा ठिकाणचे सहस्रदलपद्म वगैरे. सहस्रदलपद्म वर उमलणारे आहे व त्याची व्याप्ती सर्व शरीरभर असते. याला हजार पाकळ्या आहेत असे म्हणत असताना खरोखरच आपल्या मेंदूत हजारो नाड्या कार्यरत असतात, असे आढळते.

हृदयात रक्‍त आत येणे, हृदयाच्या आकुंचनाबरोबर सर्व रक्‍त शुद्ध करण्यासाठी फुफ्फुसांकडे पोचविणे, फुफ्फुसांकडून आलेले शुद्ध रक्‍त हृदयाच्या आकुंचनाबरोबर सर्व शरीरभर पोचविणे, हे काम अविरतपणे होत असते. यात अडथळा का येतो, हेही समजून घेण्यासारखे आहे.

- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405 Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad