रसरशीत फळे सर्वांनाच हवीहवीशी वाटतात, फळांचा योग्य प्रमाणात, योग्य स्वरूपात केलेला वापर आरोग्यासाठीही निश्चितपणे हितकर असतो. आजही आपण फळांचे आयुर्वेदिकदृष्ट्या गुणधर्म पाहणार आहोत...
- डॉ. श्री बालाजी तांबे
जांभूळ
तत्फलं तुवरं चाम्लं मधुरं शीतलं मतम्रच्यं रूक्षं ग्राहकं तु लेखनं कण्ठदूषकम्।।
स्तंभकरं वातकारकं कफपित्तनुत्। आध्मानकारकं प्रोक्तं पूर्ववैद्यैर्मनीषिभिः।। ...निघण्टु रत्नाकर
* जांभूळ चवीला तुरट, आंबट-गोड असते, वीर्याने शीत असते, रुचकर असते. मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, अतिरिक्त वाढलेल्या धातूंचे लेखन करते. कफ तसेच पित्तदोषास कमी करते पण वात वाढवते. अतिप्रमाणात जांभळे खाल्ल्यास घसा खराब होऊ शकतो, मलावष्टंभाचा त्रास होऊ शकतो व पोटात वायू धरू शकतो.
* पित्त वाढल्यामुळे मळमळत असल्यास जांभळाचा रस खडीसाखरेसह मिसळून तयार केलेले चाटण थोडे थोडे घेण्याने बरे वाटते.
* भूक लागत नसल्यास जांभळाचा एक चमचा रस व आल्याचा अर्धा चमचा रस जेवणापूर्वी घेण्याचा उपयोग होतो.
* जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या केल्यास दात व हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते.
कवठ
तत्पक्वं रूचिदं चाम्लं कषायं ग्राहि मधुरम्। कण्ठशुद्धिकरं शीतं गुरू वृष्यं च दुर्जरम्।।
श्वासं क्षयं रक्तरूजं वान्तिं वातश्रमं तथा। हिध्मानं च विषं ग्लानिं तृषां दोषत्रयं तथा।।...निघण्टु रत्नाकर
* कवठाचे पिकलेले फळ चवीला आंबट-गोड व तुरट असते, वीर्याने शीत असते व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. कवठातील धागे व बिया पचण्यास जड असल्यामुळे कवठ जड समजले जाते. कवठ कंठाची शुद्धी करते, दमा, क्षयरोग, रक्तविकार, उलटी, वातदोष, श्रम, उचकी, विष, तृष्णा, ग्लानी वगैरे तक्रारीत हितकर असते. तिन्ही दोषांचे संतुलन करते.
* पिकलेल्या कवठातील बिया व रेषा काढून टाकून शिल्लक राहिलेल्या गराची गुळासोबतची चटणी अतिशय रोचक असते, यामुळे भूकही वाढते.
* शौचासह आव, मूळव्याध वगैरे त्रासावर कवठाचा बिया व धागे काढलेला गर ताकासह घेण्याचा उपयोग होतो.
* कवठाचा साखरेसह तयार केलेला मुरांबा पाचक म्हणून चांगला असतो.
बोरे
तच्च पक्वं तु मधुरं अम्लमुष्णं कफप्रदम्। ग्राहकं लघु रूच्यं तु वाय्वतीसारशोषहृत्।।
रक्तश्रमहरं प्रोक्तं पण्डितैश्चरकादिभिः।...निघण्टु रत्नाकर
* बोराचे पिकलेले फळ चवीला गोड-आंबट असते, वीर्याने उष्ण असते व कफ वाढवणारे असते. चवीला रुचकर, पचण्यास हलके असे बोर मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, वात दोषास कमी करते, जुलाब थांबवते, रक्तविकार, श्रम, शोष वगैरे त्रासातही हितकर असते.
* म्हणून ताजी बोरे खाल्ली जातात, पण औषधात सुकलेल्या बोरांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. औषध म्हणून लहान बोरे वापरणे चांगले असते, आकाराने मोठ्या पण बेचव बोरांचा औषध म्हणून उपयोग होत नाही.
* खूप श्रमांनी येणारा थकवा दूर होण्यासाठी पिकलेली गोड बोरे खाण्याचा उपयोग होतो.
* कोरडे उमासे येत असल्यास, मळमळ होत असल्यास ताजी बोरे चघळून खाण्याचा उपयोग होतो.
* तापामध्ये शरीराचा दाह होत असल्यास सुक्या बोरांचा काढा खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो, यामुळे तापही उतरतो.
* वारंवार जुलाब होत असल्यास, भूक लागत नसल्यास, जिभेवर पांढरा थर साठत असल्यास सुक्या बोरांचे जिरे, काळे मीठ, डाळिंबाचे दाणे टाकून तयार केलेले सार घेण्याचा उपयोग होतो, याने तोंडाला चवही येते.
- डॉ. श्री बालाजी तांबे
No comments:
Post a Comment