Sunday, June 21, 2009

अन्नयोग

मुगाची खिचडी विशेषतः वात-पित्त किंवा पित्त-वात प्रकृतीसाठी उत्कृष्ट असते.

एखादा पदार्थ बनविताना त्यात कोणती घटकद्रव्ये टाकावीत, कोणत्या क्रमाने टाकावीत, कोणत्या गोष्टी एकत्र करू नयेत किंवा कोणते दोन पदार्थ एकत्र वा एका पाठोपाठ खाऊ नयेत या व यासारख्या अनेक लहान; पण महत्त्वाच्या सूचनांमधून अन्नयोग साकारतो.
'प्रकृतीनुरूप आहार' ही संकल्पना प्रत्यक्षात आणायची असली तर स्वतःची प्रकृती जशी माहिती असायला हवी, तसेच आहारातील प्रत्येक घटकद्रव्यांचे गुणही माहिती असायला हवेत. उदा. एखाद्या पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला मूग थंड असतात म्हणून पथ्यकर असतात, तर कुळीथ उष्ण असतात म्हणून जपून खायला हवेत, हे माहिती हवे. याच उद्देशाने धान्ये, कडधान्ये, भाज्यांचे स्वतंत्र गुणधर्म आपण पाहतो आहेत. अन्नयोग संकल्पनेतला हा जणू मूळ पायाच होय.
पुढे मात्र अन्नयोग संकल्पनेचा अतिशय उत्कृष्ट विकास होत जातो. एखादा पदार्थ बनविताना त्यात कोणती घटकद्रव्ये टाकावीत, कोणत्या क्रमाने टाकावीत, कोणत्या गोष्टी एकत्र करू नयेत किंवा कोणते दोन पदार्थ एकत्र वा एका पाठोपाठ खाऊ नयेत या व यासारख्या अनेक लहान; पण महत्त्वाच्या सूचनांमधून अन्नयोग साकारतो. उर्वरित भाज्या, फळे यांचे गुण आपण पुढे पाहणारच आहोत. आज आपण तयार पदार्थांचे गुण त्यातील विविध घटकद्रव्यांच्या गुणांनुसार कसे बदलतात याची २-३ उदाहरणे पाहणार आहोत.
खिचडी
मुगाची खिचडी प्रसिद्ध आहे. आयुर्वेदाच्या ग्रंथातही खिचडीचा उल्लेख सापडतो. खिचडीला कृशरा असे म्हणतात,
पादप्रस्था मुद्गदालिरर्धप्रस्थाश्‍च तन्दुलाः ।
कृशरा साध्यते सुज्ञैस्तेषां च द्विगुणैः जले ।।

तांदळाच्या निम्म्या प्रमाणात मुगाची डाळ घेऊन दोन्ही एकत्र करून धुवावे. अग्नीवर भांडे ठेवून त्यात तेल घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मसाला, हळद, हिंग, तिखट टाकून धुतलेले डाळ तांदूळ टाकावे. दुप्पट प्रमाणात आधणाचे पाणी घालावे. चवीपुरते मीठ व साखर टाकून शिजू द्यावे. तयार झालेली खिचडी तूप घालून सेवन केली असता तृप्तीकर असते. शुक्रधातू व धातुवर्धक असते. तांदूळ व मूग डाळ हे दोन्हीही वीर्याने शीत असतात. तांदळात कफ वाढविण्याचा थोडासा स्वभाव असतो; पण तो हळद, हिंग, तिखट व मसाल्यामुळे संतुलित होतो. अशा प्रकारची मुगाची खिचडी विशेषतः वात-पित्त किंवा पित्त-वात प्रकृतीसाठी उत्कृष्ट असते.
मसुराच्या डाळीची खिचडी
मुगाच्या खिचडीप्रमाणेच मसुराच्या डाळीची खिचडी करता येते. यातही तांदळाच्या निम्म्या प्रमाणात मसुराची डाळ घ्यायची असते. तांदूळ व डाळीचे मिश्रण पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. अग्नीवर भांडे ठेवून त्यात तेल घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मसाला, धणे पूड, हळद, हिंग, तिखट टाकून धुतलेले डाळ तांदूळ टाकावे. दुप्पट प्रमाणात आधणाचे पाणी घालावे. चवीपुरते मीठ व साखर टाकून शिजू द्यावे. याप्रकारे तयार झालेली खिचडी लागते चविष्ट व असतेही पौष्टिक. तांदूळ वीर्याने शीत व वात-पित्तशामक असतात, तर मसुराची डाळ शिजली की पित्त तसेच कफदोष कमी करते. मसुरातला वात वाढविण्याचा हलकासा स्वभाव हळद, हिंग, तिखट, मसाल्यामुळे कमी होतो. म्हणूनच मसुराची खिचडी विशेषतः पित्त-कफ किंवा कफ-पित्त प्रकृतीसाठी उत्तम असते.
मुगाचे यूष / सूप
मुगाच्या १६ पट पाणी घ्यावे व अग्नीवर ठेवून एक चतुर्थांश होईपर्यंत आटवावे. शिजलेले मूग पळीच्या साह्याने घाटून बारीक करावे व वस्त्राच्या साह्याने गाळून घ्यावे. यात थोडे डाळिंबाचे दाणे (वाळवलेले असले तरी चालतील), सैंधव मीठ, धणे, पिंपळी, सुंठ व जिरे यांची पूड घालावी. हे यूष सेवन करण्याने पित्त-कफजन्य विकार नष्ट होतात. मूग पित्तशामक असतात, डाळिंबही पित्त-कफशामक व पाचकही असतात. म्हणून मुगाचे यूष पित्तशामक असते, तसेच पचण्यास हलकेही असते.

No comments:

Post a Comment

ad