Wednesday, June 3, 2009

आता तरी धूप घाला

धुराचे महत्त्व एवढे, की सर्व जगभर सर्व प्रकारच्या मनुष्यमात्राने धुराचा फायदा करून घेण्यासाठी धूमचिकित्सा धर्माशी निगडित केली व धुराचा उपयोग मंदिरे, मशिदी, चर्च वगैरे ठिकाणी करून घेतला. अदृश्‍य शक्‍तींमुळे होणारे त्रास दूर करण्यासाठी, मानसिक त्रास दूर करण्यासाठी धूमचिकित्सा आयुर्वेदात सुचविलेली दिसते.
तर्कशास्त्र शिकताना धुराचा प्रथम उल्लेख येतो. जेथे धूर आहे तेथे अग्नी आहेच, असे अनुमान बांधता येते. अग्नी जोराने धगधगणारा व ज्वाळा प्रकट होणारा असू शकतो किंवा तळाला नुसते निखारे असू शकतात. ते दुरून दिसू शकत नाहीत. पण धूर नेहमी सूक्ष्म व ऊर्ध्वगामी असल्याने आकाशात जाणाराच असतो व तो दुरूनही नजरेला पडतो. असा धूर कोठे दिसला तर तेथे अग्नी असावाच लागतो. धूर व अग्नी जोडीने असतात. याचाच अर्थ धुरात अग्नी असतो व अग्नीत धूर असतो.
अग्नीचे अत्यंत सूक्ष्म रूप, ज्या ठिकाणी जडत्व कणमय होते त्या ठिकाणी धूर असतो. म्हणूनच धूर सगळीकडे पसरू शकतो. तो अत्यंत हलका असल्याने गुरुत्वाकर्षणाच्या उलट्या दिशेने, म्हणजे वर जाऊ शकतो. जी वस्तू जळण्यामुळे धूर उत्पन्न झाला, त्या वस्तूचे कण धुरात असणे स्वाभाविक आहे. किंबहुना अग्नीमुळे वस्तूचे घनरूप तुटते व वस्तू कणरूपात परिवर्तित होते.
अग्नीचा उपयोग करून घ्यायचा ठरविल्यानंतर साहजिकच आयुर्वेदाने धुराचा योग्य वापर करून घ्यायचे ठरविले. फुफ्फुसांसारख्या अत्यंत बारीक रंध्रात जेव्हा दोष उत्पन्न होतो किंवा त्या ठिकाणी जड कण (कफदोष) साठतात तेव्हा साठलेल्या कणांना वितळवून टाकून फुफ्फुसांची लवचिकता प्राप्त करून देणे आवश्‍यक असते. यासाठी दिलेले औषध आत पसरून त्याचे परिणाम मिळविण्यात साठलेल्या गोष्टींमुळे व कफामुळे अडथळा येऊ शकतो. त्यासाठी औषधी द्रव्यांच्या कणांना अग्नीवर स्वार करून त्या ठिकाणी पोचविण्याची उपाययोजना केली तर फुफ्फुसे मोकळी होऊन उपयोग होऊ शकतो.
साधा अडुळशाचा काढा वा मधातून दिलेले औषधही काम करू शकते. पण छातीवर "संतुलन अभ्यंग तेल' लावून रुईच्या पानांनी शेकण्यामुळे कमी त्रासात (वेळात) जलद फायदा होऊ शकतो. छातीवर लावलेले "संतुलन अभ्यंग तेला'चे कण रुईच्या पानांच्या अग्नीशी संस्कारित झाल्यामुळे ते फुफ्फुसांपर्यंत शोषण्याची क्रिया वेगाने होते.
योग्य औषधी कण अग्नीवर संचालित करून तोंडाच्या मार्गाने फुप्फुसांपर्यंत पोचविले, तर अधिक फायदा होऊ शकेल, ही गोष्ट आयुर्वेदाने ओळखून विशिष्ट औषधी द्रव्यांचे धूम्रपान करावयास सांगितले. वेगवेगळ्या औषधी द्रव्यांमुळे होणारे फायदे पाहून धूम्रपानाचा विकास झाला.
यातूनच पुढे तंबाखूच्या धूम्रपानाचा उगम व मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. तंबाखूतील द्रव्यांमध्ये किट्ट अधिक प्रमाणात असेल तर त्याचे धूम्रपान केल्यानंतर ते फुप्फुसात सहज जमते व मोठा तोटा होऊ शकतो. पण तंबाखूच्या धूम्रपानाचा दोष आयुर्वेदावर ठेवता येणार नाही.
आयुर्वेदाने सांगितलेले धूम्रपान केवळ आरोग्यसंपन्नतेसाठी सांगितले असून, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे तोटे होऊ नयेत, याची काळजी घेतलेली आहे. तसेच आयुर्वेदाने सांगितलेले धूम्रपान हे रोज करायचे व सवयीचे धूम्रपान नसून, गरज असल्यासच करावयाचे असल्यामुळे त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकत नाहीत.
मनुष्याच्या सूक्ष्म देहाला इजा पोचते, असाही तंबाखूच्या धूम्रपानाचा एक तोटा सांगितलेला आहे. हा विषय सहज व सर्वांना सहजपणे समजण्याच्या पलीकडचा असला, तरी धूम्रपानाचे तोटे सर्वमान्य आहेत. धूम्रपानाच्या ज्या वस्तूत तंबाखू आहे त्या वस्तूवर "धूम्रपान तब्येतीला अहितकारक आहे' असे लिहावे लागते.
धूम्रपानाने होणारा अपाय लगेच दिसत नाही, तर धूम्रपान मनुष्याचे आयुष्य सावकाश संपवायला कारणीभूत होताना दिसते. धूम्रपान करण्याचा सर्वात मोठा तोटा व धोका असा असतो, की ओढून सिगारेट हळू हळू संपते मात्र सिगारेट ओढल्यामुळे माणसाचे आयुष्य जलद संपते. झालेला खोकला धूम्रपानामुळे होतो आहे असे लक्षात आले नाही तरी धूम्रपानामुळे कर्करोगासारखा मोठा आजारही होऊ शकतो.
आयुर्वेदीय धूम्रपानाचे मात्र असे कोठलेही तोटे होत नाहीत. आयुर्वेदीय धूम्रपान "तोंडाने धूर ओढणे' एवढ्याच मर्यादेत न राहता आयुर्वेदाने धुराचे सेवन निरनिराळ्या पद्धतींनी करावयास सांगितले आहे. आयुर्वेदीय वनस्पती, उद, धूप, गुग्गुळ वगैरे जाळून रोगजंतू नष्ट करून पर्यावरण शुद्ध करण्यासाठी काही उपाय आयुर्वेदाने सांगितले आहेत. जखम फार काळ भरून येत नसल्यास विशिष्ट धुराचा उपचार सुचविलेला आहे. स्त्रियांच्या बाबतीत उत्तरधूप (योनीवाटे धूप देणे) दिल्याने आत असणाऱ्या जंतूंपासून होणारा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. हा उपाय म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत आयुर्वेदाने दिलेले एक मोठे वरदान आहे. या चिकित्सेसाठी तयार केलेला "संतुलन शक्‍ती धूप' वापरून अनेक स्त्रियांना त्रासातून मुक्‍ती मिळालेली आहे.
धुराचे महत्त्व एवढे, की सर्व जगभर सर्व प्रकारच्या मनुष्यमात्राने धुराचा फायदा करून घेण्यासाठी धूमचिकित्सा धर्माशी निगडित केली किंवा धुराचा उपयोग मंदिरे, मशिदी, चर्च वगैरे ठिकाणी करून घेतला. अदृश्‍य शक्‍तींमुळे होणारे त्रास दूर करण्यासाठी, मानसिक त्रास दूर करण्यासाठी धूमचिकित्सा आयुर्वेदात सुचविलेली दिसते.
आयुर्वेदाने धूमचिकित्सा व धूम्रपान खूप ठिकाणी सुचविलेले आहे. बिडी-सिगारेट ओढणाऱ्यांना होणाऱ्या त्रासाचे खापर आयुर्वेदावर फोडता येणार नाही.
भारतीय परंपरेत रोज सकाळ-संध्याकाळ घरात धूप, उद जाळण्याची परंपरा आहे. हीच क्रिया थोडक्‍यात व सोपेपणाने व्हावी या दृष्टीने काडीवर धूपकरणाची द्रव्ये चिकटवून तयार केलेल्या उदबत्त्या जाळण्याची प्रथा आहे. धूपनासाठी उपयोगी असणारी द्रव्ये न वापरता फक्‍त कोळशाची पूड व काही रासायनिक द्रव्ये काडीवर चिकटवून तयार केलेल्या उदबत्त्या जाळण्याचा उपयोग न होता तोटाच होतो. असा तोटा झाल्यास आयुर्वेदाला वा धूपप्रक्रयेला दोष देता येणार नाही, हे नक्की.
सध्या नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू (व्हायरस) अस्तित्वात आलेले दिसतात. यासाठी धूमचिकित्सा हा प्रभावी हा उपचार अत्यंत प्रभावी ठरू शकेल.
- डॉ. श्री. बालाजी तांबे

1 comment:

  1. धूपाचे खडे कसे तयार करतात? - nutanvm@gmail.com

    ReplyDelete

ad