Wednesday, April 1, 2009

कलासाधनेचा श्वास

शरीरामध्ये प्राणवायूयुक्त शुद्ध हवा आत खेचण्याची आणि कार्बनडायऑक्‍साईडयुक्त अशुद्ध हवा बाहेर सोडण्याची यंत्रणा आहे. तिलाच आपण श्‍वसन म्हणतो. ही यंत्रणा शरीराच्या अस्तित्वाचा मूळ आधार आहे. जन्माच्या पहिल्या श्‍वासापासून मृत्यूच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत ही प्रक्रया अव्याहतपणे चालू असते. श्‍वास हा आपोआप घेतला जातो. तो आपण घेत नाही. तरीही सदैव गडबडीत असणाऱ्या व्यक्ती "मला श्‍वास घ्यायला वेळ नाही,'' असे म्हणताना आपण ऐकतो.
श्‍वासाचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे. मनातील विचारांचा श्‍वासावर सतत परिणाम होत असतो. विचार आणि भावनांमुळे श्‍वासाची गती आणि स्नायू अस्थिबंधाची हालचाल बदलत असते. संतप्त माणसाचा श्‍वास धाप लागल्याप्रमाणे चालतो. यात चिडणे आणि धाप लागणे या गोष्टी एकाच वेळी होत असतात. आधी चिडला आणि नंतर धाप लागली, असे होत नाही. म्हणजेच मन आणि श्‍वासाचा संबंध एका वेळेला आहे; वेगळ्या वेळेला नाही. याउलट निवांतपणे बसलेल्या व्यक्तीचा श्‍वास हा संथ चालतो. तणावयुक्त व्यक्ती छातीने श्‍वास घेते, तर निरागस आणि निष्पाप अशा बालवयात श्‍वास छाती जराही न हलता फक्त पोटाने चालू असतो.
श्‍वासाचे निरीक्षण निरंतर हवे. थोडासा आनंद झाल्यावरचा श्‍वास, जास्त आनंद झाल्यावरचा श्‍वास, हर्षवायू झाल्यावरचा श्‍वास, ओक्‍साबोक्‍शी रडतानाचा श्‍वास, खदाखदा हसतानाचा श्‍वास, स्मितहास्याचा श्‍वास, द्वेषयुक्त श्‍वास, नैराश्‍याचा श्‍वास, आत्महत्येपूर्वीचा श्‍वास, बिलगून बसलेल्या प्रेमवीरांचा श्‍वास; प्रत्येक श्‍वास वेगळा असतो. राग, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अहंकार या मनाच्या सहा शत्रूंना सामोरं जाताना श्‍वासात वेगवेगळे बदल होतात. त्यामुळे श्‍वास हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा घटक असतो.
अभिनयाच्या प्रशिक्षणामध्ये कलाकाराच्या चेहऱ्यावर बुरखा घालून त्याच्या श्‍वासावरून मनातला भाव ओळखण्याचा प्रयत्न सहकलाकार करतात. श्‍वासाची पद्धत, गती, हालचालीची कक्षा इत्यादींमध्ये ढोबळ आणि सूक्ष्म स्वरूपाचे बदल भावनानुरूप होत असतात. सक्षम अभिनयात हे सूक्ष्मातिसूक्ष्म बदल श्‍वासात आपोआप घडून येतात. अभिनयाच्या सरावामध्ये मनामध्ये अपेक्षित भाव पूर्ण ताकदीने निर्माण होण्यासाठी श्‍वासांमधील बदलांचा अभ्यास आणि निदिध्यास साह्यभूत ठरतो.
अभिनय-कलेत प्रत्येक जण आयुष्यभर वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो. विवक्षित भूमिका करताना तदनुसार श्‍वास बदलतो. भूमिका संपल्यानंतरही हा श्‍वास मात्र तसाच चालू राहू शकतो. यासाठी जागरूकता हवी. अभिनय संपला की लगेच श्‍वास पूर्ववत म्हणजेच नैसर्गिक व्हायला हवा. तसा तो झाला नाही, तर श्‍वास विचित्र पद्धतीने कायमचा बदलून जातो आणि त्याची मोठी किंमत अनारोग्याच्या रूपाने कलाकाराला मोजावी लागते. कारण खरोखरीचा राग आणि रागाचा "खराखुरा'' अभिनय, यांतला फरक शरीराला कळत नाही.
दोन्हीतही शरीरात ऍड्रेलिनसारखी तणाव निर्माण करणारी संप्रेरके निर्माण होतात आणि रक्तात पंप केली जातात. रक्तदाब वाढतो. हृदयाची गती वाढते. रक्तातील साखर वाढते, वगैरे हे झालेले विघातक बदल पूर्वस्थितीला येण्यासाठी क्रोधाचा अभिनय झाल्यानंतर शांत, पोटाने श्‍वास सुरू होण्याची गरज असते.
संगीत कलेच्या रियाझातही श्‍वासांचे महत्त्व सतत जाणवते.
मैफलीमध्ये गायक आणि वादक कलाकारांना श्‍वासावर हुकमत कमवावी लागते. दोन आहत नादांमध्ये येणारी अनाहत नादाची कक्षा अनुभवण्यासाठी नैसर्गिक प्राणशक्तीची निरंतरता जागरूकतेने पाहावी लागते. भारतीय संगीताचं प्रवाहीत्व हे या शक्तीशी साधर्म्य असणारं आहे.
ज्याप्रमाणे वाहणाऱ्या जलप्रवाहात खड्डा आला की भोवरा तयार होतो, तसंच गाताना किंवा वाजविताना मला जमेल का, किंवा तत्सम स्वतःविषयी अन्य प्रश्‍न मनाच्या पात्रात पडला, की त्या क्षणी काहीतरी चूक होते. किंबहुना कलाकार कितीदा चुकतो यावरून त्याच्या मनात "मी' किती वेळा डोकावला हे कळतं. कारण "मी'' आला की श्‍वास अडकलाच! "मी'' संपूर्ण नाहीसा होईपर्यंत कलासाधक हा कलासिद्ध होत नाही. तोपर्यंत सूर, शब्द, भाव यांचा श्‍वासाशी असलेला संबंध त्याला परत परत पडताळून पाहावा लागत राहतो.
- डॉ. हिमांशू वझे

No comments:

Post a Comment

ad