Thursday, March 3, 2016

रक्‍तदाब


 डॉ. श्री बालाजी तांबे


वाढलेला रक्तदाब गोळ्या घेऊन कमी केला म्हणजे झाले, 
असा हिशेब मांडणे एखादे गणित सोडवावे इतके सोपे नाही. 
रक्‍तदाबाचा विकार मुळात होऊ नये यासाठी अगोदरच काळजी घ्यावी. 
पण तरीही रक्‍तदाब झालाच तर रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच मुळातून 
बरा होण्यासाठी योग्य उपचार करावेत. योग्य उपचारांना संतुलित आहार, 
निर्व्यसनी जीवनपद्धती, व्यायाम, चालणे, योग, संगीत व मानसिक स्वास्थ्य यांची जोड द्यावी. 

काही वर्षांपूर्वी रक्‍तदाब म्हणजे चाळिशीनंतर होणारा आजार, अशी सर्वसामान्य धारणा होती.
सध्या मात्र तिशीच्या आसपासही अनेकदा रक्‍तदाबाचा त्रास सुरू झाल्याचे दिसते.
सरासरीपेक्षा (80-120) वाढलेला किंवा कमी झालेला रक्‍तदाब हा "रक्‍तदाब विकार‘ म्हणून ओळखला जातो. वाढलेला रक्‍तदाब
गोळ्यांच्या साह्याने कमी केला म्हणजे झाले, इतका साधा हिशेब अनेकांच्या मनात असतो; पण एखादे गणित सोडवावे तसा हा
 हिशेब सुटत नाही.

रक्तदाब म्हणजे काय? 

सर्वप्रथम रक्‍तदाब म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊ.
रक्‍त जरी सर्व शरीराला व्यापून असले व रात्रंदिवस गतिशील असले, तरी ते रक्‍तवाहिन्यांमध्ये बंदिस्त असते.
 मेंदू, हृदय, मूत्रपिंड वगैरे मोठे अवयव असोत किंवा करंगळीचे टोक असो, सर्व दूर रक्‍तवाहिन्यांमधून रक्‍त
फिरत असते. यालाच "रक्‍ताभिसरण क्रिया‘ म्हणतात व त्यातूनच रक्‍तदाब तयार होत असतो. अर्थातच
रक्‍तावर सरासरी दाब प्रत्येक व्यक्‍तीला असतोच, कारण त्याखेरीज रक्‍ताभिसरण होऊच शकणार नाही.

निरोगी अवस्थेतही रक्‍तदाब प्रसंगानुरूप थोडा फार कमी जास्ती होत असतो. भरभर चालण्याने, पळण्याने,
जशी श्‍वासाची गती वाढते, तसेच श्रम झाल्यास रक्‍तदाब थोडा वाढतो. पण विश्रांती घेतल्यावर आपला
आपण प्राकृतावस्थेत येतो.

आयुर्वेदात "रक्‍तदाब‘ या नावाने वेगळा असा व्याधी सांगितलेला आढळत नाही. मात्र शरीरातील रस, रक्‍त
धातूंच्या गतीतील विकृतीमुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य विकारांपैकी हा एक विकार होय. ही गती विकृती
रक्‍ताभिसरणास कारणीभूत असणाऱ्या हृदय किंवा रक्‍तवाहिन्यातील बिघाडामुळे होऊ शकते, शरीरातील
अतिरिक्‍त क्‍लेदांश मूत्रामार्फत वाहून नेणाऱ्या किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्याने उद्‌भवू शकते किंवा
"चिन्त्यानां चाति चिन्तनात्‌‘ न्यायानुसार अति मानसिक ताणामुळे, अति विचार करण्यामुळे अर्थातच
मेंदूच्या अति श्रमानेही होऊ शकते.

तसेच रक्‍तदाब वाढला असता किंवा कमी झाला असताही शरीर, मनावर दिसणारी लक्षणे वात, पित्त दोष
वाढल्याची असतात. म्हणून आयुर्वेदानुसार रक्‍तदाबावर उपचार करताना त्रिदोष संतुलनाबरोबरच, रक्‍तदाबाचा
त्रास होण्याचे मूळ कारण काय आहे याचा विचार केला जातो व त्यानुसार केलेल्या उपचारांनी रक्‍तदाबावर
यशस्वी चिकित्सा करता येऊ शकते.

रक्तदाबाची कारणे 
रक्‍तदाबाची सामान्य कारणे अशी सांगता येतील -
  • पचायला जड अशा मेदस्वी पदार्थांचे अतिसेवन उदा. तेल, चीज, मांसाहार
  • खाण्यापिण्यातील व वागण्यातील अनियमितता, एकंदर जीवनशैलीतील अनिर्बंधता व बेशिस्तपणा
  • व्यायामाचा अभाव
  • अतिस्थूलता
  • अतिरिक्‍त धूम्रपान व मद्यपान
  • अतिचिंता तसेच कामामध्ये अतिव्यस्तता
याखेरीज किडनीचे कार्य नीट न होणे, अनेक वर्षांचा मधुमेह, रक्‍तवाहिन्या कठीण व जाड होणे, स्त्रियांच्या
बाबतीत गर्भारपणात रक्‍तदाब वाढल्याचा इतिहास असणे, तसेच गर्भाशय काढून टाकणे इत्यादींमुळे रक्‍तदाब
 वाढू शकतो.

मुळात रक्‍तदाबाचा विकार मागे लागूच नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी. हा विकार ओळखणे खरे पाहता
अतिशय सोपे आहे. रक्‍तदाब मोजणे हे अक्षरशः दोन मिनिटांचे काम असते. आजकाल तर घरच्या घरीसुद्धा
साध्या यंत्राच्या साह्याने रक्‍तदाब मोजता येणे शक्‍य आहे. या विकाराची अगदी सुरवातीला फार काही लक्षणे
 दिसत नाहीत. पण जेवढ्या लवकर निदान होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे उपाययोजना करता येत असल्याने
 वयाच्या पस्तिशीनंतर वर्ष-सहा महिन्यांनी एकदा तरी रक्‍तदाब मोजून घ्यावा. घरी रक्‍तदाबाची किंवा
 हृद्ररोगाची आनुवंशिकता असणाऱ्यांनी तर अधिकच दक्ष राहावे. वर सांगितलेली कारणे लागू होत
असणाऱ्यांनीही अधिक काळजी घ्यावी.

रक्तदाब वाढण्याची लक्षणे 
  • रक्‍तदाब वाढण्याची सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.
  • डोके दुखणे, चक्कर येणे, डोके जड वाटणे.
  • अशक्‍तपणा वाटणे, गळून गेल्यासारखे वाटणे.
  • अवेळी डोळ्यांवर झापड येणे पण योग्य वेळी झोप न येणे.
  • छातीत धडधडणे.
  • भरभर चालताना किंवा जिने चढताना दम लागणे.
  • छातीत दुखणे.
  • अकारण चिडचिड होणे.
सुरवातीला ही लक्षणे सतत दिसत नाहीत, काही वेळाने आपोआप नाहीशी होतात. अशा वेळेला लक्षणे दिसत
असताना आवर्जून तपासणी करून घेतली तरच उच्च रक्‍तदाबाचे निदान होऊ शकते.

कैक वेळेला रक्‍तदाब वाढला तरी व्यक्तीला काहीही लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत बहुधा त्रास होत
नाही म्हणून तपासणी केली जात नाही किंवा औषधांची नियमितता राखली जात नाही.
या दोन्ही गोष्टी आरोग्यास घातक होत.

रक्‍तदाबाचा त्रास सुरू झाला की तो शेवटपर्यंत राहणार, आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार हे मात्र
प्रत्येक केस मध्ये लागू होत नाही. वेळीच निदान होणे, मूळ कारण लक्षात घेऊन ते टाळायची तयारी असणे
 व रस-रक्‍ताच्या गती-विकृतीवर योग्य उपचार सुरू करणे या गोष्टींनी रक्‍तदाब बराही होऊ शकतो. अर्थातच
जितक्‍या लवकर, नियमित व योग्य उपचार केले जातील तितका लवकर व चांगला उपयोग होताना दिसतो.

रक्तदाब असेल तर... 
  • रक्‍तदाब असणाऱ्यांनी पुढील गोष्टींवर लक्ष ठेवावे.
  • तळलेले, तेलकट पदार्थ शक्‍यतो टाळावेत.
  • चीज, श्रीखंड, मांसाहार, अंडी, वाटाणा, पावटा, चवळी, हरभरा वगैरे पचायला जड असणाऱ्या व 
  • वातवर्धक गोष्टी टाळाव्यात.
  • कच्चे मीठ किंवा वरून मीठ घ्यायची सवय सोडावी.
  • वजन प्रमाणापेक्षा अधिक वाढलेले असल्यास योग्य उपायांनी हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावा.
  • रात्री उशिरा जेवण्याची सवय मोडावी.
  • रोज 30-35 मिनिटे चालायला जावे, योगासने करावीत. मात्र शरीराला थकवणारे व्यायामप्रकार टाळावेत.
  • रात्री लवकर झोपावे व प्रकृतिनुरूप किमान सहा ते सात तास शांत झोप लागेल याकडे लक्ष ठेवावे.
दिवसभराच्या कामाचा ताण किंवा नातेसंबंधातील तणावाचा स्वतःवर कमीत कमी परिणाम होईल यासाठी
 प्रयत्नरत राहावे, झोपण्यापूर्वी दहा मिनिटे डोळे बंद करून शांत बसणे, आपल्या आवडत्या छंदात मन गुंतवणे,
 मनःशांती देणारे स्वास्थ्यसंगीत ऐकणे, ध्यान करणे अशा सारखा जमेल तो उपाय करावा.
काम करताना थकवा जाणवावयास सुरवात झाल्यास वेळीच विश्रांती घ्यावी. शरीर व मन दोहोंवर जबरदस्ती
करू नये.

रक्‍तदाब वात-पित्त असंतुलनातून तयार होत असल्याने दूध, घरी बनवलेले साजूक तूप, साधा, सात्त्विक
 पण चौरस आहार ठेवावा. वजन वा कोलेस्टेरॉल वाढण्याच्या भीतीने हृदय, मेंदूला पोषक व वात-पित्तशामक
 आहार पदार्थ अकारण बंद करू नयेत. मात्र चुकीच्या पद्धतीने बनवलेले तूप, बाजारातील लोणी वगैरे गोष्टी
 निश्‍चितच टाळाव्यात.

रक्‍ताभिसरण वाढवण्यासाठी, रसरक्‍तधातूंच्या गतीचे नियमन करण्यासाठी व शरीरातील रक्‍तवाहिन्यांतील
काठिण्य नष्ट होण्यासाठी "अभ्यंग‘ करणे हा एक श्रेष्ठ व सहज करता येण्यासारखा उपाय आहे.
अभ्यंगासाठी वापरलेले तेल आयुर्वेदिक पद्धतीने शास्त्रशुद्धरीत्या तयार केलेले असावे. अशा शास्त्रशुद्ध अभ्यंगाची
 विशेषता अशी की याने कमी झालेला रक्‍तदाब पुन्हा पूर्ववत होऊ शकतो तसेच वाढलेला रक्‍तदाब कमी होऊ
शकतो.

आयुर्वेदशास्त्राने सांगितलेले त्रिदोष संतुलन करणारे स्नेहन स्वेदनपूर्वक पंचकर्म शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यावे. विशेषतः विरेचन, बस्ती या उपक्रमांचा रक्‍तदाबात उत्कृष्ट फायदा होताना दिसतो. बरोबरीने मूळ कारणानुरूप शिरोधारा, शिरोबस्ती, कर्णपूरण,
पिंडस्वेदन वगैरे उपचार उत्तम फायदा करणारे आहेत.

शवासन, योगनिद्रा या योगातल्या क्रियांचा वाढलेला रक्‍तदाब कमी करण्यासाठी खूप उपयोग होतो.
आत्मसंतुलन केंद्रात असंख्य रुग्णांनी अनुभव घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी संलग्न संशोधनातून योगनिद्रा
संगीताचा उपयोग सिद्ध झालेला आहे. तेव्हा अशा योगनिद्रा संगीताचाही रक्‍तदाब नियंत्रणासाठी उपयोग
करता येईल.

रक्‍तदाब कमी करणाऱ्या इतर औषधांच्या बरोबरीने मुळापासूनच रक्‍तदाब बरा करू शकणारी आयुर्वेदिक
औषधेही सुरू करावीत म्हणजे हळूहळू त्रिदोषसंतुलन प्रस्थापित झाले, रस-रक्‍तधातूतील गती विकृती
नाहीशी झाली व बरोबरीने आहार-विहारातील अनुशासन कायम ठेवले की रक्‍तदाबापासून मुक्‍ती मिळू शकते.

योग्य औषधाची निवड 
रक्‍तदाबाचे एक विशिष्ट असे औषध नसते, तर प्रकृती, वय, रक्‍तदाबाचा त्रास होण्याचे कारण वगैरे गोष्टींचा
विचार करून योग्य औषध निवडावे लागते.किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्यास गोमूत्र, पुनर्नवासव,
गोक्षुरादि चूर्ण, चंद्रप्रभा वगैरे औषधांचा वापर करावा लागतो. हृदयामुळे, रक्‍तवाहिन्यांमधील काठिण्यामुळे
 रक्‍तदाबाचा त्रास होत असल्यास बृहत्वातचिंतामणी, सुवर्णभस्म, अभ्रकभस्म, अर्जुनारिष्ट, सुवर्णसूतशेखर,
 वगैरे औषधे प्रकृतीनुरूप योजावी लागतात. तर रक्‍तदाबाचे मूळ कारण मेंदूशी संबंधित असल्यास जटामांसी,
 ब्राह्मी, ब्राह्मीघृत, वगैरे औषधांचा उत्तम उपयोग होताना दिसतो.

थोडक्‍यात सांगायचे झाले तर, रक्‍तदाबाचा विकार मुळात होऊ नये यासाठी अगोदरच काळजी घ्यावी. पण
तरीही रक्‍तदाब झालाच तर रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच मुळातून बरा होण्यासाठी योग्य उपचार करावेत.
 योग्य उपचारांना संतुलित आहार, निर्व्यसनी जीवन पद्धती, व्यायाम, चालणे, योग, संगीत व मानसिक
स्वास्थ्य यांची जोड द्यावी. 
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India,
Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad