Tuesday, March 2, 2010

ध्यानाने रोगोपचार

डॉ. श्री बालाजी तांबे 
आयुर्वेदात चमत्कृतीयुक्‍त योग सांगितलेले असले, तरी ते सिद्ध होण्यासाठी मनाची शुद्धी असणे खूप आवश्‍यक असते. एवढे दीर्घायुष्य मिळविण्याचा उद्देशही तपस्या, ध्यान वगैरेंचा अभ्यास करणे, असा असावा लागतो. स्वार्थ मनात ठेवून किंवा वाईट ध्येय असल्यास या प्रकारचे रसायन फळत नाहीत. ध्यान हे आरोग्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असतेच; पण ते योग्य प्रकारे होण्यासाठी मार्गदर्शनाची, गुरूंची खूप आवश्‍यकता असते.

उपचार म्हटला, की सहसा गोळ्या, चूर्ण, सिरप अशी औषधे डोळ्यांसमोर येतात. अंगाला तेल लावणे, स्वेदनादी उपचार करून घेणे, पंचकर्माने शरीरशुद्धी करून घेणे या क्रियासुद्धा उपचारात मोडतात; पण आयुर्वेदशास्त्र हे शरीरस्वास्थ्यच नव्हे, तर मन, इंद्रिये, आत्मा यांच्या प्रसन्नतेला आरोग्यावस्था समजत असल्याने, यात जप, मंत्रपाठ, दान, पूजा, ध्यान वगैरेंना महत्त्वाचे स्थान आहे.

आयुर्वेदात आठ विभाग आहेत. यात रसायन चिकित्सा हा एक वैशिष्ट्यपूर्ण विभाग आहे. रसायन म्हणजे असे औषध, असा उपचार, की ज्यामुळे व्याधीचा नाश होतो, वय वाढले तरी म्हातारपणाचे त्रास होत नाहीत आणि संपन्न दीर्घायुष्याचा लाभ होतो. रसायनाने शारीरिक आरोग्य तर मिळतेच; पण वाक्‌सिद्धी मिळते, नम्रता येते, एकंदर व्यक्तिमत्त्व सतेज, प्रभायुक्‍त बनते, असे सांगितले जाते. हे घडण्यासाठी रसायन उत्तम गुणाचे व शास्त्रोक्‍त पद्धतीने बनविलेले असायला हवेच; पण त्याला चांगल्या शुद्ध आचरणाची जोड मिळायला हवी.

चरकसंहिता वगैरे ग्रंथांत रसायनांची माहिती दिल्यानंतर शेवटी खालीलप्रमाणे महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे,

एतैः गुणैः समुदितैः रसायनं यः प्रयुंक्‍ते स यथोक्‍तान्‌ सर्वान्‌ रसायनगुणान्‌ समश्‍नुते ।।...चरक चिकित्सा

रसायनांचे गुण मिळण्यासाठी आचरणाचे नियम पाळावे लागतात, आचार-विचारांमध्ये शुद्धता असावी लागते.
पवित्र आचरण, जप, गुरुसेवा, इंद्रियांची अध्यात्माकडे प्रवृत्ती असणे, या गोष्टींची जोड मिळाली, तरच रसायनांचा उपयोग होतो.
अर्थातच, रसायनाचे आश्‍चर्यचकित करणारे फायदे मिळवायचे असतील, तर त्याला ध्यान, जप वगैरेंची जोड मिळायला हवी. म्हणूनच पंचकर्म करताना किंवा पंचकर्मानंतर रसायनयुक्‍त उपचार करताना ध्यानाला, मंत्र श्रवणाला, आध्यात्मिक वातावरणाला खूप महत्त्व असते. संतुलन उपचारांमध्ये पथ्यापथ्य, प्रकृतिनुरूप उपचार यांच्यासमवेत याही सर्व गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत, ज्यांचा अत्युकृष्ट परिणाम होताना दिसतो.

पंचकर्म करताना किंवा रसायन सेवन करतानाच नव्हे, तर कायमच जर आचार-विचारात शुद्धता ठेवली, ध्यान, संगीत, मंत्र, जप यांना दैनंदिन जीवनात समाविष्ट केले, तर सतेजता, आरोग्य, दीर्घायुष्य मिळण्यास उत्तम हातभार लागू शकतो.

एका रसायन प्रयोगातही ॐकार जपाचाही उल्लेख केलेला आहे. सर्वप्रथम शरीर शुद्ध करून घ्यावे, पौष, माघ वा फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आवळ्याच्या वनात प्रवेश करावा आणि झाडाला लागलेला आवळा हातात घेऊन ॐकाराचा जप करावा. जप इतका वेळ करावा, की हातातल्या आवळ्यामध्ये अमृताचा प्रवेश होऊन तो मधाप्रमाणे मधुर व कोमल होईल. असा मधुर झालेला आवळा सेवन करावा. असे जितके आवळे सेवन करावेत, तितके आयुष्य वाढते, व्यक्‍तीला लक्ष्मी, सरस्वतीचा लाभ घेता येतो आणि वेदज्ञान होते.

असे चमत्कृतीयुक्‍त योग आयुर्वेदात सांगितलेले असले, तरी ते सिद्ध होण्यासाठी मनाची शुद्धी असणे खूप आवश्‍यक असते. एवढे दीर्घायुष्य मिळविण्याचा उद्देशही तपस्या, ध्यान वगैरेंचा अभ्यास करणे, असा असावा लागतो. स्वार्थ मनात ठेवून किंवा वाईट ध्येय असल्यास या प्रकारचे रसायन फळत नाहीत.

ध्यान आरोग्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असतेच; पण ते योग्य प्रकारे होण्यासाठी मार्गदर्शनाची, गुरूंची खूप आवश्‍यकता असते.

ध्यान, मंत्र, प्रार्थना या उपासना आवर्जून कराव्यात. असा काळ म्हणजे गर्भावस्थेचा. काळ या संदर्भात काश्‍यपसंहितेत सांगितले आहे,
धूपितार्चितसंमृष्टं मषकाद्यपवर्जितम्‌ ।
ब्रह्मघोषैः सवादित्रैर्वादितम्‌ वेश्‍म शस्यते ।।

गर्भवती स्त्री ज्या घरात राहते तेथे सकाळ, संध्याकाळ धूप करावा, नियमितपणे पूजाअर्चा होत असावी, घरात स्वच्छता व शुद्धता असावी म्हणजेच मच्छर, कोळीष्टके वगैरेंपासून घर सुरक्षित असावे आणि घरात पवित्र मंत्रघोष, प्रार्थना व स्वास्थ्यसंगीताचा गुंजारव होत असावा.
गर्भवतीने उगवत्या सूर्याची पूजा करावी असेही शास्त्रविधान आहे,
अर्चेत्‌ आदित्यमुद्यन्तं गन्धधूपार्घ्यवार्जपैः ।। ...काश्‍यपसंहिता
गंध, धूप, अर्घ्य व जपाद्वारा उगवत्या सूर्याची पूजा करावी

Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad