Monday, January 14, 2013

नमन तेजाला!

डॉ. श्री बालाजी तांबे
भारतात दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या समजल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे सर्वांच्या कल्याणाची शुद्ध बुद्धी देण्यासाठी वापरलेला गायत्री मंत्र आणि दुसरे म्हणजे त्याचीच उपचारपद्धतीरूप असलेला सूर्यनमस्कार. वेद - पुराणात, रामायणात सूर्योपासना सांगितलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात श्री समर्थ रामदास स्वामींनी सूर्यनमस्काराचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. बाहेरच्या सर्व जगताला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्थान आपल्या मेंदूत असते आणि शरीरात असलेल्या शक्‍तीला जागृत करण्याचे कामही सूर्यच करत असतो. शरीर कमावणे, व्यायाम करणे एवढाच सूर्यनमस्काराचा मर्यादित हेतू नसतो, तर सूर्यनमस्कारामुळे तेजाची उपासना होते, ज्यामुळे स्वतःचा विषय व अभ्यास बरोबर सांभाळला जाऊन समाजाला एक उत्तम जीवन अर्पण करणे हाही उद्देश साध्य होतो.

सर्वच प्राचीन संस्कृतींमध्ये सूर्याला देवता समजून त्याची पूजा, उपासना करण्याबद्दल संदर्भ सापडतात. भारतातही वेद, पुराणांमध्ये तसेच इतर प्राचीन साहित्यात सूर्योपासना, सूर्यासंबंधी मंत्र, सूक्‍त वगैरेंचा उल्लेख सापडतो. वैयक्‍तिक पातळीवर सर्वांत सुलभ पद्धतीने सूर्याची उपासना करता यावी यासाठी भारतामध्ये सूर्यनमस्कारांची परंपरा आहे. रामायणामधील "आदित्य हृदयम्‌' या भागामध्ये मंत्रासहित जी सूर्योपासना सांगितली आहे, ती सध्याच्या प्रचलित सूर्यनमस्कारांशी खूप मिळती-जुळती आहे असे दिसते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात श्री समर्थ रामदास स्वामींनी सूर्यनमस्काराचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. सर्व जगभरात सूर्यनमस्कार आज प्रसिद्ध झाले असले, तरी ते भारतात अतिप्राचीन काळापासून सर्वपरिचित आहेत.

लहानपणी 12 सूर्यनमस्कार घातल्यावर,
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्य्रं नोपजायते ।।


आणि

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम्‌ ।
सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्‌ ।।


हे दोन मंत्र म्हणून सूर्याचा प्रकाश ज्यात पडलेला आहे असे तीर्थ घेतले आहे की नाही यावर वडीलमंडळींचे लक्ष असे. एवढा मोठा झाला आहेस तरी 12 सूर्यनमस्कारांवर थांबला आहेस, 108 सूर्यनमस्कारांना केव्हा पोचणार, वगैरे चौकशीही होत असे.

सूर्यनमस्कारात अनेक आसने अंतर्भूत असल्यामुळे आणि सूर्यनमस्कारामुळे शरीरातील हॉर्मोनल सिस्टिम व जाठराग्नी संतुलित होत असल्यामुळे सूर्यनमस्काराला अतिशय महत्त्व आलेले आहे.

भारतात दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या समजल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे सर्वांच्या कल्याणाची शुद्ध बुद्धी देण्यासाठी वापरलेला गायत्री मंत्र आणि दुसरे म्हणजे त्याचीच उपचारपद्धतीरूप असलेला सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारामध्ये जमिनीवर संपूर्ण डोके टेकल्यावर होणारा शरणागत प्रणाम हा भौतिकाचे सर्व फायदे देणारा आहे. सूर्यनमस्काराची एक स्थिती, ज्यात आकाशाकडे पाहिल्यावर संपूर्ण दृष्टी व्यापक करून सर्वांभूती असलेला परमेश्‍वर हा किती उच्च संकल्पना आहे हेही दाखवले जाते. पूर्वीच्या काळी सूर्यनमस्काराबरोबर बहुतेक वेळा दंड-बैठका काढल्या जात असत. पण खरे पाहता सूर्यनमस्कारात दंड व बैठका दोन्ही अंतर्भूत झालेले दिसतात. सूर्यनमस्कारांमुळे मनगटातील ताकद वाढत असे, मांड्या, पोटऱ्या, पाय, गुडघे मजबूत होत असत.

मेरुदंड खाली सरकल्यामुळे पाठ, मान, कंबर यांची दुखणी होऊ शकतात. अशा वेळी पायांना वजन बांधून शरीर खालच्या बाजूला ओढण्याचा (ट्रॅक्‍शन) उपचार केला जातो. सूर्यनमस्कार करते वेळी ट्रॅक्‍शन हा उपचार आपोआपच होतो.

सूर्यप्रकाशामध्ये जी व्हिटॅमिन्स मिळू शकतात, त्यामुळे दूध पचायला मदत मिळत असावी, हे लक्षात घेऊन सूर्यनमस्कार घालून झाल्यावर मुलांना ग्लासभर दूध देण्याची पद्धत रूढ होती. त्यामुळे अस्थी, मज्जा अशा सर्व धातूंचे पोषण व्यवस्थित होत असे व सरतेशेवटी सूर्यनमस्कार करणाऱ्याला या तेजाच्या उपासनेमुळे वीर्यवृद्धी व स्मरणशक्‍ती या दोन्हींचा लाभ होत असे. बाहेरच्या सर्व जगताला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्थान आपल्या मेंदूत असते व शरीरात असलेल्या या शक्‍तीला जागृत करण्याचे कामही सूर्यच करत असतो.

दोन्ही पायाचे चवडे व तळहात जमिनीवर ठेवून संपूर्ण शरीर झोक्‍यासारखे फिरवून वर उचलणे, संपूर्ण शरीर डोंगर असल्यासारखे इंग्रजी अक्षरातील उलट्या त च्या आकारात आणणे किंवा भुजंगासारखा फणा काढून मेरुदंडाला पोटाकडून ताण देणे याचेही फायदे सूर्यनमस्कारात मिळतात. सूर्यनमस्कार सोपे करण्यासाठी कोपरे, गुडघे जमिनीवर टेकणे वगैरे काही सुधारणा केलेल्या दिसतात, पण असे बदल केल्याने सूर्यनमस्काराचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.

एकूण शरीर कमावणे, व्यायाम करणे एवढाच सूर्यनमस्काराचा मर्यादित हेतू नसतो, तर सूर्यनमस्कारामुळे तेजाची उपासना होते, ज्यामुळे स्वतःचा विषय व अभ्यास बरोबर सांभाळला जाऊन समाजाला एक उत्तम जीवन अर्पण करणे हाही उद्देश साध्य होतो.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad