Wednesday, November 23, 2011

कथा च्यवनप्राशाची

डॉ. श्री बालाजी तांबे
आयुर्वेद हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी नसतात. वनस्पतींना जीव तर असतोच पण त्यांना मन असते, प्राण असतो, त्यांना आत्मा असतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचा स्वभाव विशिष्ट प्रकारे ठरलेला असतो. वनस्पतीवर संस्कार झाले तर त्यांचा स्वभाव बदलता येतो म्हणजेच त्या वनस्पतींचे गुणधर्म वाढवता येतात व मानवाला उपयोगी ठरतील असे गुणधर्म त्यात आणता येतात.

श्रीखंड हा पदार्थ पक्वान्न म्हणून सर्वांच्या परिचयाचा असतो. सणावारी किंवा विशेष प्रसंगी काही तरी गोड धोड व्हावे या हेतूने पक्वान्नाची योजना केलेली असते. मधुर रसाचा म्हणजे गोड स्वादाचा ताकदीशी संबंध असतो. तसेच मधुर रसामुळे थोडीशी कफवृद्धी होते व झोप निवांत लागू शकते. श्रीखंड आंबटगोड असल्याने ते खाताना बरे वाटले तरी काही प्रकृतीच्या लोकांना त्याचा त्रासही होऊ शकतो. श्रीखंडाला आंब्याच्या रसाचा स्वाद लाव, चॉकलेटचा स्वाद लाव अशा तऱ्हेने मूळ श्रीखंड राहते बाजूला व मनाला बऱ्या वाटणाऱ्या म्हणजे करमणूक करणाऱ्या इतर गोष्टी वाढू लागतात. तसेही भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाने सांगितलेल्या श्रीखंड ह्या पक्वान्नाची कृती अशी सांगितली की ज्यामुळे कुठलाही त्रास न होता प्रतिकारशक्‍ती वाढावी, वीर्य वाढावे आणि त्याचा पक्वान्न म्हणूनही आनंद घेता यावा.

उद्या आम्रच्यवनप्राश कोणी तयार केला तर त्याचे आश्‍चर्य वाटणार नाही. कारण सध्या आयुर्वेदाच्या पाठानुसार असलेला मूळ च्यवनप्राश बाजूला राहून एक फॅशन म्हणून व ताकद येणाऱ्या आशेवर जगण्यासाठी च्यवनप्राश नावाचा एक जणू साधाच जॅम खाण्याची पद्धत रूढ होत आहे. आंबा आवडणाऱ्यांनी आंब्याच्या आशेने च्यवनप्राश खावा अशी कल्पना असेल तर मूळ कथेला भलतीच विकृती येऊन कथा निरुपयोगी ठरू शकते. मुख्य म्हणजे च्यवनप्राश आयुर्वेदाच्या पद्धतीने बनविलेला असावा, नंतर त्याला सुगंध वगैरे देणे हे दुय्यम.

च्यवन ऋषींनी अगदी म्हातारपण आल्यानंतर म्हणजे वृद्धत्वाची सर्व लक्षणे दिसू लागल्यानंतर, बरोबरीने मेरुदंड वाकून डोके जमिनीकडे जायला लागल्यानंतर संतानप्राप्तीची अपेक्षा केली. म्हणून प्रत्यक्ष अश्‍विनीकुमारांनी हा आवळ्याचा च्यवनप्राश बनवून त्यांना दिला व त्यानंतर त्यांचे वयस्थापन झाले म्हणजे त्यांना तारुण्य परत मिळाले, पाठीच्या मणक्‍यांना ताकद मिळाली, वीर्यवृद्धी झाली आणि उशिरा सुरू केलेला संसार साधता आला आणि ते निसर्गचक्राला गती देण्यास समर्थ झाले.

आयुर्वेद हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी नसतात. वनस्पतींना जीव तर असतोच पण त्यांना मन असते, प्राण असतो, त्यांना आत्मा असतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचा स्वभाव विशिष्ट प्रकारे ठरलेला असतो. वनस्पतीवर संस्कार झाले तर त्यांचा स्वभाव बदलता येतो म्हणजेच त्या वनस्पतींचे गुणधर्म वाढवता येतात व मानवाला उपयोगी ठरतील असे गुणधर्म त्यात आणता येतात.

आवळ्याच्या झाडाखाली श्री विष्णूंचा वास असतो म्हणून आवळ्याच्या झाडाचे आणि श्री विष्णूंचे पूजन व आवळीच्या सावलीत भोजन सांगितलेले असते. आवळ्याच्या झाडाच्या आसपास असणाऱ्या वातावरणात प्रतिकारशक्‍ती वाढवून चेतासंस्थेसाठी फायदा होईल असे वायू व शक्‍ती असणार म्हणूनच ह्या परंपरा भारतीयांनी स्वीकारल्या.

आवळा चोचून साखरेच्या पाकात टाकून केलेला मोरावळा हा अवलेह सर्वांच्या परिचयाचा असतो. आवळा, आवळ्याचा रस, मोरावळा ही सर्व रसायनेच आहेत. म्हणूनच आवळा, हिरडा, बेहडा यांच्यापासून बनविलेला त्रिफळा हे सुद्धा एक रसायनच आहे. हिरडा हे स्वतंत्ररीत्याही एक रसायन आहेच.

शिजवलेले आवळे, साखरेचा पाक व वेगवेगळ्या वनस्पतींची चूर्ण, घन वगैरे गोष्टींचे मिश्रण म्हणजे च्यवनप्राश नव्हे. आवळा कमी पडतो म्हणून आवळ्याच्या ऐवजी भोपळा टाकून बनविलेल्या च्यवनप्राशबद्दल तर काही बोलायलाच नको. च्यवनप्राश बनविताना वात-पित्त-कफ ह्यांचे संतुलन करणाऱ्या तसेच सप्तधातूंना संतुलित करून पुष्ट करणाऱ्या वनस्पती तसेच रक्‍तशुद्धीसाठी व एकूणच शरीराची प्रतिकारशक्‍ती वाढावी, वीर्यवर्धन व्हावे ह्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींची योजना करून त्यांचा काढा बनविणे अभिप्रेत असते. काढा केल्याने वनस्पतींमध्ये असलेली द्रव्ये अति सूक्ष्म कणात (नॅनो) रूपांतरित होतात. काढा होत असताना त्यात आवळे शिजवले जातात त्यामुळे आवळ्यांवर वनस्पतींचा संस्कार व्हायला सुरुवात होते. शिजलेल्या आवळ्यांमधील बिया व रेषा काढून मिळालेला गर तुपावर लालसर परतून घेतला जातो, नंतर तेलावर परतला जातो. तयार झालेला काढा गाळून घेऊन वनस्पती टाकून दिल्या जातात व उरलेला काढा घट्ट केला जातो. साखरेच्या पाकात काढा व तेला-तुपावर परतलेला गर टाकून मिश्रण परत शिजविले जाते. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात मध, सुगंधी द्रव्ये मिसळली जातात. ह्या सुगंधी द्रव्यांच्या औषधी गुणधर्माचा फायदा होतोच पण मन प्रसन्न करण्यासाठीही उपयोग होतो. हा झाला आयुर्वेदात सांगितलेल्या पाठानुसार बनविलेला च्यवनप्राश.

ताज्या आवळ्यांऐवजी वाळलेले आवळे म्हणजे आवळकाठी, इतर वनस्पती एकत्र शिजवून त्यात साखर टाकून केलेल्या पदार्थाला च्यवनप्राश असे म्हणता येणार नाही. अश्‍विनीकुमारांनी च्यवनऋषींसाठी केलेला प्राश तो खरा च्यवनप्राश. तो बनविण्याची पद्धत बदलली, संस्कार करण्याची परंपरा बदलली तर बनलेल्या पदार्थाला च्यवनप्राश म्हणता येत नाही. शिवाय च्यवनप्राश बनविताना त्यातील काही महाग वनस्पती वापरल्याच नाही तरी त्याला च्यवनप्राश म्हणता येत नाही, त्याचा उपयोग पोळी-भाकरीबरोबर जॅम म्हणून खाण्यासाठी होऊ शकतो.

च्यवनप्राश प्रत्यक्ष अश्‍विनीकुमारांनी मानवजातीला दिलेला प्रसाद आहे. सर्वसामान्यांना सर्वात सोपे रसायन कायम सेवन करता यावे आणि आजारपण दूर ठेवता यावे, तसेच शारीरिक ताकद चांगली राहावी यासाठी च्यवनप्राशची योजना करावी असे सांगितलेले आहे.

प्रत्येकाने जर आवळ्याच्या ऋतूमध्ये आवळे घरी आणून च्यवनप्राश बनविण्याचा प्रयत्न केला तर वर्षभर घरात ठेवून प्रत्येकाला आपण स्वतः बनविलेला च्यवनप्राश सेवन केल्याचे समाधान मिळेल. यासाठी आवश्‍यक असलेल्या वनस्पती आणताना मात्र माहितगार व्यक्‍ती बरोबर असावी कारण वनस्पती बरोबर आहेत का शिवाय त्या वीर्यवान आहेत का वगैरे गोष्टी पारखून घेता येतील. च्यवनप्राश बनविताना दशमूळांचे महत्त्व असते. बाजारात मिळणाऱ्या दशमूळ भरड वा चूर्ण ह्या पदार्थात सर्व घटक आहेत का वा सर्व घटक योग्य प्रमाणात घेतलेले आहेत का हे कळायला काही मार्ग नसतो. शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेला च्यवनप्राश सर्व लहान-मोठ्यांनी व सर्व ऋतूत सेवन करून वर्षभर सुखी तर व्हावेच व बरोबरीने वयस्थापन करून तारुण्य टिकवावे आणि जीवनाचा आनंद मिळत राहील. अशी ही च्यवनप्राशाची कथा.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad