Monday, October 24, 2011

दिवाळीतील मिठाई खाताना...


डॉ. श्रीपाद खेडेकर, होमिओपॅथ, मुंबई
दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा, आनंदाचा उत्सव. दिवाळी आपल्या आयुष्यात वैभव आणते. भारतात दिवाळी तसेच इतर सणांनाही गोडधोड जेवण, मिठाई व पक्वान्न बनवण्याची व सेवन करण्याची परंपरा आहे. आनंदाच्या भरात चार घास जास्त खाल्ले जातात आणि मग त्याचाच त्रास होतो. या वेळी दिवाळीचा व त्या निमित्ताने गोडाधोडाचा, मिठायांचा आस्वाद घेताना चरबीयुक्त पदार्थ टाळणे गरजेचे आहे. कारण दिवाळीचे चार दिवस नातेवाईक व मित्रमंडळी यांच्यासोबत फटाके वाजवणे, एकत्र बसून फराळ, मिठाई व पक्वान्नांचा आस्वाद घेणे, यात निघून जातात. पण चार दिवसांनंतर जेव्हा आपण आपल्या नेहमीच्या आहारावर म्हणजे डाळ, भात, भाजी, चपाती यावर येतो, तेव्हा आपल्या लक्षात येते, की आपले वजन वाढले आहे.

काही टिप्स -
- मिठाई ही नेहमी नामांकित दुकानातूनच विकत घ्यावी. घरातच फराळ व मिठाई बनवली तर अति उत्तम.
- मिठाई घेताना ती ताजी व शुद्ध असल्याची खात्री करावी.
- मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्यासाठी असणाऱ्या खास मिठायांचेच सेवन करावे.
- सुका मेवा व चॉकलेट्‌स यांचा वापर करून केलेल्या मिठायांचे सेवन कमी करावे.
- सरबतांचा वापर कमी केल्याने साखर व कॅलरीज यावर नियंत्रण ठेवता येते.

दिवाळीनंतरचे व्यायाम -
भरपूर पाणी प्या - पाणी पिण्याने पचन यंत्रणा साफ होते. रक्तप्रवाह सुलभ होतो. ज्याचा फायदा त्वचेसाठी होतो. तसेच जेवणापूर्वी ग्लासभर पाणी प्यावे, त्यामुळे जेवण कमी जाते. सणासुदीच्या दिवसात रोज आठ ग्लास पाणी प्या व तंदुरुस्त राहा.
- तीन मोठ्या आहारांपेक्षा थोड्या थोड्या वेळाने खा - दिवसभरात नाश्‍ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण असे तीन मोठे आहार घेतल्याने शरीरावर अतिरिक्त भार पडतो. त्यापेक्षा दोन-दोन तासांच्या अंतराने थोडे-थोडे खाल्ले तर त्याचा फायदा होऊ शकतो.
भरपूर झोप घ्या - कमी झोप व वजन वाढणे या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध आहे. जास्त वेळ जागे राहण्याने आपण जास्त स्नॅक्‍स खातो म्हणून रोज आवश्‍यक तेवढी झोप घेणे व झोपण्याचे- उठण्याचे वेळापत्रक निश्‍चित करणे आवश्‍यक आहे.
- कार्बोरेटेड शीतपेय, तसेच मद्यार्कयुक्त पेय घेणे टाळावे - सर्व प्रकारच्या शीतपेयांमध्ये साखर असते. त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण तर वाढतेच; पण दातांसाठीही ते हानिकारक असते. मद्यपानामुळेही शरीराला फायद्यांपेक्षा त्रासच होतो. त्यामुळे मद्यपान कमी करावे. मद्यमान टाळणे सर्वांत हितावह.
व्यायाम - योगा, चालणे, धावणे, ऍरोबिक्‍स, पिलेटस अशा प्रकारचे व्यायाम करावेत. त्यामुळे घाम येतो व शरीरावर नियंत्रण ठेवणे शक्‍य होते. ज्याप्रमाणे आपण आपली नित्यकर्मे करतो, त्याप्रमाणेच व्यायाम केल्याने शरीराला फायदा होतो.

या दिवाळीत गोडाधोडाचा आनंद घेताना या सर्व टिप्स लक्षात ठेवा आणि दिवाळीचा व येणाऱ्या नवीन वर्षांचा मनमुराद आनंद लुटा.                        

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad