Saturday, December 18, 2010

विकृती विज्ञान

डॉ. श्री बालाजी तांबे
विकृती विज्ञान या विषयाची आपण माहिती घेतो आहोत. विकृती म्हणजे प्रकृतीतील बिघाड. हा बिघाड कशामुळे झाला, बिघाड झाला म्हणजे नेमके काय झाले हे सर्व विकृती विज्ञानाच्या अभ्यासावरून समजते. एकदा निदान पक्के झाले, की मग उपचार करणे सोपे होते.

आयुर्वेदात तसेच संस्कृत भाषेत "रोग' शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत.
तत्र व्याधिः आमयः गदः आतङ्‌कः यक्ष्मा ज्वरो विकारः रोग इत्यनर्थान्तरम्‌ ।...चरक निदानस्थान
रोगः पाप्मा ज्वरो व्याधि विकारो दुःखमामयः।यक्षातङ्‌क गदाबाधा शब्दाः पर्यायवाचिनः ।।
...अष्टांगहृदय निदानस्थान

व्याधि - हा शब्द "व्यध्‌' या क्रियापदावरून आलेला आहे, व्यध्‌ म्हणजे टोचणे, पीडा देणे. विविध प्रकारची पीडा ज्यामुळे अनुभूत होते तो व्याधी होय.

आमय - आम म्हणजे अर्धवट पचलेला विषसमान आहार. आम हे बहुतेक सर्व विकारांचे मूळकारण असल्याने रोगाला आमय म्हटले जाते.

गद - गद्यते पीड्यते अनेन इति गदः । गद म्हणजे पीडा, रोगामुळे अनेक प्रकारच्या पीडा सहन कराव्या लागत असल्याने रोगाला गद असे म्हणतात.

आतंक - म्हणजे भय, संकट, रोगाचे भय वाटत असल्याने तसेच रोग आयुष्यात संकटाप्रमाणे असल्याने रोगाला आतंक म्हणतात.

यक्ष्मा - राजयक्ष्मा म्हणजे क्षय या रोगावरून हा शब्द आला आहे, सर्व रोगांचा राजा म्हणजे क्षयरोग असे समजले जात असल्याने रोगाला यक्ष्मा असेही म्हणतात.

ज्वर - म्हणजे ताप. शरीर-मनाचा संताप करवणारा तो ताप होय. कुठलाही रोग असला तरी तो शरीर तसेच मनाला तापदायक असतोच म्हणूून रोगाला ज्वर असाही पर्याय दिलेला आहे.

पाप्मा - आहार-आचरणात केलेल्या चुका म्हणजे पाप. या चुकांमुळेच रोग होत असल्याने रोगाला पाप्मा असेही म्हटले जाते.

विकार - म्हणजे बदल. रोगामुळे शरीरातील प्राकृत क्रियांमध्ये बदल होत असल्याने रोगाला विकार असेही म्हटले जाते.

दुःख - रोगामुळे दुःख होते म्हणून रोगाला दुःख असेही म्हटले जाते.

आबाध - शरीर-मनाच्या कार्यात बाधा आणणारा तो रोग या अर्थाने रोगाला आबाध असे म्हटले जाते.

आयुर्वेदात प्रकृती व विकृतीतील फरक तसेच रोग कसा होतो हेही समजावले आहे,
विकारो धातुवैषम्यं साम्यं प्रकृतिरुच्यते ।सुखसंज्ञकमारोग्यं विकारो दुःखमेव च ।।...चरक सूत्रस्थान
धातूंमधला बिघाड म्हणजे विकार, जो दुःखाला व वेदनेला कारणीभूत ठरता.े तर धातूंची समस्थिती, संतुलित स्थिती म्हणजे प्रकृती, जी सुखकारक असते.

रोगस्तु दोषवैषम्यं दोषसाम्यमरोगता ।...अष्टांगहृदय सूत्रस्थान
दोषांची विषमता, दोषांचे असंतुलन म्हणजे रोग तर दोषांचे संतुलन ही निरोगी अवस्था होय.

रुजाकर्तृत्वात्‌ रोग एव ।
रुजा म्हणजे वेदना, दुःख, वेदनेला कारण ठरणारा तो रोग होय.

दोषदुष्यसंमूर्च्छनाजनितो व्याधिः ।
दोष व दुष्य (सप्तधातू व तीन मल) यांच्या एकत्रीकरणातून परस्परसंपर्कातून जो बिघाड होतो त्याला व्याधी असे म्हणतात. तीन दोष, सप्तधातू व तीन मल यांच्या परस्परसंयोगातून सर्व व्याधी उत्पन्न होतात, हेही आयुर्वेदात सांगितले आहे.

स एव कुपितो दोषः समुत्थानविशेषतः ।स्थानान्तरगतश्‍चैव जनयत्यामयान्‌ बहून्‌ ।।
त एव अपरिसंख्येया भिद्यमाना भवन्ति हि ।...चरक सूत्रस्थान
दोष ज्या कारणाने प्रकुपित होतो आणि कुपित झाल्यावर ज्या स्थानाचा आश्रय घेतो, त्या कारणानुरूप आणि त्या स्थानानुरूप अनेक विकार उत्पन्न करू शकतो. म्हणूनच दोष जरी तीनच असले तरी त्यांच्यामुळे अगणित रोग होऊ शकतात. म्हणूूनच प्रत्येक रोगाला नाव असलेच पाहिजे ही संकल्पना आयुर्वेदात नाही.

विकारनामा कुशलो न जिह्वियात्‌ कदाचन ।न हि सर्वं विकाराणां नामतो।स्ति ध्रुवा स्थितिः ।। ...चरक सूत्रस्थान
रोगावर उपचार करताना त्याचे नावाने निदान केले नाही तरी चालते, त्यापेक्षा कोणता दोष कोणत्या कारणाने बिघडला आणि धातू-मलांमध्ये नेमका काय बिघाड झाला हे समजले, तर त्यानुसार उपचार करता येतात
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad