डॉ. श्री बालाजी तांबे
सौंदर्य सर्व चराचरात असते, पण ते व्यक्तिगत असते. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या मनात, डोळ्यात, बुद्धीत व मेंदूत असते. ही सौंदर्याची देवाशी असलेली जवळीक. देव जसा एकमेवाद्वितीय असतो, तसे सौंदर्यही एकमेवाद्वितीय असते. म्हणूनच सौंदर्याची मोजमापे ठरविता येत नाहीत. तरीही एकूण पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, स्पर्शानंतर मनात कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण झाली नाही तर ते खरे सौंदर्य असे म्हणायचे.सौंदर्य हे सर्व प्राणिमात्रांना विश्वात व जीवनात धरून ठेवण्याचे आकर्षण आहे. दिवसाच्या पहिल्या क्षणी म्हणजे सूर्योदयाच्या क्षणी संपूर्ण आकाशभर पसरलेला सोनेरी लालसर गुलाबी रंग आणि रसरसता लाल रंगाचा गोळा पाहिल्यानंतर या जीवनाचे आकर्षण कोणाला वाटणार नाही? सूर्याचे कर्तृत्व, सूर्याची उष्णता, सूर्याने जीवनाला दिलेली ऊब आणि सूर्याने जीवननिर्मितीसाठी दिलेली शक्ती याला कशाचीच तुलना नाही. असा हा सूर्य सकाळच्या वेळी त्याच्या उषा ह्या सहचरीबरोबर ज्यावेळी प्रकट होतो, त्यावेळचे सौंदर्य एवढे अवर्णनीय असते, की थंड हवेच्या ठिकाणी हिल स्टेशनवर गेलेली जोडपी रात्री थकून भागून झोपल्यानंतर सकाळी साखरझोपेतून उठू नये, असे वाटत असतानाही भल्या पहाटे उठून सूर्योदय पाहायला जातात, त्यामागे ओढ असते सौंदर्याचीच.
मराठीतील व संस्कृतातील सुंदर व सौंदर्य ह्या शब्दांचा संबंध आपल्या भारतीय पौराणिक कथेशी असावा व म्हणून सौंदर्य आपल्याला अधिकच काही सुचवून जाते. दोन राक्षस होते, एकाचे नाव सुंद, दुसऱ्याचे उपसुंद. त्यांना ब्रह्मदेवाने म्हणजे पृथ्वीच्या सृजनकर्त्यानेच असे वरदान दिलेले होते की तुम्हाला दुसरे कोणी कधी मारू शकणार नाही, केवळ तुम्हीच तुम्हाला मारू शकाल. देवाने दिलेले प्राकृत सौंदर्य हे दुसरे कोणीच कधीच नष्ट करू शकत नाही. चुकीच्या वागण्यामुळे, चुकीच्या खाण्यापिण्यामुळे जन्मतः आलेला सौंदर्याचा प्रसाद मनुष्य स्वतःच नासवून टाकतो. अर्थात चेहऱ्यावर ऍसिड वगैरे टाकण्याच्या घटनांमध्ये सुद्धा सौंदर्याचे चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी प्रदर्शन असण्याचाच संभव अधिक असतो. पण जसे सौंदर्यवती स्त्री किंवा रुबाबदार पुरुष लक्षात घेत नाहीत, की सौंदर्य वा रुबाबदारपणा ही देवाची देणगी आहे, आपण ही देणगी फक्त सांभाळायची आहे आणि मग त्यांना सौंदर्याचा गर्व होतो. ही देणगी म्हणजे आपले स्वतःचे कर्तृत्व आहे अशा घमेंडीत हे लोक इतरांकडे तुच्छतेने पाहतात व पर्यायाने त्यांचे इतरांशी संबंध बिघडतात व शेवटी ते स्वतःचा व सौंदर्याचा घात करतात. नेमके हेच सुंद व उपसुंद या राक्षसांचे झाले. आपल्याला कोणीही मारू शकत नाही असे म्हटल्यावर ते उन्मत्त झाले नाहीत तरच नवल ! त्यांना आवरण्यासाठी इंद्राने तिल्लोत्तमा (तिल + उत्तमा) नावाची एक अप्सरा पाठविली. तीळ किती छोटा असतो ह्याची आपल्याला कल्पना आहे. आयुर्वेदात ह्या तिळाच्या तेलाचे महत्त्व सांगितलेले आहे. पण हाच तीळ शरीरावर एका विशिष्ट जागी आला तर सौंदर्य अजूनच खुलते. तिल्लोत्तमेला पाहिल्यानंतर तिला कोणी प्राप्त करून घ्यावे यावरून सुंदोपसुंदांमध्ये वाद सुरू झाला, वादाचे रूपांतर लढाईत झाले. स्त्रीसाठी झालेल्या लढायांमधली ही पहिली लढाई. बऱ्याच वेळा असे वाटते की लढाई स्त्रीसाठी नसून ती सौंदर्यासाठी आहे. पण सौंदर्य हा अनुभवण्याचा विषय आहे. सौंदर्यावर ताबा मिळवायचा, त्यावर स्वतःची मालकी प्रस्थापित करायची ही कल्पना नसते. सौंदर्याची प्रत्येकाला ओढ असते परंतु सौंदर्य राहते एका बाजूला व प्रयत्न होते त्या व्यक्तीवरच्या स्वामित्वाचा. सुंद व उपसुंद ह्यांच्यातही हेच झाले. तिल्लोत्तमा कोणाची होईल ह्याच्यावर दोघांनी भांडण केले व शेवटी त्यांनी या लढाईत स्वतःलाच मारून घेतले.
तिल्लोत्तमेच्या या कार्यावर सर्व देव खूष झाले व त्यांनी तिला वर दिला की तुझ्या नावातील "तिळ' यज्ञात हवनद्रव्य म्हणून वापरले जातील आणि तिळापासून बनविलेल्या तेलाचा पृथ्वीवर सौंदर्यासाठी औषधी उपयोग होईल. तिल्लोत्तमेला आनंद झाला. सौंदर्याची किंमतही सिद्ध झाली. सौंदर्याचा आस्वाद घेणे, त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे ही कल्पना सुंदोपसुंदीच्या ह्या गोष्टीमुळे महत्त्वाची ठरली. सौंदर्यावर मालकी हक्क गाजवावा अशी ती काही वस्तू नाही, तशा प्रयत्नांना मराठीत सुंदोपसुंदी असे म्हटले जाते.
सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या मनात, डोळ्यात, बुद्धीत व मेंदूत असते असे म्हणायला हरकत नाही, त्यामुळे सौंदर्याची एक ठराविक व्याख्या करता येईल असे दिसत नाही. एखाद्याला न आवडलेली वस्तू दुसऱ्याला मनापासून आवडते. दुकानात नेऊन पत्नीला एखादी साडी दाखवावी तर तिला ती साडी अजिबात पसंत पडत नाही. तुला ही साडी चांगली दिसेल असे प्रत्यक्ष नवरा म्हणत असताना तिने ती साडी घ्यायला काय हरकत आहे? एरवी पती-पत्नीत असलेला समविचार नेमका त्यावेळी एकमेकाच्या विरोधात कसा जातो हेच समजत नाही. पलीकडच्या काउंटरवर स्त्रिया साड्या पाहात असतात त्यापैकी एकीचे लक्ष त्या निवडलेल्या साडीवर जाते. ती विक्रेत्याकडून ती साडी मागून घेते, तिच्या ग्रुपमधल्या सगळ्यांनाच साडी खूप आवडते. तिने साडी घेण्याचे ठरविल्यावर पहिली बाई विक्रेत्याला विचारते, ""अहो, तशीच दुसरी साडी तुमच्याकडे आहे का? मीही तीच विकत घेईन म्हणते.'' अर्थातच तशी दुसरी साडी दुकानात नसते. ह्या सगळ्या डिझायनर साड्या असतात, त्यांचा एकेकच नग बनविलेला असतो. एकाच डिझाईनच्या अनेक साड्या असल्या तर त्यात सौंदर्य कसले? सौंदर्य सर्व चराचरात असते, पण ते व्यक्तिगत असते. ही सौंदर्याची देवाशी असलेली जवळीक. देव जसा एकमेवाद्वितीय असतो तसे सौंदर्यही एकमेवाद्वितीय असते. म्हणूनच सौंदर्याची मोजमापे ठरविता येत नाहीत. तरीही एकूण पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, स्पर्शानंतर मनात कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण झाली नाही तर ते खरे सौंदर्य असे म्हणायचे.
तेव्हा ह्या संपूर्ण विश्वाला एका संतुलनात ठेवलेले दिसते. गोलाकार कुठेच खटकत नाही, बोचत नाही, टोचत नाही. म्हणून शरीरात असलेले गोलावे जसे शरीराचे सौंदर्य वाढवितात तसे ह्या संपूर्ण विश्वाचे सौंदर्य आपल्याला अनुभवायला येऊ शकते. याचा अर्थ असा की सौंदर्य संतुलनात असते. शरीराच्या बाबतीत डोळ्याचा आकार बदामाचा असो, कमळाच्या पाकळीप्रमाणे असो, माशाप्रमाणे असो किंवा डोळे भेदक, बटबटीत असोत, काळेभोर असोत वा हिरवे असोत त्यांचे स्वतःचे म्हणून एक विशेष सौंदर्य असते आणि त्या विशेष सौंदर्यामुळे ती व्यक्तीही सौंदर्यवती ठरते. सौंदर्य हे नखशिखांत पाहिजे, त्यात कुठे बारीकसा दोष असला तरी इतर सर्व संतुलित अवयवांच्या सौंदर्यामुळे तो दोष झाकलाही जातो. असे असल्यामुळे बुटकी व्यक्तीही सुंदर असू शकते व उंच व्यक्तीही सुंदर असू शकते. अर्थात ताडामाडासारखी अति उंच व्यक्तीची उंची जाडीच्या प्रमाणात नसली तर ते सौंदर्याला बाधक ठरू शकते. पण तरीही उंच व्यक्तीत त्वचा, कांती, डोळे, केस, भरदार छाती, उन्नत उरोज असे सर्व सौंदर्य असले तर एकूण व्यक्तिमत्व सुंदरतेत मोजले जाते. एक गोष्ट निश्चित की माणसाच्या जिवाला कुठेतरी दिलासा मिळून परमेश्वरी सृजनात असलेले सौंदर्य जर पटले व मन शांत झाले तर उद्गार बाहेर येतात, सुंदर, अति सुंदर!!
- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment