Sunday, October 31, 2010

वास्तुप्रथा : किचन (भाग ४) - शेगडीची मांडणी

संजय पाटील
पूर्वा, रोहिणी, पुष्य, तिन्ही उत्तरा, अश्विनी यापैकी नक्षत्रात आणि शुक्रवार, गुरुवार व बुधवार यापैकी दिवशी शेगडीची स्थापना करावी. शेगडी ज्या वारी बसवता त्याप्रमाणेफळं मिळतील.
 शुक्रवार     - अन्नधान्याची प्राप्ती
 गुरुवार    - लक्ष्मीप्राप्ती
 बुधवार    - लाभ
 शनिवार     - दारिद्रय़
 मंगळवार    - स्त्रीनाश
 सोमवार    - धननाश
 रविवार    - आजारपण
किचनमध्ये सर्वात महत्त्वाची असते शेगडी. शेगडी अंतरिक्षपदात ठेवावी, असं मयमतमनं नेमकेपणानं सांगितलंय. अंतरिक्षपद (नभ) कुठे येतो ते एकाशितीपद वास्तुमंडळाची आकृती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. (वास्तुमंडळ समजून घेण्यासाठी दि. २९मे २०१० चा वास्तुरंगचा अंक पाहावा.)
(संदर्भ- अंतरिक्षे भवेचुल्ली सत्यके स्यादुखुलम- मयमतम अध्याय २७, श्लोक १००)
जर किचन आग्नेयेलाच असेल तर संपूर्ण घराचं वास्तुमंडळ गृहीत धरून हे पद काढावं. मात्र जर किचन अन्य दिशांत असेल तर फक्त किचनच्या रूमसाठी वास्तुपदमंडळ आखून त्याप्रमाणे अंतरिक्षपद(नभ) काढावं. (आकृती १ पाहा)

किचन ईशान्येत असेल तर मात्र शेगडी किचनच्या अंतरिक्षपदात न ठेवता शिखी किंवा पर्जन्य या पदात ठेवावी. किचन वायव्येला असेल तर शेगडी रोगपदात ठेवावी.
फेंगशुईत शेगडीच्या नॉबची दिशा गृहस्वामीच्या सर्वोत्तम दिशेत ठेवावी असा नियम आहे. गॅस थोडा तिरका बसवून ही सर्वोत्तम दिशा साधता येत असेल तर जरूर करावं. याचे रिझल्ट फार चांगले मिळतात असा प्रॅक्टिकल अनुभव आहे.
सर्वोत्तम दिशा काढण्याचा फॉम्र्युला सांगतो. सोप्पं आहे. जन्मतारखेच्या सालाची बेरीज करा. तिचं रुपांतर एक आकडी संख्येत करा. ही एक आकडी संख्या ११ तून वजा करा. राहिलेली बाकी म्हणजे कुआ नंबर. उदाहरण देतो. जयेश आणि जयश्री हे जुळे भाऊ-बहिण आहेत.   जन्मतारीख आहे २६.०५.१९६९. पहिल्यांदा जयेशचा कुआ नंबर काढुया.  तारखेतील फक्त सालाची चार आकडी संख्या घेऊन त्या सर्व आकडय़ांची बेरीज  करा. ती येईल २५. आता २५ चं रुपांतर सिंगल आकडय़ात करायचं म्हणजे,  २+५=७ .  आता ११ मधून ७ वजा करा. बाकी राहील ४. म्हणजे जयेशचा कुआ नंबर आला ४.
महिलांचा कुआ नंबर काढण्याची पध्दत थोडी वेगळी आहे. आता जयश्रीचा कुआ नंबर कसा काढायचा ते पाहू. तिच्याही जन्मसालाची बेरीज करा. ती येईल ७. आता ही बेरील ४ मध्ये मिळवा. आणि उत्तराचं रुपांतर करा एक आकडी संख्येत. म्हणजे ७+४=११, १+१=२. म्हणजे जयश्रीचा कुआ नंबर आला २. जेव्हा  कुआ नंबर ५ येतो तेव्हा तो पुरुषांसाठी २ पकडावा आणि महिलांसाठी ८ पकडावा.
मात्र चायनीज वर्ष जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून सुरू होत असल्यानं या महिन्यात जन्म झालेल्यांचा कुआ नंबर काढताना गडबड होऊ शकते. समजा हेतलची जन्मतारीख २९ जानेवारी १९७० अशी  आहे. पण त्या वर्षी चायनीज वर्ष ५ फेब्रुवारीला सुरू झालं. त्यामुळे कुआ नंबरच्या गणितासाठी हेतलचं जन्मवर्ष १९६९ घ्यावं लागेल.  जानेवारी व  फेब्रुवारी या दरम्यान जन्म असणाऱ्यांनी चायनीज कॅलेंडर रेफर करावं किंवा मला मेल पाठवावा.
 प्रत्येक कुआ नंबरसाठी चार दिशा शुभ असतात तर चार अशुभ. सोबतचा तक्ता पाहा. प्रत्येक कुआ नंबरच्या शुभ दिशा उतरत्या क्रमानं त्यात दिल्यायत.
घरातील कर्त्यां पुरुषाच्या शुभ दिशेकडे  शेगडीचे नॉब जातील अशाप्रकारे  शेगडी ठेवता आलं तर पाहावं. खूप चांगले परिणाम मिळतात.  उदाहरण देतो. अजयची जन्मतारीख आहे ६ जून १९६५. त्याचं किचन आहे घराच्या ईशान्येला. त्याचा कुआ नंबर येईल ८. या कुआ नंबरची सर्वोत्तम दिशा आहे नैऋत्य. जेव्हा किचन ईशान्येला असतं त्यावेळी शेगडी अग्नी किंवा पर्जन्य पदात ठेवावी लागते हा नियम आहे. या केसमध्ये मी  शेगडी अग्नी पदात तिरकी ठेवेन म्हणजे   तिचे नॉब नैऋत्येकडे जातील. (आकृती २ पाहा.)
शेगडी कोणत्या दिवशी स्थापन करावी यासाठी नियम आहे. तो पुढीलप्रमाणं..
        पूर्वाद्रारोहिणी पुष्ये उत्तरात्रितयेश्चिमे
        स्थितिर्महानसस्येष्टा गृहोपस्करण: सह
        शनिवारे दरिद्रत्व शुक्रन्नं धनमेव च
        गुरुवारे लभलक्ष्मीर्बुधे लाभोभवेसदा
        भौमवारे मृतिर्नार्या: सोमे धनक्षयो भवेत्
        रविवारे भवेद्रोगी चुल्लोस्थापनकर्मणि
             (मुहूर्त प्रकाश)
अर्थात.. पूर्वा, रोहिणी, पुष्य, तिन्ही उत्तरा, अश्विनी यापैकी नक्षत्रात आणि शुक्रवार, गुरुवार व बुधवार यापैकी दिवशी शेगडीची स्थापना करावी.
  शुक्रवारी शेगडी बसवल्यास अन्नधान्याची प्राप्ती, गुरुवारी लक्ष्मीप्राप्ती व बुधवारी लाभ अशी फळं मिळतील. शनिवारी शेगडी बसवल्यास दारिद्रय़, मंगळवारी स्त्रीनाश, सोमवारी धननाश, रविवारी आजारपण अशी फळं मिळतील.
शेगडीच्या  बर्नरची संख्या विषम असावी. मयमतमच्या २७व्या अध्यायातील हा श्लोक पाहा-
    इद्वग्निभूतमुनिनन्दकरुद्र संख्याशूल्यो।
    नृणाममरधाम्नि समासमा: स्यु:।।
    सर्वा: सुरावनिसुरावनिपेषु योग्या:।
    शेषेषु तत्तदुदिताश्च मता यमीन्द्रे: ।।१०४।।
             (मयमतम)
अर्थात.. चुलींची संख्या विषम असावी.
मॉडर्न जमान्यात चुली हद्दपार झाल्यायत. त्यामुळे शेगडीचा एक बर्नर म्हणजे एक चूल असं समजावं. हल्ली सरसकट चार नॉबचं हब वापरलं जातं. ते एक्सेंज करून तीन बर्नरची शेगडी तुम्हाला आणावी लागेल. ते शक्यच नसेल तर एक बर्नरची दुसरी शेगडी किंवा क्लीक्सचा गॅस बाजूला ठेवावा लागेल जेणेकरून बर्नरची संख्या  होईल पाच.
 लॉफ्ट किंवा बीमच्या खाली शेगडी येऊ नये. चिमणी बीमसदृश्य परिणाम देते. म्हणून शक्यतो टाळावी. वायुविजनाचा टोकाचा प्रॉब्लेम असेल तरच चिमणी लावा. येऊ द्या ना घरभर अन्न शिजवण्याचा झमझमीत वास. घरात अन्नाचा वास नको असेल तर कसला हवा.. टॉयलेटचा?   वायुविजनाची कसलीच समस्या नसताना फक्त विशिष्ट शेजाऱ्याच्या   घरात वास जाईल याच्या काळजीनं चिमणी बसवणारे मी अनेकजण पाहिलेयत.   अतिचांगुलपणाही वाईटच नाही का?  भांडल्यासारख्या आवाजात हा विशिष्ट शेजारी गप्पा मारतो किंवा दरवाजा सताड उघडा ठेवून जोरजोरात टीव्ही लावतो, तेव्हा  तुमचा विचार करत नसेल तर तुमचा चांगुलपणा अनाठायीच नाही का ?
सेकंड हँड शेगडी वापरू नये. कुणावर परिस्थितीच्या रेटय़ामुळे भांडीकुंडी विकण्याची वेळ आली तर अशा ठिकाणी जाऊन शेगडी व तिजोरी या दोन गोष्टींची खरेदी कदापि  करू नये. (क्रमश:)

इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (मायक्रोवेव्ह) यांचा वापर करून स्वयंपाक शिजवू नये, असं माझे गुरू आणि अमेरिकेतील बाऊ बायोलॉजीचे प्रणेते आर्किटेक्ट हेल्मुट झीई मला नेहमी सांगत. गॅस किंवा लाकूड-कोळशासारखे इंधन यांचाच वापर अन्न शिजवण्यासाठी करावा. डाव्या बाजूचं सफरचंद गॅसवर तर उजव्या बाजूचं मायक्रोवेव्हमध्ये शिजवण्यात आलंय. नंतर किरलीन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं त्यांची ऑरा फोटोग्राफी केली असता असे परिणाम मिळाले. गॅसवर शिजवलेल्या पदार्थाचा ऑरा निकोप होता तर मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेल्या पदार्थाचा ऑरा डागाळलेला होता. पुण्याच्या एमआयटीत ऑरा फोटोग्राफिची सोय आहे.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad