Wednesday, October 20, 2010

टेन्शन काय कू लेने का ?




आपलं रोजचं जगणं परिघाचं झालं आहे. सीमित झालं आहे. या परिघात, या सीमारेषेअंतर्गतच मग घरच्यांशी, ऑफिसमधल्यांशी छोटी-मोठी भांडणं, वाद-विवाद, कुरबुरी होत राहतात...पण अशा रोजच्याच झगड्यांची ओझी शिरावर वाहायची तरी किती ? त्याच त्या चकव्यांत फिरायचं तरी किती ? 
या मानसिक ताण-तणावांना आपल्या आयुष्यातून घालवून देण्यासाठी आपणही ठरीव विचारसरणीच्या सीमा ओलांडायला नकोत का ? त्याशिवाय सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं सोनं कसं बरं लुटता येईल ? हे "सीमोल्लंघन' व्यक्तिगणिक वेगवेगळं असू शकेल...पाहू या आपल्यातीलच साध्यासुध्या माणसांनी कशा कशा प्रकारचं "सीमोल्लंघन' केलं ते...! कदाचित तुमच्यापैकी अनेकांना ते मार्गदर्शकही ठरेल आणि आनंदाचं सोनं देणारंही !
दुर्लक्ष करणे उत्तम (अश्‍विनी कर्णिक)
माझा नवरा छोट्या छोट्या कारणांनी वैतागतो. भांडतोही. तितकाच लवकर शांतही होतो. पूर्वी
अशा छोट्या छोट्या कारणांवरून भांडणं झाली की माझाही तोल जायचा. माझी या घराला किंमतच नाही असं राहून राहून वाटायचं, रडू यायचं. पण आता मात्र मी त्याच्या रागाकडे चक्क दुर्लक्ष करते! त्याचा स्वभावातला "स्व' आणि राग गेल्यानंतर पटकन शांत होण्यातला "भाव' मला कळलाय, म्हणूनच मी आता त्यातला फक्त "भाव' पाहते..!

थोडासा स्वार्थी झालोय (शैलेश बेलोसे)
माझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली की माझा "इगो' दुखावला जायचा. आपणच सर्वेसर्वा ही भावना मुळाशी असायचीच. त्याचा अनिष्ट परिणाम माझ्या प्रकृतीवर व्हायला लागला... झोप गेली, भूक मेली, अस्वस्थता आली. ही सारी चिडचिड करून आपल्याला मिळतंय काय, असा विचार मी केला. तेव्हा मला उत्तर मिळालं, केवळ मनःस्ताप! म्हणूनच मित्रांनो, मी आता थोडासा स्वार्थी झालोय. चिडचिड होते खरी; पण तिला मी आता गोंजारत नाही, उडवून देतो..

संवाद साधते (प्रमिला कोळमकर)
छोट्या छोट्या गोष्टी माझ्या मनाला लागतात. त्यातले संदर्भ माझ्यासाठी नसले तरीही ते मी मनाला लावून घेते. मनातल्या मनात कुढत राहते; पण आपल्या जवळच्या व्यक्तीला नेमकं काय वाटतंय, हे सांगण्याची यापूर्वी मला आवश्‍यकता वाटत नसे. आता मात्र मला नेमकं कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं हे मी आवर्जून सांगते, त्याबद्दल त्यांचं म्हणणं काय असतं, हे समजून घेते. त्यामुळे मला पर्वताएवढ्या वाटणाऱ्या अनेक गोष्टी राईइतक्‍याही नसतात, हे जाणवतं.

परिस्थिती स्वीकारायला शिका (सुनील गुप्ते)
आयुष्य सुरळीत असावं, त्यात चढ-उतार नको असं मला नेहमी वाटायचं. अनपेक्षित प्रसंग आला की छातीत धडधडायचं, ऍसिडिटी वाढायची, कुणीतरी येऊन एकदाचं मला या संकटांतून मोकळं करो, असं वाटायचं. मग त्रागा, वैताग वाढत राहायचा. तणावाच्या त्या स्थितीमध्ये हातात असलेल्या पर्यायांचा विचारच करण्याइतका विवेकही गमावून बसायचो. पण आता मी परिस्थितीचा स्वीकार करायला शिकलोय. वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातोच ना!

सुपरवुमन बनण्याचा अट्टहास सोडला (वर्षा पैठणकर)
घरातली एकुलती एक सून आणि आई-वडिलांची एकुलती एक लेक. म्हणजे इथले दोन आणि तिथले दोन अशा चार ज्येष्ठांची जबाबदारी माझ्या खांद्यावर. ऑफिस, घर, नातलग या साऱ्या पातळ्यांवर माझा सुपरवुमन होण्याचा अट्टहास. त्यातून होणारी ओढाताण, सगळ्याचं सगळं नीट होतंय ना, हे पुनःपुन्हा तपासून पाहण्याचा प्रयत्न... त्यातून त्यांच्या खाण्या-पिण्याच्या, जगण्याची काळजी नाही तर "ऑडिट' करण्याचा प्रयत्न. ते साध्य झालं नाही की मग ताण, अस्वस्थता... माझं सुपरवुमन होण्याचं खूळ मी मनातून साफ काढून टाकलंय, तेव्हापासून "नॉर्मल' झाले हेच खरं..

स्वतःच प्रयोग करा (मिलिंद बोरकर)
कुटुंबाचे बजेट, गैरसोई, त्रुटी, वाद, पाहुणे, खरेदी, छोट्या-मोठ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी एक साप्ताहिक बैठक आम्ही घरीच घेतो. एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे प्रत्येक सदस्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. त्यामुळे घरातली कामं कुणी कोणत्या पद्धतीने करावीत, कुणी कुणावर नाहक राग काढतंय का, संवादाचा अभाव आहे का, आर्थिक बजेट कसं आखायचं या प्रत्येक गोष्टींवर चर्चा होते. त्यामुळे काही चढ-उतार असलेच तर त्याचं निराकरण या छोट्याशा बैठकीमध्ये होतंच

प्रार्थनेमध्ये बळ असतं (सुलभा मेहेंदळे)प्रार्थनेमध्ये बळ असतं. मन अस्वस्थ असताना, चित्र-विचित्र प्रकारचे विचार आपल्यावर स्वार होत असताना मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी प्रार्थनेसारखा, योगसाधनेसारखा उत्तम उपाय नाही.
शरीर-मनाचा तोल साधण्यासाठी, एकतानतेची अनुभूती मिळण्यासाठी प्रार्थना बळ तर देतेच; पण ती तणावांनाही दूर सारते. जगण्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रार्थनेतील शक्ती जाणून घ्यायला हवी.

भटकंती मूड बदलवून टाकते (प्राची मोरे)
त्याच त्याच रुटीनमधून ब्रेक घेण्यासाठी एक छोटासा ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी वेगवेगळे छंद जोपासण्याचीही गरज असते. त्याच वातावरणाचा त्रास होऊ लागला की "ऑफ बीट' असं काही करावं. वेगळ्या प्रदेशातील भटकंतीही आपला मूड बदलवून टाकते...


---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad