माझ्या एका मित्राचा खूप वर्षांनंतर फोन आला. अरे तुझी आठवण आली म्हणून सहज फोन केला.. त्याची कॅसेट सुरू झाली. आठवण आणि सहज हे दोन शब्द संभाषणात आले की मी सावध होतो. मुळात ज्यांना तुमची आठवण येते ते तुमच्या नेहमीच टचमध्ये असतात. फार वर्षांनंतर फोन करायची पाळी त्यांच्यावर येत नाही. आणि अशी माणसं सहज फोन तर नक्कीच करीत नाहीत. मित्राचं इकडचं तिकडचं सुरू होतं. माझी वेळ घाईची होती. हा बाबा कधी मुद्दय़ावर येतोय असं मला झालं होतं. शेवटी तो मुद्दय़ावर आला. त्याच्या आत्याच्या घरी मी जावं अशी इच्छा त्यानं बोलून दाखवली. मी हो ला हो करत सुटका करून घेतली. त्यानंतरच्या दोन चार दिवसात गेल्या १५ वर्षांत केले नसतील इतके फोन त्यानं केले. हे कमी म्हणून की काय, आत्याबाईंचेही फोन सुरू झाले. आत्याबाई कोलगेटमध्ये उच्च पदावर काम करीत होत्या. वर्सोव्याला समुद्रकिनारी काही करोड रुपये किमतीचा आलिशान फ्लॅट त्यांनंी खरेदी केला होता. तो बघण्यासाठी मी लवकरात लवकर यावं, अशी त्यांची विनंती होती. बाईंचा सूर चिंतेचा होता.
त्यानंतर पंधरवडय़ातच मी चारबंगल्याला माझ्या मैत्रिणीकडे गणपतीसाठी म्हणून गेलो होतो. नेमका त्याचवेळी आत्याबाईंचा पुन्हा फोन आला. बाप्पांच्या समोर बसलेला असताना टोलवाटोलवी करणं शक्य नव्हतं. मग तशीच वाट वाकडी करून त्यांच्या घरी गेलो एकदाचा.
फ्लॅट काळजीपूर्वक बघितला. आणि तो चांगला असल्याचं प्रमाणपत्र देऊन टाकलं. बाईंच्या चेहऱ्यावर आनंद वगैरे पसरणं दूर तो आणखी प्रश्नार्थक झाला. या बुवाला वास्तुशास्त्रातलं नक्की काही कळतं ना, असे काहीसे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले.(कुणीही कुणाचाही चेहरा वाचू शकतं.) त्यांच्या मनात काही तरी घोळतंय हे स्पष्ट दिसत होतं. शेवटी त्यांनी थेट किचनबद्दल विचारलं आणि त्यांच्या चिंतेचा उलगडा झाला. किचन चुकीच्या ठिकाणी आहे का, तोडावं लागेल का, असा प्रश्न त्यांनी केला. त्या फ्लॅटचं किचन ईशान्येला होतं. ईशान्येचं किचन चांगलं, असं ऋषीमुनी सांगतात. मी ऋषीमुनींच्या परंपरेतला अभ्यासक असल्यानं तुमचं किचन उत्तम ठिकाणी आहे, तोडण्याची मुळीच गरज नाही, असं आत्याबाईंना ठामपणं सांगितलं. तेव्हा कुठे त्यांचा जीव भांडय़ात पडला.
झालं असं होतं की, कुण्या नवशिक्या वास्तुतज्ज्ञाला त्यांनी कन्सल्टन्सीसाठी बोलावलं होतं. त्या तज्ज्ञानं ईशान्येचं किचन अगदी वाईट. पहिल्यांदा ते तोडा आणि आग्नेयेला घ्या नाही तर तुमचं वाट्टोळं होईल, असं सांगून बाईंना घाबरवून टाकलं होतं. (‘तुमचं वाट्टोळं होईल' हा शब्द परवलीचा बनलाय ज्योतिष, वास्तु आणि विशेषत कर्मकांडात. देवांच्या वतीने बोलणारे तथाकथित पंटर ते सर्रास वापरतात. आणि तुम्हीही त्यांना घाबरून जाता. हे चित्रं बघितलं की असं वाटतं की देव म्हणजे कुणी गुंड आहे, आणि तुमच्या हातून पूजा वगैरे करताना बारीकशी चूक राहिली की तुम्हाला शिक्षा करण्यासाठी तो टपून बसलाय. टीव्हीवर एक ज्योतिषी कम वास्तुशास्त्री येतो. इतक्या भितीदायक पध्दतीनं भविष्य सांगतो की विचारू नका. ‘बेटा सो जा नहीं तो गब्बर आएगा' या पुराण्या जमान्यातील डायलॉगऐवजी आधुनिक मातांना ‘बेटा सो जा नहीं तो वास्तुशास्त्री आएगा' असा नविन डायलॉग म्हणावा लागेल. असो!)
त्या फ्लॅटची रचना अशी होती की किचन आग्नेयेला घेतलं असतं तर त्या महागडय़ा फ्लॅटची रया जात होती. (आणि नसतं घेतलं तर वाट्टोळं वगैरे पण होणार होतं..) म्हणून आत्याबाई टेन्शनमध्ये होत्या. यानिमित्त वाचकांना पुन्हा सांगतो की, काहीच जमत नाही म्हणून वास्तु कन्सल्टन्सीचं दुकान थाटून बसलेले मुंबईच्या गल्लोगल्ली आहेत. रेल्वे स्टेशनांवर मिळणारी पुस्तकं चाळून, काही तरी तिरपागडे तर्क लढवून काहीबाही सांगणारे लोक हेच. वास्तुशास्त्रावरचा लोकांचा विश्वास कमी व्हायला कारण हेच. ज्योतिषशास्त्राचं ज्ञान नाही, प्राचीन ग्रंथांना हातही लावलेला नाही, मंत्र-तंत्राची माहिती नाही, अध्यात्माची बैठक नाही, मुहूर्तशास्त्राची माहिती नाही, इंटिरियर डिझायनिंग- आर्किटेक्चरचा गंध नाही तरीही हे वास्तु कन्सल्टन्ट म्हणून मिरवणार. थोडक्यात काय तर, ‘चले मुरारी हीरो बनने’..
आत्याबाईंकडून त्या तज्ज्ञाचा फोन नंबर घेतला आणि त्याला फोन करून विचारलं की, ईशान्येचं किचन वाईट हे तू कुठून शिकलास? त्यानं सांगितलं की, एका संप्रदायाच्या स्वयंघोषित प्रमुखानं वास्तुशास्त्रावर लिहिलेलं एक पुस्तक विकत मिळतं, त्या पुस्तकात हे लिहिलंय. मला आश्चर्य वाटलं. अध्यात्मात अधिकारी असलेल्या व्यक्तीनं वास्तुशास्त्रात घुसखोरी करण्याचं कारण काय? की विकलं जातंय म्हणून?.. राहवलं नाही म्हणून एक पुस्तक विकत घेतलं. ईशान्येचं किचन वाईट, ताबडतोब तोडून टाका वगैरे.. काहीबाही त्यात लिहिलं होतं. ती व्यक्ती अध्यात्मातली अधिकारी असली तरी वास्तुशास्त्रात कच्ची आहे हे पुस्तक वाचताना लक्षात आलं. दुर्दैवाची गोष्ट अशी की, स्वपुण्याई नसली तरी सद्गुरूंची पुण्याई पाठीशी असल्यानं त्या व्यक्तीच्या शब्दाला किंमत आहे. ते पुस्तक म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्सचा प्रकार होता. मला अध्यात्मातलं कळतं म्हणजे सर्वच विषयांवर बोलण्यास मी पात्र झालो, असा समज काहींचा होतो. सचिन तेंडुलकर जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे. पण त्याला असा दर्प झाला की, मी क्रिकेट उत्तम खेळतो म्हणजे कोणताही खेळ उत्तमच खेळेन आणि त्या दर्पातून तो बॉक्सिंगच्या रिंगणात उतरला तर त्याचं जे होईल नेमकं तेच अशांचं होतं. मुळात आपला विषय नसलेल्या गोष्टीवर अधिकारवाणीनं बोलू नये याचंही भान नसलेल्या माणसाच्या आध्यात्मिक उंचीबद्दलच कुणी शंका घेतली तर ती चुकीची आहे, असं कसं म्हणता येईल?
किचनसाठी आग्नेय ही दिशा प्रमुख असली तरी ईशान्य, वायव्य, नैर्ऋत्य, पूर्व आणि उत्तर या दिशाही चालतात. कशा ते पुढील भागात पाहू. आशा करतो की या लेखांमुळे मध्यमवर्गीय फ्लॅटधारकांना दिलासा मिळेल.. (क्रमश)
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment