लग्नासारख्या मंगलकार्यात, शांतिकर्मात, स्वारीवर निघण्याच्या वेळी, राज्यरोहणप्रसंगी, धान्याची कापणी झाल्यानंतर धान्याच्या राशीवर कलशस्थापना करण्याची प्रथा होती.
पाण्यानं भरलेले कलश मागवले होते आणि या सप्तकलशांतील पाण्यानं त्यांनी महाराजांना अभिषेक केला असे उल्लेख आढळतात.
प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाचं वर्णन कालिदासानं केलंय. एका श्लोकात तो म्हणतो-
सरित्समुद्रान्सरसीश्च गत्वा
रक्ष:कपीन्दैरुपपादितानि
तस्यापतन्मूर्घनि जलानि जिष्णा
विन्धस्य मेघप्रभवा इवाप:
अर्थात राक्षस व वानर यांच्या नायकांनी भिन्न भिन्न नद्या, समुद्र व सरोवरे यांतून आणलेले पाणी जयशील रामाच्या डोक्यावर विंध्य पर्वताच्या डोक्यावर मेघातलं पाणी पडावं त्याप्रमाणं सुवर्णकलशातून पडलं.
भारतीय शिल्पकलेत मोठय़ा प्रमाणावर कलशाची योजना केली गेलेय. भरहूत, सांची, अमरावती येथील बौद्ध शिल्पात कमलपुष्पानं युक्त असे नक्षीदार मंगलकलश आढळतात. मंदिराच्या शिखरावर शेवटी जो कलश असतो तो मंगलकलशच होय. भारतीय शिल्पकलेतला कलश वाटोळा किंवा अंडाकृती असतो तर गांधार शिल्पातला टोकदार असतो. मैत्रेय, बोधिसत्त्व, वसुंधरा या बौद्ध देवता व धन्वंतरी ही पौराणिक देवता कलशधारी आहेत. देवांचा खजिनदार असलेल्या कुबेराचा उजवा पाय एका लवंडलेल्या कलशावर दाखवतात. अनेक देवळांत कलशधारी स्त्रीची मूर्ती आढळते.
कलश जरा मोठा केला की तो घट बनतो. नवरात्रात देवीचा घट बसतो तोही कलशच. संक्रांतीला सुवासिनी सुगडं देतात, तो घटदानाचाच प्रकार होय. अक्षय्यतृतीयेस पितरांच्या उद्देशानं आमान्नासहित कलशदानच सांगितलंय. मत्स्यपुराणात अनेक महादानं सांगितलीत. त्यात एक महाभूत घटदान आहे. हिरण्यगर्भदान सांगितलं आहे तेही कलशाच्या आधारानं. याचा मत्स्यपुराणातील विधी आहे तो पुढीलप्रमाणं- शुभदिनी एक मोठा सुवर्णकलश करावा. तो दुधातुपानं भरावा. तिळांच्या राशीवर ठेवावा. मग यजमानानं मंगलस्नान करून त्या कलशात उत्तराभिमुख बसावं. ब्रह्माची प्रतिमा मुठीत धरावी. ही प्रतिमा हाच हिरण्यगर्भ. ब्राह्मणांनी त्या हिरण्यगर्भाचे सर्व संस्कार करावेत. मग यजमानानं त्या कलशातून बाहेर येऊन ती मूर्ती आचार्याना दान द्यावी आणि ऋत्विजांनी अन्य कलशांतल्या जलानं यजमानास अभिषेक करावा.
नवरात्रीतील गुजराती महिलांचा गरबा म्हणजेही कलश. पण हा कलश सजल नसतो तर सतेज असतो. त्याच्या आत पाण्याऐवजी दिवा तेवत असतो. कलशाचा दीपज्योतीशी संबंध येतो तेव्हा त्याची शोभा काही आगळीच बनते. घटात दिवा म्हणजे हृदयात प्रकाशित आत्मा. तुकोबांचं एक सुंदर चरण आहे-
सांडिली त्रिपुटी। दीप उजळला घटी।
उत्तर प्रदेशातील चरकला आणि पंजाबातील जागो ही दोन लोकनृत्ये म्हणजे घटनृत्येच होत.
महाभूतघटदान, हिरण्यगर्भदान, अभिषेक, जलकलश, दीपकलश आदी कोणत्याही विधानाचं सार काढू गेल्यास हे स्पष्ट होतं की, कलश हे मानवशरीराचं प्रतीक आहे. म्हणूनच तो धान्यपुंजावर स्थापतात. कारण अन्न हे मानवदेहाचं आधारभूत तत्त्व आहे. अन्नमय प्राण आणि प्राणमय पराक्रम अशी एक म्हण आहे. अन्नं प्राणमन्नमपानमाहु या श्रुतीचाच तो अनुवाद आहे. कलश म्हणजे जीवनरूपी जल आणि प्राणरूपी ज्योत यांचं धारण करणारा सुघटित देह होय. सकल संतांनी देहाला घट म्हणून संबोधलं आहेच..
(क्रमश:)
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment