Tuesday, July 20, 2010

चातुर्मासातील आरोग्यव्रते

डॉ. श्री बालाजी तांबे

चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा काळ. आषाढातील देवशयनी एकादशीपासून ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास समजला जातो. याच सुमाराला खरा पावसाळा सुरू झालेला असतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. चेतनाशक्‍ती, वीर्यशक्‍ती इतर ऋतूंच्या मानाने कमी झालेली असते.

भारतीय संस्कृती व आयुर्वेद यांची सांगड प्रत्येक गोष्टीत दिसते. अभ्यंग, लंघन, एक वेळ भोजन, उद्वर्तन (उटणे) अशा अनेक आयुर्वेदोक्‍त उपचारांचा उल्लेख व्रतवैकल्यादी सांस्कृतिक कार्यक्रमात केलेला असतो. चंदन, तुळशी, दूर्वा, कोहळा, आघाडा आणि वेगवेगळी पत्री या सर्व औषधी वनस्पतींनाही व्रतामध्ये महत्त्वाचे स्थान असते. जणू शक्‍य तितके निसर्गाच्या सान्निध्यात येता यावे आणि निसर्ग तत्त्वांचे पालन व्हावे व आरोग्य चांगले राहावे म्हणूनच आपल्या संस्कृतीने सर्व व्रतांची योजना केलेली आहे.

संपूर्ण वर्षभर अनेक वेगवेगळ्या प्रकारची व्रते सांगितलेली आहेत. मात्र आज आपण चातुर्मासातील मुख्य व्रतांचा आरोग्याशी कसा संबंध आहे हे पाहणार आहोत. चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा काळ. आषाढातील देवशयनी एकादशीपासून ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास समजला जातो. शयनी एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर निद्रा घेतात म्हणून ही "शयनी' एकादशी असे समजले जाते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार केला असता याच सुमाराला खरा पावसाळा सुरू झालेला असतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. चेतनाशक्‍ती, वीर्यशक्‍ती इतर ऋतूंच्या मानाने कमी झालेली असते. प्रत्यक्षातही आपल्याला याचा अनुभव येत असतो. साक्षात चैतन्यच मंदावले की ताकद, उत्साह, वीर्यता कमी होतात आणि जीवन जगताना, रोजचे व्यवहार करताना याचे भान ठेवणे गरजेचे असते. जणू हे लक्षात आणून देण्याचे काम चातुर्मासातील व्रतवैकल्यांच्या आधाराने होत असते.

चातुर्मास्य व्रते
चातुर्मास्य व्रते म्हणजे आषाढ एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंतच्या चार महिन्यात करावयाची व्रते. यात मुख्यत्वे पुढील व्रतांचा समावेश होतो.

१. एक वेळ भोजन - पावसाळ्यामध्ये अग्नी मंदावत असल्याने पचनसंस्थेवर ताण येऊ नये या दृष्टीने एक वेळ भोजन सुचविले आहे. आयुर्वेदातही वर्षा ऋतूत पचण्यास हलका व कमी प्रमाणात आहार घ्यायला सांगितले आहे. ज्या दिवशी खूप पावसामुळे सूर्यदर्शन होणार नाही त्या दिवशी शक्‍यतोवर जेवण करू नये असेही सांगितले आहे. यावरून चातुर्मासातील "एक वेळ भोजन' या व्रतामागे आरोग्यरक्षणाची कल्पना असल्याचेच स्पष्ट होते.

दुपारी एकदा जेवून रात्री लंघन करणे हे सर्वांना मानवणारे व्रत होय. या प्रकारच्या लंघनाचे फायदे असे असतात,

लङ्‌घनैः क्षपिते दोषे दीप्तेऽग्नौ लाघवे सति ।स्वास्थ्यं क्षुत्तृङ्‌ रुचिः पक्‍तिर्बलमोजश्‍च जायते ।।
...अष्टांगहृदय चिकित्सास्थान

लंघनामुळे ("एक वेळ भोजन' व्रतामुळे) शरीरातील वाढलेले दोष पचून जातात, जाठराग्नी प्रदीप्त होतो, शरीर हलके होते, आरोग्य व्यवस्थित राहते, भूक-तहान नीट प्रतीत होतात, अन्नात रुची वाटते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताकद व ओज ह्यांची वृद्धी होते. 'एक वेळ भोजन' यात जड म्हणजे पचण्यास अवघड अन्न अर्थातच निषिद्ध असते. म्हणूनच एकंदर संपूर्ण चातुर्मासात मांसाहार केला जाते नाही. उलट प्रकृतीला अनुकूल असे साधे-हलके अन्न सेवन करणे अपेक्षित असते.

२. मौनधारण - अर्थात न बोलणे. सध्याच्या आधुनिक व धकाधकीच्या जीवनात संपूर्ण मौन पाळणे अशक्‍यप्राय असले तरी निदान कमीत कमी म्हणजे जेवढे अगदी आवश्‍यक आहे तेवढेच बोलणे, वायफळ गप्पा न मारणे, इतरांची निंदा-नालस्ती न करणे या प्रकारे तरी मौन सांभाळता येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीतून मौनधारणाचे प्रयोजन शक्‍ती-ऱ्हास होऊ न देणे असे असते. कारण बोलण्यामुळे खूप शक्‍ती खर्च होत असते. आयुर्वेदात एक सूत्र आहे,

व्यायामजागराध्वस्त्रीहास्यभाष्यादि साहसम्‌ ।
गजं सिंह इवार्षन्‌ भजन्नति विनश्‍यति ।।

व्यायाम, जागरण, प्रवास, मैथुन, हास्य व भाषण यांचे अति सेवन केल्यास हत्तीवर हल्ला करणाऱ्या सिंहाप्रमाणे मनुष्याचा नाश होतो.

अति बोलणे हे कायमच वर्ज्य होय. पण चातुर्मासात शक्‍ती मंदावलेली असल्यामुळे मौनव्रतच घ्यायला सांगितले आहे.

३. पिंपळ, तुळस यांची पूजा, सेवा, प्रदक्षिणा - आयुर्वेदात अनेक ठिकाणी पिंपळ व तुळस या वनस्पतींची पूजा, सेवा, प्रदक्षिणा करायला सांगितली आहे. औषध म्हणून वनस्पती उपटण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. औषध बनविताना विशिष्ट मंत्र म्हणून वनस्पती आत टाकल्या जातात. चातुर्मासात व्रत म्हणून याच दोन वनस्पती निवडण्यामागे आरोग्याचा विचार महत्त्वाचा दिसतो. तुळस कफ-वातशामक असते, जंतुनाशक असते, अग्नीस उत्तेजित करते, सर्दी-खोकला-ताप-भूक न लागणे वगैरे पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या विकारांवर रामबाण असते. तुळशीच्या नुसत्या अस्तित्वाने किंवा तुळशीच्या केवळ संपर्कात आल्याने आरोग्याचे रक्षण होऊ शकते, भूतबाधा वगैरे नष्ट होऊ शकते असे आयुर्वेदात सांगितले आहे. म्हणूनच चातुर्मासात तुळशीची पूजा-अर्चा, तुळशीला प्रदक्षिणा घालायला सांगितले आहे. पिंपळ हाही सर्वांच्या परिचयाचा असतो. पिंपळाची साल स्तंभन करणारी म्हणजेच जुलाब, उलट्या, आव पडणे वगैरे विकारात औषध म्हणून वापरली जाते. पावसाळ्यात नेमके हेच विकार होण्याची शक्‍यता सर्वाधिक असते म्हणून चातुर्मासात पिंपळाच्या झाडाची पूजा-सेवा करायला सांगितली असावी, जेणेकरून पिंपळाच्या संपर्कात राहिल्याने शक्‍यतो हे विकार होणारच नाहीत.

दीपपूजा
आषाढातील अमावस्येला दीपपूजा केली जाते. दीप हे प्रकाशाचे, तेजाचे, अग्नीचे रूप असते. शिवाय दीपदर्शन हे मंगलदायक समजले जाते. वर्षाऋतूमुळे मंदावलेल्या अग्नीला उत्तेजना मिळावी, कमी झालेली शरीरशक्‍ती पुन्हा ताजीतवानी व्हावी म्हणून दीपपूजा केली जाते.

श्रावणात मंगळागौरीच्या व भाद्रपदात हरितालिकेच्या निमित्ताने २१ पत्रींशी संबंध येतो. या सर्व पत्रींच्या संपर्काने आणि पूजेनंतर दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून या पत्रींचा काढा करून पिण्याची प्रथा असल्याने आरोग्य नीट राहण्यास मदत मिळते. श्रावणातील पंचमी म्हणजे नागपंचमी. या दिवशी स्त्रिया हातावर मेंदी काढतात. या महिन्यामध्ये शरीरात पित्त साठण्याची सुरुवात झालेली असते. हाता-पायांच्या तळव्यांवर मेंदी लावणे हे पित्तशामक असते. श्रावण-भाद्रपदात अशा प्रकारे पित्त साठूच दिले नाही तर नंतर येणाऱ्या शरद ऋतूत पित्ताचा त्रास होत नाही. हरितालिकेच्या दिवशी स्त्रिया फक्‍त फलाहार करतात. फळे रसधातुपोषक असतात तसेच प्रकृतीनुरूप व योग्य प्रमाणात घेतल्यास विषद्रव्ये काढून टाकण्याचेही काम करतात. या दृष्टीने एक दिवस केवळ फलाहार उत्तम असतो.

आश्‍विनातील ललितापंचमीच्या दिवशी ललितादेवीची दूर्वा वाहून पूजा केली जाते. आश्‍विन-कार्तिक हे दोन महिने शरद ऋतूचे असतात. दूर्वा खुडणे, दूर्वांच्या संपर्कात राहणे पित्तशामक असते. शरदात वाढलेले पित्त कमी व्हावे म्हणून शीतल गुणाच्या दूर्वा वाहून ललितादेवीची पूजा केली जाते.

आश्‍विनाच्या शेवटी व कार्तिकाच्या सुरुवातीला दिवाळीचा सण येतो. दीपपूजन, फटाके, फराळाचे पदार्थ, उत्सव यांच्या साहाय्याने पावसाळ्यात आलेली मरगळ पूर्णपणे दूर होऊ शकते. या दिवसात अग्नी प्रदीप्त झाल्याने लाडू, अनारसे, चकली, वगैरे पदार्थांचा आस्वाद घेता येतो. दिवाळीनंतर कार्तिकातील द्वादशीला चातुर्मासातील व्रताची सांगता करता येते. अशा प्रकारे व्रतवैकल्यांचा आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे हे लक्षात येते.

सामाजिक आरोग्यासाठीही...
- आरोग्यरक्षणाबरोबर व्रतवैकल्यांच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकतात, त्यातून सामाजिक आरोग्य सुधारते.
- दैनंदिन व्यवहारापेक्षा काही तरी वेगळे करण्याची संधी मिळाल्याने मनाला विरंगुळा मिळतो.
- एकंदरच उत्सवाचे वातावरण अनुभवता येते.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे हलक्‍या फुलक्‍या तऱ्हेने मनावर निर्बंध घालण्याचा, शिस्त लागण्याचा सराव होऊ शकतो.

- डॉ. श्री बालाजी तांबे
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad