Thursday, January 21, 2010

हृदय आणि हृदयविकार

शरीरातील अतिमहत्त्वाच्या अवयवांपैकी एक महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय होय. हृदय कार्यरत असणे हे जिवंतपणाचे लक्षण समजले जाते. यावरूनच हृदयाचे महत्त्व लक्षात येऊ शकते. अगदी गर्भावस्थेतही गर्भाची जडणघडण व्यवस्थित होत आहे का नाही, हे पाहताना हृदयाचे ठोके महत्त्वाचे समजले जातात.

शोणितकफप्रसादजं हृदयम्‌ ।
असे हृदयाचे वर्णन केलेले आहे. रक्‍तधातूच्या व कफाच्या प्रसादभागापासून म्हणजेच सारभागापासून हृदय तयार होते. या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे कफाच्या मागे दोष हा शब्द लावलेला नाही. म्हणजे शरीरधारणेचे काम करणारा, स्थिरता, शक्‍ती देण्याचे काम करणारा जो प्राकृत कफ आहे, त्याच्या सारभागापासून आणि रक्‍ताच्याही उत्तम अशा सारभागापासून हृदय बनत असते.
हृदय हा मातृज अवयव असतो. म्हणजेच हृदयावर आईच्या प्रकृतीचा प्रभाव अधिक असतो. म्हणून गर्भधारणेपूर्वी स्त्रीचे रक्‍त, स्त्रीचा कफ प्राकृत असणे, उत्तम स्थितीत असणे आवश्‍यक असते. गर्भधारणेनंतरही गर्भाचे हृदय तयार होत असताना रक्‍तवर्धक, कफपोषक आहार-औषधद्रव्ये घेणे जरुरीचे असते.

प्राण-मनाचे अधिष्ठान
गर्भ तयार होत असताना स्पंदनाच्या रूपात हृदयाचे अस्तित्व बरेच आधी समजत असले, तरी प्रत्यक्ष अवयव म्हणून हृदयाची अभिव्यक्‍ती होण्यासाठी चौथा महिना उजाडावा लागतो. गर्भहृदय अभिव्यक्‍त झाले, की गर्भवतीला डोहाळे लागतात, जे पूर्ण करणे गर्भाच्या एकंदर आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. हृदय हे रक्‍ताभिसरणाचे, अशुद्ध रक्‍त स्वीकारून, फुफ्फुसांच्या मदतीने शुद्ध करून, शुद्ध रक्‍ताचा संपूर्ण शरीराला पुरवठा करण्याचे काम करत असतेच; पण हृदय हे चेतनेचे, प्राणाचे; तसेच मनाचेही स्थान असते.

तद्विशेषेण चेतसः स्थानम्‌। ...सुश्रुत शरीरस्थान
चेतना विशेषत्वाने राहण्याचे स्थान म्हणजे हृदय.

दशप्राणायतनेषु एकम्‌। ...चरक सूत्रस्थान
प्राण शरीरात ज्या दहा ठिकाणी राहतो, त्यांतील एक ठिकाण म्हणजे हृदय.

मनो।धिष्ठानम्‌।। ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
मनाचे अधिष्ठानही हृदयच होय.

या सर्व वर्णनावरून हृदयाचे महत्त्व अधिकच पटते. हृदयावर आघात झाला असता ताबडतोब प्राण नष्ट होतात म्हणून हृदयाला "सद्यःप्राणहरमर्म' असेही म्हटले जाते.
मनाचे आरोग्य टिकवायचे असेल, तर ते ज्या ठिकाणी राहते ते हृदय नीट असावेच लागते, प्राणशक्‍ती वाढवायची असेल, तर ती ज्या हृदयात प्रामुख्याने राहते ते हृदय मजबूत असणे आवश्‍यक असते आणि चैतन्याचा अनुभव घ्यायचा असला, तरी चेतनास्थान असणाऱ्या हृदयाची काळजी घेणे भाग असते.

एकंदरच फक्‍त शरीराच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर चैतन्यपूर्ण व उत्साही जीवन जगण्यासाठी, उत्तम मानसिक आरोग्यासाठीही हृदयाची काळजी घेणे खूपच आवश्‍यक असते. आयुर्वेदात निरोगी हृदयासाठी गर्भावस्थेपासून काय काळजी घ्यावी, हृदयाचे कार्य कसे चालते, हृदयाचे आरोग्य टिकविण्यासाठी काय काळजी घ्यावी येथपासून ते हृदयरोग कशामुळे होऊ शकतात, ते कोणकोणत्या प्रकारचे असतात, त्यांच्यावर काय उपचार करायचे या सर्व गोष्टी अतिशय समर्पकपणे समजावल्या आहेत आणि त्यांचा प्रत्यक्षात खूप चांगला उपयोगही होताना दिसतो.

वाताच्या गतीने चाले
सर्वप्रथम आपण हृदयाशी संबंधित दोष, धातू, मलांविषयी माहिती करून घेऊ या.

प्राणवायू : वाताच्या पाच प्रकारांपैकी प्राण हा पहिला; तसेच महत्त्वाचा असतो आणि हृदयामध्ये राहत असतो.
शिरः कण्ठचरोबुद्धिहृदयेन्द्रियचित्तधृक्‌। ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
शिर, कंठ या ठिकाणी संचरण करणारा प्राणवायू बुद्धी, हृदय, इंद्रिये, मन यांचेही धारण करतो. म्हणूनच मनाचे स्थान असणाऱ्या हृदयात प्राण विशेषत्वाने राहत असतो.

उदानवायू : प्राण व उदान हे श्‍वसनाचे काम जोडीने करत असतात.

उरःस्थानमुदानस्य । ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
म्हणजे हृदय हे उदानाचे स्थान असते.
व्यानवायू : वाताच्या पाचही प्रकारांपैकी अतिशय वेगवान व बलवान असा हा वायू असतो.

व्यानो हृदि स्थितः कृत्स्न देहचारी महाजवः। ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
व्यान हृदयात राहतो आणि तो महावेगवान असल्याने संपूर्ण देहात संचरण करतो. हृदयाद्वारे रक्‍ताभिसरणाचे जे महत्त्वाचे कार्य घडते ते या व्यान वायूच्या जोरामुळेच होय. व्यान वायूची शक्‍ती कमी पडली किंवा व्यान वायूच्या गतीत कुठेही अडथळा आला, तर त्यामुळे रक्‍ताभिसरणात दोष उत्पन्न होऊन अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

अपानवायू : अपानवायूचे कार्यक्षेत्र, राहण्याचे ठिकाण नाभीच्या खाली असते त्यामुळे अपानाचा हृदयाशी प्रत्यक्ष संबंध नसतो; मात्र अपानाची गती अवरुद्ध झाली म्हणजे पोट फुगणे, वात व सरणे असे त्रास झाले असता छातीत जडपणा जाणवू शकतो. अपानातील बिघाडामुळे हृदयरोग होऊ शकतात, असे उल्लेख ग्रंथांतही सापडतात.

समानवायू : अपानाप्रमाणेच समानाचाही हृदयाशी प्रत्यक्ष संबंध येत नाही; कारण समान नाभीच्या ठिकाणी, जठराग्नीजवळ राहतो; पण समानाचा संचार संपूर्ण कोठ्यात होत असतो.

अर्थातच हृदय हा कोठ्यातील एक अवयव असल्यामुळे समानाचा हृदयाशी संबंध असतो. समानवायू बिघडल्याने पचन बिघडले, तर त्याचा परिणाम म्हणून हृदयात वेदना वगैरे होताना आढळते ते याचमुळे. शिवाय अन्नापासून आहाररस तयार झाला, की तो हृदयापर्यंत नेण्याचे काम समानवायू करत असल्यानेही समानवायूचा व हृदयाचा संबंध असतो.

कफ करी गतिसंतुलन
प्राण, उदान व व्यान यांच्या प्रत्यक्ष सहभागाने व समान; तसेच अपानाच्या अप्रत्यक्ष संबंधाने हृदय अविरत, अगदी जन्माला येण्याअगोदरपासून ते मृत्यूपर्यंत सातत्याने काम करत असते. वाताची गती हृदयाची गती चालू राहण्यासाठी आवश्‍यक असतेच; पण हृदयाची गती संतुलित राहण्यासाठी हृदयाच्या ठिकाणी कफाचीही आवश्‍यकता असते. म्हणूनच हृदयात अबलंबक व श्‍लेषक कफ राहतो.

अवलंबक कफ :
हृदयस्यान्नवीर्याच्च तत्स्थएवाम्बुकर्मणा । ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
अवलंबक कफ छातीत राहून स्ववीर्याने हृदयाचे, अन्नाचे आणि वीर्याचे धारण करतो. पाणी ज्याप्रमाणे तृप्तीचे, पोषणाचे काम करते त्याप्रमाणे अवलंबक कफ हृदयाचे पोषण करतो, हृदयाची ताकद कायम ठेवतो.

श्‍लेषक कफ : कफाचा हा प्रकार सांध्यांच्या ठिकाणी राहून तेथील लवचिकता कायम ठेवण्यास पर्यायाने काम व्यवस्थित होण्यास मदत करत असतो. सर्वसाधारणपणे सांधे म्हटले, की हाडांचे सांधे, उदा.- गुडघे वगैरे डोळ्यांसमोर येतात; पण हृदयाच्या ठिकाणीही मण्डल संधी नावाचे विशेष संधी असतात असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. आधुनिक परिभाषेनुसार ज्याला हृदयाच्या झडपा (व्हॉल्व्ह्‌ज) म्हटले जाते तेच संधी या ठिकाणी अभिप्रेत असावेत. हृदयातील हे संधी कडक होऊ नयेत यासाठी हृदयातही श्‍लेषक कफाची योजना केलेली असते.

साधक पित्त
वात व कफाच्या प्रकारांप्रमाणे पित्ताचेही पाच प्रकार असतात. यातील साधक पित्त हा प्रकार हृदयात राहतो.
बुद्धिमेधाभिमानाद्यैरभिप्रेतार्थं साधनात्‌।
साधकं हृद्‌गतं पित्तम्‌ ।। ...अष्टांग हृदय सूत्रस्थान
साधक पित्त हृदयात राहते आणि बुद्धी, आकलनशक्‍ती, अभिमान, स्मरण करण्याचे काम करत असते. म्हणूनच हृदयावर आघात झाला, एकाएकी मानसिक धक्का बसला, तर मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होताना दिसते.

चेतनेचे गाव
ओजाचे शरीर हे सप्तधातूंपासून (टिश्‍यूपासून) म्हणजे रस, रक्‍त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र यांच्यापासून बनलेले असते आणि प्रत्येक अवयवात एका विशिष्ट धातूचे प्राधान्य असते. हृदयाशी संबंधित धातू खालीलप्रमाणे होत.

रसधातू : सर्व शरीरावयवांना तृप्ती देण्याचे काम रसधातूचे असल्याने हृदयाचा रसधातूशी संबंध असतोच; पण रसधातू हृदयाकरवी सर्व शरीरावयवांपर्यंत पोचत असल्याने त्याचा हृदयाशी अधिकच घनिष्ट संबंध असतो. रसक्षय म्हणजेच रसधातू आवश्‍यकतेपेक्षा कमी झाला तर हृदयात धडधडणे, अकारण भीती वाटणे वगैरे त्रास होताना दिसतात तेही याच कारणामुळे होय.

रक्‍तधातू : रक्‍तधातूच्या प्रसादभागापासून हृदयाची उत्पत्ती होते हे आपण वर पाहिले. रसाबरोबरच रक्‍ताचेही संपूर्ण शरीरभर संवहन हृदयातून होत असते. हृदयाचे पोषण करण्याचे कामही रक्‍तधातू करत असतो.

मांसधातू : हृदय हा अवयव मांसपेशींपासून तयार झालेला असतो. हृदयातून निर्माण होणाऱ्या; तसेच हृदयापर्यंत येणाऱ्या सर्व धमन्या, शिरा यांना आधार देण्याचे व धरून ठेवण्याचे काम हृदयातील मांसधातूमुळे होत असते. रात्रंदिवस सातत्याने आकुंचन-प्रसरण पावण्याचे सामर्थ्यही मांसधातूमुळेच मिळत असते.

शुक्रधातू : शुक्रधातू संपूर्ण शरीराला व्यापून असतो. सर्व महत्त्वाच्या अवयवांचे काम व्यवस्थित होण्यासाठी महत्त्वाचे योगदान करत असतो. म्हणूनच हृदयातही शुक्रधातू असतो. शुक्राच्या वेगाचा अवरोध केल्यास वेदना उत्पन्न होतात किंवा मैथुनाच्या अतिरेके हृदयात कंप निर्माण होतो यावरून हृदयाचा शुक्राशी संबंध असतो हे स्पष्ट होऊ शकते.

ओज : सर्व धातूंचे सार म्हणजे ओज होय.
हृदयस्थमपिव्यापि देहस्थिती निबन्धनम्‌। ...अष्टांगहृदय सूत्रस्थान
सर्व देहाला व्यापून असणाऱ्या ओजाचे (चेतनेचे) राहण्याचे मुख्य स्थान हृदय असते, असा स्पष्ट उल्लेख आहे. हृदयात ओज असते म्हणून हृदयाचे महत्त्व इतके जास्त असते. ओज जोवर आहे तोवर शरीर टिकून असते, ओजक्षय झाला तर सर्वच संपते.

असे महत्त्व असणारे ओज हृदयात राहत असल्याने हृदयाची काळजी घेणे खूप महत्त्वाचे होय. हृदयाच्या रचनेत या प्रकारे दोष व धातूंचा महत्त्वाचा सहभाग असतो; पण कार्याचा विचार करता मलांचा व हृदयाचाही संबंध असतो.

पुरीष (विष्ठा) : मलरूप पुरीष शरीराबाहेर विसर्जित होणे महत्त्वाचे असतेच; पण जोवर याला मलरूपता आलेली नसते तोवर ते शरीरधारणाचे काम करत असते. पुरीषक्षय झाला म्हणजे मलरूपता न आलेले पुरीष शरीराबोहर गेले, तर हृदयात वेदना निर्माण होतात असे उल्लेख सापडतात.

मूत्र : मूत्राचा व हृदयाचा प्रत्यक्ष संबंध नसला, तरी मूत्रवहस्रोतसाचे मूळ असणारे मेढ्र (लिंग) व हृदय यांना जोडणारा एक बंध शरीरात असतो, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. मूत्रवहस्रोतसातील दोषामुळे होणाऱ्या मधुमेहाचा परिणाम म्हणून हृदयरोग होऊ शकतो असे संदर्भ आयुर्वेदिक ग्रंथात सापडतात व प्रत्यक्षही दिसतात. अशा प्रकारे हृदय तयार कसे होते, हृदयाची रचना कशी असते याविषयीची माहिती आपण घेतली. यानंतर आपण हृदयरोग कशामुळे होतो, कसा होतो वगैरेची माहिती पाहणार आहोत.
(क्रमशः)

- डॉ. श्री बालाजी तांबे Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad