Wednesday, December 23, 2009

उन्नत जीवनासाठी सकारात्मक व्हा!

-जयप्रकाश झेंडे
आपल्यापुढे असणाऱ्या अडथळ्यांना आपण कसे सामोरे जातो, ते आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर व्यक्तिमत्त्व झळाळून उठतेच; पण यशाचा मोठा पुरस्कारही आपल्याला मिळतो. यशस्वी झालेली सगळी माणसे वेगळी नव्हती. वेगळा होता तो त्यांचा दृष्टिकोन. या दृष्टिकोनाविषयी...

जीवन उन्नत करायचे असेल तर आपला दृष्टिकोन, मनोवृत्ती, प्रवृत्ती सकारात्मक हवी. "दृष्टिकोन' हा अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मग तो जीवनाचा वैयक्तिक भाग असतो की व्यावसायिक दृष्टिकोनाचे म्हणजे काय ते समजावून घेऊ. एक फुगेवाला यात्रेत फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे अशा विविध रंगांचे फुगे विक्रीसाठी असायचे. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो हेलियम वायू भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करीत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होई. असे तो दिवसभर करीत राही.

असेच एकदा फुगे विकत असताना फुगेवाल्याच्या लक्षात आले, की कुणीतरी आपले जाकीट ओढतो आहे. त्याने मागे वळून पाहिले तर तिथं एक लहान मुलगा उभा होता. मुलानं त्याला विचारलं. "काका काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तोसुद्धा असाच उंच जाईल का? मुलाच्या जिज्ञासेचं काकांना खूपच कौतुक वाटलं आणि अतिशय प्रेमाने त्यानं त्याला उत्तरही दिलं. ""अरे बाळ, हे फुगे त्यांच्या रंगामुळे उंच जात नाहीत, तर त्यांच्या आत जे काही आहे त्यामुळेच ते उंच जातात.''

हीच गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही आहे त्यामुळेच आपण उंचीवर जातो आणि आपल्या अंतरंगातील ही गोष्ट म्हणजेच आपला दृष्टिकोन. दृष्टिकोन म्हणजे काय हे समजावून घेतल्यावर आता सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय ते आपण समजावून घेऊ.

तुम्हाला डेव्हिड आणि गोलिआशयची कथा माहितीच असेल. एक राक्षस होता. एका खेड्यातील गावकऱ्यांना तो फार सतावीत असे. एका डेव्हिड नावाचा एक पोरगेलासा मेंढपाळ त्या गावातल्या आपल्या नातेवाइकांना भेटायला आला. त्याने गावकऱ्यांना विचारलं, ""तुम्ही या राक्षसाशी लढत का नाही?'' भयग्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी उत्तर दिले, ""या महाप्रचंड राक्षसाचा वध कसा करणार? तो केवढा बलाढ्य आहे दिसत नाही का तुला?'' तेव्हा डेव्हिड उत्तरला, "या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळे त्याचा वध करता येणार नाही असं मानणं बरोबर होणार नाही. खरं तर त्याच्या प्रचंड आकारामुळे तुमचा नेम चुकण्याची अजिबात शक्‍यता नाही.' पुढे काय घडले हे सर्वांनाच माहिती आहे. डेव्हिडने केवळ गोफणीच्या साह्यानेच राक्षसाला मारून टाकले. राक्षसरूपी संकट तेच, पण त्याच्याकडे पाहण्याचा डेव्हिडचा दृष्टिकोनच वेगळा होता. याचेच नाव सकारात्मक दृष्टिकोन.

सकारात्मक दृष्टिकोन असणारा माणूस बंद घड्याळाकडेही दिवसातून दोन वेळा ते अचूक वेळ दाखविते या दृष्टीने बघतो. आपल्यापुढे असणाऱ्या अडथळ्यांना आपण कसे सामोरे जातो हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी आहे असे वाटते, तर नकारात्मक विचार करणाऱ्याला हेच अपयश मार्गातील अडथळा वाटते.

सकारात्मक व्यक्तिमत्त्वे काही ठळक गुणांमुळे उठून दिसतात. त्यांच्यात आस्था, आत्मविश्‍वास, चिकाटी, नम्रता यासारखे गुण असतात. या माणसांकडे जबरदस्त आशावाद असतो. निरंतर उत्साह ओसंडून वाहत असतो. आपल्या अवतीभोवतीच्या माणसांकडेही ते मोठ्या आशावादी दृष्टिकोनातून पाहत असतात. पूर्वी सर्व कधीही नव्हते एवढी प्रचंड गरज आजच्या वातावरणात परिस्थिती सकारात्मक दृष्टिकोनाची आहे. आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम माणसाच्या वैयक्तिक दृष्टिकोनावर, मनोवृत्तीवर, विचारसरणीवर होत असतो, हे जरी खरे असले तरी वैयक्तिक दृष्टिकोनाचा प्रभाव जागतिक मनोवृत्तींवरही होत असतो, होऊ शकतो हेही तितकेच सत्य आहे. अमेरिकेतील 11 सप्टेंबरचीच घटना बघा. तोपर्यंत अमेरिकेत जाणारा प्रत्येक प्रवासी हा एक तर व्यावसायिक तरी असायचा किंवा हौशी प्रवासी तरी असायचा. पण एखादा माणूस आपल्या बुटातून काहीतरी स्फोटक घेऊन जातो आणि पुढे प्रत्येक प्रवासाच्या बुटांची कसून तपासणी केली जाते. प्रत्येक वेगाने बदलणाऱ्या सामाजिक घटनांचे परिणाम वैयक्तिक मनोवृत्ती घडवण्यावर होतोच, महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या आपल्या दृष्टिकोनाचे ब्रिटिश सत्तेचा दृष्टिकोन बदलला.

दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान यंग्स मठ हे एकदा ब्रिटिश सत्ताधीश चर्चोल यांच्याबरोबर स्टॅलिनला भेटायला जात होते. गप्पाच्या ओघात मठ यांनी चर्चिलना विचारले, आपण महात्मा गांधींना भेटला आहात का? त्यावर चर्चिल म्हणाले होते, नाही. कारण अशी भीती वाटते की त्यांच्या उपस्थितीत ते माझे विचार बदलतील, "केवढी ही ताकद वैयक्तिक सकारात्मक विचारांची एका महान सत्तेलाही प्रचंड हादरा देणारी हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी अजून दोन व्यक्तींचा विचार करू. अब्राह्म लिंकन यांचा एकट्याच्या दृष्टिकोन निग्रोंबद्दल, गुलामगिरीबद्दल करुणेचा होता. त्यांनी संपूर्ण अमेरिकेचा याबाबतचा दृष्टिकोन बदलला. सीतेचे पातिव्रत्य आणि पती भक्ती तिच्यापुरतीच मर्यादित राहिली नाही तर त्यामुळे भारत वर्षातील स्त्रियांची मानसिकताच बदलली.

सकारात्मक दृष्टिकोन किती फरक पडू शकतो याचे उदाहरण म्हणजे थोर शास्त्रज्ञ अल्वा एडिसन. त्यांना वयाच्या अगदी लहान वयात मतिमंद ठरवून शाळेतून काढून टाकले. वयाच्या दहाव्या वर्षी मित्रांनी कानावर मारल्यामुळे त्यांचे कान निकामी झाले. वयाच्या 14 व्या वर्षीच त्यांची रेल्वे प्लॅटफॉर्मवरची नोकरी गेली. अशा सर्व बाजूंनी नकार घंटा वाजत असताना न डगमगता आपल्या घराच्या तळघरात त्यांनी एक प्रयोगशाळा सुरू केली आणि या प्रयोगशाळेने सर्व जगाचेच लक्ष वेधून घेतले. त्यांच्या नावावर 1093 पेटंट आहेत आणि हो जागतिक विक्रम अजून कोणी मोडू शकलेले नाही. वयाच्या अगदी उतारवयात अचानक त्यांच्या कारखान्याला आग लागली आणि सर्व मालमत्ता जळून खाक झाली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, "चला आयुष्यातील सर्व चुका आपण जाळून टाकल्या आहेत आता नव्याने सुरवात करू या.' या घटनेनंतर तीन आठवड्यांत त्यांना "ग्रामोफोन'चा शोध लावला आणि त्याच्या उत्पादनास सुरवातही केली. विजेच्या दिव्याचा शोध लावत असताना त्यांना कैक हजार वेळा अपयश आले. पण हे अपयश आहे असे ते कधी मानतच नव्हते. यावर ते म्हणत "इतक्‍या मार्गांनी विजेचा दिवा तयार करता येत नाही हाच शोध मला लागला आहे.' यशासाठी असा प्रखर सकारात्मक दृष्टिकोन असायला लागतो.

सर्वसाधारण माणसांची यावर अशी मते असतात, की त्यांचे हे बरोबर आहे, पण मी काही महात्मा गांधी, अब्राह्म लिंकन किंवा अल्वा एडिसन नाही. मी एक साधा माणूस आहे. परंतु इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ही मंडळी काही जन्मताच मोठी नव्हती, तर त्यांच्या ठिकाणी असणारा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला मोठा करणार आहे. महत्त्व मिळवून देणार आहे. मग सुरुवात करा स्वतःपासून. कुटुंब, सगळी मित्रमंडळी, आपला अवतीभोवतीचा समाज जास्त उत्पादक, जास्त सुसंवादी आणि समाधानी करण्याचा प्रयत्न आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाने करायला आपण सकारात्मक होऊन आपले जग बदलायला सुरुवात केली तर आपण जगही बदलू शकू. आपण एखाद्याचं जरी जग बदलू शकलो तरी संपूर्ण जग बदलायला वेळ लागणार नाही. 
--
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad