Monday, October 24, 2011

वातव्याधीचे निदान -1


डॉ. श्री बालाजी तांबे
वात शरीराचे आरोग्य सांभाळत असतो. वातदोषाच्या असंतुलनाने वातव्याधी होतात. वातदोष कोणत्या कारणाने आणि कोणत्या स्थानी उद्‌भवतो, यावर त्याची लक्षणे व रोग ठरतात.

वातदोषाच्या असंतुलनामुळे होणारे व्याधी म्हणजे वातव्याधी. वातव्याधीचे अनेक प्रकार असतात, मात्र या सर्वांचे मूळ कारण बिघडलेल्या वातात असते.

वातव्याधीची कारणे
- कोरड्या आणि थंड पदार्थांचे अतिसेवन करणे.
- फार कमी खाणे.
- मैथुन अतिप्रमाणात करणे.
- रात्री जागरणे करणे.
- नियमांचे पालन न करता अशास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्मादी उपचार करणे.
- कोणत्याही कारणाने शरीरातून अतिप्रमाणात रक्‍तस्राव होणे.
- उड्या, पोहणे, व्यायाम वगैरेंचा अतियोग होणे.
- वेड्यावाकड्या किंवा अति प्रमाणात हालचाली करणे.
- रसादी सप्तधातूंपैकी कोणताही एक किंवा अधिक धातू क्षीण होणे.
- अतिप्रमाणात चिंता वा शोक करणे.
- रोगामुळे वजन कमी होणे.
- मल-मूत्रादी नैसर्गिक वेग धरून ठेवणे.
- शरीरात आमदोष साठणे.
- मार लागणे.
- उपवास करणे.
- हृदय, मेंदू व बस्ती (किडनी व युरिनरी ब्लॅडर) या मर्मस्थानांमध्ये बिघाड होणे.
- हत्ती, घोडा, गाडी, विमान वगैरेंतून वेगाने प्रवास करणे.

या सर्व कारणांमुळे कुपित झालेला वातदोष शरीरातील स्रोतसांचा आश्रय घेतो आणि शरीरात एखाद्या ठिकाणी किंवा संपूर्ण शरीरात अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करतो.

वातव्याधी होण्यापूर्वी शरीरावर दिसणारी लक्षणे -
ज्या प्रकारचा वातव्याधी होणार असेल त्याचीच लक्षणे कमी प्रमाणात दिसू लागतात. उदा. कंपवात हा वातव्याधी होणार असला तर अगोदर लिहिताना हात कापणे, बारीकशी गोष्ट करताना हात थरथरणे अशी लक्षणे दिसू लागतात. ही वातरोगाची सूचक लक्षणे सुद्धा कमी-जास्ती होत राहतात. वाताची तीव्रता कमी झाली की शरीरात हलकेपणा येतो, मात्र वात वाढला तर पुन्हा पूर्वरूपे दिसू लागतात.

वातदोषाच्या असंतुलनामुळे अनेक रोग होऊ शकतात. या रोगांची माहिती आपण घेणार आहोतच, त्यापूर्वी वात-असंतुलनामुळे दिसणारी सामान्य लक्षणे काय असतात हे पाहू या.

संकोचः पर्वणां स्तम्भो भोऽस्थ्नां पर्वणामपि ।
रोमहर्षः प्रलापश्‍च पाणिपृष्ठशिरोग्रहः ।।
खाञ्ज......पुाल्यकुब्जत्वं शोथो।ऽऽनामनिदद्रता ।
गर्भशुक्ररजोनांशः स्पदनं गांत्रसुप्तता ।।
शिरोनासाक्षिजत्रूणां ग्रीवायाश्‍चापि हुण्डनम्‌ ।
स्तोदोऽर्तिराक्षेपो मुहुश्‍चायास एव च ।।...माधवनिदान


- हाता-पायाची बोटे आखडतात, हात बंद-उघड होऊ शकत नाहीत.
- हाडांमध्ये तीव्र वेदना होतात, बोटांमध्ये तीव्र वेदना होतात.
- अंगावर अकारण काटा येतो.
- अकारण बडबड केली जाते.
- पाय, पाठ व डोके आखडते.
- पाठीला कुबड येते.
- मनुष्य चालण्यास असमर्थ होतो.
- अंगावर सूज येते.
- झोप कमी येते.
- गर्भधारणा होण्यास त्रास होतो किंवा झालेली गर्भधारणा टिकत नाही.
- पुरुषांमध्ये पुनरुत्पादनाची शक्‍ती कमी होते.
- स्त्रीमध्ये रजःप्रवृत्ती कमी किंवा अकाली थांबते.
- संपूर्ण शरीरात किंवा शरीराच्या एका भागात कंप होऊ लागतो, तसेच बधिरपणा येतो.
- मान ताठ राहत नाही, डोक्‍यात तीव्र वेदना होतात.
- गंधज्ञानाची क्षमता कमी वा नष्ट होते.
- डोळे बारीक होतात, छाती-मानेतही जखडल्यासारखे वाटते.
- सर्व अंगात वेदना होतात, अस्वस्थता प्रतीत होते.

वातदोषाचे वैशिष्ट्य असे, की तो कारणानुसार आणि स्थानानुसार अनेक लक्षणे, अनेक रोग उत्पन्न करू शकतो. उदा. वातदोष त्वचेच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर त्वचा कोरडी होऊन भेगा पडू शकतात. सांध्यांच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर सांधे आखडू शकतात, नसांच्या ठिकाणी प्रकुपित झाला तर बधिरपणा येऊ शकतो वगैरे. याविषयीची अधिक माहिती आपण पुढच्या वेळी पाहणार आहोत.                        

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad