पा डव्याच्या दिवशी म्हणजे कार्तिक प्रतिपदेला सुरू होणाऱ्या वर्षात, आरोग्यप्राप्ती व्हावी म्हणून व संपलेल्या वर्षात घेतलेल्या आरोग्याच्या आनंदाचा उत्सव म्हणून अशा दोन कारणांसाठी दीपावली हा उत्सव साजरा केला जातो. वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंतचे दीपावलीतील सर्व दिवस साजरा करण्याची पद्धत आरोग्यासाठीच उपयोगाची आहे असे दिसते.
नव्या संवत्सराची सुरुवात करत असताना आरोग्य तयारी करताना आयुर्वेदाप्रमाणे आरोग्याची व्याख्या विचारात घ्यावी लागेल. त्या व्याख्येनुसार नुसते शारीरिक नव्हे, तर मानसिक व आत्मिक आरोग्य व आनंद मिळविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मनाचे व आत्म्याचे आरोग्य म्हटले की बाह्य जगत, आजूबाजूला असलेली नातेवाईक मंडळी व सर्व समाज यांचा समावेश होतो, तसेच पृथ्वीच्या पाठीवर असलेली सर्व साधनसामुग्री, व्यवसाय-उदीम-व्यवसायाची साधने या सर्वांचा विचार करून दीपावलीचा उत्सव योजलेला दिसतो.
माणसात असलेल्या पशुत्वाला दूर करण्यासाठी व पशुत्वातून मनुष्यत्वाकडे येत असताना सात्त्विक प्रवृत्तीच्या पशूची म्हणजेच गाईची आणि सृष्टिचक्र चालू राहावे म्हणजेच वसुंधरेचा विकास व्हावा या हेतूने वासरू असलेल्या गाईचे पूजन करून ह्या उत्सवाला सुरुवात होते.
श्रीमद्भगवद्गीतेत सांगितल्यानुसार "वसूनां पावकश्चास्मि' म्हणजे अष्टवसूंपैकी अग्नी महत्त्वाचा आहे. एकूणच दीपावली हा अग्नीचा, दिव्यांचा व प्रकाशाचा उत्सव आहे म्हणून दिवाळीच्या दिवसात रोषणाई केली जाते, ठिकठिकाणी उजेड केला जातो, पणत्या लावल्या जातात. यामुळे सर्वप्रथम मनाला उभारी येते आणि आपण गेले वर्ष आनंदात जगलो याची पावती म्हणून दीप लावले जातात.
मातृस्तन्य हे आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. ज्या मुलांना मातेचे दूध भरपूर प्रमाणात व व्यवस्थित मिळते त्यांचे आरोग्य पुढे आयुष्यभर उत्तम राहू शकते. परंतु एखाद्या मुलाला मातेचे दूध मिळणे शक्य नसल्यास त्याला गाईचे दूध दिले जाते, एवढे साधर्म्य गाईचे दूध व मातेचे दूध यांच्यात असते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. दुधाशिवाय शरीरधातू पुष्ट होत नाहीत, दुधाशिवाय शरीरात वीर्य तयार होऊ शकत नाही, दुधाशिवाय हाडांना बळकटी मिळत नाही, शिवाय त्वचेचा तजेला, शरीराचा बांधा, केस, डोळे यांचे आरोग्यही दुधाशिवाय मिळू शकत नाही. "दूध पिऊ नये' अशा प्रचारामुळे सध्या नाना प्रकारचे रोग झालेले दिसतात. शरीरातील अग्नी व पर्यायाने शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे . शरीरधारणेसाठी सर्व शरीराचे धातू पुष्ट करून त्रिदोष व मल समत्वात ठेवण्यासाठी दुधाएवढे श्रेष्ठ अन्न नाही. म्हणून जिच्याकडून दूध मिळते त्या गाय-वासराचे पूजन आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सहज लक्षात येईल. याच दुधापासून तयार केलेले दही, लोणी, तूप यांचा वापर करून शरीरातील अग्नी, वीर्य - प्राणशक्ती संभाळता येते व जीवनाचा आनंद लुटता येतो.
आपले जीवन एकूण सुखी करायचे असेल तर आपल्याला आवश्यक असणारी सर्व साधनसामुग्री व्यवस्थित असावी, तिच्याकडे नीट लक्ष द्यावे. प्रत्येक आठवड्याला चेन साफ करणे, त्यात तेलाचे चार थेंब टाकणे, एखादा भाग खराब झाला असला तर बदलणे अशी काळजी साध्या सायकलसारख्या वाहनाची आपण करतो. अशी काळजी न घेतल्यास ऐन वेळेला सायकलचा उपयोग होत नाही. यावरून आपल्या लक्षात येईल की शरीररूपी यंत्राचीही काळजी घेणे व सर्विसिंग करणे आवश्यक असते.
साधनसामुग्री म्हणजे जड वस्तुजात बोलून सांगू शकत नाही की मी पण जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, पण असलेल्या साधनसामुग्रीची आपल्याला नोंद घ्यावीच लागते. हे साधनसामुग्रीरूपी धन आरोग्यधनासाठी उपयोगाचे असते म्हणून या सर्व धनाची पूजा केली जाते. या सर्व साधनसामुग्रीची घेतलेली काळजी हीच त्या धनाची पूजा. धनत्रयोदशीच्या दिवशी केवळ धनाची नव्हे तर आपल्या जीवनाची उंची वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीची (इफ्रास्ट्रक्चर) पूजा केली जाते, त्यांची देखभाल केली जाते.
अर्थात घरा-दाराची देखभाल एका दिवसात होऊ शकत नाही म्हणून घरे साफ करून घेणे, घरे रंगवून घेणे, आवश्यक असलेल्या वस्तू घरात आणणे वगैरे कामे दिवाळीच्या आधीच केली जातात. साधनस्वच्छता म्हणत असताना घराच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारे घाण नसावी. बाहेर अंगणात साठलेले पाणी व घरातील जळमटे अनारोग्याचे कारण ठरत असल्याने ती काढण्याचा विचार करणेही आवश्यक असते.
धनत्रयोदशीच्या नंतर नरकचतुर्दशीची योजना पंचकर्माच्या उद्देशानेच केलेली दिसते. म्हणजे शरद ऋतूनंतर येणाऱ्या शिशिर व हेमंत ऋतूत शरीराला तेलाभ्यंगाची खूप आवश्यकता असते. याची सुरुवात दीपावलीच्या वेळी केली तर शरीरातील सर्व मलभाग व शरीरात संचित झालेला आम शरीराच्या बाहेर टाकून या चार महिन्यात शरीराचे संरक्षण व्यवस्थित केले तर पुढचे आठ महिने त्रास होत नाही. या दृष्टीने या चार महिन्यांमध्ये अंगाला सुवासिक उटणे, अंगात जिरण्याची क्षमता असणारे तेल लावून अभ्यंग करावा. याची सुरुवात नरकचतुर्दशीच्या दिवशी करण्याची प्रथा दिसते. नरक म्हणजे अंधार, नरक म्हणजे घाण, नरक म्हणजे दुःख. या सगळ्याला कारणीभूत असणारे जंतू -व्हायरस म्हणजे नरकासुराचा वध करण्याचा म्हणजे पर्यायाने शरीराची प्रतिकारशक्ती, प्राणशक्ती वाढविण्याचा हा उत्सव. स्नानापूर्वी पायाखाली कारंड - विशाला नावाच्या वनस्पतीचे फळ चिरडण्याची प्रथा आहे. याचा उपयोग मेंदूतील व्हायरस, डिप्रेशन, वेड वगैरेंवर उपचार करण्यासाठीही केला जातो.
हे फळ पायाने फोडल्याने शरीराला व मेंदूला काही फायदा होत असावा. दुष्ट शक्तींचा नाश करण्याचे प्रतीक म्हणून हे फळ पायांखाली चिरडण्याचा विधी सांगितलेला दिसतो. सूर्योदयापूर्वी सर्व ठिकाणी दिवे लावून अंधाराचे साम्राज्य संपवण्याची योजना दिसते. सूर्य उगवल्यावर सर्व ठिकाणी प्रकाश पसरतोच, पण अंधार-नरक संपवण्याचा आपण केलेला प्रयत्न म्हणून सूर्योदयापूर्वी सर्व ठिकाणी दिवे लावले जातात. याच बरोबरीने सकाळच्या वेळी आवाज करणारे फटाके फोडले जातात. दहा हजार फटाक्यांच्या माळा लावून प्रदूषण वाढवणे, लोकांच्या कानाला त्रास होईल एवढे मोठे फटाके वाजवणे अभिप्रेत नाही. पण काही प्रमाणात फटाके वाजवणे चांगले असते.
पावसाळ्याच्या नंतर वातावरणात जमलेले कीटक, सर्प यांना दूर करण्यासाठी या आवाजाचा उपयोग होतो. एखाद्याला बोलविताना टाळी वाजवून लक्ष वेधले जाते, तसेच एका विशिष्ट तऱ्हेने लक्ष खेचून घेण्याची शक्ती आवाजात असल्यामुळे या आवाजाचा उपयोग होतो.अशा रीतीने या उत्सवात फटाके व रोषणाई यांचे आरोग्यासाठी महत्त्व आहे. फुलबाज्यांमुळे मन प्रसन्न होणे, आतील चेतनाशक्ती सर्व शरीरभर पसरण्याचा अनुभव येणे, जमिनीवर पेटणाऱ्या चक्रांकडे पाहताना शरीरातील मूलाधाराच्या ठिकाणी असलेल्या कुंडलिनी जागृतीची आठवण होत असते. भुईनळे कारंजासारखे वर जाताना पाहून कुंडलिनीचे ब्रह्मरंध्राकडे ऊर्ध्वगामी होणे वगैरे फायदे होताना दिसतात. या दिवशी साहजिकच नवीन कपडे घालणे, देवदर्शन करून मन प्रसन्न ठेवणे, शरीराची धारणा होईल, शरीराचे धातू वाढतील, शरीरात ताकद येईल असे चांगले फराळाचे पदार्थ खाणे ह्या गोष्टीही केलेल्या दिसतात.
यानंतर असते लक्ष्मीपूजन. लक्ष्मी म्हणजे समृद्धी. आपल्याला आरोग्य मिळालेले आहे, आरोग्यामुळेच आपण जीवनाचा आनंद घेत आहोत, चांगली बुद्धी झाल्याने आपण आपल्याला मिळालेली संपत्ती चांगल्या कामासाठी वापरत आहोत, आपले नशीब चांगले आहे यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. लक्ष्मी व विष्णू ह्या पती-पत्नींच्या आशीर्वादानेच संपत्ती मिळते व नशीब उघडते. विष्णू म्हणजे शरीरात चालणाऱ्या चेतनेचे चलनवलन म्हणजे इंद्रियांकडून शरीरात येणाऱ्या व मेंदूतून इंद्रियांकडे बाहेर जाणाऱ्या संवेदना असे आहे विष्णूचे स्वरूप. त्यासाठी असलेली शक्ती व लागणारी व्यवस्था हे लक्ष्मीचे स्वरूप. संवेदनाच जर व्यवस्थित नसल्या तर कुठलेच काम नीट होत नाही. हात कापत असला तर लिहिणार कसे? फूल पाहिल्यावर मनात परमेश्वराच्या चमत्काराची संवेदना जाणता आली नाही, डोळ्यात पाहिल्यावर प्रेमाचा भाव उत्पन्न झाला नाही तर जीवन पुढे चालणार कसे? तेव्हा समृद्धीसाठी लक्ष्मीचे पूजन केले जाते. ईमाने इतबारे, कष्ट करून, नैतिकता पाळून मिळविलेल्या लक्ष्मीचीच पूजा होऊ शकते, अलक्ष्मीची पूजा होऊ शकत नाही. तेव्हा एक प्रकारे भ्रष्टाचार व अनैतिकतेने मिळविलेल्या संपत्तीसंबंधी घृणा उत्पन्न व्हावी अशी योजना येथे दिसते. कार्य करण्यासाठी आवश्यक असणा आरोग्य असण्यासाठी आहार-विहार, औषधोपचारांबरोबरच योग्य पूर्वकर्माची व नशिबाची साथ लागते.
असे सर्व झाल्यानंतर प्रतिपदेला - पाडव्याला मेंदूत चमकलेले कोटी कोटी दिवे अनुभवण्याचा पाडव्याचा दिवस. या दिवशी कुंडलिनी ब्रह्मरंध्रापर्यंत येऊन तेथे प्रकाश पसरतो. सत्प्रेरणा, समाजाचे बांधिलकीचे भान, आपल्यापेक्षा उपेक्षित व दुर्लक्षित असणाऱ्यांना मदत करण्याची भावना, आपल्या नातेवाईकांना प्रेम व भेटी द्यायची भावना बाळगून एकूणच जीवन आनंदात जावे या दृष्टीने हा दिवस साजरा केला जातो.
यानंतरचा दिवस असतो भाऊबीजेचा. बहीण-भावाचे नाते हे स्त्री-पुरुषामधील सर्वात पवित्र नाते. भाऊ बहिणीकडे स्त्री या दृष्टीने पाहात नाही व बहीण भावाकडे पुरुष या दृष्टीने पाहात नाही. स्त्री-पुरुष ही शक्ती वेगळी असली तरी त्यांच्यातील प्रेमाचा भाव पाहिला जातो, बहिणीला आपुलकी दाखवून "मी तुझ्या पाठीशी आहे' असे आश्वासन दिले जाते. एकूणच आपल्या नात्याचा विस्तार प्रेमाने व शुद्ध बुद्धीने वाढविण्याचा दिवस म्हणजे भाऊबीजेचा दिवस.
एकूणच दीपावली हा नुसता करमणुकीचा, परंपरेचा, कर्माकांडातील, देवतांचे पूजन करण्याचा उत्सव आहे असे नाही तर तो एक आरोग्याचा उत्सव आहे. हा उत्सव साजरा करून आपण आरोग्यवान होऊ या, म्हणजे नूतन वर्ष आपल्या सर्वांना आरोग्य, सुखसमृद्धीचे जाऊन, दीर्घायुष्य मिळून आपल्याला जीवनाचा आनंद लुटता येईल. दीपावलीच्या शुभेच्छा.
- डॉ. श्री बालाजी तांबे
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment