Monday, July 12, 2010

जीवनसत्त्वांच्या अतिरेकाचा धोका

डॉ. ह. वि. सरदेसाई
आपला आहार संतुलित आणि परिपूर्ण असल्याखेरीज प्रकृती निरामय राहणार नाही हे सर्व-विद्‌ आहे. उष्मांक, आवश्‍यक अमायनो आम्ले, ओमेगा-३, मेदाम्ले, आवश्‍यक इतर मेदाम्ले, जीवनसत्त्वे, क्षार, पाणी, चोथा आणि तृप्ती आहारातून मिळणे आवश्‍यक असते. जीवनसत्त्वे महत्त्वाची कामगिरी बजावतात. त्यांच्या अभावाने विविध प्रकारचे त्रास आणि विकार उद्‌भवू शकतात. आपल्या आहारात काही त्रुटी असणे शक्‍य आहे. या त्रुटी जीवनसत्त्वे असणारी एखादी गोळी घेऊन आपण भरून काढावी, या विचाराने अनेक माणसे दररोज एखादी "मल्टीव्हिटॅमिन'ची गोळी घेत राहतात. जीवनसत्त्वांची गरज असते; पण त्यातल्या काहींच्या अतिरेकाने अपाय संभवतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. त्यातल्या त्यात जी जीवनसत्त्वे शरीरात साठून राहू शकतात, त्यांच्या बाबतीत दक्ष राहावेच लागते.

जीवनसत्त्व "अ' (रेटिनॉल) आपल्या शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्‍यक असते. आपली नजर चांगली राहणे, पेशींची योग्य वाढ होणे, प्रजनन व्यवस्थित होणे, लोहाच्या अणूचा योग्य वापर होणे, प्रतिकार शक्तीचे कार्य व्यवस्थित होणे इत्यादी महत्त्वाची कार्ये रेटिनॉल आणि रेटिनॉलपासून तयार झालेल्या रेणूंमुळे होतात. प्राण्यांचे लिव्हर (यकृत) आणि मासळी हे जीवनसत्त्व "अ' मिळण्याचे प्रभावी स्रोत आहेत. शाकाहारातून कॅरॉटिन नावाचे रेणू मिळतात. या कॅरॉटिन रेणूंचे आपल्या शरीरात जीवनसत्त्व "अ'मध्ये रूपांतर होते. कॅरॉटिनचे रेणू उष्णतेमुळे निघटन पावतात. त्यामुळे शिजवलेल्या अन्नातून शरीरात जीवनसत्त्व "अ' फारसे मिळत नाही. नैसर्गिक स्थितीमध्ये पालेभाज्यांत, गाजरात, रंगीत गर असणाऱ्या फळांत कॅरॉटिन विपुल प्रमाणात असते. ज्या जीवनसत्त्वांच्या गोळ्यांमध्ये जीवनसत्त्व "अ' असते, त्या गोळ्या सतत घेत राहण्याने जीवनसत्त्व "अ' शरीराच्या मेदाच्या साठ्यांत साचून राहते. अशा तऱ्हेने गरजेपेक्षा जास्त जीवनसत्त्व "अ' शरीरात साचले तर त्याचे अपाय होऊ लागतात. जीवनसत्त्व "अ'ची इंजेक्‍शने मिळतात. त्यांच्या अतिरेकाने तीव्र विषबाधा होऊ शकते. मेंदू व आजूबाजूच्या पेशी सुजतात, चक्कर येऊ लागते, एका वस्तूच्या ठिकाणी दोन वस्तू दिसू लागतात, फिट्‌स येतात, त्वचेच्या आवरणातील पेशी झपाट्याने बाहेर टाकल्या जातात. मृत्यूही ओढवू शकतो. मोठ्या माणसांत त्वचा कोरडी होते, ओठांच्या बाजूला चिरा पडतात, तोंड येते, उलट्या होऊ लागतात, डोक्‍यावरचे केस गळू लागतात, टक्कल पडते, हाडे दुखतात, रक्तात कॅल्शियमचे प्रमाण वाढल्याने खूप थकवा येतो व मांद्य जाणवते. शरीरातील लिम्फच्या गाठी सुजतात, रक्तातील मेदघटकांचे प्रमाण वाढते, स्त्रियांची मासिक पाळी थांबते, मेंदूत गाठ झाली असावी, अशी लक्षणे दिसू लागतात. यकृताचे कार्य नीट होत नाही, हाडांतील कॅल्शियम कमी होते. गर्भवती स्त्रियांचा अकाली गर्भपात होतो, गर्भवाढीवर विपरीत परिणाम होऊन वेडीवाकडी मुले जन्मतात. आहारात कॅरॉटिनचे प्रमाण जास्त झाल्यास त्वचेवर पिवळसर झांक येते व व्यक्तीला कावीळ झाल्याची शंका येऊ लागते.

आपल्या आहारातून मिळणाऱ्या कॅल्शियमचे आतड्यांतून शोषले जाण्याच्या क्रियेला जीवनसत्त्व "ड' (Vitamin D3) आवश्‍यक असते. यामुळे आपल्या रक्तातील कॅल्शियमची पातळी योग्य राहते. (साधारण १० मिलिग्रॅम प्रति १०० मिलीलिटर). शिवाय जीवनसत्त्व "ड'मुळे कॅल्शियम हाडातील पेशींमध्ये गुंफले जाते. या क्रियेस प्रथिने आणि स्त्रीत्वाला जबाबदार असणारे इस्ट्रोजेन (Estrojen) संप्रेरक महत्त्वाचा भाग घेतात. आपली मूत्रपिंडे कॅल्सिट्रॉल (Calcitrol) नावाचे संप्रेरक तयार करून रक्तात स्रवतात. आतड्यांतून कॅल्शियम शोषण्याच्या कार्यात कॅल्सिट्रॉल हे जीवनसत्त्व "ड'पेक्षा १० पट अधिक प्रभावी असते. जीवनसत्त्व "ड' आणि कॅल्सिट्रॉल मिळून रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढवतात. त्याचप्रमाणे पॅरॅथॉयरॉइड (Parathyroid) ग्रंथीचा स्राव हाडातून कॅल्शियमचा रक्तात निचरा वाढवतात. या सर्वांचे संतुलन असल्याखेरीज हाडात कॅल्शियम राहत नाही. कॅल्शियम कमी असणारी हाडे पोकळ व ठिसूळ बनतात. लहान मुलांत असे घडते तेव्हा त्यांना मुडदूस (रिकेट्‌स - Rickets) होतो. जीवनसत्त्व "ड३' मिळण्याचा स्रोत दूध, अंडी आणि लोणी हे आहेत. सर्व प्राण्यांच्या लिव्हरमध्ये व्हिटॅमिन डी३ मुबलक असते. विशेषतः कॉड माशांच्या लिव्हरपासून काढलेल्या तेलात ते विपुल प्रमाणात असते. आपल्या त्वचेत व्हिटॅमिन डी३ तयार होते. सूर्यकिरणांतील अतिनील किरणांमुळे (Ultraviolet Rays) तयार होते. भारतासारख्या देशात सूर्यप्रकाश अंगावर पडू देणे महत्त्वाचे आहे. "मल्टीव्हिटॅमिन' गोळ्यात जीवनसत्त्व "ड' असते. अशा गोळ्या रोज घेत राहण्याने जीवनसत्त्व "ड'चा शरीरात अतिरेक होतो. यामुळे आहारातील सर्व कॅल्शियम शोषले जाऊ लागते. शिवाय काही प्रमाणात हाडातील कॅल्शियमदेखील त्यात परत येऊ लागते. स्वाभाविकपणे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढू लागते. जसे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढू लागते, तसे पॅरॅथॉईरॉइड ग्रंथीचे कार्य कमी होऊ लागते. परिणामी, रक्तातील फॉस्फरसची पातळी वाढू लागते. रक्तातील वाढलेल्या कॅल्शियम व फॉस्फर यांची संयुगे विविध पेशींमध्ये साचू लागतात. मूत्रपिंडात, रक्तवाहिन्यांत व इतर अवयवांत असे कॅल्शियम साचण्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. भूक लागेनाशी होते. याचा परिणाम म्हणून अधिक व्हिटॅमिन्सयुक्त टॉनिक्‍स देण्याकडे पालकांचा कल होतो व परत व्हिटॅमिन्स जादा दिली जातात. मळमळ होते, तहान-तहान होते, उलट्या होऊ लागतात, मुलाला शौचाला वेळेवर होत नाही, अवरोध होऊ लागतो, मूत्रपिंडे अकार्यक्षम होऊ लागतात, रक्तातील युरियाचे प्रमाण वाढू लागते. जीवनसत्त्व "ड' जास्त देणे कोणत्याही वयात धोक्‍याचे असते. प्रौढ व्यक्तींना रक्तवाहिन्यांत रोहिणीकाठिण्य व मूत्रपिंडे निकामी होणे असे आजार होऊ शकतात. ज्या व्यक्तीला जीवनसत्त्व "ड'चा अतिरेक झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करून दर दोन तासांनी फ्युरेसेमाइड हे औषध तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या नजरेखाली द्यावे लागते. मुलांना किंवा मोठ्या माणसांना अनावश्‍यक व्हिटॅमिनच्या गोळ्या देणे म्हणजे अकारण आजाराला निमंत्रण देणे असे होणे शक्‍य असते याचे भान ठेवावे.

इतर जीवनसत्त्वांचा अतिरेक क्वचितच होतो. जीवनसत्त्व "ई' जास्त प्रमाणात सेवन केले गेल्यास स्नायू कमजोर होतात, थकवा जाणवू लागतो आणि मळमळ होऊ लागते. थायरॉइड ग्रंथीतून स्त्रवली जाणारी संप्रेरके यांच्या पातळीवर परिणाम दिसू लागतो. ही संप्रेरके कमी होतात. जीवनसत्त्व "ई' जास्त घेण्याने स्त्रियांच्या रक्तातील ट्रायग्लिसराइड्‌स हे मेद घटक वाढतात. अशा जास्त प्रमाणात जीवनसत्त्व "ई' घेणाऱ्या व्यक्तींच्या नीलांच्या आत रक्त गोठू लागते. (थ्रॉंम्बोफ्लेबायटिस - Thrombophlebitis). अशा रुग्णांना जीवनसत्त्व "के' देऊनही परिणाम होत नाही. उलटपक्षी रक्त गोठू नये याकरिता दिलेल्या वार्फारिन (Warfarin) या औषधाचा प्रभाव खूप वाढतो. निकोटिनिक ऍसिड या जीवनसत्त्वामुळे शरीर गरम झाल्याची भावना येते, कंड सुटते. जीवनसत्त्व ब-१ (थायमिन - Thiamine) या रेणूची अनेक व्यक्तींना ऍलर्जी येते. अंगावर गुलाबी रंगाचे पुरळ उठते (Urticario), अंगावर गरम गरम झाल्याची भावना येते, घाम सुटतो. नाडीची गती वाढते, काही वेळा बी-१च्या इंजेक्‍शननंतर अकस्मात मृत्यू (Anaphylactic Shock, Collapse, Death) ओढवलेला नोंदला गेला आहे. पार्किन्सन्स डिसीजमध्ये वापरण्यात येणाऱ्या लिव्होडिया या औषधाचा फायदा ब-६ (Vitamin B-6 : Phridoxine) घेण्याने जातो. ब-६चा अतिरेक झाल्यास हाता-पायांतून येणाऱ्या काही संवेदना समजेनाशा होतात व चालताना तोल जाऊ लागतो. जीवनसत्त्वे आवश्‍यक; अतिरेक टाळावा.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad