Thursday, September 3, 2009

अन्नयोग


अन्नाची रुची वाढवण्यासाठी हरित म्हणजे कच्च्या स्वरूपात काही पदार्थांचे सेवन करता येते. मात्र हरित वर्गातली द्रव्ये व फळे वगळता इतर सर्व भाज्या, धान्ये अग्निसंस्कार करून मगच सेवन करायला हवीत.
कोशिंबीर म्हणून किंवा अन्नाची रुची वाढवण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हरित वर्गाची आपण माहिती घेत आहोत. ही सर्व द्रव्ये ताजी वापरायची असतात व योग्य प्रमाणात कच्ची खाल्ली तरी चालण्यासारखी असतात.
गाजर
गृज्जनं मधुरं तीक्ष्णं तिक्‍तोष्णं दीपनं लघु ।
संग्राहि पक्‍तपित्तार्शो ग्रहणीकफवातजित्‌ ।।
...भावप्रकाश
गाजर चवीला गोड असले तरी गुणाने उष्ण-तीक्ष्ण असते, अग्नी प्रदीप्त करते, पचायला हलके असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. गाजर पित्तज मूळव्याध, संग्रहणी मध्ये पथ्यकर असते तसेच कफदोष व वातदोषात हितकर असते.
गाजराचा कोशिंबीर म्हणून वापर करणे चांगले असते. त्यातही ते शिजवून खाणे अधिक चांगले असते, मात्र आजकाल रूढ होत असलेली गाजराचा रस पिण्याची पद्धत चांगली नाही कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते, त्वचारोग बळावतात, मलावष्टंभ होऊ शकतो.
कांदा
पांढरा व लाल असे कांद्याचे दोन प्रकार असतात. दोघांचे वेगवेगळे गुणधर्म आयुर्वेदात दिलेले आहेत
श्‍वेतः पलाण्डुर्बल्यः स्यात्‌ स्वादुर्वृष्यो गुरुः कटुः ।
रुच्यः स्निग्धः कफकरो धातुवृद्धिकरो मतः ।।
निद्राकरो दीपकः स्यात्‌ क्षयहृद्रोगनाशनः ।
...निघण्टु रत्नाकर
पांढरा कांदा बलदायक, चवीला गोड, तिखट व पचायला जड असतो, शुक्रधातूला वाढवतो, रुची वाढवतो, स्निग्ध गुणाचा असतो, अग्निसंदीपन करतो, झोप येण्यास मदत करतो व क्षयरोग, हृदयरोग, मूळव्याध, उलटी, रक्‍तविकार वगैरे रोगात हितकर असतो.
बाह्यतः वापरला असता कांदा थंड असतो म्हणून उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून डोक्‍यावर टोपीच्या आत कांदा ठेवण्याची पद्धत दिसून येते. तापात हाता-पायांची जळजळ होते तेव्हाही कांद्याचा कीस बांधण्याचा उपयोग होतो. नाकातून रक्‍त पडल्यास नाकात कां द्याच्या रसाचे २-३ थेंब टाकले जातात.
लाल कांदा
गुरुः कटुश्‍च मधुरः किंचित्‌ उष्णश्‍च पित्तलः ।
वृष्यो बलकरः प्रोक्‍तः कफं वातं च शोथकम्‌ ।।
अर्शः कृमीन्नाशयतीत्येवं प्रोक्‍ता गुणाः खलु ।।
..निघण्टु रत्नाकर
पांढऱ्या कांद्यापेक्षा लाल कांदा थोडा उष्ण असतो, चवीला तिखट गोड असणारा लाल का ंदा पचायला जड असतो, पित्तकर असतो, मात्र कफ-वातदोषांचे शमन करतो, का मोत्पादक असतो, ताकद वाढवतो, मूळव्याध, जंत व सूज यांचा नाश करतो.
अन्नाची रुची वाढवण्यासाठी कांद्याचा योग्य प्रमाणात वापर करता येतो, मात्र कांद्यामध्ये उत्तेजित करण्याचा स्वभाव असल्याने कच्चा कांदा अतिप्रमाणात, विशेषतः रात्री खाणे टाळणे चांगले असते. शुक्रदोष असणाऱ्यांनी किंवा झोपेत वीर्यप्रवर्तन वगैरे त्रास असणाऱ्यांनी रात्री कच्चा कांदा किंवा दह्यासह कांद्याची कोशिंबीर वगैरे खाणे टाळावे असा वृद्धवैद्याधार आहे.
लसूण
लसणाचे वैशिष्ट्य असे, की त्याच्यात षड्रसांपैकी आंबट रस सोडला तर बाकीचे पाचही रस आहेत. म्हणून संस्कृतमध्ये लसणाला रसोन (रस+उणे) असे म्हणतात.
लसणाचा कंद तिखट असतो, पाने कडू असतात, दांडा तुरट तर दांड्याचे टोक खारट असते, बीज मधुर असते. योग्य प्रमाणात व योग्य प्रकारे लसूण खाण्याने अनेक फायदे होऊ शकतात.
लशुनं पाककाले च रसकाले कटु स्मृतम्‌ ।
रसायनं गुरुं प्रोक्‍तमुष्णं वृष्यं च वीर्यदम्‌ ।।
तीक्ष्णं स्निग्धं पाचकं च भग्नसन्धानकारकम्‌ ।
पित्तलं कण्ठ्यं च रक्‍तकोपकरं मतम्‌ ।।
...निघण्टु रत्नाकर
लसूण चवीला तिखट तसेच विपाकानेही तिखट असतो, वीर्याने उष्ण व पचायला जड असतो पण शुक्रधातू वाढवतो, लसूण रसायन गुणांनी युक्‍त असतो.
लसूण गुणांनी स्निग्ध व तीक्ष्ण असतो, पाचक असतो, तुटलेले हाड सांधण्यासाठी उत्तम असतो, घशासाठी हितकर असतो, पित्त वाढवतो आणि रक्‍तप्रकोप करवतो. वातश मनासाठी लसूण हे एक मोठे औषध असते. तुपात तळलेला लसूण प्रकृतिनुरूप योग्य प्र माणात खाणे आमवात, संधिवात व इतर वातविकारात हितकर असतो. मात्र लसूण तीक्ष्ण व पित्तकर असल्याने कच्चा खाणे अयोग्य समजले जाते. लसणाच्या पातीची हिरवी चटणी किंवा लसणाची कोरडी चटणी ऋतू व प्रकृतीचा विचार करून खाता येते. त्यातही एका पाकळीचा लसूण औषधी गुणांनी श्रेष्ठ असतो. जुलाब उलट्या होत असता, रक्‍तस्राव होत असता तसेच गर्भवती व बाळंतिणीने लसूण खाऊ नये.
अशा प्रकारे आयुर्वेदाने हरित म्हणजे कच्च्या पदार्थांचा वेगळा वर्ग सांगितला आहे. यावरून एक गोष्ट अजून लक्षात येऊ शकते की इतर सर्व भाज्या शिजवून खाणे अपेक्षित असते. कच्च्या दुधीचा रस पिणे, कारल्याचा रस पिणे किंवा भाज्या न शिजवता सॅलड म्हणूून कच्च्याच खाणे अपेक्षित नाही. कोशिंबीर म्हणून हे पदार्थ खातानाही काही विशिष्ट द्रव्यांसह खायचे असतात, उदा. काकडीची कोशिंबीर करताना त्यासह दाण्याची पूड मिसळली जाते. हरित वर्गातली द्रव्ये व फळे सोडता इतर सर्व भाज्या, धान्ये अग्निसंस्कार करून मगच सेवन करायला हवीत.
डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad