Saturday, August 22, 2009

अन्नयोग

हरित वर्गातील पदार्थ अन्नाला रुची आणतात. कच्च्या स्वरूपात काही प्रमाणातच ते खायचे असतात, पण त्यांचा उपयोग काही विकार दूर ठेवण्यासाठी होतो.
हरित वर्ग म्हणजे तोंडी लावण्याइतपत कच्च्या स्वरूपात खाण्यास योग्य पदार्थांची आपण माहिती घेतो आहोत. हरित वर्गामुळे अन्नाला रुची येते, सुगंध (अरोमा) लाभतो.
तुळशी
सहसा प्रत्येक घरात तुळशी असते. तिला "अपेत राक्षसी' असे नाव आहे कारण तिच्यापासून भूत, राक्षस (म्हणजेच विषाणू, जिवाणू, जीवजंतू, दुष्ट शक्‍ती) दूर राहतात. औषध म्हणून तुळशी उत्तम आहेच, पण स्वयंपाकात वापरण्यासाठीही योग्य आहे. तुळशीच्या पानांचा उपयोग काढा करण्यास वा चहात घालण्यास केला जातो.
तुलसी कटुका तिक्‍ता हृद्योष्णा दाहपित्तनुत्‌ ।
दीपनी कुष्ठकृच्छ्रास्रपार्श्‍वरुक्‌ कफवातजित्‌ ।।...भावप्रकाश
तुळशी तिखट व कडू चवीची असते, हृदयासाठी हितकर असते, वीर्याने उष्ण असल्याने पित्त वाढवते, अग्नी प्रदीप्त करते, अतिप्रमाणात घेतल्यास दाह निर्माण करू शकते, त्वचाविकार, रक्‍तविकार, छातीचे विकार, कफ-वाताचे विकार यात हितकर असते.
अर्जक (बेसिल)
तुळशीसारखी दिसणाऱ्या या वनस्पतीचा उल्लेख आयुर्वेदात आहे, पण आपल्यापेक्षा थंड प्रदेशात हिचा अधिक वापर होताना दिसतो. तुळशीप्रमाणे कुंडीतही ही वनस्पती लावता येते. आजकाल चूर्ण स्वरूपात मसाला म्हणून मिळू शकते.
अर्जक शीतलस्तिक्‍तः श्‍लेष्मामयविनाशनः ।
द्विविधं च विषं हन्याः दुष्टरक्‍तविनाशनः ।।...राजनिघण्टु
बेसिल चवीला किंचित कडू असते पण वीर्याने शीत असते, विषदोषाचा नाश करते, दूषित रक्‍त सुधारते, तसेच कफविकाराचाही नाश करते.
आयुर्वेदाच्या ग्रंथात बेसिल कंड कमी करणारी, जंतांचा नाश करणारी, नेत्ररोग दूर करणारी आहे, असेही सांगितलेले सापडते.
ओवा
ओवा स्वयंपाकात वापरतात, तसेच जेवणानंतर मुखशुद्धीसाठी वापरता येतो.
यवानी पाचनी रुच्या तीक्ष्णोष्णा कटुका लघुः ।
दीपनी च तथा तिक्‍ता पित्तला शुक्रशूलहृत्‌ ।
वातश्‍लेष्मोदरानाहगुल्मप्लीहकृमिप्रणुत्‌ ।।...निघण्टु रत्नाकर
ओवा पाचक, रुचकर व अग्निदीपन करणारा असतो, चवीला तिखट, कडवट असतो व वीर्याने उष्ण असतो, वातदोषाचे तसेच कफदोषाचे शमन करतो, वेदना कमी करतो, गॅसेस, जंत, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी वगैरे रोगात हितकर असतो.
अतिप्रमाणात ओवा खाण्याने मात्र पित्त वाढते, तसेच शुक्र कमी होऊ शकते. म्हणून ओवा चवीपुरता योग्य प्रमाणातच खायचा असतो.
पानओवा
याच्या पानांना ओव्यासारखा गंध व चव असते. पानओव्याची पाने अग्निदीपन करतात, पाचक असतात, पोट फुगणे, पोट जड होणे वगैरे तक्रारींवर उपयुक्‍त असतात. पानओव्याची सहसा भजी केली जातात, पण चटणी, कोशिंबिरीतही पानओवा वापरता येतो.
मुळा
मुळा कोवळा असतानाच खावा असे आयुर्वेदात सांगितले आहे. जून किंवा शिळा मुळा खाणे अयोग्य होय. तसेच मोठ्या मुळ्यापेक्षा लहान मुळा अधिक प्रशस्त समजला जातो.
लघुमूलं कटुष्णं स्यात्‌ रुच्यं लघु च पाचनम्‌ ।
दोषत्रयहरं स्वर्यं ज्वरश्‍वासविनाशनम्‌ ।।...भावप्रकाश
लहान मुळा चवीने तिखट व वीर्याने उष्ण असतो, रुचकर असतो, पचण्यास हलका असतो व पाचकही असतो, त्रिदोषांचे शमन करतो, आवाज सुधारतो, ताप, दमा वगैरे विकारात हितावह असतो.
त्तदेव रुक्षोष्णं गुरु दोषत्रयप्रदम्‌ ।
स्नेहसिद्धं तदेव स्यात्‌ दोषत्रयविनाशनम्‌ ।।...भावप्रकाश
मोठा मुळा रुक्षता वाढवतो, वीर्याने उष्ण असतो, पचण्यास जड असतो व तिन्ही दोषांना बिघडवू शकतो, मात्र हाच मोठा मुळा तेलासह शिजवला तर त्रिदोषांना शामक असतो.
मुळ्याची शेंग डिंगरी नावाने मिळते ती किंचित उष्ण वीर्याची असून कफदोष व वातदोषाला कमी करते.
डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad