Monday, June 16, 2008

स्किझोफ्रेनिया आणि विवाह

स्किझोफ्रेनिया आणि विवाह

(डॉ. उल्हास लुकतुके)
स्किझोफ्रेनियामधून बाहेर पडणे शक्‍य आहे; पण त्यासाठी रुग्णाने व कुटुंबाने चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. विवाह हा त्यावरचा उपाय नव्हे. ........
स्किझोफ्रेनिया हा गंभीर आजार आहे. तो लवकर बरा होत नाही. सहजासहजी बरा होत नाही. पुन्हा पुन्हा उद्‌भवतो व दर वेळी व्यक्तिमत्त्वाची काही ना काही हानी होते. हा रोग पुढील पिढीत उतरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या सर्व घटकांचा विचार रुग्णाचे लग्न करण्यापूर्वी करावा. सर्वसामान्य जनतेमध्ये कुणालाही जन्मभरात केव्हातरी हा रोग होण्याची शक्‍यता असते एक टक्का. तर, हा रोग असलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यामुळे केवळ सहवासाने हा रोग होण्याची शक्‍यता असते दोन टक्के.

आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी - विवाह ही काही ट्रीटमेंट नव्हे. ""याला स्किझोफ्रेनिया झाला आहे. याचे लग्न करून द्या. म्हणजे तो बरा होईल'' ही भ्रामक, भोळसट, अज्ञानी कल्पना आहे. ती सोडून द्यावी. सेक्‍स न मिळाल्याने हा रोग झाला, ही कल्पना चुकीची आहे. विवाह म्हणजे ट्रीटमेंट नव्हे, तसेच सेक्‍स म्हणजे ट्रीटमेंट नव्हे. तरुण मुलीचा विवाह न होणे पालकांना दुःखदायक वाटते; पण या रोगाने ग्रस्त मुलीचे लग्न करून दिल्यानंतर सासरच्यांनी तिला परत पाठवून दिले तर ते जास्त दुःखदायक नाही का? त्यात तिला मूल झाले असेल तर ही जबाबदारी कोणी घ्यायची?

वैद्यकीय मार्गदर्शक नियम आहे तो पुढीलप्रमाणे ः सर्व ट्रीटमेंट संपल्यानंतर काहीही लक्षणे नाहीत, रोग पुन्हा उद्‌भवला नाही, आणि अर्थपूर्ण काम केले, अशी दोन वर्षे गेली तर विवाह करण्याबद्दल विचार करावा.'' आपल्या समाजपद्धतीत दोन वर्षे म्हणजे फार होतात, असे मानून काही डॉक्‍टर एक वर्षापर्यंत ही कालमर्यादा खाली आणतात. डॉक्‍टर म्हणजे रुग्णाच्या लग्नाच्या आड येणारा खलनायक नव्हे. हा रोगच अवघड आहे त्याला तो काय करणार? तरी देखील रुग्णाचे लग्न करायचे असल्यास सर्व माहिती काहीही न लपविता, खोटे न बोलता, स्पष्टपणे द्यावी. समोरची पार्टी डॉक्‍टरला भेटू म्हणेल तर त्याला मान्यता द्यावी आणि खोटेनाटे बोलण्याची प्रेमळ सक्ती डॉक्‍टरवर करू नये. याउपर त्या दोघांना लग्न करायचे असल्यास ठीकच आहे. आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची खरीखुरी जाणीव सर्वांना असावी, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

घटस्फोट
लग्नानंतर स्किझोफ्रेनिया झाला तर ते घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही. लग्नापूर्वी हा रोग होता, पण ही गोष्ट लग्नाच्या वेळी लपवून ठेवली. लग्नानंतर ती उघडकीस आली, असे घडले तर फसवणुकीचा दावा करता येतो. या रोगाबद्दल साधारणपणे न्यायालये गंभीर दृष्टिकोन ठेवतात. या रोगामुळे रुग्ण संसार करू शकत नाही, घर चालवू शकत नाही, वैवाहिक सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही, मुलाबाळांकडे पाहू शकत नाही, असे सिद्ध झाले तर घटस्फोट मिळू शकतो. पण रुग्णाची काळजी पुढे कोण घेणार, याबद्दलची खात्री पटवून द्यावी लागते. एकाच्या रोगामुळे दुसऱ्याची मानसिक यातना किंवा दुसऱ्याचे हाल, हा मुद्दाही आजकाल मांडला जातो. लग्नाचा हेतू साध्य होत नसेल तर ते लग्न निरर्थक होय, हे खरे; पण घटस्फोटित रुग्णाची पुढे सोय काय, हा प्रश्‍न राहतोच. स्वतःचा स्वार्थ बघायचा असेल तर हे सगळे मुद्दे खरे आहेत. पण, अगदी उघड मनोरुग्ण जोडीदाराबरोबर नेकीने आणि नेटाने संसार करणारी माणसेही प्रत्यही आढळतात. त्यांच्याकडे बघावे आणि आपला संसार चालवावा, हे बरे. समाधान आणि स्थैर्य हे विवाहाचे दोन अक्ष आहेत. आपल्याकडे आपण स्थैर्य मुख्य मानतो समाधान दुय्यम. याचे भान ठेवावे. म्हणजे मनाची काहिली नाहीशी होईल.

कुटुंबीयांचा अनुभव
डॉ. वेदकुमार वलिअप्पन यांनी सांगितलेला अनुभव तसा बोलका आहे. ते म्हणतात - ""मे २००२ मध्ये माझी मुलगी कॉलेजमध्ये असताना तिला आजाराचा पहिला तीव्र झटका आला. "कोणतीतरी अज्ञात शक्ती तिला त्रास देत आहे आणि एक दुसरा गट तिला ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यात तिचे पालकसुद्धा तिचं संरक्षण करू शकत नाहीत,' असं ती म्हणू लागली. या भेटीत रेश्‍माला "सिझोफ्रेनिया' हा आजार असल्याचं आम्हाला समजलं.

वैद्यकीय सल्ला आणि धार्मिक मार्गदर्शन यामध्ये आमची घुसमट झाली. रेश्‍माला चेटकिणीनं झपाटलंय आणि आम्ही तिच्यावर काही औषधोपचार करू नये, हे मत मात्र मला पटलं नाही. तथापि जैवरासायनिक आणि हार्मोन्समधील असंतुलनामुळे हा आजार होतो, अशी माझी पक्की खात्री होत गेली. रेश्‍माच्या आईने सलोख्याने वातावरण निर्माण करत प्रार्थनेच्या माध्यमातून रेश्‍माला मानसिक व भावनिक आधार दिला. आजार उलटण्याच्या भीतीमुळे रेश्‍माच्या वर्तनातील प्रत्येक छोट्या बदलानं आमचे पाय जमिनीवर ठेवले.

दरम्यान कोणीतरी आम्हाला स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन - "सा' बद्दल सांगितलं आणि हा रेश्‍माच्या सकारात्मक सुधारणेतील एक कलाटणीचा क्षण ठरला. "सा'च्या साप्ताहिक बैठकांना उपस्थित राहणं आणि डेक्कन जिमखाना क्‍लबवरील नियमित व्यायाम करणं, या गोष्टी रेश्‍मा नेहमी करत असते. याचा एक मोठा सकारात्मक परिणाम होत आहे.

आता ती चित्रं काढते, खेळ खेळते. विशेषतः स्व-मदतीबद्दलच्या पुस्तकांचं वाचन करते. आजारामुळे तिच्या कॉलेजच्या परीक्षेत खंड पडला होता. ती आता या परीक्षांना बसणार आहे. हळूहळू तिची औषधं डॉक्‍टरांनी कमी केली आहेत. रेश्‍माच्या मनःस्थितीत सातत्याने आणि निश्‍चित अशी सुधारणा होत आहे.

या आजाराचा त्रास असलेल्या इतर व्यक्तींना ती जाऊन भेटत आहे आणि त्यांचा अनुभव समजावून घेऊन तिच्या परीने त्यांना "स्वकोशातून' बाहेर पडण्यास मदत करत आहे. ब्लू क्रॉसच्या माध्यमातून ती भटक्‍या कुत्र्यांना मदत करते.

सरतेशेवटी, औषधं, समुपदेशन, साचे कार्यक्रम आणि कुटुंब आणि मित्रांच्या आधार, यांच्या मदतीमुळे तिच्यातील "सकारात्मक लक्षणं' चांगल्या प्रकारे नियंत्रित राहिली आहेत. तिची नकारात्मक लक्षणं जवळपास नाहीशी झाली आहेत. "सा'च्या अंतर्नाद कार्यक्रमात नृत्य, गायन आणि सूत्रसंचालनामध्ये ती आनंदाने भाग घेत असते. रेश्‍माने तिच्या मनःस्थितीचा स्वीकार केला आणि कार्यक्षमतेने परिस्थिती हाताळली.

सत्त्वपरीक्षेच्या आणि संकटाच्या काळात जे जे आमच्या पाठीशी उभे राहिले त्या सर्वांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.''

रुग्णाच्या कुटुंबीयांनी लक्षात ठेवावं असं काही
""आमच्या घरात स्किझोफ्रेनियाचा रुग्ण आहे. आम्ही त्याच्याशी कसे वागायचे, हे थोडक्‍यात सांगा.'' अशी विनंती अनेक वेळा नातेवाईक करतात. त्याबाबतचा मंत्र अगदी सोपा आहे. इंग्रजी शब्द "सेफ', स्पेलिंग एस-ए-एफ-ई या आद्याक्षरात तो मंत्र भरलेला आहे.

एस - सेन्स ऑफ ह्यूमर. विनोदी वृत्ती किंवा हसरी वृत्ती. या रोगामुळे कुटुंबावर ताण येतो हे खरे आहे; पण म्हणून सतत रडका चेहरा ठेवू नका. लांब तोंडाने हिंडू नका. थोडे हसायला शिका. हसरे रहा. रुग्णाला हसू नका; पण स्वतःमधील कमतरतांबद्दल थोडे हलक्‍या मनाने पहा. घटनांमधील विरोध पाहायला शिका. त्याबद्दल थोडे हसायला शिका.

ए - अवेरनेस ऍण्ड ऍक्‍सेप्टन्स. जाणीव आणि स्वीकार. आपल्या घरात एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहे हे जाणा व ते स्वीकारा. जास्त माहिती करून घ्या. किरकिर करू नका. तक्रार नको, विरोध नको. कारण विरोध म्हणजे अस्वीकार.

एफ - फॅमिली रिसोर्सेस - इक्विटेबल डिस्ट्रिब्यूशन. कुटुंबाजवळ सामग्री किती आहे त्याचा अंदाज घ्या. वेळ, पैसा, शक्ती, जागा, प्रेम, ज्ञान व आपुलकी, या मूळ सामग्री. ज्याला त्याला योग्य प्रमाणात द्या. याच्या तोंडचा घास त्याला देऊ नका. प्रमाणशीर वाटप करा. नाहीतर ताण येईल. भांडणे होतील.

ई - एक्‍सपेक्‍टेशन, रिऍलिस्टिक. रुग्णाकडून किती अपेक्षा ठेवायची, याचा अगदी वास्तविक विचार करा. जेवढे शक्‍य आहे तेवढे करू घ्या. जास्त नको. नाही तर निराशा तुमच्या पदरी येईल. वास्तवाचे भान ठेवा.

थोडक्‍यात काय, "सेफ' रहा.

--------------------------------------------------------------
मुलांमध्ये स्किझोफ्रेनिया उतरण्याची शक्‍यता
- एक पालक (आई अथवा वडील) स्किझोफ्रेनिक असल्यास - दहा टक्के
- दोन्ही पालक स्किझोफ्रेनिक असल्यास - चाळीस टक्के
- पुतण्यांमध्ये - दोन ते तीन टक्के
- भाच्यांमध्ये - चार टक्के
- जुळी मुले - दोन वेगळ्या फलित बीजांपासून - पंधरा ते सतरा टक्के
- जुळी मुले - एका फलित बीजापासून - चाळीस ते पंचाहत्तर टक्के
--------------------------------------------------------------

- डॉ. उल्हास लुकतुके
मानसोपचारतज्ज्ञ, पुणे.

No comments:

Post a Comment

ad