Monday, June 16, 2008

तंत्र डीएनए विश्‍लेषणाचे

तंत्र डीएनए विश्‍लेषणाचे


(सु. वि. पाडळीकर)
एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत ठरणाऱ्या "डीएनए'मध्ये त्या-त्या जीवाबद्दलची भरपूर माहितीही साठवून ठेवलेली असते जी गुन्ह्यांच्या शोधांपासून औषधोपचारांपर्यंत अनेक ठिकाणी उपयुक्त ठरते. "डीएनए'चे विश्‍लेषण करून ही माहिती हस्तगत करणे याला त्यामुळेच मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. .......
मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये जो केंद्रबिंदू असतो त्यात दोन प्रकारची न्यूक्‍लिइक ऍसिड्‌स असतात. १) रायबो न्यूक्‍लिइक ऍसिड (आरएनए) २) डी ऑक्‍सी रायबो न्यूक्‍लिइक ऍसिड (डीएनए). तसेच या केंद्रबिंदूत २३ जोड्या क्रोमोसोमच्या असतात. त्या डीएनएच्या असतात. त्या प्रत्येक जोडीत एक क्रोमोसोम पित्याकडून व एक मातेकडून आलेला असतो. हे डीएनए मानवी शरीर बांधणीचे महत्त्वाचे घटक असतात. हे डीएनए मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व ठरवीत असतात. त्यांमध्ये ऍडिनिन (ए), गुवानिन (जी), सायटोसिन (सी), थायमिन (टी) ही प्रमुख रसायने असतात जी महत्त्वपूर्ण आहेत. ही सर्व वेगवेगळ्या पद्धतीने साखळी रूपात असतात. जसे सीजीएटी... सीएजीटीटीसीए... जीटीसीएएजीटी अशा पद्धतीने त्याच्या अनेक साखळ्या असतात. त्या काही वेळा मूळस्वरूपी पूर्ण शृंखला रूपात किंवा लघुस्वरूपी पुनरावृत्तीय शृंखला अशा प्रकारच्या असतात. डीएनएच्या क्षकिरण परीक्षणात हे स्पष्ट दिसते.

या डीएनए विश्‍लेषणाचे गुन्हे शोध तंत्रात खूप महत्त्व आहे. या आधारे अचूक गुन्हेगार मिळतो; तसेच संशयित व्यक्ती जी मूलतः निरपराधी असते ती दोषमुक्त होऊ शकते. तसेच बलात्कार-खून वा बलात्कार या प्रकरणीही हे विश्‍लेषण महत्त्वाचे ठरते. तसेच मातृत्व/ पितृत्व चाचणीतही हे महत्त्वपूर्ण ठरते. विशेषतः विमान अपघात, धरणीकंप, भूकंप अथवा जलप्रपात यात अनेक मृतदेह मिळतात. त्यांची या गुणसूत्रतंत्राधारे डीएनए व्यक्तीनिश्‍चिती करता येते. तसेच लहान मुले पळविली जातात किंवा रुग्णालयामध्ये बालकांची अदलाबदल होते इत्यादी प्रकरणांत हे विश्‍लेषण महत्त्वपूर्ण ठरते. या विश्‍लेषणात रक्त, रक्तडाग अथवा रक्तमिश्रित कपडे; तसेच मानवी केस, नखे, वीर्य हेही उपयोगी पडते. तसेच काही वेळा नुसत्या रक्तगट विश्‍लेषणाने काम होत नाही. कारण गुन्हेगार व मयत यांचा रक्तगट एकच असेल, तर हे डीएनए विश्‍लेषण आवश्‍यक असते. तसेच काही वेळा सूक्ष्म रक्तडाग वा वीर्यडाग मिळतात; ज्यावर हे रक्तगट विश्‍लेषण करता येत नाही. त्या वेळेस हे डीएनए आवश्‍यक राहते.

या विश्‍लेषणाच्या दोन मुख्य पद्धती आहेत. १) वितंचक तंत्र, २) किरणोत्सारी तंत्र. या दोन्ही तंत्रासाठी लागणारी यंत्रसामग्री खूप महाग असते; तसेच त्यासाठी लागणारी रसायनेही महाग असतात. यासाठीची प्रयोगशाळा पूर्णपणे वातानुकूलित व धूळरहित व स्वच्छ असणे आवश्‍यक असते; तसेच सर्व रसायने ही उच्च दर्जाची हवीत.

रक्ताचे गुणसूत्र परीक्षण व डीएनए परीक्षण
रक्त नमुन्यातील डीएनए प्रथम वेगळे करणे आवश्‍यक असते. यासाठी वितंचक पद्धतीने ती साखळी योग्य ठिकाणी तोडली जाते. त्यासाठी प्रथम क्‍लोरोफॉर्म/ अमिल अल्कोहोल अथवा अल्कोहोल दोन्ही उच्च दर्जाची वापरून त्याचे उतारे (एक्‍स्ट्रॅक्‍टस्‌) काढतात. त्यानंतर वितंचकाच्या तंत्राने डीएनए वेगळे करून ते पॉलिमरायझेशन करतात. यास पीसीआर - पॉलिमरेझ चेन रिऍक्‍शन असे नाव आहे. यातून वेगळे झालेले डीएनए बॅक्‍टेरियल स्टेन वापरून स्वच्छ करतात. त्यानंतर त्या डीएनएचे विलगीकरण विघृत गती प्रतिरक्षा तंत्राने केले जाते. त्यासाठी विशिष्ट माध्यमे वापरतात. १) अगार - अगार जेल, २) ट्राय ऍलिटेट इ.डी.टी.ए. जेल. एका काचपट्टीवर परीक्षार्थी नमुना डीएनए लावतात; ज्याबरोबर मानव डीएनए घटक असतात. तसेच गुन्हेगाराचे रक्त वा वीर्यही वरील पद्धतीने सर्व तंत्रे वापरून तयार करून लावतात. ही काचपट्टी विशिष्ट तापमानात ठेवून हे विश्‍लेषण अगार जेलमध्ये करतात. त्यानंतर ते नायलॉनच्या साह्याने वर उचलून ते ठराविक तापमानास पुन्हा एका पेटीत (इन्क्‍युबेटर) ठेवतात. त्यानंतर या काचपट्टीचे अवलोकन अतिनील किरणांनी करतात. याद्वारे सर्व डीएनए घटक वेगवेगळे दिसू शकतात. तसेच त्या काचपट्टीवर मेथिलीन ब्ल्यू किंवा इथीडियम ब्रोमाइडची फवारणी करूनही ते डीएनए अतितील किरणांद्वारे पाहता येतात. काही वेळा किरणोत्सारी तंत्रानेही हे अवलोकन केले जाते. या सर्व तंत्रास खूप वेळ लागतो; तसेच त्या प्रत्येक ठिकाणी खूप काळजी घेणे आवश्‍यक असते. वानगीदाखल त्या रसायनाच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत. मेथिलीन ब्ल्यू ५ मि.ली. ७० डॉलर्स, इथीडियम ब्रोमाईड १० मि. ली. ७० डॉलर्स इ.

आपल्याकडे भारतात हैदराबाद येथील सेंटर फॉर मॉलीक्‍यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) येथे सर्व प्रकारचे डीएनए परीक्षण करतात. म्हणजे न्यायप्रविष्ट मुद्देमालाचे, तसेच रोग शोधण्यासाठी सामान्य व्यक्तीचे. महाराष्ट्रातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई व नागपूर येथे असे डीएनए परीक्षण फक्त न्यायप्रविष्ट मुद्देमालाचे केले जाते. तेसुद्धा अत्यंत आवश्‍यक प्रकरणात. सरसकट सर्व प्रकरणांत ते करणे अशक्‍य आहे. असे हे डीएनए परीक्षण मानवी हितासाठी आहे. अलीकडेच एका अभ्यासात असे आढळून आले, की मानवी मृत्यूसाठी दूषित डीएनए कारणीभूत असण्याचे प्रमाण फक्त ५-१० टक्के आहे. त्यातूलनेत ९०-९५ टक्के मृत्यू चुकीचा आहार, व्यसने यांमुळे होतात. म्हणजे "दैवजात' दोषांपेक्षा "कर्मजात' दोष करण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहणे केव्हाही योग्यच, नाही का?

- सु. वि. पाडळीकर, पुणे.

No comments:

Post a Comment

ad