Thursday, September 13, 2012

नको भीती भाताची

डॉ. श्री बालाजी तांबे
मधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, असं सांगितलं जातं, परंतु भात खाणे वाईट नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. म्हणून पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.

मधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, भात खाण्याने शरीर फुगते, वजन वाढते अशा प्रकारचा बराच प्रचार आतापर्यंत झालेला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भात खाणे वाईट नाही. ग्लायसेमिक इंडेक्‍स (glycemic index - I) म्हणजे एखादा अन्नपदार्थ सेवन केल्यावर दोन तासांमध्ये रक्‍तामध्ये साखर किती प्रमाणात वाढते, याची मोजणी असते. वेगवेगळ्या 233 प्रकारच्या तांदळाची पाहणी केल्यानंतर असे आढळले, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. अनेक प्रकारचे तांदूळ अस्तित्वात असतात. भातामुळे रक्‍तात वाढणारी साखर 48 ते 92 या गुणांमध्ये मोजली जाते. भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाच्या सेवनामुळे 68 ते 74 संख्येपर्यंत साखर वाढते (भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाचा जी.आय. 68 ते 74 आहे), तर सुवर्णा किंवा मसुरी या तांदळांच्या सेवनामुळे साखर वाढण्याचे प्रमाण 55 पेक्षा कमी आहे. हातसडीचा तांदूळ पचायला जरा जड असतो, पण त्यातून जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात मिळू शकतात. अन्यथा तो पॉलिश केलेल्या तांदळाप्रमाणेच काम करतो. तांदळात कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असल्यामुळे भात खाल्ल्यावर मनुष्याने हालचाल करणे म्हणजेच काम करणे आवश्‍यक असते. भात खाऊन नुसते बसून राहिले तर चांगले नसते, असेही निष्पन्न झालेले आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र (International Rice Research Institute - IRRI)  आणि युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलॅंड या दोन्ही संस्थांनी मिळून केलेले आहे. या संशोधनात असे आढळले आहे, की दहा प्रजातींपासून केलेला भात सेवन केल्यास रक्‍तात साखर वाढण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. चीनमध्ये तयार होणार तांदळाचा जी. आय. 45 इतका कमी आहे, तर लाओसमध्ये तयार होणाऱ्या तांदळाचा जी.आय. 92 आहे.

ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नाचे पचन सावकाश होते व तो शरीरात सावकाश सावकाश जिरतो, म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नापासून थोडी साखर शरीरात सोडली जाते. म्हणून अशा प्रकारचा तांदूळ खाल्ल्यास मधुमेहींसाठी कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नसल्याने खायला हरकत नाही, असा एकूण या संशोधनाचा निष्कर्ष निघाला. तसेही योग्य प्रमाणात तांदूळ-भात खाल्ला तर रक्‍तात साखरेचे प्रमाण वाढत नाही, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.

आयुर्वेदाकडून भातप्रशंसा
"फॅमिली डॉक्‍टर' व "सकाळ'च्या वाचकांना, तसेच फॅमिली डॉक्‍टरच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेल्यांना आठवत असेल, की आयुर्वेदाने भात खाण्याची प्रशंसा वेळोवेळी केलेली आहे. ज्या ठिकाणी भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो तेथे, तसेच भात हे मुख्य अन्न असलेल्या चीनमध्ये लोकांचे आरोग्य उत्तम असल्याचे दिसते. (चीनमधील तांदळाचा जी.आय. 45 इतका कमी आहे.) ज्या देशातील लोकांचे किंवा भारतातील ज्या प्रदेशातील लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे त्यांचे आरोग्य गहू वा इतर अन्न खाणाऱ्या लोकांपेक्षा चांगले असलेले दिसते. भात खाणाऱ्यांचा सडसडीतपणा डोळ्यांत भरण्यासारखा असतो. अनेक मंडळींना प्रत्यक्ष विचारल्यानंतर असे दिसून आले, की भात मुख्य अन्न असणाऱ्यांच्या आई-वडील, आजी-आजोबा वगैरेंचे वजन कधीच मर्यादेच्या बाहेर नव्हते, त्यांना कधीही स्थूलत्वाचा त्रास झालेला नव्हता. मधुमेह वगैरे तर सोडाच, पण त्यांनी निरामय आरोग्य सांभाळत शंभरी पार केलेली होती.

तीन महिने, सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे नाश्‍त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत केवळ तांदळाचे पदार्थ सेवन केल्यास आरोग्याचा लाभ होतो हे दाखवून दिले. दही-भात, ताक-भात, वरण-भात, डाळ-भात, मेतकूट-भात, गोड भात, तांदळाची भाकरी वगैरे तांदळाचे वेगवेगळे पदार्थ खाता येतात. त्याबरोबर काही अंशी तांदळापासून बनविलेले पोहेसुद्धा खाता येतात. दही-पोहे खाणारी अनेक मंडळी असतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते. तांदळाच्या कण्यांचा उपमा खाता येतो. तांदळापासून पक्वान्ने बनवूनही खाता येतात. तेव्हा नुसता तांदूळ खायचा म्हटल्यावर आता माझे कसे होणार, याची चिंता करायचे कारण नसावे.

तांदूळ पचायला सोपा
संतुलन पंचकर्म व शरीरातील पेशी शुद्ध करण्याच्या चिकित्सेच्या दरम्यान सर्व रोग्यांना (यात हृद्रोगी, मधुमेहाचे रोगीही अंतर्भूत आहेत) सकाळी नाश्‍त्यासाठी साळीच्या लाह्या, दुपारच्या व रात्रीच्या जेवणात भात देण्यात आला. एवढे करून कुणालाही कसलाही त्रास झाला नाही, कुणाचेही कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्‌स वाढले नाही, साखरही वाढली नाही, उलट कमी झाली. अर्थात रोग्यांच्या दिनक्रमात अंतर्स्नेहन, बाह्यस्नेहन, स्वेदन, विरेचन, बस्ती वगैरे उपचार, योग, संगीत वगैरेंचाही समावेश होता. त्यांची कुठल्याही प्रकारे उपासमार केली गेली नाही. त्यांच्या आहारात तांदळाचा समावेश होता.

तांदूळ हे अधिक पाण्यावर उगवणारे पीक आहे. त्यातल्या त्यात साठ दिवसांत तयार होणारा तांदूळ पचायला अधिक सोपा असतो. तांदूळ भाजून घेऊन त्यापासून केलेला भात पचायला सोपा असतो व कुठलाही त्रास न होता त्यापासून सहज शक्‍ती मिळते. भात शिजवण्यासाठी वा डाळ-तांदळाची खिचडी बनवताना फारसे कौशल्य असण्याची गरज नसते.

या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर भात खाण्याचा प्रयोग करून पाहावा व प्रकृतीत सुधारणा अनुभवावी, आनंद मिळवावा.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad