Thursday, April 17, 2008

फळे खा! आरोग्य राखा!!


फळे खा! आरोग्य राखा!!


(डॉ. श्री बालाजी तांबे)
"ऍपल अ डे कीप्स द डॉक्‍टर अवे' असं म्हणतात खरं. पण, फळं आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त म्हणतात ते नेमकं कशामुळे, हे अनेकदा आपल्याला माहीत नसतं. ........
आयुर्वेदात औषधीद्रव्यांची जशी माहिती दिलेली आहे, तशी आहारद्रव्यांचेही सविस्तर वर्णन केलेले आहे. धान्यवर्ग, कडधान्यवर्ग, शाकवर्ग, फलवर्ग असे निरनिराळे वर्ग आयुर्वेदिक संहितांमध्ये दिलेले आहेत. रसाळ फळे दिसायला आणि चविलाही छान असतात. योग्य प्रमाणात, योग्य तऱ्हेने प्रकृतीचा विचार करून खाल्लेली फळे आरोग्यासाठीही उत्तम असतात. फळ नेहमी ताजे व योग्य ऋतूत तयार झालेले असावे. कच्चे किंवा अनेक दिवसांचे जुने फळ खाणे टाळावे. सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या व नियमित सेवन केल्या जाणाऱ्या फळांची आयुर्वेदातील माहिती या प्रमाणे सांगता येईल.

द्राक्षे
फळांचा राजा म्हणून जरी आंबा प्रसिद्ध असला तरी गुणांच्या दृष्टीने विचार करता द्राक्षे सर्व फळात उत्तम समजली जातात. आयुर्वेदात तर "द्राक्षा फलोत्तमा 'असे सांगितलेले आहे.
पक्वं चेन्मधुरं तथा।म्लसहितं तृष्णास्रपित्तापहम्‌ ।
पक्वं शुष्कतमं श्रमार्तिशमनं सन्तर्पणं पुष्टिदम्‌ ।।
... राजनिघण्टु

पिकलेली द्राक्षे चवीला गोड व थोडी आंबट असतात. तहान, रक्‍तविकार व पित्तदोष यामध्ये हितकर असतात. व्यवस्थित पिकलेली तसेच सुकविलेली द्राक्षे थकवा दूर करतात, वेदना शमवितात, तृप्ती करतात व पौष्टिक असतात. ताज्या द्राक्षांचा रस घेणेही आरोग्यासाठी उत्तम असते. एका वेळेला साधारण ४०-५० मिली इतका रस घेता येतो. यातच चमचाभर मध घातल्यास चवही छान लागते व पोषक गुणही वाढतो. द्राक्षांच्या रसाने पित्त कमी होते, लघवीला साफ होते, शरीरातील विषारांचे प्रमाणही कमी होते. कच्ची, आंबट द्राक्षे मात्र पित्त वाढवत असल्याने न खाणेच चांगले. वास्तविक सर्वच फळे खाण्यापूर्वी वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची असतात. द्राक्षांवर कीटकनाशकांचा फवारा मारलेला असल्याने व द्राक्षांची साल काढणे शक्‍य नसल्याने द्राक्षे फारच काळजीपूर्वक स्वच्छ करावी लागतात. यासाठी द्राक्षे मीठ विरघळवलेल्या पाण्यात अर्धा तास भिजत घालावीत व नंतर वाहत्या पाण्यात व्यवस्थित धुवून खावीत.

डाळिंब
हेही आरोग्यासाठी उत्तम फळ असते.
अम्लं कषायमधुरं वातघ्नं ग्राहि दीपनम्‌ । मधुरं पित्तनुत्‌ तेषां पूर्व दाडिमुत्तमम्‌ ।।
... चरक सूत्रस्थान

चवीला गोड, आंबट व तुरट लागणारे डाळिंब वातदोषाचे शमन करते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते व जाठराग्नीला प्रदीप्त करते. तर गोड डाळिंब पित्तशामक असते व उत्तम समजले जाते. डाळिंब हृदयासाठीही हितकर असते.

गोड डाळिंबाचा रस उत्तम पित्तशामक असतो, विशेषतः घशा-पोटात जळजळ होत असताना, लघवीस आग होत असताना, मळमळत असताना खडीसाखर मिसळलेला डाळिंबाचा रस घोट घोट घेण्याचा उपयोग होतो. डाळिंबामुळे रक्‍तधातूचे पोषण होत असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी गोड डाळिंबाचा रस उत्तम असतो. गर्भारपणात सुरुवातीचे तीन-चार महिने पित्ताचा त्रास होतो, उलट्या होतात, अन्न नकोसे वाटते अशा वेळी गोड डाळिंबाचा रस थोडा थोडा घ्यावा. याने पित्त तर शमतेच पण ताकदही नीट राहते. त्रास होत नसला तरी गर्भारपणात डाळिंब खाणे चांगलेच असते. डाळिंबाच्या रसापासून बनविलेला दाडिमावलेह पित्तासाठी प्रभावी औषध समजले जाते.

सफरचंद
बाराही महिने मिळणारे हे फळ आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असते.
कषायमधुरं शीतं ग्राहि सिम्बितिकाफलम्‌ ।
... चरक सूत्रस्थान

चवीला गोड, किंचित तुरट असणारे सफरचंद वीर्याने शीत व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मसदत करते. सफरचंद पचनसंस्थेतील अतिरिक्‍त उष्णता कमी करणारे असल्याने वारंवार तोंड येणे, शौचाला न बांधता होणे, अन्नपचनाची शक्‍ती कमी होणे, पित्तामुळे पोटात दुखणे वगैरे तक्रारींसाठी वापरता येते. पचन खालावलेले असताना, भूक मंद झालेली असताना वाफवलेले सफरचंद खाणे अधिक चांगले असते. लहान मुलांना, वाढत्या वयाच्या मुलांना सफरचंदाचा गर (पल्प) चिमूटभर वेलची व केशर टाकून देण्याने पोषक ठरतो, शरीर भरून येण्यासाठी उपयोगी पडतो.

पपई
तत्पक्वं मधुरं रुच्यं पित्तनाशकरं गुरु ।
... निघण्टु रत्नाकर
पिकलेली पपई चवीला गोड, अतिशय रुचकर व पित्तशामक असते. अति प्रमाणात सेवन केल्यास गुरु म्हणजे पचायला जड वाटली तरी योग्य प्रमाणात घेतली असता पाचक असते. दुपारच्या जेवणासह किंवा जेवणानंतर पपईच्या एक-दोन फोडी खाल्ल्यास अन्नपचन व्यवस्थित होते. ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी अंगावरून कमी प्रमाणात जाते, पोट दुखण्याचा त्रास होतो, त्यांनी रोज दुपारी पपईची एक फोड खाण्याचा उपयोग होतो. पपईचे पळ गर्भाशयसंकोच करणारे असल्याने बाळंतपणानंतर घेण्यासही उत्तम असते, मात्र गर्भारपणात पपई घेऊ नये.

अंजीर
तर्पणं बृंहणं फल्गु गुरु विष्टम्भि शीतलम्‌ ।
... चरक सूत्रस्थान
अंजीर शीत वीर्याचे, शरीर तृप्त करणारे, मांसधातूला पोषक असते. अंजिराचे ताजे फळ पित्त तर कमी करतेच पण रस-रक्‍तधातूसाठी पोषक ठरते. संगणकावर काम करणाऱ्यांनी, सातत्याने उपवास करणाऱ्यांनी, रात्रपाळी किंवा जागरणे करणाऱ्यांनी अंजिराच्या ऋतूत रोज एक-दोन अंजिर खावेत. पाळीच्या वेळेस कमी रक्‍तस्राव होणाऱ्या स्त्रीने तसेच हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी अंजिरे अवश्‍य खावीत. पिकलेल्या अंजिराचा जॅमही रक्‍तवृद्धी करण्यास उत्तम असतो.

आंबा
पक्वमाम्रं जयेत्‌ वायुं मांसशुक्रबलप्रदम्‌ ।।
... चरक सूत्रस्थान
पिकलेला आंबा वाताला जिंकतो अर्थात कमी करतो, मांसधातू, शुक्रधातूला पोषक असतो, शरीरशक्‍ती वाढवतो. आंब्याचे फळ तीन महिन्यांचे झाले की झाडावरून खाली काढले जाते व गवताच्या अढीत ठेवून पिकवले जाते. पूर्ण पिकलेले आंब्याचे फळ दिसायला, चवीला तसेच वासाला उत्तम असते. पूर्ण पिकलेला आंबा खाण्यापूर्वी साधारण तासभर साध्या पाण्यात भिजत ठेवावा व नंतर रस काढून खावा. वाटीभर आंब्याच्या रसात एक-दोन चमचे साजूक तूप व चिमूट-दोन चिमूट मिरपूड वा सुंठीचे चूर्ण टाकून घेतल्यास आंबा पचायला मदत होते व पचलेला आंबा ताकद वाढवतो, हृदयाला पोषक ठरतो, शुक्रघातू वाढवतो, शरीर भरायला व वजन वाढायला मदत करतो. कच्चा आंबा अर्थात कैरी मात्र पित्तकर असते. उन्हाळ्यामध्ये कैरीचे पन्हे अधून मधूून पिणे योग्य असले तरी अति प्रमाणात कैरीचा वापर न करणेच चांगले. मधुमेहाच्या व्यक्‍तींनी मात्र आंबा खाऊ नये.

संत्रे
मधुरं किञ्चिदम्लं च हृद्यं भक्‍तप्ररोचकम्‌ ।
दुजर्रं वातशमनं नागरङफलं गुरु ।।
... चरक सूत्रस्थान
संत्री चवीला आंबट-गोड असतात, हृदयाला पोषक असतात, जेवणाची रुची वाढवितात, वातदोषाचे शमन करतात, गुरु गुणाची असतात. संत्रे आंबट असल्याने पित्तप्रकृतीसाठी अनुकूल नसते.

मोसंबे
मोसंबी चवीला गोड असल्याने पित्तप्रकृतीसाठीही उत्तम असतात. पथ्यकर असल्याने तापात, आजारपणातही मोसंबीचा रस देता येतो. मोसंबीचा रस गाळून घेतला तर कफदोषही वाढवत नाही.
मोसंबी चवीला संत्र्यापेक्षा गोड असल्याने अधिक गुणकारी असतात. या दोन्ही फळांचा रस रसधातूसाठी उत्तम असतो. अतिरिक्‍त श्रम झाल्याने थकवा आला, उन्हामुळे किंवा व्यायामामुळे घाम आल्याने शरीरातील जलांश कमी झाला की संत्र्या-मोसंबीचा रस घेणे चांगले असते. संत्री तसेच मोसंबी हृदयाला हितकर व रुचकर असल्याने अकारण धडधड होत असल्यास, छातीत अस्वस्थता जाणवत असल्यास मध तसेच खडीसाखर टाकलेला संत्र्या- मोसंबीचा रस घोट घोट घेण्याचा फायदा होतो. अर्थात हृदयामध्ये विकृती असल्यास बरोबर ीने इतर औषधांची आवश्‍यकता असतेच. भूक लागते पण जेवायची इच्छा होत नाही अशा वेळी संत्र्या-मोसंबीचा रस मीठ-जिरे-ओवा यासह घोट घोट घेण्याने तोंडाला रुची येते. पित्ताची प्रकृती असणाऱ्यांनी किंवा पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी संत्र्यापेक्षा मोसंबीचा वापर अधिक करणे चांगले. वारंवार सर्दी, खोकला होणाऱ्या व्यक्‍तींनी संत्र्याचा वापर वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करू नये.

जांभूळ
जांभळ्या रंगाची जांभळे पावसाळ्याच्या सुरुवातीस मिळतात.
कषायमधुरप्रायं गुरु विष्टम्भि शीतलम्‌ ।
जाम्बवं कफपित्तघ्नं ग्राहि वातकरं परम्‌ ।।
... चरक सूत्रस्थान
गोड व तुरट चवीची जांभळे शीत वीर्याची असतात, कफ व पित्तदोष कमी करतात पण मलावष्टंभ करतात, पचायला जड असतात आणि वातवर्धक असतात. पित्त वाढल्यामुळे मळमळत असल्यास किंवा जुलाब होत असल्यास थोडी जांभळे खाण्याने बरे वाटते.. मधुमेहाच्या व्यक्‍तींसाठी जांभूळ पथ्यकारक समजले जात असले तरी ती फार प्रमाणात खाणे अयोग्य होय.

कलिंगड
बाहेरून हिरवट-काळपट व आतून लाल रंगाचे कलिंगडाचे वर्णन आयुर्वेदात या प्रमाणे केलेले आहे.
कलिंगं शीतलं बल्यं मधुरं तृप्तिकारकम्‌ ।
गुरु पुष्टिकरं ज्ञेयं मलस्तम्भकरं तथा ।।
कफकृत दृष्टि पित्ते च शुक्रधातोश्‍च नाशनम्‌ ।।
... निघण्टु रत्नाकर
कलिंगड चवीला गोड, वीर्याने शीत व तृप्ती करणारे असते. कफवर्धक व गुरु गुणाचे असल्याने पुष्टिकर व बलवर्धक असते, मात्र अति प्रमाणात घेतल्यास मलावष्टंभ होतो, दृष्टी तसेच शुक्रधातूचा नाश होतो. जून कलिंगड पित्तवर्धक असते.

केळे
केळ्याच्या अनेक जाती आहेत. त्यांच्या गुणांमध्ये थोडा-फार फरक असतो. त्यातल्या त्यात सोनकेळी किंवा वेलची केळी उत्तम समजली जातात.
सुवर्णमोचा मधुरा हिमा च स्वल्पाशने दीपनकारिणी च ।
तृष्णापहा दाहविमोचनी च कफावहा वृष्यकरी गुरुश्‍च ।।
... राजनिघण्टु
सोनकेळे चवीला गोड, वीर्याने शीत व गुरु गुणाचे असते. थोड्या प्रमाणात सेवन केले असता अग्निदीपन करते, तहान शमवते, दाह कमी करते, कफदोष वाढविते, शुक्रधातूला हितकर असते.
छातीत, पोटात जळजळ होणे, पित्तामुळे पोटात दुखणे वगैरे त्रास वारंवार होत असल्यास केळ्याचे नियमित सेवन करण्याचा उपयोग होतो. अकारण वजन कमी होत असल्यास, अशक्‍तता जाणवत असल्यास किंवा वजन वाढत नसल्यास केळे-मध-तूप एकत्र करून खाण्याचा उपयोग होतो. वात व पित्तप्रकृतीसाठी केळे चांगले असतेच मात्र कफप्रकृतीच्या व्यक्‍तीने केळ्यावर मध व वेलची पूड टाकून खावे.

टरबूज
हनुमान जयंतील? ?र्साद म्हणून खाल्ले जाणारे टरबूज स्वादिष्ट, वीर्याने शीत व कफवर्धक असते, तृप्ती देते, ताकद वाढवते, शुक्रधातूला हितकर असते. टरबूजाच्या सेवनाने कोठा शुद्ध होतो, शरीरश्रम नाहीसे होतात, दाह शमतो, वात व पित्त दोषांचे शमन होते. टरबूज उन्मादावर म्हणजे मनोभ्रम, वेड्यासारखे वागण्यावरही उपयुक्‍त असते. कलिंगडाप्रमाणे टरबूजही जुने झाल्यास पित्त वाढवते.

पेरू
पिकलेला पेरू चवीला गोड आणि कफवर्धक असतो, तर कच्चा पेरू तुरट असतो. कच्चा पेरू खाऊ नये आणि पिकलेला पेरू शक्‍यतो बिया काढून खावा. पिकलेला पेरू खाण्याने मलप्रवृत्ती साफ व्हायला मदत मिळते, जेवणानंतर पोटात आग होणाऱ्यांनी पेरूच्या एक- दोन फोडी खाण्याचा उपयोग होतो. वारंवार सर्दी, खोकला होणाऱ्यांनी, दम्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी पेरू खाऊ नये. तसेच रात्री पेरू खाणे टाळावे.

सिताफळ
सीताफलं तु मधुरं शीतं हृद्यं बलप्रदम्‌ ।
... निघण्टु रत्नाकर
सिताफळ चवीला मधुर, वीर्याने शीत, रुचकर व ताकद देणारे असते, पित्तशामक व कफवर्धक असते. उष्णतेचा त्रास असणाऱ्यांसाठी सिताफळ चांगले असते, मात्र ते पचायला जड असल्याने पचनशक्‍तीचा विचार करून खावे. विशेषतः उन्हाच्या दिवसात, शरद ऋतूत पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून सिताफळ खावे. वारंवार सर्दी, खोकला, दमा होण्याची सवय असणाऱ्यांनी, अंगावर सूज येणाऱ्यांनी, वजन जास्ती असणाऱ्यांनी मधुमेहाच्या रोग्यांनी सिताफळ खाऊ नये.

अननस
पिकलेला अननस आंबट-गोड व सुगंधी असतो. अननस योग्य प्रमाणात घेतल्यास पचनास सहायक ठरू शकतो. विशेषतः कफदोष वाढल्यामुळे पचन मंदावले असल्यास अननसाच्या फोडी चावून खाण्याचा उपयोग होतो. मात्र रिकाम्या पोटी अननस मुळीच घेऊ नये, गर्भवतीने अननस खाऊ नये. पित्ताचा त्रास होणाऱ्यांनी, पित्तप्रकृतीच्या व्यक्‍तींनी, वारंवार सर्दी होणाऱ्यांनी अननस न खाणेच चांगले. अशा प्रकारे आपापल्या प्रकृतीचा, दोषप्रकृतीचा विचार करून योग्य त्या फळांचे सेवन करण्याने आरोग्य टिकवण्याचा प्रयत्न करता येतो. फळे खाताना लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे फळे किंवा फळांचा रस उपाशीपोटी, विशेषतः सकाळी नाश्‍त्यासाठी घेऊ नये. तसेच, रात्रीच्या जेवणानंतरही घेऊ नये. जेवणासह किंवा मधल्या वेळेत फळे खाणे उत्तम असते. फळे व दूध एकत्र करून खाऊ नये. तसेच, फळे खाल्ल्यावर लगेच दूध पिऊ नये.

----------------------------------------------------------------------
आजार रोखणारी फळे!
फळांमुळे आजारांना प्रतिबंध करता येतो तसाच आजारांनंतर शरीराची कमी झालेली शक्ती भरून काढण्यासाठीही फळांचा उपयोग होतो. फळांतील विविध पोषक घटकांमुळे हे शक्‍य होते. अन्नपदार्थांचे पचन लवकर व्हावे यासाठी त्यांत पाण्याचे प्रमाण चांगले असावे लागते. फळांमध्ये निसर्गतःच पाण्याचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्यांचे पचन लवकर होते. चांगले होते.

फळांतील शर्करेचे ज्वलन शरीरात लवकर होते आणि या क्रियेत निर्माण होणारी द्रव्ये शरीराला त्रासदायक नसतात. या तुलनेत मेद आणि प्रथिनांचे शरीराला आवश्‍यक असलेल्या ऊर्जेत रूपांतर करणे अधिक गुंतागुंतीचे असते. या प्रक्रियेत निर्माण होणारी रसायने शरीराला त्रासदायक ठरू शकतात. प्रथिनांची निर्मिती अमायनो ऍसीडस्‌पासून होते. आपल्या शरीरात एकूण २० वेगवेगळ्या अमायनो ऍसीडस्‌चा वापर केला जातो. त्यापैकी आठ अमायनो ऍसीडस्‌ शरीराला अत्यावश्‍यक असतात. केळ्यासारख्या अनेक फळांमध्ये ही सर्व अमायनो ऍसीडस्‌ असतात.
----------------------------------------------------------------------

- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला.

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

ad