डॉ. उल्हास कोल्हटकर ,
डॉ. मॅकगिनिस आणि डॉ. फोजी यांनी १९९३ सालच्या ‘जामा’मध्ये (जर्नल ऑफ दी अमेरिकन मेडिकल असोसिएशन) एक लेख लिहून त्या काळातील अमेरिकेतील मृत्यूस कारणीभूत होणाऱ्या अशा दहा प्रमुख व्याधी विकारांचा मागोवा घेतला होता. त्यांच्या मते वरकरणी यात जरी कर्करोग, हृदयविकार, मधुमेह व एड्स असे रोग दिसत असले तरी त्यांच्या मुळाशी जाऊन पाहिल्यास, मूलभूत कारणे काही वेगळीच दिसतात व ती म्हणजे तंबाखू सेवन, मदिरापान, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, काही टाळता येण्याजोगी संक्रमणे, व्यसने, औषधांचे गंभीर दुष्परिणाम, इ. इ. यापैकी अनेक मृत्युदूतांना थोपविणे आपल्याला सहज शक्य आहे पण त्याकरिता आपल्याला, १) शरीर-मन-चेतनेचे अद्वैत २) ‘शरीर-मन-चेतना’ व बाह्य़ भौतिक आणि सामाजिक वातावरणाचा एकमेकांवरील होणारा परिणाम ३) शरीराचा मनावर व मनाचा शरीरावर होणारा परिणाम यांची जाणीव होणे अत्यावश्यक आहे. अशी जाणीव झाल्यास शरीराच्या माध्यमातून मनावर (Body work therapies) व मनाच्या माध्यमातून शरीरावर (mind- body medicine) उपचार करणे शक्य आहे. यातूनच अनेक प्रकारच्या पूर्णोपचारांचा (Holistic Medicine) जन्म झाला आहे.
इतिहास : वास्तविक पाहता ‘मन आणि शरीराची’ एकात्मता हा काही नवा सिद्धांत नव्हे. अगदी वेद-उपनिषदांच्या कालखंडापासून (इ. स. पूर्वी साधारण : १५०० ते १००० वर्षे) ‘यथा अन्नं तथा मन:’ किंवा ‘मन: एव कारणं मनुष्याणां बन्धमोक्षयो:’ अशा प्रकारचे सिद्धांत आपल्याकडे तसेच अशाच प्रकारचे सिद्धांत पाश्चात्त्य देशांमध्येही प्रचलित व मान्य होते. पण साधारणपणे ३००-३५० वर्षांपूर्वीपासून हे सिद्धांत मागे पडून प्रथम शरीर व मनाची व नंतर शरीराचीही कार्टेशियन पद्धतीने विभागणी होऊन निरनिराळ्या विभागांकरिता निरनिराळे उपचार व तज्ज्ञमंडळी जन्माला येऊ लागली परंतु आता विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकात मन आणि शरीराचे अद्वैत व त्यांचा एकमेकांवर होणरा परिणाम स्पष्ट होऊ लागला असून आधुनिक विज्ञानाचे त्यावर शिक्कामोर्तबही होत चालले आहे. (पाहा तक्ता क्र. १ व २). या पाश्र्वभूमीवर शरीर व मन या ‘पूर्णा’वर शरीराच्या वा मनाच्या माध्यमातून कोणकोणत्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत ते बघणे उद्बोधक ठरावे.
* मनाच्या माध्यमातून शरीरावर व मनावर उपचार (Mind- Body Medicine) यात चार प्रमुख व काही अन्य उपचार पद्धतींचा समावेश होतो.
१) ध्यान आणि शिथिलोपचार , २) प्रतिमातंत्र, ३) जैव प्रतिज्ञापन, ४) संमोहन , ५) अन्य - ऑटोजेनिक ट्रेनिंग, गेस्टाल्ट थेरपी, ईएमडीआर (Eye Movement Densitization and Reprocessing), जेकबसन्स प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन, एनएलपी, विवेकनिष्ठ भावना-वर्तनोपचार (REBT) इ.
* शरीराच्या माध्यमातून शरीरमनावर उपचार - यात पुढील उपचार पद्धतींचा समावेश होतो.
१. अॅक्युप्रेशर २. अलेक्झांडर टेक्निक ३. किरो प्रॅक्टिक ४. क्रॅनिअल टेक्निक ५. फेल्डेनक्रेस तंत्र ६. जलोपचार ७. मसाज ८. लिम्फॅटिक पम्पिंग अँड ड्रेनेज ९.ऑस्टिओपथी १०. फिजिकल थेरपी ११. पिलेट्स १२. रिफ्लेक्सॉलॉजी १३. रोल्फिंग १४. ताई-ची १५. टय़ूईना, इ.
* मन, शरीर आणि चेतना यावर एकाच वेळी उपचार-योगोपचार पद्धती.
यापैकी मन-शरीर पद्धतींचा विचार आपण प्रथम करू या.
पर्यायी वैद्यकाच्या विविध शाखा व तंत्रांपैकी मनाच्या माध्यमातून शरीर व मनावर करावयाची उपचारतंत्रे, आधुनिक वैद्यकाला कदाचित अधिक जवळची वाटतात, कारण त्यांना अनेक वेळा आधुनिक वैद्यकाच्या सिद्धांताची बैठक असते व आधुनिक तंत्रविज्ञानाने त्यांचे परिणामही दृश्य स्वरूपात मोजता येतात. ‘शिथिलीकरण’ आणि ‘ताणव्यवस्थापन’ हे दोन मूलभूत घटक अशा प्रकारच्या सर्व मन-शरीर पूर्णोपचारांची महत्त्वाची अंगे आहेत.
शिथिलीकरणामुळे होणारे प्रमुख फायदे म्हणजे -
* रक्तामधील शर्करा, कोलेस्टिरॉल व एपिनेफ्रीन या संप्रेरकाची पातळी कमी होते.
* उच्च रक्तदाब कमी होऊन हृदयावरील ताण कमी होतो.
* श्वसनाचा वेग मंदावतो. फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते व चयापचयाचा वेग कमी होतो.
* स्नायू शिथिल होतात व म्हणून त्यातील लॅक्टिक अॅसिडची पातळी कमी होते.
* पचन सुधारते.
* त्वचेचे तापमान कमी होते, घाम कमी होतो.
ताणतणाव हे अनेक रोगांचे उदा. हृदयविकार, मधुमेहसदृश स्थिती, अर्धशिशी, पोटाचे व पचनाचे विविध विकार, आंत्रव्रण, आम्लपित्त, काही त्वचाविकार, दम्याचे काही प्रकार इ. इ., उगमस्थान असल्याने ‘ताणव्यवस्थापन’ हे उपचारांमध्ये अतिमहत्त्वाचे ठरते. आधुनिक जीवनशैलीमध्ये नाहक चिंता निर्माण करणारे विचार, गर्दी, अनियंत्रित रहदारी, कामाचे ओझे, अतिमहत्त्वाकांक्षा, डेड्लाइन्स अशा अनेक गोष्टींमुळे शरीर-मनाला सातत्याने ताणतणावाखाली राहावे लागते. त्यातच जर जनुकीय पाश्र्वभूमी ही रोगाकरिता पूरक असेल तर रोगनिर्मिती हमखास होते. हे लक्षात घेतले तर ‘शिथिलीकरण’ व ‘ताणव्यवस्थापन’ व त्या दृष्टीने मन-शरीर उपचारपद्धती या किती महत्त्वाच्या व हितकारक आहेत हे सांगणे न लगे. त्यातही या पद्धतींची खासियत म्हणजे नेहमीच्या उपचारपद्धतींना या पूर्णत: पूरक आहेत. पूर्णोपचार पद्धतींचे एक वैशिष्टय़ म्हणजे त्या केवळ रोग लक्षणे नाहीशी करून थांबत नाहीत तर शरीर-मन व चेतना यांची एकसंधता साधतात. पुढील लेखांकात या विविध पद्धतींची थोडक्यात माहिती घेऊ या.
मनाचा शरीरावर होणारा परिणाम
अ- भावना - उदा. राग, चेहरा लाल होणे, शरीराचे तापमान वाढणे, रक्तदाब वाढणे, हृदयगती वाढणे.
अनुराग : गाल लाल होणे.
भीती : घाम फुटणे, हृदयगती वाढणे वा अति कमी होणे.
ब- ताणतणाव - प्रतिरक्षाप्रणालीचे कार्य मंदावणे.
हृदयगती वाढणे, पचनसंस्था मंदावणे.
क- हास्यविनोद - उच्च रक्तदाब कमी होणे.
’ तणावकारण संप्रेरकाची पातळी कमी होणे.
’ प्रतिरक्षाप्रणाली सुधारणे (T cells व B cells च्या संख्येत व कार्यात वाढ).
’ रक्तातील शिथिलताकारकच्या चेतारसायनांची. उदा. एन्डॉर्फिन्स पातळी वाढणे.
ड- प्रतिमातंत्र - उदा. चिंच खाण्याच्या विचाराने, प्रतिमेने तोंडाला पाणी सुटणे.
’ हिमालयात ध्यान लावण्याच्या प्रतिमेने प्रगाढ शक्तीचा अनुभव येणे, इ.
इ- ‘प्लासिबो’ परिणाम (placebo effect) - औषध नसतानाही एखाद्या गोष्टीचा श्रद्धेमुळे औषधासारखा परिणाम.
शरीराचा मनावर होणारा परिणाम
अ- व्यायाम - मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढतो.
* एन्डॉर्फिन्स व इतर चेतारसायनांचे प्रमाण वाढते व शांतता लाभते.
* मेंदूतील सिरोटोनिनच्या पातळीत बदल.
* चेतापेशींच्या वाढीला पोषक अशा इऊठा चेतारसायनाच्या पातळीत वाढ.
ब- मसाज व तत्सम तंत्रे - तणावकारक संप्रेरकांच्या पातळीत घट, शिथिलीकरण.
क- ढब - पोक काढणे- नैराश्य, दुर्बलतेची भावना, श्वसनावर परिणाम. ताठ कणा, मान- उत्साह, उत्तेजना, आनंद, सकारात्मक दृष्टिकोन.
ड- शांत संगीत - एन्डॉर्फिन्स पातळीत वाढ म्हणून शांत भावना.
ध्वनिप्रदूषण - वैचारिक गोंधळ, स्मृतिभ्रंश, निद्रानाश.
इ- श्वसन - दीर्घ, खोल श्वासोच्छ्वास : तणावकारक संप्रेरकांची पातळी कमी.
जलद, उथळ श्वास : भीती, चिंताकारक
फ- लैंगिक संप्रेरके - इस्ट्रोजेन व टेस्टोस्टिरोनच्या पातळीनुसार विचार व वर्तनात लक्षणीय फरक.
---- Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog
No comments:
Post a Comment