Sunday, July 19, 2009

'इ' जीवनसत्त्वाचा शारीरिक क्षमतेशी संबंध

वृद्धपणी माणसांची शारीरिक क्षमता कमी होते, हा आपला सर्वसाधारण अनुभव आहे. पण प्रत्येकाचीच क्षमता विशिष्ट वर्षानंतर कमी होते असे नाही. एखादी व्यक्ती साठीनंतरच शारीरिकदृष्ट्या अक्षम बनलेली दिसते, तर काही जण नव्वदी पार केल्यानंतरही मस्त मजेत दिसतात. असे का होते?
एका अमेरिकी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार "इ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे शारीरिक क्षमता कमी होते. किंबहुना, "इ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेच माणसाला वृद्धत्त्व गाठते. म्हणजेच "इ' जीवनसत्त्वाचा पुरवठा शरीराला केला तर वृद्धत्त्व जरासे लांबवता येऊ शकेल, असे या विद्यापीठातील अभ्यासकांना वाटते.
अमेरिकन मेडिकल असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या या माहितीनुसार, फ्लोरेन्स शहराच्या आसपास स्कूल ऑफ मेडिसिन (येल विद्यापीठ) तर्फे हा अभ्यास करण्यात आला. ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सुमारे ६९८ जणांची शारीरिक क्षमता तपासण्यात आली. ज्यांची शारीरिक क्षमता कमी होती त्या सर्वांमध्ये "इ' जीवनसत्त्वाची कमतरता आढळली.
सुमारे तीन वर्षे हे अध्ययन सुरू होते. या काळात ज्यांची शारीरिक क्षमता कमी आढळली त्यांना "इ' जीवनसत्त्व देण्यात आले. त्यावेळी त्यांची ताकद त्या काळात वाढलेली दिसली. "फॉलेट', "बी - ६', "बी - १२' आणि "ड' या जीवनसत्त्वांचा काही परीणाम होतो का, हेही पाहण्यात आले. पण तसा काही संबंध आढळला नाही.
शरीरातील पेशींच्या विघटनामुळे होणारे शरीराचे नुकसान "इ' जीवनसत्त्वामुळे टाळले जाते. तसेच, "इ' जीवनसत्त्वामुळे तांबड्या रक्तपेशी बनण्यास मदत होते.
वृद्ध व्यक्तींची शारीरिक क्षमता "इ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे कमी झालेली आढळल्यानंतर कुपोषितांबाबतही काही चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, कुपोषणात आणखीही काही गोष्टींचा अंतर्भाव असल्याने याबाबत नेमक्‍या निष्कर्षांपर्यंत अभ्यासकांना पोहोचता आले नाही.

No comments:

Post a Comment

ad