Monday, December 22, 2008

आरोग्याच्या प्रश्‍नांसाठी निसर्गोपचार

आरोग्याच्या प्रश्‍नांसाठी निसर्गोपचार


(डॉ. अजित जगताप)
आपल्या स्वास्थ्यासाठी मनःशांती, सात्त्विक आहार-विहार, व्यायाम व विश्रांती यांची गरज आहे. व्याधींमधून मुक्त होण्यासाठीही याच गोष्टींची आवश्‍यकता असते. जोडीला ज्या पंचमहाभुतांपासून आपले शरीर तयार झाले आहे, त्यांचाच उपचार म्हणून उपयोग केला, तर शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडून निवारण करता येते...

सध्याच्या गतिमान व ताणतणावाच्या काळात विकास व भौतिक सुखांच्या मागे लागल्यानंतर ओढवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबाबत गांधींचा निसर्गोपचार घराघरांत पोहोचविण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे.

आर्थिक बाबतीत व इतर विकासाच्या बाबतीत भारत महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत असताना वास्तवात मात्र प्रथम आपण मधुमेह, हृदयविकार, एड्‌स इ. विकारांत महासत्ता झाल्याचे दिसते. यासाठीच प्रथम आरोग्याचे सामान्य ज्ञान, निसर्गाचे नियम हे आपण समजावून घेतले पाहिजेत असे गांधीजींना वाटत होते. म्हणूनच १९०६ मध्ये आफ्रिकेत असताना "आरोग्याचे सामान्य ज्ञान' या नावाने "इंडियन ओपिनियन' या सदराखाली काही प्रकरणे लिहिली होती.

त्यांनी स्वतः निसर्गोपचाराचा पुरस्कार व अवलंब केला होता. पुढे भारतात आल्यावरसुद्धा त्यांच्या प्रत्येक आश्रमात व उरुळीकांचन येथे स्वतंत्र निसर्गोपचार आश्रम स्थापन केला. त्यांनी स्वतः उपचार केले व बऱ्याच रुग्णांना सहकार्य केले.

Qans2.jpgनिसर्गदेवतेनं धरतीमातेच्या कुशीत जन्मलेल्या प्रत्येक जीवाला अन्न, पाण्याची व्यवस्था भरभरून करून ठेवली आहे. तरीसुद्धा विकासाच्या नावाखाली आपण निसर्गापासून दूर दूर जाऊ लागलो, तसतसे वेगवेगळ्या व्याधींनी आपण त्रस्त होताना दिसतो आहोत.

निसर्गाचे नियम अत्यंत सोपे, साधे व सरळ असताना आपण ते पाळत नाही व त्यांचा परिणाम म्हणून आपणास विकार होतात. निसर्ग नियमांमध्ये ब्राह्म मुहूर्तावर उठणे, नैसर्गिक आहार, म्हणजे भूक लागेल तेव्हाच जेवणे, विहार यांमध्ये सुती, सैलसर कपडे, योग्य प्रमाणात व्यायाम- यामध्ये प्राणायाम, योगासने, चालणे, पोहणे, निसर्गाच्या सान्निध्यात जाणे यांचा समावेश होतो. तसे योग्य प्रमाणात विश्रांती हेही महत्त्वाचे आहे.

आपल्या दैनंदिनीची सुरुवातच मुळी सूर्योदयानंतर होते, त्यामुळे शरीरातील जैविक घड्याळ बिघडू लागते. त्यातच फास्ट लाईफ जगताना फास्ट मनी येतो, मग आपल्याला खायला वेळ नसतो. अशा वेळी फास्ट फूड समोर येतं, मग चालता चालता, बोलता बोलता, उभ्याने गाडीवर बसून खाता खाता केव्हा फास्ट डेथपर्यंत पोहोचतो ते कळत नाही. कमावलेला सर्व पैसा हॉस्पिटलमध्ये खर्च होतो.

आहारशास्त्राचे सर्व नियम धाब्यावर ठेवून लहानपणापासूनच बिस्किटे, चॉकलेट, बेकरी पदार्थ, स्वीटस्‌, कोल्ड्रिक, चिप्स, चहा, कॉफी, तळलेले पदार्थ, मसालेदार तिखट, चटपटीत अशा तामसी आहाराचे सेवन आपण करतो; तर खारवलेले, आंबवलेले, टिकाऊ प्रोसेस व रिफाइण्ड केलेले राजसीक आहाराचे सेवन करतो, त्यामुळे समाजात भ्रष्टाचार, पापाचार, अनाचार व फसवेगिरी वाढलेली दिसते.

कारण आपण जसे खाणार तसेच त्याचे रक्त तयार होणार. त्यातूनच रक्त, मांस, मेद, अस्थी, त्वचा व शुक्र धातू तयार होतात. मग भोगवादी संस्कृतीचे दर्शन होते.

म्हणूनच आपल्या स्वास्थ्यासाठी मनःशांती, सात्विक आहार-विहार, व्यायाम व विश्रांती यांची गरज आहे. व्याधींमधून मुक्त होण्यासाठीसुद्धा याच गोष्टींची आवश्‍यकता असते. जोडीला ज्या पंचमहाभुतांपासून (म्हणजेच माती, पाणी, तेज, वायू व आकाश) आपले शरीर तयार झाले आहे, त्यांचाच उपचार म्हणून उपयोग केला, तर शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडून व्याधी निवारण करता येते.

उपचारांमध्ये मातीपासून बनविलेल्या माती पट्ट्या, मातीचा लेप, पाण्याच्या उपचारा मध्ये थंड-गरम पाण्याच्या पट्ट्या, कटीस्नान, बाष्पस्नान, टब बाथ, सूर्यस्नान, उपवास, म्हणजेच लंघनम्‌‌‌ परम औषधम्‌ यांचा उपयोग केला जातो.

जोडीला मसाज, ऍक्‍युप्रेशर, चुंबकीय उपचार, न्युरोथेरपी, सुजोक, ऍक्‍युपंक्‍चर इ. औषधांविना वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धतींचा समावेश होतो. या सर्वांत आहाराचे योग्य मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गोपचार पद्धत ही पायाभूत व तात्विक उपचार पद्धती आहे; तर ऍलोपॅथी, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी या अल्टरनेटिव्ह उपचार पद्धती आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

गांधीजींनी असे स्पष्ट म्हटले होते, की ऍलोपॅथीची औषधे सर्वसामान्यांना परवडणारी नाहीत, यासाठी आरोग्याचे सामान्य ज्ञान व निसर्गोपचार हे घरोघरी, खेडोपाडी पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम सर्वप्रथम केले पाहिजे.

यासाठी निसर्गोपचार किंवा औषधाविना उपचार पद्धतीचे ज्ञान मिळविणे हा आपला हक्क आहे असे समजून या उपचार पद्धतीची ओळख आपण करून घेऊ या.
मिट्टी पानी धूप हवा
सब रोगों की यही दवा

- डॉ. अजित जगताप
निसर्गोपचारतज्ज्ञ, चिंचवड

No comments:

Post a Comment

ad