Friday, October 3, 2008

उपचार दातदुखीवर

उपचार दातदुखीवर


(डॉ. संजीव डोळे)
दातदुखीवर अनेक उपयुक्त होमिओपॅथिक औषधे उपलब्ध आहेत; मात्र दातांची योग्य काळजी घेण्याला पर्याय नाहीच. ........
या सादरीकरणात, आपण दातदुखी व त्यावरील उपयुक्त होमिओपॅथिक औषधे यांविषयी जाणून घेणार आहोत. हा आजार आपणास लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत भरपूर प्रमाणात दिसून येतो.

एकदा का दाढदुखी सुरू झाली, की मग रुग्णाला काहीच सुचत नाही. दातदुखीच्या वेदना इतक्‍या असह्य असतात, की त्या वेळी अक्षरश- जीव नकोसा वाटतो. काही जणांचे दात व दाढा किडलेल्या असतात याची कारणे वेगवेगळी आहेत. काही जणांचे दात खूप संवेदनशील असतात त्यामुळे थोड्या सुद्धा गरम किंवा थंड स्पर्शाने वेदना होतात. काही वेळा मार लागल्यामुळे वेदना होतात. बऱ्याच वेळा हिरड्यांना इन्फेक्‍शन होते व त्यामुळेही दात दुखू लागतात. बऱ्याच वेळा दात वरून चांगले दिसतात; परंतु आतून किडलेले असतात. त्यामुळे वेदना होतात व काही वेळा दातांतून रक्तही येते. पुष्कळ लोकांमध्ये दाढा काढल्यावरही वेदना तशाच राहिलेल्या असतात.

दातदुखीच्या वेदना सुरू झाल्या, की त्याबरोबर डोके दुखणे सुरू होते. त्या बाजूचा गाल लाल होतो तसेच सुजतो. स्पर्शही सहन होत नाही. अशा वेळी रुग्ण वेदनाशामक गोळ्या घेतो. त्याने वेदना काही काळ थांबतात पण नंतर परत सुरू होतात. बऱ्याच वेळा असे दिसून येते की या वेदना रात्री सुरू होतात व रुग्णाची झोपमोड होते. आजकाल आपल्याला दात किडण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये भरपूर प्रमाणात वाढल्याचे आढळून येते; याची कारणे अनेक आहेत. पहिल्यापासून मुलांना खूप चॉकलेट, मिठाई खायला देणे, थंड पेय देणे, तसेच दातांची निगा न घेणे, खाल्ल्यानंतर व्यवस्थित दात घासले नाहीत तर अन्नाचे कण दातात अडकतात व तेथे जंतूसंसर्ग होऊन ते किडण्यास सुरू होतात.

दातांची निगा घेताना खालील गोष्टींचे पालन करावे.

१) खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी व्यवस्थित चूळ भरावी.
२) सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.
३) खूपच थंड, गरम, कडक पदार्थांचे सेवन शक्‍यतो टाळावे.
४) लहान मुलांना खूप गोड व चॉकलेट, तसेच अतिथंड पदार्थ देणे टाळावे, तसेच नियमित दात घासायला लावणे.

होमिओपॅथिक औषधांचा वापर करून आपण अशा रुग्णांना आराम देऊ शकतो. मात्र, ही औषधे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

१) प्लॅंटॅगो - दातदुखीसाठी खूपच महत्त्वाचे व उपयुक्त औषध आहे. दाढेला कुठल्याही प्रकारचा स्पर्श चालत नाही. गालाला सूज येते, तसेच तोंडात लाळेचे प्रमाण वाढलेले असते. दात मोठे झाल्यासारखे वाटतात. जेवण करत असताना दात दुखत नाहीत. दातांच्या वेदना डोळ्यांपर्यंत जातात.

२) क्रिओसोट - दात किडल्यानंतर त्रास होत असेल, तर उपयुक्त औषध आहे. लहान मुलांमध्ये दात उगवल्यावर लगेच किडायला सुरवात होते. दातदुखीमुळे मुलांना रात्री झोप येत नाही. हिरड्या सुजतात व त्यातून रक्त येते. दात काळे पडतात. तोंडाला घाणेरडा वास येतो.

३) चामोमिला - दातदुखीच्या वेदना थांबविण्यासाठी महत्त्वाचे असे उपयुक्त औषध आहे. या औषधाने वेदना खूप प्रमाणात कमी होतात. वेदना या जबड्यापासून कानापर्यंत, डोक्‍यात जातात. दातदुखी गरम पाण्याने वाढते. कॉफी पिल्यानंतर त्रास वाढतो. दातदुखी रात्री जास्त होते. ज्या बाजूची दाढ दुखते त्या बाजूचा गाल लाल आणि गरम होतो. चिडचिड वाढते.

४) स्टॅफिसऍग्रिया - स्त्रियांमध्ये पाळी चालू असताना दातदुखीचा त्रास होतो. दात काळसर झालेले असतात. हिरड्या सुजलेल्या असतात व त्यातून रक्त येते. दाढेच्या शेजारील घशामधील ग्रंथी सुजलेल्या असतात. खाल्ल्यानंतर झोपण्याची इच्छा होते. रुग्ण खूपच रागीट होतो. त्यामुळे जेव्हा राग येतो तेव्हा दाताच्या वेदना वाढतात.

५) पल्सेटिला - सर्वसाधारणपणे स्त्रियांमध्ये वापरले जाणारे औषध. जीभ कोरडी असली तरी रुग्णाला तहान खूपच कमी असते. दातदुखी तोंडात गार पाणी घेतल्यावर थांबते. तोंडाला घाणेरडा वास येतो.

६) थुजा - रुग्ण काळसर रंगाचा व जाड असतो. दात किडलेले असतात. दाताचा वरचा भाग व्यवस्थित असतो पण मूळचा भाग किडलेला असतो. त्याच्या अंगावर चामखिळी असतात.

७) मॅग कार्ब - अक्कलदाढ येताना वेदना होतात त्या वेळी दिल्यास वेदना कमी होतात. मुख्यत- डाव्या बाजूची दाढ दुखते. बाळंतपणात जर दाढ दुखत असेल तर महत्त्वाचे औषध.

८) अरनिका - वेदना कमी करण्यासाठी गुणकारी औषध. मुख्यत- दात काढून टाकल्यावर वेदना खूप काळ टिकल्या, तर याचा चांगला उपयोग होतो.

इतर काही औषधे - मर्क सॉल, मेझेरियम, कॉफीया.

- डॉ. संजीव डोळे, होमिओपॅथीतज्ज्ञ, पुणे

No comments:

Post a Comment

ad